Marathi Short Story: सिंगल मदर

महावीर सांगलीकर

Marathi short story: सिंगल मदर

सुनिल कोल्हापूरचा एक अविवाहित तरुण. त्याला पुण्यात एक बिझनेस सुरू करायचा होता, म्हणून तो बरीच तयारी करून इकडं आला. सुरवातीला त्याच्या एका मित्राकडं राहिला. मग त्यानं स्वत:साठी एक फ्लॅट शोधायला सुरवात केली. एकदा रहायची सोय झाली की तो स्वत:ला पूर्णपणे त्याच्या बिझनेसमध्ये झोकून देणार होता.  

जोशी मॅडम

पेपरमधल्या ‘फ्लॅट भाड्याने देणे आहे’ अशा जाहिराती वाचून त्यानं कांही फ्लॅट्स बघितले पण ते सगळे फ्लॅट्स फक्त फॅमिलीसाठीच उपलब्ध होते. असाच एक फ्लॅट बघून परत येत असताना त्याला एका इमारतीबाहेर 1BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे असा बोर्ड दिसला. चौकशी करण्यासाठी तो त्या इमारतीत शिरला. वॉचमनकडं चौकशी केली. त्यानं सुनिलला दुसऱ्या मजल्यावर 4 नंबरच्या फ्लॅटमध्ये जोशी मॅडमकडे जायला सांगितलं. 

सुनिल दुसऱ्या मजल्यावर 4 नंबरच्या फ्लॅटसमोर गेला आणि बेल वाजवली. थोड्याच वेळात एका वयस्क बाईंनी दार उघडलं. 
‘तुम्ही जोशी मॅडम  न?’ त्यानं विचारलं.
‘हो’
‘तुमचा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे ना? मला बघायचा आहे’‘
‘हो, या ना आत’ असं म्हणत जोशी मॅडमनी सुनिलला आत यायला सांगितलं.
तो आत गेल्यावर मॅडमनी त्याला बसायला सांगितलं.

‘नाव काय तुमचं?’‘ मॅडमनी पहिला प्रश्न विचारला.
‘सुनिल’ त्यानं सांगितलं.’‘
नाव विचारल्यावर पूर्ण नाव सांगावं’‘  मॅडम कपाळाला आठ्या घालत म्हणाल्या.
सुनिल पाटील….. पाटील म्हणजे जळगावकडचे का? की नगरकडचे?’‘
मी कोल्हापूरचा आहे’‘
अच्छा…. मी जरा स्पष्ट बोलते’‘, मॅडम म्हणाल्या, ‘तुम्ही शाकाहारी आहात ना?’‘
होय. मी वारकरी घरातला आहे’‘
‘मग ठीक आहे. तुमचं लग्न झालंय ना? त्याचं काय आहे, आम्ही फक्त फॅमिलीसाठीच फ्लॅट देणार आहोत’ मॅडम म्हणाल्या

मॅडम हा प्रश्न विचारणार याची त्याला आधीच कल्पना आली होती. त्याला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर फ्लॅट पाहिजे होता आणि आत्तापर्यंतच्या अनुभवावरून चांगल्या एरियात फ्लॅट मिळवण्यासाठी फॅमिली असणे गरजेचे होते हे त्याला कळून चुकलं होतं, म्हणून त्यानं उत्तर काय द्यायचं ते ठरवलंच होतं. ‘हो मॅडम. दोन वर्षापूर्वीच माझं लग्न झालं आणि मला एक छोटी मुलगीही आहे. पण माझी मिसेस आणि मुलगी महिन्याभरानं येतील’‘ सुनिलनं उत्तर दिलं.

‘हो का…? काय नाव तुमच्या मिसेसचं ? आणि काय करतात त्या?’‘
तिचं नाव सुनिता. ती अजून कांही जॉब वगैरे करत नाही. मुलीला सांभाळायचं असतं ना. पण इथं आल्यावर करेल एखादा जॉब’‘
ठीक आहे. बाजूचाच फ्लॅट आहे माझा. 5 नंबरचा. तो द्यायचाय भाड्यानं. हा फ्लॅट माझ्या मुलाचा आहे. तो अमेरिकेत असतो ना, म्हणून मी त्याच्या फ्लॅटमध्ये रहाते’’
‘आणि तुमचे मिस्टर?’‘ सुनिलनं विचारलं 
‘त्यांचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे’‘ 
‘म्हणजे?’ सुनिलनं न कळून विचारले.’‘
म्हणजे ते फक्त जेवायला इकडे येतात. माझ्या हाताचा स्वयपाक त्यांना फार आवडतो! दिवसभर वर त्यांच्याच फ्लॅटमध्ये कांहीतरी लिहित नाहीतर वाचत बसलेले असतात. त्यांची खूप पुस्तके निघाली आहेत इतिहासावर. इतिहास संशोधक आहेत ते’‘
‘मला पण इतिहासाची आवड आहे’‘
‘हो का? पण ते प्राचिन इतिहास लिहितात’‘ जोशी मॅडमनी टोमणा मारला, पण तो कांही सुनीलच्या लक्षात आला नाही.

मग जोशी मॅडम आत गेल्या आणि थोड्याच वेळात शेजारच्या फ्लॅटची किल्ली घेऊन परत बाहेर आल्या. 

‘चला तुम्हाला फ्लॅट दाखवते’‘ 
सुनिलनं तो फ्लॅट बघितला. वेल फर्निशड होता. त्याला तो एकदमच आवडला. शिवाय बिल्डींगमधले लोकही स्टॅण्डर्ड वाटत होते आणि एरीयाही चांगला होता. 
त्यानं फ्लॅट पसंत असल्याचं जोशी मॅडमना सांगितलं.
त्या म्हणाल्या, ‘चला, आपण पलीकडं जाऊन पुढचं बोलू’‘ 
ते दोघं परत चार नंबरच्या फ्लॅटमध्ये आले.
त्यानं विचारलं, ‘भाडं किती? डिपॉझिट किती?’‘
भाडं दहा हजार रुपये महिन्याला. डिपॉझिट 40 हजार’‘

हे सुनिलला परवडणारं होतं. तरी पण तो म्हणाला, ‘थोडं कमी करा की मॅडम कांही तरी…’‘
आता यात काय कमी करायचं? कमीच आहे. या एरियात अशा फ्लॅटला 15 हजारांच्या खाली भाडं नाही. शिवाय माझ्या फ्लॅटमध्ये फर्निचरपण आहे. तुम्हाला ते बाहेरून आणायची गरज नाही. आणखी एक सिक्रेट सांगते तुम्हाला. त्या फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत राहून गेलेल्या सगळ्या फॅमिलींचं भलं झालं. या आधी एक तरुण जोडपं रहायचं तिथं, गेल्याच महिन्यात दोघेपण अमेरिकेला गेले’‘
ठीक आहे. आपण अॅग्रिमेंट कधी करायचं?’‘ सुनिलनं विचारलं.
‘कधीही. उद्या म्हणाल तर उद्या करु’‘
चालेल. मी उद्या येतो,’ असे म्हणत तो जोशी मॅडमचा निरोप घेऊ लागला..
मॅडम म्हणाल्या, ‘चालेल, या उद्या, पण थांबा पाच मिनिटं. …. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, कि मी अजून तुम्हाला ‘चहा घेऊन आला असाल ना’ किंवा ‘चहा नको ना’ असं कसं विचारलं नाही? पण मी तसं कधी विचारत नाही. तुम्ही बसा, मी चहा करते. की कॉफी करू?’‘
कांहीही चालेल’, सुनील हसत म्हणाला
.‘ठीक आहे, मग मी कॉफीच करते. मला पण घेता येईल, मला नाही चहा चालत”

दुसऱ्याच दिवशी  रेंट अग्रीमेंट झालं. त्याच दिवशी सुनिल तिथं रहायला आला. चला, फ्लॅट तर मिळाला. आता बिझनेसच्या तयारीला लागायला पाहिजे…. त्याच्या मनात आलं. पण बायको आणि मुलगी कुठनं आणायची?

Marathi short story: सिंगल मदर

थाप अंगलट आली ….

दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या एका मित्राला गाठलं आणि त्याला आपली समस्या सांगितली. 

“तुझं लग्न झालंय अशी थाप तू मारलीस हे कळू शकतं, पण तुला एक छोटी मुलगी आहे अशी एक्स्ट्रा थाप का मारलीस?’‘
“ते तोंडातनं निघून गेलं. पण त्यामुळं जोशी बाईला पटलंय की माझं खरंच लग्न झालंय म्हणून’‘
एक आयडिया आहे,’ मित्र म्हणाला, ‘तू पुण्यात एखादी तरुण सिंगल मदर शोध आणि तिच्याशी लग्न करून टाक. बायको आणि मुलगी दोन्ही मिळेल तुला’ 
‘सिंगल मदर? हे काय असतं?’ सुनीलनं विचारलं.
‘अरे बाबा, समाजात अशा कांही तरुणी असतात की ज्यांचं लग्न होतं, त्याना एखादं मूल होतं आणि नंतर  डायव्हर्स होतो. मग त्या तरुणी आपल्या मुलाचा किंवा मुलीचा सांभाळ करत जगत असतात. कांही तरुणी अशा पण असतात की ज्यांचं लग्न झालेलं नसतं तरीपण त्यांना एखादं मूल असतं,’ मित्रानं त्याला माहिती दिली.‘
नको बाबा तसली कांही भानगड. आणि मला लगेच लग्न पण करायचं नाही. त्याच्यापेक्षा मी पेपरला ‘शेअरिंग बेसिसवर वर्किंग वूमनसाठी फ्लॅट उपलब्ध आहे’ अशी जाहिरात देऊन बघतो’‘
अरे बाबा, पण लहान मुलीचं काय?’
‘खोटी खोटी बायको मिळाली तर छोटी मुलगी पण मिळवता येईल कोठून तरी’

मग सुनिलनं पेपरला तशी जाहिरात दिली. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर सकाळी सकाळी 9.30 वाजता त्याला पहिला फोन आला. पलिकडंनं गोड आवाज आला,
‘तुमची जाहिरात वाचली आजच्या पेपरला. शेअरिंग बेसिसवर फ्लॅट मिळेल म्हणून. किती मुली ठेवणार आहात तुम्ही?’
‘एकच’ त्यानं सांगितलं.‘एकच? पण तुम्ही तर शेअरिंग बेसिसवर असं लिहिलंय’‘
‘मी आहे ना शेअर करायला’

तिकडून फोन कट झाला. नंतर आणखी चार फोन आले. प्रत्येक वेळी तेच डायलॉग आणि फोन कट. त्यानं ठरवलं, आता खरं खरं काय आहे तेच सांगायचं.
तेवढ्यात त्याला आणखी एक फोन आला

‘तुमची जाहिरात वाचली पेपरमध्ये….
‘होय, मीच दिलीय जाहिरात. पण माझ पूर्ण ऐकून घेणार का? महत्वाचं आहे म्हणून विचारतो. आय नीड युवर हेल्प’
‘बोला, मी काय मदत करू शकते?’
त्यानं त्याची सगळी कथा ऐकवली.
‘छान!’ तिकडून आवाज आला, ‘पण तुमचं वय किती आहे?’
‘अठ्ठावीस वर्षे’ 
‘मला तुमच्या या नाटकात भाग घ्यायला आवडलं असतं, पण…
’‘पण काय?’ त्यानं अधीर होऊन विचारलं.‘
पण माझं वय पंचेचाळीस वर्षे आहे… मिस मॅच. सॉरी, मी तुमच्यासाठी कांही करू शकत नाही. प्रयत्न करत रहा, यश मिळेल. बेस्ट लक’ असे म्हणत त्या बाईंनी फोन ठेऊन दिला.

हिप्नॉटिस्टचा सल्ला

नंतर सुनिलला एकही फोन आला नाही. तो थोडासा निराश झाला होता. दुसऱ्या दिवशी तो पेपर वाचत असताना त्याची नजर एका जाहीरातीकडं गेली.

सुनिलला आशेचा किरण दिसला. त्यानं लगेच त्या नंबरला फोन केला.
‘हॅलो’, तो म्हणाला, ‘मी सुनिल पाटील बोलतोय. आज पेपरमध्ये तुमची जाहिरात वाचली. मला तुम्हाला भेटायचं आहे
’‘तुम्ही पुढच्या गुरुवारी भेटू शकता मला’ तिकडून उत्तर आलं.
‘पण सर, मला फार अर्जन्सी आहे. माझ्या करिअरचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. आज संध्याकाळी नाही का जमणार?
’‘नाही… पण एक मिनिट थांबा’ तिकडून आवाज आला. थोड्या वेळानं ती व्यक्ति म्हणाली, ‘तुम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजता येऊ शकता माझ्याकडं. पत्ता घ्या लिहून’

दुसऱ्या दिवशी सुनिल त्या व्यक्तिला भेटायला तिच्या ऑफीसवर गेला. त्याला तिथं जायला दहा मिनिटं उशीर झाला होता.
रिशेप्शनिस्ट म्हणाली, ‘आता तुम्हाला तासभर बसावं लागेल. 
तासाभरानं केबिनमधून एक तरुण बाहेर पडला.
रिशेप्शनिस्ट सुनिलला म्हणाली, ‘आता तुम्ही सरांना भेटू शकता’ .
तो केबिनमध्ये गेला. आता एक वयस्क व्यक्ति बसली होती. तिचे डोळे भेदक होते. चेहरा गंभीर.
‘बोला मिस्टर सुनिल पाटील. काय प्रॉब्लेम आहे तुमचा?’
सुनीलनं त्याची सगळी कथा ऐकवली. यातनं काय मार्ग काढता येईल ते विचारलं.
‘तुमची केस किरकोळ आहे. तुमचं काम होऊन जाईल. तुम्ही आता रिलॅक्स होऊन बसा. माझ्या डोळ्यांकडं टक लावून बघा’, ती व्यक्ति म्हणाली.

सुनिल त्या व्यक्तिच्या डोळ्यांकडं बघू लागला. पुढच्या कांही सेकंदातच त्याचे डोळे जड होऊ लागले, त्याला गुंगी येऊ लागली आणि तो गाढ झोपेत गेला. त्या गाढ झोपेत त्याला एक सुंदर तरुणी दिसली. तिच्यासोबत एक छोटी मुलगी होती. ती तरुणी त्याच्याकडं बघून हसली. त्याच्याकडं बोट दाखवत तिनं आपल्या मुलीला कांहीतरी सांगितलं. ती छोटी मुलगी धावतच त्याच्याकडं आली आणि त्याला बिलगली. त्यानं तिला आपल्या दोन्ही हातानं उचललं आणि हवेत उंच उडवलं. अलगद झेललं. थोड्या वेळानं तो म्हणाला, चला आपल्याला उशीर होतोय, आपण घरी जाऊ. मग ते तिघंही घरी आले. त्याच्या फ्लॅटवर. 

एवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला, मिस्टर सुनिल, जागे व्हा. जागे व्हा.
तो झोपेतून हळूहळू जागा झाला. पण त्याला त्याच्या डोळ्यावरचा अजूनही ताण जाणवत होता.
‘मिस्टर सुनिल’, त्या व्यक्तिनं विचारलं, ‘तुम्हाला काय दिसलं?
’‘मला जे पाहिजे ते दिसलं. एक तरुणी आणि तिची लहान मुलगी… माझ्याबरोबर’ 
‘छान!’ ती व्यक्ति म्हणाली, ‘मी तुमच्या मनाला सूचना दिल्या आहेत. आता तुम्हाला जसं पाहिजे, तसंच घडेल… जे पाहिजे ते मिळेल. आणि हे सगळं तीन आठवड्यांच्या आत घडून येईल. आता तुम्ही तुमच्या बिझनेसकडं लक्ष द्या. बाकी कांही काळजी करू नका. सगळं कांही आपोआपच घडेल. माझ्याकडं परत यायची गरज नाही. पण मला तुमचा मोबाईल फोन नंबर देऊन ठेवा’
सुनीलनं त्याचा नंबर देऊन टाकला. मग म्हणाला, ‘थॅंक यू सर! तुमची फी किती द्यायची?
’‘बाहेर रिशेप्शनिस्ट सांगेल किती ते. तिच्याकडेच द्या.’

Marathi short story: सिंगल मदर

पुढे चालू……

सिंगल मदर (भाग 2)

सिंगल मदर -भाग 3

सिंगल मदर -भाग 4 |

वाचण्यासारखं आणखी काही……

गूढकथा: व्हर्च्युअल डॉटर

अँजेलिना बॅण्डची गोष्ट

प्रेम-काजवा | Love Letter

पत्रमैत्रिण | Pen Friend: मराठी लघुकथा

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English (Online English Magaine)