महावीर सांगलीकर
8149703595 / 8149128895
तेजस आणि विवेक हे दोघे खास मित्र होते. दोघेही तरुण, महत्त्वाकांक्षी आणि श्रीमंत होते. पण त्यांच्या श्रीमंतीची कहाणी केवळ पैशांपुरती मर्यादित नव्हती.
तेजस आपल्या बुद्धिमत्तेच्या, दूरदृष्टीच्या आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर श्रीमंत झाला होता. पैसा कमावण्याचे मार्ग त्याला चांगले माहीत होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, पैसा स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, याचाही तो विचार करायचा.
आपल्या जवळच्या मित्रांना तो नेहमी सांगायचा, “पैसा कमावणं ही कला आहे; आणि एक टेक्निकही आहे, आणि कमावलेल्या पैशाचा योग्य उपयोग करणं ही त्याहून मोठी कला आणि एक टेक्निक आहे.”
तेजसनं विवेकलाही श्रीमंत होण्याची अनेक गुपितं सांगितली होती. विवेकनं ती गुपितं केवळ ऐकून घेतली नाहीत, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. काही वर्षांतच विवेकची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्याने मोठी संपत्ती निर्माण केली.
दोघेही अधूनमधून भेटायचे. त्यांच्या भेटींत नेहमीच काहीतरी महत्वाची चर्चा व्हायची… हसत-खेळत, गप्पा मारत. राजकारण, क्रिकेट किंवा केवळ गप्पांसाठी गप्पा या गोष्टींमध्ये त्यांना रस नव्हता. प्रत्येक भेटीत एखादा नवीन विचार, एखादी नवीन कल्पना किंवा जीवनाकडे पाहण्याचा एखादा वेगळा दृष्टिकोन त्यांना मिळायचा.
अशाच एका संध्याकाळी दोघे एका शांत कॅफेमध्ये बसले होते. टेबलवर कॉफीचे कप होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे प्रसन्न हास्य.
तेजसनं विवेककडं पाहिलं आणि हसत म्हणाला,
“विवेक, आजकाल तू फारच वेगाने पैसे कमवायला लागला आहेस!”
विवेक हसला.
“काय झालं? माझ्या प्रगतीवर लक्ष ठेवतोयस वाटतं?”
“अर्थात!” तेजस म्हणाला. “शेवटी माझ्या शिकवणीचा विद्यार्थी आहेस तू!”
दोघेही हसले.
तेजस पुढे म्हणाला, “खरंच सांगतो, तुझी प्रगती पाहून मला खूप आनंद होतोय. अजून काही वर्षं अशीच गेली तर तू माझ्यापेक्षा श्रीमंत होशील असं दिसतंय.”
विवेक लगेच म्हणाला,
“असं काही होणार नाही.”
“का बरं?”
“कारण श्रीमंत कसं व्हायचं हे मी तुझ्याकडून शिकलो. आणि मला खात्री आहे की अजून बरीच गुपितं तू मला सांगितलेली नाहीस.”
तेजस मोठ्यानं हसला.
“अरे वा! म्हणजे मी अजून काही गुपितं लपवून ठेवली आहेत असं तुला वाटतंय?”
“नक्कीच! गुरूनं सगळी विद्या शिष्याला कधी दिली आहे का?”
तेजसनं खोटा राग आणत म्हटलं, “म्हणजे आता तू मला गुरू म्हणतोयस?”
“गुरू नाही तर काय? माझी आर्थिक स्थिती बदलण्यामागं तुझा मोठा वाटा आहे.”
तेजस काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, “पण एक गोष्ट लक्षात ठेव. तू माझ्यापेक्षा श्रीमंत झालास तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही.”
विवेकनं त्याच्याकडं पाहिलं .
“खरंच?”
“अगदी खरं. उलट मला आनंद होईल. कारण माझ्यामुळे माझा मित्र माझ्यापेक्षा पुढे गेला, यापेक्षा मोठं समाधान दुसरं काय असणार?”
विवेकच्या चेहऱ्यावरचे हास्य आणखी खुलले.
काही क्षण दोघेही शांत बसले.
मग तेजस थोडा गंभीर होत म्हणाला,
“चल, आज तुला आणखी एक गुपित सांगतो.”
विवेकनं उत्सुकतेनं विचारलं,
“आणखी जादा श्रीमंत होण्याचं गुपित?”
“होय “
तेजस किंचित पुढे झुकला आणि म्हणाला, “आता तू कुठेतरी मोठी देणगी दे.”
विवेक क्षणभर विचारात पडला आणि म्हणाला, “खरं सांगू? मीही त्याच विचारात होतो.”
“छान! मग कुठं देणार आहे देणगी?”
“आमच्या गावी एक मंदिर बांधत आहेत. खूप मोठं मंदिर होणार आहे. त्यासाठी मोठी देणगी देण्याची माझी इच्छा आहे.”
तेजसनं नकारार्थी मान हलवली. “मंदिराला देणगी?”
“हो. का?”
तेजस काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, “माझं ऐकशील तर मंदिराला देणगी देऊ नकोस.”
विवेकला आश्चर्य वाटलं.
“का? तूच तर देणगी दे म्हणालास!”
“देणगी दे म्हणालो. पण कुठं द्यायची, आणि कुठं नाही द्यायची ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.”
“मग कुठे देऊ?”
तेजस म्हणाला, “गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत कर. एखाद्या हुशार विद्यार्थ्याची फी भर. एखाद्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दे. एखाद्याला पुस्तकं घेऊन दे. एखाद्या विद्यार्थ्याला पुरस्कार देऊन त्याच्या मेहनतीचं कौतुक कर.”
विवेक शांतपणे ऐकत होता.
तेजस पुढं म्हणाला, “आपण दोघेही शिक्षणामुळे, संधी मिळाल्यामुळे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे इथपर्यंत आलो. पण प्रत्येक मुलाला ती संधी मिळतेच असं नाही.”
“बरोबर आहे,” विवेक म्हणाला.
“विचार कर,” तेजस पुढे म्हणाला, “एखाद्या मंदिरात आपण लाखो रुपये दिले तर काय होईल? मंदिर सुंदर होईल, भव्य होईल. लोक दर्शनाला येतील. पण गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आपण तेच लाखो रुपये खर्च केले तर? अनेक मुलांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. पुढे ते डॉक्टर होतील, इंजिनिअर होतील. कोणी शिक्षक होईल, शास्त्रज्ञ होईल, उद्योजक होईल, आणि ते पुढे अनेक विद्यार्थ्यांना मदत करतील.”
विवेक काही क्षण गप्प राहिला. तेजस म्हणाला, “मंदिरासाठी दगड, संगमरवर आणि पैसा लागतो. पण समाजाचं भविष्य घडवण्यासाठी माणसं लागतात. आणि ती माणसं घडवायची असतील तर शिक्षणात गुंतवणूक करावी लागते.”
विवेकनं मान डोलावली. “तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मंदिर बांधण्यासाठी इतर लोक आहेत. पण एखाद्या मुलाचं आयुष्य घडवण्यासाठी मी पुढाकार घेतला तर त्याचा परिणाम खूप मोठा होईल.”
“अगदी बरोबर”
“ठीक आहे. यापुढे माझ्या देणगीचा मोठा भाग विद्यार्थ्यांसाठी असेल.”
स्मितहास्य करत तेजस म्हणाला, “फक्त एक गोष्ट विसरू नकोस.”
“काय?”
“नुसतं आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांचा विचार करू नकोस.”
विवेक आपल्या भुवया उंचावत म्हणाला, “म्हणजे?”
“म्हणजे तू सध्या कुठं राहतोस?”
“पुण्यात.”
“आणि कॉलेज शिक्षण कुठं केलंस ?”
“पुण्यातच.”
“मग ज्या शहरानं तुला संधी दिली, ज्या शहरात तू तुझा व्यवसाय उभा केलास, जिथं तू पैसा कमावलास, जिथं तुझं आजचं आयुष्य उभं राहिलं—त्या शहरातील विद्यार्थ्यांबद्दलही तुझी काही जबाबदारी आहे.”
पुढं तेजस शांतपणे म्हणाला, “आपण अनेकदा जन्मभूमीला आपलं सर्वस्व मानतो. ती महत्त्वाची आहेच. पण आयुष्य आपल्याला जिथे घडवतं, संधी देतं, उभं करतं, ती कर्मभूमीही तितकीच महत्त्वाची असते.नेहमी लक्षात ठेव—जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी महत्त्वाची असते.“
विवेक मान डोलावत म्हणाला, “यू आर राईट. माझ्या गावासाठीही करतो आणि पुण्यासाठीही करतो.”
“किती?”
“थोडं इकडं … थोडं तिकडं.”
तेजस लगेच त्याला थांबवत म्हणाला, “नाही!”
“काय झालं?”
“थोडं नाही.”
“मग?”
तेजस हसत म्हणाला, “भरपूर इकडं आणि भरपूर तिकडं!”
विवेकही हसला.
“म्हणजे तू मला श्रीमंत होण्याचं गुपित सांगितलंस आणि आता श्रीमंती वाटण्याचं गुपित सांगतोयस.”
तेजसने गंभीर होत उत्तर दिलं, “हो. कारण पैसा कमावल्यावर आपण श्रीमंत होतो. पण तो पैसा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू लागला की आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो.”
विवेक काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, “तेजस, मी एक ऐकलंय… दान केल्याने आपण अजून श्रीमंत होत जातो म्हणे. हे खरं आहे का?”
“शंभर टक्के खरं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आज शंभर रुपये दान केले आणि उद्या दोनशे रुपये परत मिळाले. दान हे व्यवहाराचं गणित नाही.”
“तसं असेल तर मग दान देणारे श्रीमंत कसे काय होतात?”
“ज्याच्यामध्ये देण्याची वृत्ती असते, त्याचं मन आणि जगण्याचा परीघ मोठा होत जातो. तो फक्त स्वतःसाठी संधी शोधत नाही, तर इतरांसाठीही संधी निर्माण करतो. आणि अशा माणसाकडे पैसा, माणसं, विश्वास आणि नवीन संधी अनेक मार्गांनी येत राहतात.”
विवेक म्हणाला,
“पण मग श्रीमंत होण्यासाठी दान द्यायचं ही गोष्ट यौग्य आहे का?”
“नाही. अजून श्रीमंत व्हायचं म्हणून दान द्यायचंच नसतं. दान हे परताव्याच्या अपेक्षेनं केलेला व्यवहार नाही.”
“मग दान का देतात?”
“कारण आपल्याकडे जे काही आहे, त्यात समाजाचाही वाटा असतो. आपल्याला ज्ञान मिळालं, संधी मिळाली, कुणीतरी मार्गदर्शन केलं, कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार समाजाला परत देणं ही आपली जबाबदारी आहे.”
विवेकनं विचारलं, पण दान म्हणजे फक्त पैसे देणं, आर्थिक मदत करणं एवढंच ना?”
“अजिबात नाही. दान केवळ पैशांचं नसतं.”
“मग?”
“तुझ्याकडे मौल्यवान ज्ञान असेल आणि तू ते योग्य व्यक्तीला दिलंस, तरी ते दानच. एखाद्या तरुणाला व्यवसायाची दिशा दिलीस, एखाद्या विद्यार्थ्याला करिअरबाबत मार्गदर्शन केलंस, एखाद्याला तुझा अनुभव दिलास किंवा त्याचा मेंटॉर बनलास—हेही तितकंच मोठं दान आहे. अनेक लोक रक्तदान, अवयवदान करतात, त्यामुळे कित्येक लोकांना नवीन जीवन मिळतं …. “
विवेक म्हणाला, “बरोबर …. अशा दानाची किंमत पैशांत मोजता येत नाही.”
“म्हणूनच ते अधिक मौल्यवान आहे. पैसे दिले तर कदाचित एखाद्याची आजची अडचण दूर होईल; पण योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन दिलं तर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं.”
विवेक काही क्षण शांत राहिला. “म्हणजे दान करताना ‘मी काय देऊ शकतो?’ एवढाच विचार न करता ‘समोरच्याला खरंच कशाची गरज आहे?’ हा विचार करायला हवा.”
“अगदी! कधी पैशांची गरज असते, कधी शिक्षणाची, कधी उपचारांची, कधी संधीची… आणि कधी फक्त योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची.”
विवेकनं मान डोलावली… “आता समजलं. श्रीमंती वाढवण्याचं गुपित कमाईत असेल; पण श्रीमंतीला अर्थ देण्याचं गुपित देण्यात आहे.”
तेजस हसत म्हणाला, “बस्स! हेच लक्षात ठेव—पैसा कमावणं तुला श्रीमंत करू शकतं; पण तुझं ज्ञान, वेळ, अनुभव आणि संपत्ती इतरांसाठी वापरणं तुला खऱ्या अर्थाने समृद्ध करतं.”
“तेजस, आज तू मला पैशाचं नव्हे… श्रीमंतीचं खरं गुपित सांगितलंस.”
तेजस हसला. “आणि लक्षात ठेव—आपण किती कमावलं, याची गणितं बँकेच्या खात्यात दिसतात. पण आपल्या पैशामुळे किती आयुष्यं बदलली, याची गणितं कुठल्याही खात्यात दिसत नाहीत… त्याचा हिशेब युनिव्हर्स ठेवत असतं”
दोघेही काही क्षण शांत बसले.
बाहेर संध्याकाळ गडद होत होती. कॅफेच्या काचेपलीकडे शहराची दिव्यांची रोषणाई सुरू झाली होती.
विवेक म्हणाला, “चला, गप्पा मारता मारता मी भरपूर काही शिकलो… . उद्यापासून काम सुरू.”
“कशाचं?”
“माझ्या कमाईचा एक भाग दुसऱ्यांच्या भविष्यासाठी वापरण्याचं.”
तेजसनं हात पुढे केला. दोघांनी हात मिळवला. त्या हातमिळवणीत केवळ मैत्री नव्हती; तर तेजससाठी एका नव्या विचाराची सुरुवात होती.
हेही वाचावे……
Jains & Jainism (Online Jain Magazine)
They Won Hindi (हिंदी कहानियां व लेख)
TheyWon
English Short Stories & Articles

खूप छान लेख आहे. दानाचे महत्त्व उत्तमरीत्या समजावून सांगितले आहे.