पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी राणी अब्बक्का

महावीर सांगलीकर


ई-मेल: jainway@gmail.com

तुलुनाडूच्या चौटा राजवंशातील राणी अब्बक्का (इ.स. १५२५–१५७०) हिने सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचा अनेक वेळा पराभव केला. पोर्तुगीजांची स्थलसेना आणि आरमार या दोघांनाही एकाच वेळी पराभूत करणारी ही पराक्रमी राणी भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व मानली जाते.

राणी अब्बक्का ही युरोपीय वसाहतवाद्यांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणारी पहिली भारतीय व्यक्तिहोती. तिने पोर्तुगीजांच्या राजकीय आणि व्यापारी महत्त्वाकांक्षांना प्रभावीपणे आळा घातला. तिच्यामुळे पोर्तुगीजांना कर्नाटकमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही.

तुलुनाडूचा चौटा राजवंश

कर्नाटक आणि केरळमधील तुळू भाषिक प्रदेशाला तुलुनाडू असे म्हणतात. या प्रदेशात कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे तसेच केरळमधील कासरगोड जिल्ह्याचा समावेश होतो.

चौटा राजवंश हा मध्ययुगातील एक महत्त्वाचा राजवंश होता. चौटा राजे जैन धर्माचे अनुयायी होते. इ.स. ११६० ते १८६७ या जवळपास ७०० वर्षांच्या कालावधीत चौटा राजवंशाने तुळूनाडूवर राज्य केले.

चौटा राजवंशाच्या उदयापूर्वी येथे होयसळ राजवंशातील राजा विष्णुवर्धन याचे राज्य होते. मात्र त्याहीपूर्वी या प्रदेशावर चौटांच्या पूर्वजांचे राज्य होते.

राणी अब्बक्का

याच चौटा राजघराण्यात सोळाव्या शतकात राणी अब्बक्का सत्तेवर आली. ती चौटा राजा तिरुमलराय (तिसरा) याची भाची होती. तिरुमलराय याने तिला बालपणापासूनच राज्यकारभार, धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धकलेचे प्रशिक्षण दिले.

तिरुमलराय याच्या निधनानंतर अब्बक्का चौटा राजवंशाची प्रमुख बनली.

अब्बक्का सत्तेवर आली, त्याच काळात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांचे आगमन झाले होते. वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला होता आणि इ.स. १४९८ मध्ये तो कालीकट येथे पोहोचला होता. त्यानंतर अनेक पोर्तुगीज व्यापारी भारतात येऊ लागले. आपल्या शक्तिशाली आरमाराच्या बळावर त्यांनी हळूहळू पश्चिम किनाऱ्यावरील सागरी व्यापारमार्गांवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

त्या काळात मसाले, तांदूळ, कापूस, कापड इत्यादी वस्तू दक्षिण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून इराण आणि अरब देशांत निर्यात होत असत. पोर्तुगीजांनी या व्यापारावर निर्बंध लादले. त्यांनी किनारपट्टीवरील सर्व राजे आणि व्यापाऱ्यांना आदेश दिला की, या सर्व वस्तू त्यांनी पोर्तुगीजांनी ठरविलेल्या किमतीत त्यांनाच विकाव्यात; त्यानंतर निर्यात पोर्तुगीज करतील. त्यांचा हेतू शेतकऱ्यांकडून कमी दरात माल विकत घेऊन तो आखाती देशांत महाग दराने विकून प्रचंड नफा कमावण्याचा होता.

राणी अब्बक्काचे धैर्य

हे निर्बंध शेतकरी आणि राज्याच्या सार्वभौमत्वासाठी घातक होते. त्यामुळे राणी अब्बक्काने त्यांचा विरोध केला. कालीकटच्या झामोरिन राजाच्या मदतीने तिने मसाले आणि इतर मालाने भरलेली जहाजे आखाती देशांकडे रवाना केली.

यामुळे संतप्त झालेल्या पोर्तुगीजांनी तिच्या विरोधात युद्ध पुकारले. मात्र धाडसी आणि दूरदृष्टी असलेल्या अब्बक्काला याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे तिने युद्धाची पूर्ण तयारी केली होती.

चौटा राज्याची राजधानी उल्लाल हे महत्त्वाचे बंदर होते. पोर्तुगीजांनी या बंदरावर हल्ला केला. परंतु अब्बक्काच्या आरमाराने त्यांच्या जहाजांना वेढा घातला आणि त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तिच्या सैनिकांनी चार पोर्तुगीज जहाजे जप्त केली. या लढाईत केलाडीचा राजा वेंकटप्पा नायक आणि कालीकटचा झामोरिन यांनी अब्बक्काला मदत केली.

राणी अब्बक्काचा अतुलनीय पराक्रम

इ.स. १५६७ मध्ये पोर्तुगीजांनी संपूर्ण तयारीनिशी पुन्हा उल्लालवर आक्रमण केले. या मोहिमेत पोर्तुगीज सेनापती जो पिक्सेटो आणि आरमारप्रमुख अॅडमिरल मस्कारेन्हास यांनी स्वतः भाग घेतला.

पोर्तुगीजांनी उल्लाल शहर ताब्यात घेतले. त्यांनी अनेक घरे जाळली, मंदिरे उद्ध्वस्त केली आणि जो पिक्सेटो आपल्या सैनिकांसह अब्बक्काच्या राजवाड्यात घुसला. मात्र तोपर्यंत राणी गुप्त मार्गाने सुरक्षित बाहेर पडली होती.

राजधानीबाहेरील एका मशिदीत आश्रय घेतल्यानंतर त्याच रात्री राणीने आपल्या निवडक २०० सैनिकांसह पुन्हा उल्लालमध्ये प्रवेश केला आणि पोर्तुगीजांवर अचानक हल्ला चढवला. हा छापामार हल्ला इतका जबरदस्त होता की, त्यात जो पिक्सेटो आणि त्याचे ७० सैनिक ठार झाले. अनेक सैनिक जखमी झाले, तर उरलेले पळून गेले.

त्याच वेळी अब्बक्काच्या ५०० सैनिकांनी पोर्तुगीज आरमारावरही हल्ला केला. या हल्ल्यात अॅडमिरल मस्कारेन्हास आणि त्याचे बहुतांश सैनिक मारले गेले.

एकाच युद्धात शत्रूच्या स्थलसेनेचा सेनापती आणि आरमाराचा प्रमुख दोघेही मारले गेल्याची ही इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते.

पुढील वर्षी राणी अब्बक्काने ६,००० सैनिकांसह पोर्तुगीजांच्या ताब्यातील मंगळूर किल्ल्यावर हल्ला केला. या वेळी पोर्तुगीजांना किल्ला सोडून पळ काढावा लागला.

काही दिवसांनी पोर्तुगीजांचे आरमार पुन्हा उल्लालच्या किनाऱ्यावर येऊन थांबले. योग्य संधी साधून ते बंदरावर हल्ला करणार होते. मात्र याही वेळी अब्बक्काने त्यांना चकवा दिला.

रात्रीच्या अंधारात तिचे नाविक छोट्या होड्यांमधून पोर्तुगीज युद्धनौकांजवळ पोहोचले आणि त्यांनी अचानक शेकडो अग्निबाण व गोळे युद्धनौकांवर फेकले. त्यामुळे अनेक जहाजांना आग लागली. जीव वाचवण्यासाठी पोर्तुगीज सैनिकांनी समुद्रात उड्या मारल्या, परंतु त्यांना अब्बक्काच्या सैनिकांनी पकडले. पोर्तुगीज नोंदींनुसार या हल्ल्यात दोन युद्धनौका बुडाल्या आणि सुमारे २०० नाविक मारले गेले.

राणी अब्बक्काच्या या पराक्रमांची चर्चा त्या काळी युरोप, अरब जगत आणि इराणमध्येही होत होती.

राणी अब्बक्काची सेना

अब्बक्काची सेना संख्येने लहान असली तरी ती अत्यंत प्रशिक्षित आणि लढाऊ होती. तिच्या आरमारात मुख्यतः मुस्लिम आणि कोळी समाजातील नाविक होते, तर स्थलसेनेत सर्व समाजांतील सैनिक सहभागी होते.

हे सैनिक विशेष प्रकारचे अग्निबाण वापरत असत. अब्बक्काकडे सक्षम तोफखानाही होता.

राणी अब्बक्काच्या शौर्यामुळे पोर्तुगीजांच्या राजकीय आणि व्यापारी विस्ताराला मोठा अडथळा निर्माण झाला आणि त्यांना कर्नाटकमध्ये आपले पाय रोवता आले नाहीत.

साधी राहणी आणि प्रजावत्सल कारभार

इटालियन प्रवासी पिएत्रो देल्ला व्हॅले याने राणी अब्बक्काची भेट घेतली होती. त्याच्या नोंदीनुसार राणी अब्बक्काची राहणी अत्यंत साधी होती.

अब्बक्काचे कार्य केवळ राज्याच्या संरक्षणापुरते मर्यादित नव्हते. ती प्रजावत्सल शासिका होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी तिने अनेक बंधारे बांधले. विविध सामाजिक कामे केली. ती धार्मिक वृत्तीची होती. ती जैन धर्माची अनुयायी होती आणि भगवान सोमेश्वर यांना आपले कुलदैवत मानत होती.

आजची स्मृती

पूर्वी राणी अब्बक्काविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र अलीकडील संशोधनामुळे तिच्या कार्याचे अनेक पैलू प्रकाशात आले आहेत. तिच्या सन्मानार्थ अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

  • भारतीय तटरक्षक दलाने किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या पाच जहाजांपैकी पहिल्या जहाजाला ‘राणी अब्बक्का’ हे नाव दिले आहे.
  • कर्नाटकमध्ये दरवर्षी ‘अब्बक्का उत्सव’ साजरा केला जातो.
  • तिच्या नावाने संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे.
  • तुळू भाषेच्या अभ्यासासाठी ‘राणी अब्बक्का तुळू अध्ययन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
  • २०२३मध्ये राणी अब्बक्काच्या स्मरणार्थ भारतीय टपालखात्याने एक तिकीट प्रकशित केले.
  • उल्लाल, बेंगळुरू आणि मुडबिद्री येथे तिचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
  • तिच्या जीवनावर अनेक लेख, संशोधनग्रंथ आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
राणी अब्बक्का संग्रहालय

हेही वाचावे……

जैन धर्माचा ऱ्हास कसा झाला? (भाग पहिला)जैन संस्कृतीच्या सांगली जिल्ह्यातील प्राचीन पाऊलखुणा
मुघल काळातील जैन धर्म आणि समाजसिरीभूवलय: एक अदभूत ग्रंथ
जैनांचे मराठी भाषेतील योगदानमराठी भाषेचे प्राचीनत्व!
कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जाभारतीयांचा इतिहासबोध

Jains & Jainism (Online Jain Magazine)

They Won Hindi (हिंदी कहानियां व लेख)

TheyWon
English Short Stories & Articles

न्यूमरॉलॉजी हिंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *