महावीर सांगलीकर
मराठी माणूस म्हणजे नेमका कोण रे भाऊ? मराठी माणसाची नेमकी व्याख्या काय आहे?
माझ्या मते ‘ज्याची मायबोली मराठी आहे तो मराठी माणूस’ ही व्याख्या जास्तीत जास्त बरोबर असावी, किंबहुना तीच मराठी माणसाची खरी व्याख्या होवू शकते.
पण प्रत्यक्षात मराठीवादी लोकांनी मराठी माणसाची व्याख्या संकुचित करून तिला प्रांतिक स्वरूप दिले आहे. म्हणजे महाराष्ट्रात रहाणारा मराठी आडनाव असणारा माणूस म्हणजे मराठी माणूस अशी मराठीवादी लोकांनी तयार केलेली व्याख्या आहे.
मराठी माणसाची ही दुसरी व्याख्या मान्य केल्यास कांही महत्वाचे प्रश्न उभे रहातात.
मायबोली मराठी पण ते महाराष्ट्रीयन नाहीत….
पहिला प्रश्न म्हणजे ज्यांची मायबोली मराठी आहे, पण ते महाराष्ट्राचे नागरिक नाहीत, ते मराठी माणूस ठरत नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर मुख्य करून गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात येथे ज्यांची मायबोली मराठी आहे अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे. ते लोक त्या त्या राज्याचे रहिवासी आणि नागरिक आहेत. पण मग अर्थातच ते महाराष्ट्राचे रहिवासी आणि नागरिक नसल्याने मराठीवाद्यांच्या जगात त्यांना कसलेही स्थान रहात नाही. प्रत्याक्षातही असेच घडत असलेले आपण बघतो.
महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांची मायबोली मराठी नाही…
दुसरा प्रश्न म्हणजे खुद्द महाराष्ट्रात ज्यांची मायबोली मराठी आहे, त्यांची संख्या सुमारे 68% आहे. म्हणजे सुमारे 32% लोकांची मायबोली मराठी सोडून इतर आहे. हे लोक मराठीवाद्यांनी तयार केलेल्या मराठी माणसाच्या व्याख्येत बसत नाहीत, जरी हे लोक महाराष्ट्राचे रहिवासी आणि अधिकृत नागरिक असले, मराठी त्यांची व्यवहार भाषा आणि सेकंड लँग्वेज असली, आणि त्यांच्याकडून मराठी भाषेचा वापर त्यांच्या मायबोलीपेक्षा जास्त होत असला तरी. त्यामुळे ते मराठी नसले तरी महाराष्ट्रीय आहेत. आता मराठीवादी लोक या लोकांकडे नेहमी परकेपणाच्या भावनेने पहात असतात.
म्हणजे गम्मत बघा, मराठीवादी लोकांनी महाराष्ट्रात रहाणारे तथाकथित अमराठी लोक आणि महाराष्ट्राच्या बाहेर रहाणारे मराठी भाषिक लोक या दोघांना आपल्यापासून दूर सारले आहे.
मराठीवादी लोक एवढ्यावरच थांबत नाहीत. जे महाराष्ट्रात रहातात आणि ज्यांची मायबोली मराठी आहे, त्यातीलही अनेकांना ते मराठी मानत नाहीत. कारण काय तर त्यांची आडनावे मराठी नसतात.
महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांची मायबोली मराठी नाही……..अशा लोकात महाराष्ट्राचे सगळ्यात जुने रहिवासी असणारे आदिवासीही आहेत.
जातीयवादाचे एक उदाहरण …..
माझा एक मित्र आहे. त्याचे आडनाव शर्मा. त्याची आई मराठी. वडील उत्तर भारतातले, पण पुण्यात स्थायिक झालेले. हे सगळे कुटुंब घरात आणि व्यवहारात मराठी बोलणारे. पुढे माझा मित्र पत्रकार झाला. दिल्लीला गेला. दिल्ली आकाशवाणीवरून मराठी बातम्या देवू लागला. पण एक शर्मा नावाचा माणूस मराठी बातम्या देतो म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या मराठीवादी लोकांना हे मुळीच रुचले नाही. त्यांनी दबाव आणून त्याच्या जागी ‘आपल्या’ माणसाची वर्णी लावली. अर्थात हे एक प्रकारे बरेच झाले, कारण शर्माची संकुचित मराठी जगतातून सुटका झाली. आज तो एका आंतरराष्ट्रीय टी.व्ही. न्यूज चॅनेलचा प्रमुख आहे.
हा ‘मराठी जातीयवाद’ मिडिया, साहित्य, सिनेमा, नाटक आदी सगळ्याच क्षेत्रांमध्ये दिसून येतो.
वेगवेगळ्या प्रदेशातील प्रसिद्ध लोकांची विकीपेडीयावरील याद्या पाहिल्यास त्यात सर्व धर्मांचे, वेगवेगळ्या प्रदेशातील पण त्या प्रदेशाशी जवळचा संबंध असणारे, समाजातील सगळ्या स्तरातील लोकांची नावे दिसतात. अपवाद फक्त मराठी लोकांच्या यादीचा. एक-दोन नावांचा अपवाद वगळल्यास या यादीत इतर धर्मियांना, समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना स्थान नाही.
प्रांत-जात-धर्म यांना बळी पडलेली मराठी अस्मिता
मराठी अस्मिता ही प्रांत-जात-धर्म यांना बळी पडलेली आहे. याउलट तमिळ अस्मितेचे उदाहरण घ्या. तिथे एक मलयालम माणूस (एम जी. रामचंद्रन) तमिळनाडूचा मुख्यमंत्री होवू शकतो, तर एक मराठी माणूस (रजनीकांत) तमिळ सिनेमासृष्टीचा सुपर स्टार होवू शकतो. तमिळ अस्मिता ही भाषेशी संबंधीत आहे, प्रांत-जात-धर्म यांच्याशी संबंधीत नाही.
दुसरे उदाहरण हिंदी भाषेचे आहे. ती तर प्रांत-जात-धर्म यांच्या पलीकडे गेली आहे, आणि आता तर तिने देशाचीही सीमा ओलांडली आहे.
मध्यप्रदेश मधील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, एम.एफ. हुसेन, सलमान खान, राहुल द्रविड यांना आपले मानतात, कारण या लोकांचा मध्य प्रदेशशी जवळचा संबंध आला आहे. याउलट तथाकथित मराठी लोकांनी पंढरपूर मध्ये जन्मलेल्या एम.एफ. हुसेन यांना, नगर जिल्ह्यात जन्मलेल्या झहीर खान या खेळाडूस आपले कधी मानले आहे का? मध्यप्रदेशमध्ये यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांना जो मान आहे, तो महाराष्ट्रात आहे का?
कित्तूरची राणी चेन्नमा, जी मराठी भाषिक होती आणि तिचा सर्व राजकीय पत्रव्यवहार मराठी भाषेत होत असे, ती मराठी माणसाला आपली वाटते का? नाही वाटत, कारण ती महाराष्ट्राच्या बाहेरची होती.
महाराष्ट्रात अशी कितीतरी कुटुंबे आहेत, जी पक्की मराठी आहेत, पण ती मराठीवाद्यांना कधीच मराठी वाटत नाहीत, कारण त्यांची आडनावे प्रस्थापित मराठी लोकांसारखी नसतात. या मराठीवादातील आणखी एक मेख म्हणजे येथेही वर्णव्यवस्था आणि जातीय उतरंड आहे. कांही लोक स्वत:ला जरा ‘जास्तच मराठी’ समजतात आणि इतरांना हलक्या प्रतीचे मराठी समजतात, किंवा त्यांना मराठी समजतच नाहीत! मराठीवाद्यांची ही संकुचित मानसिकता त्यांच्या न्यूनगंडातून तयार झालेली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढणे तसे अवघडच आहे.
मराठी अस्मिता ठेवायचीच असेल तर ती जात, धर्म, प्रांत यांना भेदून केवळ भाषेशी संबंधित असली पाहिजे.
हेही वाचा ……
तुमच्या मुलांना इंग्लिश मेडीयममध्येच शिकवा!
अण्णा भाऊ साठे: मराठी साहित्यातील ध्रुवतारा