जैन धर्माचा ऱ्हास कसा झाला? (भाग पहिला)

महावीर सांगलीकर

ई-मेल: jainway@gmail.com

जैन धर्माच्या ऱ्हासाची बाह्य कारणे

या लेखात मी जैन धर्माच्या ऱ्हासाचे एक बाह्य आणि मोठे कारण दिले आहे. या लेखाच्या पुढच्या भागात पुढच्या भागात जैन धर्माच्या ऱ्हासाची अंतर्गत कारणांची चर्चा करेन -लेखक


अनेकदा असे मानले जाते की शैव आणि वैष्णव धर्म अधिक प्रभावशाली झाल्यामुळे, तसेच राजाश्रय संपल्यामुळे जैन धर्माचा ऱ्हास झाला. आदि शंकराचार्य, रामानुजाचार्य यांसारख्या शैव-वैष्णव आचार्यांनी जैन आचार्यांना वादविवादात पराभूत केले, किंवा बळाचा वापर करून जैनांचे धर्मांतर केले, जैन धर्म नष्ट केला, तसेच जैन मंदिरे शैव किंवा वैष्णव मंदिरांमध्ये रूपांतरित केली, असे आरोपही केले जातात.

परंतु, जेव्हा आपण इतिहासातील घटनांचा कालक्रम (Timeline) पाहतो, तेव्हा हे सर्व आरोप अर्धसत्य आहेत असल्याचे स्पष्ट होते.

शंकराचार्यांच्यामुळे सुधन्वा हा जैन राजा वैदिक झाला, तर, रामानुजाचार्यांच्यामुळे बिट्टीदेव हा जैन राजा वैष्णव झाला, पण याचा अर्थ त्यांच्यामुळे जैन धर्माला ओहोटी लागली असा होत नाही.

प्रत्यक्षात, जैन धर्म तेराव्या शतकापर्यंत आणि अनेक ठिकाणी सोळाव्या शतकापर्यंत भारतातील अनेक प्रदेशांमध्ये प्रमुख धर्मांपैकी एक होता. भारतीय समाजात जैन धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने होते. विशेषतः दक्षिण आणि पश्चिम भारतात तो लोकधर्म बनला होता. समाजातील सर्व स्तरांमध्ये जैन धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर असत. याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

जैन धर्मीय राज्यकर्ते

आठव्या-नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत आणि काही ठिकाणी सोळाव्या शतकापर्यंत दक्षिण आणि पश्चिम भारतातील अनेक प्रदेशांवर जैन धर्मीय राजे राज्य करत होते. उदाहरणार्थ:

राष्ट्रकूट राजवंश

राज्यकाल: इ.स. 753 ते 982

या राजवंशातील ही अनेक राजे जैन धर्मिय होते. या राजवंशाची स्थापना दंतिदुर्ग याने केली होती. या राजवंशातील अमोघवर्ष, इंद्र (तिसरा), इंद्र (चौथा), कृष्णा (दुसरा) हे जैन धर्मिय होते, यांच्या काळात महाराष्ट्र व कर्नाटक या भागात जैन धर्माचा मोठा प्रचार झाला, व तो एक जनधर्म बनला.

चालुक्य राजवंश

राज्यकाल: इ.स. 940 ते 1244

या राजवंशाने मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मोठ्या प्रदेशावर राज्य केले. या घराण्यावर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता.

याच घराण्यात सम्राट कुमारपाल (इ.स. 1143 ते 1172) होऊन गेला. तो जैन धर्माचा अनुयायी आणि आचार्य हेमचंद्रसूरी यांचा शिष्य होता.

सम्राट कुमारपालने शत्रुंजय येथील आदिनाथ मंदिर, तारंगा येथील अजितनाथ मंदिर, अनहिलपट्टण येथील मंदिरे यांसह अनेक भव्य जैन मंदिरे बांधली. या राजघराण्यात इतरही अनेक जैन राजे होऊन गेले.

शिलाहार राजवंश

राज्यकाल: इ.स. 940 ते 1250

या राजवंशाच्या उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र अशा तीन शाखा होत्या. या राजघराण्यावर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. या राजवंशातील अनेक राजे, राण्या आणि सेनापती जैन धर्माचे अनुयायी होते.

गंडरादित्य, गोंक, दुसरा भोज यांसारखे अनेक जैन राजे आणि निंबरससारखे प्रसिद्ध सेनापती या घराण्यात झाले. राजा गंडरादित्य हे आचार्य माघनंदी यांचे शिष्य होते, तर राजा विजयादित्य हे आचार्य माणिक्यनंदी यांचे शिष्य होते.

दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जैन धर्माचा प्रसार आणि विकास होण्यासाठी शिलाहार राजवंशाचे मोठे योगदान आहे.

देवगिरीचे यादव

राज्यकाल: इ.स. 1187 ते 1317

या राजवंशाने महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील विस्तीर्ण प्रदेशावर राज्य केले. या घराण्याचा संस्थापक दृढप्रहार हा आचार्य जिनप्रभसूरी यांचा शिष्य आणि तीर्थंकर चंद्रप्रभूचा भक्त होता.

या राजघराण्यात पुढेही अनेक जैन राजे झाले. त्यांच्या राण्या बहुधा कर्नाटकातील जैन राजघराण्यांतील राजकन्या असत. यादवांच्या सैन्यात आणि प्रशासनात मोठ्या संख्येने जैन अधिकारी होते.

यादवांची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती. देवगिरी किल्ल्यावर एक मोठे जैन मंदिर होते, ज्याला आज “भारत माता मंदिर” म्हणून ओळखले जाते.

यादवांच्या राज्यातील प्रदेशात आजही त्या काळातील अनेक जैन मंदिरे, जैन अवशेष आणि शिलालेख मोठ्या प्रमाणावर आढळतात.

होयसळ राजवंश

या राजवंशाची स्थापना सल नावाच्या राजाने केली. तो आचार्य सुदत्त यांचा शिष्य होता. या राजवंशातील अनेक राजे जैन धर्माचे अनुयायी होते.

विजयनगर साम्राज्य

राज्यकाल: इ.स. 1336 ते 1565

दक्षिण भारतावर राज्य करणारे हे एक बलाढ्य साम्राज्य होते. या साम्राज्यात राजा हरिहर दुसरा याचा प्रमुख सेनापती आणि महादंडनायक इरुगप्पा हा जैन धर्मीय होता. विजयनगर साम्राज्यात जैन समाजाचा आणि जैन धर्माचा मोठा प्रभाव होता.

चौटा राजवंश

हा कर्नाटकाच्या किनारपट्टीवर बाराव्या ते अठराव्या शतकापर्यंत राज्य करणारा जैन राजवंश होता. याच घराण्यात राणी अब्बक्का होऊन गेली. तिने पोर्तुगीजांचा समुद्रावर आणि जमिनीवर अनेक वेळा पराभव केला.

याशिवाय या काळात अनेक इतर राजवंशही होते, ज्यांच्या काळात जैन धर्माची भरभराट होत राहिली.

आदि शंकराचार्यांनी जैन धर्म नष्ट केला का?

आता प्रश्न असा निर्माण होतो की, आदि शंकराचार्यांनी खरोखरच जैन धर्म नष्ट केला का?

ज्यांच्यावर हा आरोप केला जातो त्या आदि शंकराचार्यांचा जन्म इ.स. 700 मध्ये झाला आणि त्यांचे निधन इ.स. 750 मध्ये झाले.

वर उल्लेख केलेले सर्व राजवंश आणि त्यांचा प्रभाव हा आदि शंकराचार्यांच्या निधनानंतरचा आहे. यावरून स्पष्ट होते की, आदि शंकराचार्यांनी जैन धर्म नष्ट केला हा आरोप वस्तुस्थितीशी जुळत नाही. जर हा आरोप खरा मानला, तर मग त्यांच्या मृत्यूनंतर जैन धर्म पुन्हा जिवंत झाला आणि तेराव्या-सोळाव्या शतकापर्यंत भरभराटीस कसा आला? याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.

मग जैन धर्माचा ऱ्हास कधी आणि का झाला?

घटनांचा कालक्रम पाहिल्यास स्पष्ट दिसते की, जैन धर्माचा ऱ्हास तेराव्या शतकानंतर सुरू झाला.

याच काळात:

  • इ.स. 1202 मध्ये दिल्लीवर मुस्लिम सुलतानांची सत्ता प्रस्थापित झाली.
  • इ.स. 1317मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण करून यादवांचे राज्य संपवले.
  • इ.स. 1527 पर्यंत दक्षिण भारतात पाच मुस्लिम सुलतानांची सत्ता प्रस्थापित झाली.
  • इ.स. 1565 मध्ये या पाचही सुलतानांनी मिळून विजयनगर साम्राज्याचा पराभव केला.
  • इ.स. 1526 मध्ये भारतात मुघल सत्तेची स्थापना झाली.

उत्तर भारतात मुघलांची सत्ता बळकट झाल्यावर तिकडे जैन धर्माचा प्रभाव कमी झाला, तर 1565 मध्ये विजयनगर साम्राज्याचे पतन झाल्यावर दक्षिणेतही जैन धर्माचे पतन झाले.

या काळात हजारो जैन आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. गैर-मुस्लिमांवर जिझिया कर लादण्यात आला. विविध प्रकारची बंधने घालण्यात आली. लाखो जैन आणि हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले.

इतिहास संशोधक अब्दुल गणी आपल्या एका रिसर्च पेपरमध्ये लिहितात की आदिलशाहीमध्ये विजापूर भागात लाखो जैन धर्मियांनी सुफी पंथाच्या प्रभावामुळे इस्लाम स्वीकारला.

संपूर्ण भारतात लाखो जैन आणि हिंदू लोक बळजबरीने अथवा इतर कारणांमुळे मुस्लिम झाले.

मेहरौली (दिल्ली) येथील कुतुबमिनार उभारण्यासाठी 27 जैन आणि हिंदू मंदिरे पाडण्यात आल्याचा उल्लेख ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळतो.

कुतुब मिनार येथील जैन अवशेष

हे केवळ दिल्ली किंवा दक्षिण भारतापुरते मर्यादित नव्हते. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशांमध्ये, जिथे जिथे जैन आणि हिंदू मंदिरे होती आणि जिथपर्यंत मुस्लिम आक्रमक पोहोचले, तिथे मोठ्या प्रमाणावर मंदिरांची तोडफोड करण्यात आली.

टिपू सुलतानच्या सैनिकांनी केरळमधील वायनाड येथील जैन मंदिर नष्ट केले होते. गुजरातमधली भरूच येथे 14व्या शतकात जैन मंदिर पाडून त्या जागेवर जामा मशीद बांधण्यात आली.

पूर्व भारतातील सराक प्रदेशात आज दिसणारे जैन मंदिरांचे अवशेषही अशाच प्रकारे उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचे असल्याचे मानले जाते.

आज अनेक ठिकाणी उत्खननादरम्यान जमिनीतून जैन मूर्ती सापडतात. त्या मूर्ती जमिनीत कशा गेल्या?

याचे एक संभाव्य उत्तर असे आहे की, मुस्लिम आक्रमकांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी जैन समाजाने त्या मूर्ती स्वतःच जमिनीत लपवून ठेवल्या असाव्यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ‘प्रतिक्रांती’ या पुस्तकात लिहिले आहे की, “भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास ब्राह्मण किंवा हिंदूंमुळे नव्हे, तर मुस्लिम आक्रमकांमुळे झाला.” हीच बाब मोठ्या प्रमाणात जैन धर्मालाही लागू पडते. मात्र, बौद्ध धर्माप्रमाणे जैन धर्म पूर्णपणे नष्ट झाला नाही. त्यामागे काही वेगळी कारणे आहेत, त्याविषयी मी स्वतंत्रपणे लिहिणार आहे.

  • महावीर सांगलीकर हे सिनिअर न्यूमरॉलॉजिस्ट, मेंटॉर, मोटिव्हेटर, इतिहास संशोधक आणि कथालेखक आहेत.

हेही वाचा:

मुघल काळातील जैन धर्म आणि समाजजैन संस्कृतीच्या सांगली जिल्ह्यातील प्राचीन पाऊलखुणा
कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जाभारतीयांचा इतिहासबोध
जैनांचे मराठी भाषेतील योगदानमराठी भाषेचे प्राचीनत्व!
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहासशिलाहार राजा भोज (दुसरा) आणि त्याने बांधलेले किल्ले

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *