संजय सोनवणी
व्रात्य कोण होते? जरी व्रात्यांचा उल्लेख ऋग्वेदात कोठेही नसला तरी सुरुवातीच्या काळात ते ज्या व्यक्तींना भेटले त्यांचा उल्लेख यती, मुनी आणि केशी असा केला गेलेला आहे. हे लोक संसारत्याग केलेले तापसी होते असे मत सर्वच विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. व्रात्य संकल्पनेशी वैदिक आर्यांचा परिचय जरा नंतर म्हणजे काही वैदिक आर्य जेव्हा मगध प्रदेशातही स्थिर झाले तेव्हा झाला. या गूढवादी व्रात्यांकडे मगधात स्थिर झालेल्या वैदिकांनी मोठ्या आदराने पाहिले. परंतु आर्यावर्तात स्थिर झालेल्या मोठ्या वैदिक समाजाने मात्र उपहास व तिरस्काराने पाहिले असल्याचे आपल्या लक्षात येईल.
व्रात्य हे विशिष्ट व्रतांचे (शारीरिक व मानसिक) पालन करणारे लोक होते. त्यांना व्रतीन असेही संबोधले गेलेले आहे. व्रतांमुळे या लोकांत गूढ शक्ती वास करत असतात असा दृढ समज मगधात स्थायिक झालेल्या वैदिक आर्यांचा होता.
अथर्ववेदाची निर्मितीही याच भागात झाली. अथर्ववेद हा अन्य तीन वेदांपेक्षा आशयाने सर्वस्वी वेगळा आहे याचे कारण तेथील वैदिक आर्य स्थानिक लोकधर्म आणि समण परंपरेशी अधिक परिचित व प्रभावित झाले. आर्यावर्तातील वैदिक मात्र लोकसंस्कृतीपासून सर्वस्वी फटकून राहिलेले आपल्याला दिसतात. अथर्ववेदात मंत्र-तंत्र, जारण-मारण इत्यादी तांत्रिक प्रथांचा सर्वस्वी स्वीकार दिसून येतो. एवढेच नव्हे तर आर्यावर्तात राहणारे वैदिक जरी व्रात्यांकडे तिरस्काराने पाहत असले तरी अथर्ववेदाचे कर्ते मात्र तसे करत नाहीत.
वैदिक आणि व्रात्य
हे व्रात्य म्हणजेच आपल्याला भारतात आल्यावर सुरुवातीला भेटलेले भेटलेले केशी, यती किंवा वेगळे व्रत पाळणारे मुनी आहेत हे आर्यावर्तातील वैदिकांच्या लक्षात येणे शक्य नव्हते कारण व्रतामध्ये सुद्धा आधीच विभाग पडलेले होते किंवा पंथ निर्माण झालेले होते. पश्चिमेकडील व्रात्यांच्या आणि पूर्वेकडील व्रात्यांच्या जीवन व साधनाशैलीत फरक असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले नाही, तसेच हे लोक म्हणजे एखादी विशिष्ट जमात अथवा वर्ण नव्हे तर एक विचारधारा आहे हेही त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे आर्यावर्तातील वैदिक आणि मगधातील वैदिक यांच्या अनुमानात जमीन अस्मानाचा फरक पडल्याचेही आपल्याला दिसून येते.
मुळात वैदिक आर्यांना आधी मगध प्रांत (किंवा पुर्व भारत) त्याज्ज्य वाटत होता असे वैदिक साहित्यावरूनच दिसते. तेथील लोक स्वागतशील नाहीत व वैदिक कर्मकांडाचा ते विरोध करतात अशा तक्रारी आपल्याला ऐतरेय आणि शतपथ ब्राह्मणावरून दिसून येतात. धार्मिक विभेद हे तर कारण होतेच कारण त्यांनी वैदिकेतर धर्मियांना शुद्र व असुर गटात वाटून टाकलेलेच होते.
व्रात्य कोण होते?
खरे तर असुर ही संज्ञा मुळची वैदिक आर्यांचे शत्रू झरुस्त्रीय (अहुर माझ्दा) धर्माची. पण ती संज्ञा त्यांनी भारतात आल्यावरही जेही लोक त्यांना शत्रू वाटले त्यांनाही उद्देशून वापरली. कदाचीत हे स्थानिक संज्ञा समजून घेण्यातील अज्ञान असेल. पण यामुळे जो सांस्कृतिक गोंधळ निर्माण झाला ज्याचे निराकरण अद्यापही झालेले नाही. तसेच स्थानिक धर्माबद्दलही त्यांच्या लेखनातून स्पष्ट निर्देशन होत नाही.
ते असो, पण वैदिकांचे व्रात्य सम्प्रदायाबाबतचे ज्ञान आणि अज्ञान काय होते हे आपण थोडक्यात पाहूयात.
व्रात्य नेमके कोण होते याबाबत वैदिक साहित्यातच अनेक मत-मतांतरे आहेत. व्रात्य हा शब्द वैदिक साहित्यात इतक्या परस्परविरोधी अर्थाने वापरला गेला आहे कि गोंधळ होणे स्वाभाविक आहे. वर्णसंस्कारलोप झालेले वैदिक म्हणजे व्रात्य या अर्थापासून ते व्रत करणारे व्रती म्हणजे व्रात्य, समूहातून च्युत झालेले ते व्रात्य (पाणिनी अष्टाध्यायी ४/३/५४). लाट्यायन श्रौतसूत्रानुसार (८/५/२) व्रतीन म्हणजे लुटमार करून जगतात ते आयुधजीवी म्हणजे व्रात्य, तांड्य ब्राह्मणानुसार लाकडी तख्त असलेल्या गाडीतून, हाती बिनादोर किंवा बाण नसलेले धनुष्य घेऊन हवे तिथे फिरणारे आणि नृत्य, संगीत इ. विद्या समूहाला शिकवणारे ते व्रात्य अशा अनेक व्याख्या आपल्याला पहायला मिळतात.
मनुस्मृतीत (१०, २१-२३) मध्ये ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य संस्कारलोप झाल्याने समाजच्युत झालेले ते व्रात्य असून त्यांची संतती हीनजातीय मानली आहे. ‘सावित्रीपतित’ झाल्यामुळे-म्हणजे उपनयनाच्या संस्काराचा लोप झाल्यामुळे –जातिभ्रष्ट झालेले असतात, ते ‘व्रात्य’ होत, अशा आशयाचा निर्देश मनुस्मृतीत आलेला आहे (२·३९).
अधम, पतित, पाखंडी, भटक्या अशा लोकांची गणनाही व्रात्यांमध्ये केली जात असे. थोडक्यात आर्यावर्तात निवास करणा-या वैदिकामध्ये व्रात्यांबाबत अज्ञान होते.
व्रात्य कोण होते?: अथर्ववेद आणि व्रात्य
पण मगधात निर्माण झालेला अथर्ववेद मात्र या सर्व मतांना छेद देतो. दोन्ही दृष्टीकोनात कमालीची भिन्नता आहे. एक प्रकारे ही वैदिक आर्यातली वैचारिक फुट होती. आणि हेच कारण आहे कि अथर्ववेदाला चवथा वेद मानायला वैदिक आर्य खूप काळ तयार नव्हते कारण हा वेद मुळात अभिचार कर्माला प्राधान्य देणारा वेद आहे अशी त्यांची समजूत झाली होती, परंतु औपनिषदिक विचारांच्या जन्माला हाच वेद कारण झाला हे त्यांनी लक्षात घेतले नाही. ऋग्वेदासाहित अन्य वेद हे औपनिषदिक विचार जन्माला घालूच शकत नव्हते कारण त्या तत्वज्ञानाचा आत्माच मुळी ऐहिक सौख्य हा होता. अथर्ववेदाचे तत्वज्ञान हे मुळात मगधातील तंत्र आणि समण विचारांतून जन्माला आले हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
अथर्ववेदातील पंधरावे कांड हे ‘व्रात्यकांड’ असून, त्यात व्रात्यांचा गौरव केला आहे. ह्या कांडाच्या नवव्या व दहाव्या सूक्तांत म्हटले आहे की, सभा, समिती, सेना आणि सुरा ज्याला अनुकूल आहे, असा व्रात्य ज्या राजाकडे अतिथी म्हणून जातो, त्या राजाने त्या व्रात्याला स्वत:पेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा सन्मान करावा. अथर्ववेदातील व्रात्य आत्मध्यानी योगी असून वेगळ्या प्रकारचे यज्ञ, म्हणजे आत्मयज्ञ, करणारे आहेत. या व्रात्यांना ‘महादेव’ असेही म्हटले गेले आहे. व्रत ही संज्ञा मगधातील वैदिकांनी योग शीर्षकाखाली स्वीकारली व त्याचाच पुरस्कार पुढे उपनिषदात केला गेला, पण मुलतत्व मात्र जसेच्या तसे राहिले.
म्हणजे पूर्वेकडील, तशा वैदिकांना त्याज्ज्य अशा मगध प्रांतात निर्माण झालेल्या अथर्ववेदिक आणि औपनिषदिक साहित्यात मात्र व्रात्यांचीच मते सर्वस्वी प्रधान झालेली दिसतात. एकही उपनिषद आर्यावर्तात लिहीले गेलेले दिसुन येत नाही ते त्यामुळेच. वैदिक विचारांतील ही मध्य भारत आणि पूर्व भारत यातील तफावत लक्षणीय आहे. आणि आज जर जीवित असेल तर पुर्वेकडील उधार घेतलेल्या संकल्पना.
व्रात्य कोण होते?
समण संस्कृतीची परंपरा ऋषभनाथ यांच्यापासून सुरु झाली असे परंपरेने मानले जाते. ते एक ऐतिहासिक व्यक्तित्व असून ते सरासरी इसपू ३००० ते इसपू २७०० या काळादरम्यान गंगेच्या खो-यात होऊन गेले व विनिता (आजची अयोध्या) नगरीची स्थापना केली असेही जम्बुद्दीवपन्नती सुत्तवरून समजते. शिव आणि ऋषभनाथ या दोघांच्या व्यक्तीविशेशात कल्पनातीत साधर्म्य आहे. या ग्रंथानुसार ऋषभनाथ हे भ्रमणशील व तापस जीवन स्वीकारणारे व एक मुष्टी जटा ठेवणारे पहिले पुरुष होते. अपरिग्रह या व्रताची सुरुवातही त्यांच्यापासून सुरु झाली असेही मानले जाते. ही प्रथा विकसित होत नंतरच्या काळातील इतर तपस्वींनी पाळली असावी. वैदिक आर्य ज्या केशी किंवा मुनींच्या संपर्कात आले ते या परंपरेतील लोक असणार हे स्पष्ट आहे.
मुळात तपस्वी हे ध्येयहीन भटके नव्हते किंवा भिकारीही नव्हते. गृहस्थजीवनातील लोकांपेक्षा त्यांच्या जीवनाची ध्येये वेगळी होती पण ऋग्वेदातील ऋषी नेहमीच गृहस्थजीवनाचा पुरस्कार करणारे होते. निपुत्रिक त्यांच्यासाठी बहिष्कृत होते. ऋग्वेदातील अगत्स्य-लोपामुद्रा संवादातून स्पष्ट होते कि ब्रह्मचर्य व्रत ही त्यांची जीवनपद्धती नव्हती. व्रत (योग) आणि तप यांचा व्रात्य, केशी आणि मुनी यांच्याशी असलेला संबंध निर्विवाद आहे. पण व्रत या मूळ शब्दाला योग हे नाव देऊन एक तात्विक गोंधळ होतो आहे याकडे मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. योग हा शब्द काहीतरी कशाशीतरी जोडण्याची क्रिया अभिव्यक्त करतो, तर व्रत हे जीवात्मा वैश्विक आत्म्यात विलीन करण्याची प्रक्रिया दर्शवते. यात एकत्वाची भावना आहे, समदृष्टीची भावना आहे. येथे जोडण्याचे द्वैत नाही तर विलीन होणे या एकदृष्टीचा अभिप्राय आहे.
समण विचार्कांनी वैश्विक आत्मा आणि जीवात्मा यांच्यातील एकतेचा विचार केला. ही क्रिया पूर्ण होते त्या क्षणाला त्यांनी मोक्ष ही संज्ञा दिली, म्हणजेच जन्माच्या शाश्वत चक्रातून मुक्ती. कर्मबंधमुक्ती हा या तत्वद्न्यानाचा आधार होता आणि कर्माचा नाश करण्यासाठी व्रत अर्थात आध्यात्मिक आणि शारीरिक क्रिया (आसनपद्धती) आवश्यक होत्या. जरी शारीरिक मुद्रा नवशिक्यांसाठी अत्यावश्यक आहेत असे मानले जात असले तरी ते अध्यात्माचा अत्यावश्यक भाग असल्याचे कधीही मानले जात नव्हते, पण नंतर त्यांनाच अपरंपार महत्व मिळाल्याचे दिसते.
जेव्हा उपनिषद “अहम ब्रह्मास्मि” (बृहदारण्यक उपनिषद १.४. १०) म्हणते, तेव्हा ते स्पष्टपणे समण विचार प्रतिध्वनीत करते. जी व्यक्ती आंतरिक विकारांचा पराभव करून परम वैश्विक अस्तित्वात विलीन होते, अशा व्यक्तीला केवली व जिन म्हणतात. येथे योग हा शब्द मूळ “व्रत” द्वारे अभिप्रेत असलेला अर्थ घेत नाही हे स्पष्ट आहे.