संजय सोनवणी
लिखित पुराव्यांनुसार मराठी भाषेचा इतिहास किमान 2200 वर्ष जुना जातो. प्राचीन महाराष्ट्री प्राकृताचीच विकसित होत आलेली अवस्था म्हणजे आजची आपण बोलतो-लिहितो ती मराठी. वररुची याने आद्य महाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण इसपू 200च्या आसपासच लिहिले होते, याचा अर्थ त्याआधीही कैक शतके ही भाषा बोलीभाषा म्हणून प्रचलित होती.
इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट, पाले आणि लोहगड येथील शिलालेख या प्राचीन मराठीचे लिखित रूप दर्शवतात. महाराष्ट्रात जैन धर्म किती प्राचीन काळातच पोचला होता याचेही पाले व लोहगड येथील शिलालेख निदर्शक आहेत.
यानंतर सातवाहन काळातील बौद्ध विहारांतील असंख्य शिलालेख आज उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील साहित्य, काव्य आणि महाकाव्यांचा इतिहासही इतकाच मागे जातो. हाल सातवाहन राजाने संकलित केलेल्या 700 गाथांचा समावेश असलेले गाथा सप्तशती तर आज काव्यरसिकांना चांगलेच माहित आहे. पण आद्य रामकाव्य हेही महाराष्ट्री प्राकृतातच लिहिले गेले होते (इसवी सनाच्या पहिल्या शतकात) तर वाल्मीकीचे रामायण इसवी सनाच्या तिसऱ्या शतकानंतर लिहिले गेले हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
आद्य रामकाव्य लिहिण्याचा मान प्राचीन मराठीकडे जातो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे आद्य रामकाव्य म्हणजे पउमचरीय. हे लिहिले विमल सुरी यांनी इसवी सन 4 मध्ये, म्हणजे जैन तीर्थंकर महावीर यांच्या निर्वाणानंतर 530 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आपल्या काव्यातच विमल सुरी यांनी हे वर्ष दिले आहे. यातील रामकथेचे मुलस्त्रोत हे पूर्णतया स्वतंत्र असून जैन जीवनदृष्टीचा या काव्यावर फार मोठा प्रभाव आहे.
याच काळातील अंगाविज्जा हा तत्कालीन समाजजीवन व संस्कृतीचे दर्शन घडवणारा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ लिहिला गेला. चवथ्या शतकातील संघदास गणी यांनीही वासुदेव हिंडी हे महाकाव्य लिहिले. महाराष्ट्री प्राकृतावर जैन साहित्यिकांचे मोठे ऋण आहे. त्यांनी महाराष्ट्री प्राकृतात अपार ग्रंथसंपदा लिहिली, परंतु त्यांचे योगदान आजचे मराठी भाषक विसरल्यासारखे दिसते. याशिवायही महाराष्ट्री प्राकृतात विपुल म्हणता येईल अशी रचना झालेली आहे. पण आपला भाषाभिमान बेतास बात असल्याने आपले या साहित्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही हेही दुर्दैवी आहे.
मराठी भाषेचे प्राचीनत्व: प्राकृत, मराठी आणि संस्कृत
संस्कृतमधून मराठी भाषेचा उगम झाला हे जुने मत आता मान्य होणार नाही एवढे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत. संकरीत संस्कृतातील एकमेव मिळणारा प्राचीन पुरावा म्हणजे इसवी सन १६० चा राजा रुद्रदामनचा शिलालेख. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व दाखवणारा एकही शिलालेखीय अथवा नाणकीय पुरावा उपलब्ध नाही. महाराष्ट्री प्राकृताचे शिलालेखीय पुरावे मात्र त्यापेक्षा प्राचीन तर आहेतच पण विपुल प्रमाणात आहेत.
मराठी हीच महाराष्ट्राची आद्य भाषा होती, स्वतंत्र होती व आहे ही मराठी माणसाला अभिमानाची बाब वाटायला हवी, आणि त्यासाठी अनेक पुरावे आहेत. वैदिक भाषा आणि संस्कृत भाषा या एकच मानण्याच्या प्रवृत्तीतून हा गैरसमज जोपासला गेला त्यामुळे आज मराठी ही दुय्यम भाषा आहे असा समज निर्माण झाला. खरे तर वैदिक भाषेवरही प्राकृत भाषांचा मोठा प्रभाव आहे हे अनेक विद्वानांनी साधार सिद्ध केले आहे.
फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ ज्यूल्स ब्लॉख यांनी भारतीय भाषांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी :
- ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२)
- मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे.
- मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५),
- अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८)
- हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१)
- प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२)
- सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४).
मराठी भाषेचे प्राचीनत्व
मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. महाराष्ट्री प्राकृत भाषा तिस-या शतकात मध्य आशियातील निया शहरापर्यंत पोहोचली होती, तेथिल राजादेश लिहिलेल्या लाकडी पाट्या सापडल्या असून त्यात “महानुराया लिहती” सारख्या आजही मराठी भाषेत प्रचलित असलेली वाक्ये मिळून येतात. यावरून प्राचीन काळी झालेला मराठीचा प्रसार आपल्या लक्षात येतो.
खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत.
संस्कृत व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत.
“भाषेचा उगम’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे.
मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते, परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.
मराठी भाषा ही प्राचीन काळापासून साहित्य व्यवहाराची भाषा राहिलेली आहे. स्त्रियांनीही या भाषेत काव्यलेखन केलेले आहे. एकट्या गाथा सप्तशतीमध्ये २८ कवयित्रीनी आपले काव्य-योगदान दिलेले आहे. ही सातवाहनकाळापासून राजभाषाही राहिलेली आहे. संस्कृतअभिमानी मानतात तशी ही ग्राम्य लोकांची भाषा असती तर असे झाले नसते.
मराठी भाषेचे प्राचीनत्व
विमल सुरींच्या आद्य महाकाव्यात येणारी नुसती रामकथाच नव्हे तर त्यात येणारे समाजजीवनही वास्तवपूर्ण आहे. वासुदेव हिंडी तर जगातील अतिप्राचीन प्रवासवर्णन असल्याचे मत पाश्चात्य अभ्यासकांनीही व्यक्त केले आहे.

प्राचीन महाराष्ट्री प्राकृत विकसित होत, कालौघात बदल स्वीकारत मुकुंदराज-ज्ञानेश्वरांच्या मराठीपर्यंत आले. शिवकालीन पत्रव्यवहारातील मराठी, तुकोबारायांच्या अभंगातील मराठी इंग्रजकाळात आधुनिकतेचा स्पर्श होत अजून बदलत आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील भाषेपर्यंत आलेली आहे.
प्राचीन मराठीतील असंख्य शब्द आजही आपल्या नित्य बोलण्यात असतात, आणि हे शब्द संस्कृतात सापडून येत नाहीत हे विशेष.
जी भाषा जिवंत असते तीच कालानुसार परिवर्तने स्वीकारत असते. नवीन शब्द शोधणे वा अन्य भाषांतून उधार घेणे, अभिव्यक्तीचे व्याकरण बदलणे आणि नव्या जोमाने व्यक्त होण्यातून भाषेचा आणि त्या सोबतच मानवी संस्कृतीचाही विकास करणे हे जिवंत भाषांचे वैशिष्ट्य असते आणि मराठी या निकषावर पूर्णपणे टिकते. मराठी ही एक जिवंत भाषा आहे. तिला आज पुन्हा एकदा ज्ञानभाषा बनवण्याची तेवढीच आवश्यकता आहे. मराठीचा नव्याने जागर करत तिला पुन्हा प्राचीन वैभव प्राप्त करून देण्याची आपली जबाबदारी आहे.
++++
संजय सोनवणी हे प्रसिद्ध लेखक, विचारवंत, धर्म चिकित्सक आणि इतिहास संशोधक आहेत. विविध विषयांवर त्यांची आजपर्यंत ११० पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये लिहितात.
हेही वाचावे……
Jains & Jainism (Online Jain Magazine)
They Won Hindi (हिंदी कहानियां व लेख)
TheyWon
English Short Stories & Articles
