महावीर सांगलीकर
यादव वंशाचा इतिहास
यादव हा भारतातील एक प्राचीन आणि अत्यंत महत्त्वाचा वंश आहे. प्राचीन भारतातील प्रमुख वंशांमध्ये त्याची गणना होते. या वंशाची स्थापना यदु यांनी केली. यदु हे ययाती आणि देवयानी यांचे ज्येष्ठ पुत्र होते.
प्राचीन काळात यादवांबरोबरच आभीर, अंधक, वृष्णी इत्यादी कुळांचाही या वंशात समावेश होत असे, कारण हे सर्व यदुचे वंशज होते. त्याचप्रमाणे चेदी, भोज इत्यादी राजघराणी देखील यदुच्या वंशातूनच निर्माण झाली होती.
प्राचीन भारतातील अनेक राजवंश कालांतराने नष्ट झाले, परंतु यादव वंशाचे वंशज आजही मोठ्या संख्येने भारतभर आढळतात. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यादव ही एक मोठी जात आहे. याशिवाय अहीर, भट्टी राजपूत, पंजाबमधील सैनी, महाराष्ट्रातील जाधव, राजपूतांतील जादौन, जडेजा इत्यादी समाजही यदुचे वंशज मानले जातात.
महाराष्ट्रातील मराठा समाजात जाधव हे प्रसिद्ध कुळ आहे. हे मूळचे यादवच आहेत. जाधव कुळाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुळात १५० हून अधिक उपकुळे आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे या कुळाचे अनेक उपगट निर्माण झाले.
त्याचप्रमाणे भारतातील राजपूत, जाट आणि इतर अनेक प्रमुख समाजांमध्येही यादव कुळ आढळते. दक्षिण भारतातील अनेक समाजांमध्येही यादव वंशाचे अस्तित्व दिसून येते.
आज बहुसंख्य यादव हे शैव किंवा वैष्णव धर्माचे अनुयायी आहेत. मात्र काही यादव आजही जैन धर्माचे अनुयायी आहेत.
प्राचीन काळातील यादव आणि जैन धर्म
यादव वंशाचा जैन धर्माशी प्राचीन काळापासून अतिशय जवळचा संबंध राहिला आहे.
भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नेमिनाथ
भगवान श्रीकृष्ण हे यादव वंशातील सर्वात प्रभावशाली आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे चुलत बंधू म्हणजे अरिष्टनेमि, ज्यांना नेमिनाथ या नावानेही ओळखले जाते. पुढे ते जैन धर्माचे २२ वे तीर्थंकर झाले.
जैन परंपरेत भगवान नेमिनाथांच्या मूर्तीवर शंख हे चिन्ह असते. हे चिन्ह यादव वंशाशी संबंधित आहे.
यदुकुळात शूरसेन नावाचे प्रसिद्ध राजा होऊन गेले. त्यांना दहा पुत्र होते. त्यांपैकी सर्वात मोठे समुद्रविजय आणि सर्वात धाकटे वासुदेव होते. अर्थातच समुद्रविजय आणि वासुदेव हे सख्खे भाऊ होते. वासुदेव आणि देवकी यांच्यापासून श्रीकृष्णाचा जन्म झाला, तर समुद्रविजय आणि शिवादेवी यांच्यापासून अरिष्टनेमि यांचा जन्म झाला. म्हणजेच श्रीकृष्ण आणि अरिष्टनेमी हे सख्खे चुलतभाऊ होते.
पुढे अरिष्टनेमि यांचा विवाह राजा उग्रसेन यांच्या कन्या राजीमती हिच्याशी ठरला. राजा उग्रसेन हे श्रीकृष्णाचे मातामह, म्हणजेच देवकीचे वडील होते.
जैन परंपरेतील कथेनुसार, एकदा राजकुमार अरिष्टनेमि यांनी भगवान श्रीकृष्णांच्या शस्त्रागारात त्यांचा शंख फुंकला होता. ही कथा अनेक प्राचीन जैन ग्रंथांत आढळते. या कथेनुसार तयार केलेले चित्र तिजारा येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात लावण्यात आले आहे.

अनेक विद्वानांच्या मते, भगवान श्रीकृष्णांचे गुरु ऋषी घोर आंगिरस हे प्रत्यक्षात अरिष्टनेमि होते.
जैन परंपरेतील यादव वंश आणि भगवान श्रीकृष्ण
प्राचीन जैन साहित्यातील अनेक ग्रंथांमध्ये यादव वंश, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान अरिष्टनेमि यांचे सविस्तर वर्णन अनेक ठिकाणी आले आहे.
अंतगडदसा सूत्र या प्राचीन जैन ग्रंथात अरिष्टनेमि आणि श्रीकृष्ण यांचे विस्तृत वर्णन आहे. हा जैन धर्मातील सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक मानला जातो.
वसुदेवहिंडी या दुसऱ्या प्राचीन जैन ग्रंथात भगवान श्रीकृष्णांचे वडील वासुदेव यांचे सविस्तर चरित्र दिलेले आहे.
जैन परंपरेत ६३ महान व्यक्तींना त्रिषष्टि शलाकापुरुष असे म्हटले जाते. त्यामध्ये—
- २४ तीर्थंकर
- १२ चक्रवर्ती
- ९ बलभद्र
- ९ वासुदेव (नारायण)
- ९ प्रतिवासुदेव (प्रतिनारायण)
यांचा समावेश होतो.
विशेष म्हणजे या ६३ शलाकापुरुषांपैकी एकाच यादव कुटुंबातील तीन व्यक्ती आहेत—
- बलराम — ९ बलभद्रांपैकी एक
- भगवान श्रीकृष्ण — ९ वासुदेवांपैकी एक
- भगवान अरिष्टनेमि (नेमिनाथ) — श्रीकृष्णांचे चुलत बंधू आणि जैन धर्माचे २२ वे तीर्थंकर
त्याचप्रमाणे जैन धर्माचे 20वे तीर्थंकर भगवान मुनिसुव्रत हे देखील यादव होते.
विशेष म्हणजे यादवांच्या प्राचीन इतिहासात जी महत्वपूर्ण ठिकाणे होती, ती जैनांसाठीही महत्वाची ठिकाणे होती. उदा. शौरीपुर, मथुरा, द्वारका, देवगिरी, विदर्भ, कर्नाटक वगैरे. याचे कारण यादव हे जैनधर्मिय होते.
मध्ययुगातील यादव आणि जैन धर्म
देवगिरीचे यादव
महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांनी इ.स. ८६० ते १३१७ या काळात भारतातील विस्तीर्ण प्रदेशावर राज्य केले. त्यांचे साम्राज्य उत्तरेला नर्मदा नदीपासून दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते.
या काळात मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांचा विकास झाला. त्याचबरोबर जैन धर्मालाही मोठा राजाश्रय मिळाला.
राजा दृढप्रहार
देवगिरीच्या या राजवंशाचा संस्थापक राजा दृढप्रहार होता.
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथील एका जैन शिलालेखात दृढप्रहार याच्या जन्माची कथा मिळते. तसेच अकराव्या शतकातील जैन आचार्य जिनप्रभसूरी यांच्या ‘नासिक्यकल्प’ या ग्रंथातही त्याचा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार दृढप्रहार हे जैन धर्मीय राजा होता, तो आठवे जैन तीर्थंकर भगवान चंद्रप्रभ यांचा परम भक्त होता, आणि त्याने भगवान चंद्रप्रभ यांचे मंदिर बांधले होते.
दृढप्रहार याने चंद्रप्रभ स्वामी यांच्या सन्मानार्थ त्याने आपल्या राजधानीचे नाव चंद्रादित्यपूर असे ठेवले.
या राजवंशातील पुढील अनेक राजेही जैन धर्माशी संबंधित होते. त्यामध्ये सेऊणचंद्र, सेऊणचंद्र द्वितीय, भिल्लम प्रथम, भिल्लम पंचम, जैत्रपाल, कृष्ण, रामचंद्र, महादेव इत्यादींचा उल्लेख करता येईल.
दृढप्रहार हा सेऊण (यादव) राजवंशातील इतिहासात स्पष्टपणे नोंद झालेल्या सर्वात प्राचीन राजा मानला जातो.
या राजवंशातील पुढील अनेक राजेही जैन धर्माशी संबंधित होते. त्यामध्ये सेऊणचंद्र, सेऊणचंद्र द्वितीय, भिल्लम प्रथम, भिल्लम पंचम, जैत्रपाल, कृष्ण, रामचंद्र, महादेव इत्यादींचा उल्लेख करता येईल.
देवगिरी
पुढे यादवांची राजधानी देवगिरी ही झाली.
देवगिरीच्या किल्ल्यावर मध्ययुगीन जैन मंदिर होते. आज ते भारतमाता मंदिर म्हणून ओळखले जाते.
पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज, पुणे यांनी देवगिरी येथे केलेल्या केलेल्या उत्खननात अनेक जैन मूर्ती आणि इतर पुरातत्त्वीय अवशेष सापडले. त्यावरून येथे आणखी एक मोठे जैन मंदिर अस्तित्वात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
हे जैन अवशेष आणि मुर्त्या देवगिरी संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात यादवकालीन अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. त्यांमध्ये जैन धर्मासंबंधी अनेक उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ, यादव राजे किंवा राण्यांनी जैन मंदिरांसाठी जमिनींची दाने दिली किंवा मंदिरे बांधून दिली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील अनेक राण्या जैन धर्माच्या अनुयायी होत्या. त्यांपैकी अनेक कर्नाटकातून आलेल्या होत्या.
देवगिरीच्या यादवांचे अनेक सेनापती आणि प्रशासकीय अधिकारीही जैन धर्माचे अनुयायी होते.
देवगिरीच्या यादव राजांनी जैन धर्माला दिलेला आश्रय केवळ धार्मिक नव्हता, तर सांस्कृतिकही होता.
यादव काळात अनेक जैन मंदिरे उभारली गेली, जैन बसद्या आणि मठांना जमिनींची दाने देण्यात आली. जैन विद्वानांना राजाश्रय मिळाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक जैन शिलालेख कोरण्यात आले. यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्रातील जैन संस्कृती मोठ्या प्रमाणात विकसित झाली.
यादवांच्या राज्यकाळात महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक जैन आचार्यांनी संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि कन्नड भाषांमध्ये महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. या काळात जैन तत्त्वज्ञान, व्याकरण, काव्य, पुराणे आणि चरित्रग्रंथांची समृद्ध परंपरा निर्माण झाली. या साहित्याचा प्रभाव पुढे मराठी वाङ्मयावरही पडला.
यादव आणि यापनीय संप्रदाय
यादव काळात जैन धर्मातील यापनीय संप्रदायाचा मोठ्या वेगाने विकास झाला.
हा संप्रदाय दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही प्रमुख संप्रदायांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा होता.
चौदाव्या शतकाच्या प्रारंभी यादव राजवंशाचा अंत झाला आणि त्यानंतर काही दशकांतच यापनीय संप्रदायही लुप्त झाला.
दक्षिण भारतातील यादव
दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचे काही सम्राट तसेच होयसळ राजवंशातील राजे हेही यादव वंशातील होते आणि त्यांचे जैन धर्माशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते.
होयसळ राजवंशाची स्थापना जैन आचार्य सिंहनंदी यांनी केली होती.
आधुनिक काळातील यादव आणि जैन धर्म
आता प्रश्न असा निर्माण होतो की आजही यादव समाजात जैन धर्माचे अनुयायी आहेत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी बराच काळ प्रयत्न केला. मला मिळालेली माहिती अशी आहे की उत्तर प्रदेशातील शौरिपूर या जैन तीर्थक्षेत्राच्या परिसरात तसेच इतर काही ठिकाणी परंपरेने जैन धर्माचे पालन करणारे अनेक यादव आजही आहेत. हे जैन यादव शौरिपूर येथील जैन मंदिरांची नियमित तीर्थयात्रा करतात.
शौरिपूर हे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नेमिनाथ यांचे जन्मस्थान आहे.
उत्तर भारतातील जैन समाजातील लमेचुवाल ही जात प्रत्यक्षात जैन धर्माचे पालन करणाऱ्या यादव लोकांचा समूह आहे. त्यांना यदुवंशी जैन असेही म्हटले जाते.
या समाजात जैन या आडनावाबरोबरच यादव, ठाकूर इत्यादी आडनावेही आढळतात.
आधुनिक काळात यादव समाजातून काही जैन मुनीही झाले आहेत. त्यांपैकी रमणीक मुनी हे एक प्रसिद्ध आणि उदारमतवादी जैन साधू आहेत.
यादव समाजातील आणखी एक तरुण ब्रह्मचारी म्हणजे श्री ब्रह्मरूपी महाराज. ते यादव, आदिवासी आणि बहुजन समाजामध्ये जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार करत आहेत.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते भगवान राम यांचे वीतरागी जैन स्वरूप समाजासमोर मांडत आहेत.

उत्तर भारतात यादव समाजात जैन धर्माबद्दल आस्था दिसून येते.
हेही वाचावे……
Jains & Jainism (Online Jain Magazine)
They Won Hindi (हिंदी कहानियां व लेख)
TheyWon
English Short Stories & Articles
