चित्तरंजन चव्हाण
मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो, तेव्हा माझ्या वर्गात एक सुंदर मुलगी होती. ती अभ्यासातही खूप चांगली होती. तसे पाहिले तर अभ्यासात मीही काही कमी नव्हतो. आमची चांगली मैत्री झाली. पण पुढे माझ्या बाजूने ती फक्त मैत्री राहिली नाही, मी तिच्यावर प्रेम करू लागलो. मात्र ही गोष्ट तिला सांगायची हिंमत माझ्यात झाली नाही.
एकदा शनिवारी मी तिला विचारलं, “उद्या काय करतेस?”
ती म्हणाली, “का, काय झालं?”
मी थोडं घाबरतच म्हणालो, “उद्या रात्री माझ्यासोबत डिनरला येशील का?”
ती म्हणाली, “मी रात्री जेवत नाही.”
“का?”
“आमच्यात सूर्यास्ताआधी जेवायची प्रथा आहे.”
“मग संध्याकाळी सूर्यास्ताआधी जाऊया जेवायला?”
“नाही, उद्या संध्याकाळी मला ट्यूशनला जायचं आहे.”
मी थोडा नाराज झालो. तरीही हार न मानता मी पुन्हा विचारलं, “ठीक आहे, मग लंचला तरी जाऊया? उद्या दुपारी?”
ती म्हणाली, “नको बाबा, उद्या दुपारी आमच्या मंदिरात एक कार्यक्रम आहे, गुरुमहाराज येणार आहेत. मला तिथं जायचं आहे उद्या दुपारी”
“ठीक आहे, मग पुढच्या रविवारी जाऊया?”
“पुढच्या रविवारी मला आमचं दुकान सांभाळायचं आहे… माझा भाऊ आणि बाबा मुंबईला जाणार आहेत, त्यामुळे दुकान मला एकटीला सांभाळावं लागेल.”
अशा प्रकारे तिच्यासोबत जेवायला जाण्याचा आणि जवळीक वाढवण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न फसला!
नंतर एके दिवशी मी तिला कॉलेजच्या आवारातच गाठलं. म्हणालो, “उद्या आपण कॉलेजला दांडी मारू आणि लंचला जाऊया.”
ती माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाली, “मी कॉलेजला शिकायला येते, दांडी मारायला नाही.” आणि ती लगेच क्लासकडे निघून गेली.
मग मला आणखी एक संधी मिळाली. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मी कॉलेजमध्ये तिच्यासाठी एक गुलाबाचं फूल घेऊन गेलो. पण तिने ते घ्यायलाच नकार दिला. ती म्हणाली, “फुलांनाही जीव असतो. फुलं झाडावरच छान दिसतात. ती तोडू नयेत.”

एक दिवस मी प्रेमचंदांच्या कथांचं एक पुस्तक घेऊन वर्गात गेलो. ते पुस्तक तिला दिसेल अशा पद्धतीने तिच्यासमोरून गेलो. तिनं काही प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने मीच तिला विचारलं, “तू प्रेमचंदांच्या कथा वाचल्या आहेत का?”
ती म्हणाली, “मी त्यांच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत… खूप छान आहेत. पण सध्या मी इंग्रजी कथा वाचतेय…”
दोन-चार दिवसांनी मी एका ऑस्ट्रेलियन लेखिकेचं इंग्रजी कथांचं पुस्तक घेऊन कॉलेजला गेलो. तिनं ते पुस्तक पाहिलं आणि म्हणाली, “या लेखिकेबद्दल ऐकलं आहे, पण मी अजून तिच्या कथा वाचल्या नाहीत.”
मी लगेच म्हणालो, “चल, हे पुस्तक तू ठेव, वाचून परत दे.”
तिनं ते पुस्तक आपल्या बॅगमध्ये ठेवलं.
मी विचारलं, “कधी परत करशील?”
ती म्हणाली, “परवा देईन.”
“इतक्या लवकर?”
“हो… मी फास्ट रीडर आहे.”
तिनं माझ्याकडून पुस्तक घेतलं, त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण दुसऱ्या बाजूला माझं हृदय जोरात धडधडत होतं… कारण त्या पुस्तकात मी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात मी माझं तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं… आता काय होणार…
दुसऱ्या दिवशी ती क्लासमध्ये सारखी माझ्याकडं बघत होती, आणि मी मात्र नजर चुकवत होतो. त्या दिवशी ती काहीही न बोलता निघून गेली.
पुढच्या दिवशी तिनं ते पुस्तक परत दिलं, पण ती माझ्याशी काही बोलली नाही.
घरी आल्यावर मी पाहिलं, की मी लिहिलेलं प्रेमपत्र त्या पुस्तकातच होतं. मी ते उघडून पाहिलं, तर त्या मुलीनं लाल शाईनं त्यात अनेक ठिकाणी व्याकरणाच्या चुका दाखवल्या होत्या. खाली लिहिलं होतं की माझं अक्षर चांगलं नाही, ते सुधारायला हवं…. आणि शेवटी १० पैकी फक्त २ गुण दिले होते!
मला हसूही आलं आणि थोडा रागही आला. ही माझी क्लासमेट आहे की शिक्षिका?
मला कळून चुकलं होतं की ही मुलगी मला भाव देत नाही. त्यामुळे मी तिचा नाद सोडून दिला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. माझं अक्षर सुधारण्यासाठीही प्रयत्न केले, आणि ते खरंच सुधारलं. या सगळ्याचा फायदा असा झाला की मी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झालो.
अशा प्रकारे माझी ही एकतर्फी प्रेमकथा संपली!
पण एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे या एकतर्फी प्रेमाच्या काळात मी जैन तत्त्वज्ञानाची अनेक पुस्तकं वाचली. हे तत्त्वज्ञान मला खूप वेगळं आणि उत्तम वाटलं. त्यातील काही गोष्टी मी माझ्या आयुष्यातही अंगीकारल्या — जसं की कुणाचं मन दुखवू नये, वाद टाळावेत, मनात चांगले विचार ठेवावेत आणि इतरांना होईल तेवढी मदत करावी. याचा मला खूप फायदा झाला… आणि मी एक तणावरहित, आनंदी आणि समाधानी जीवन जगू लागलो.
हेही वाचावे:
| Cat & Dog : जीवन कसं जगावं….. | माझ्या लग्नाची गोष्ट… |
| अँजेलिना बॅण्डची गोष्ट | पहिलं प्रेम …. First Love |
| एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ…. | राजकुमारी निर्भया |
| विद्रोही मन दुःखाचे आगार ….. | फ्रेंडशिपमधलं भांडण! |
Jains & Jainism (Online Jain Magazine)
They Won Hindi (हिंदी कहानियां व लेख)
TheyWon
English Short Stories & Articles
