महावीर सांगलीकर
Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री
(पत्रमैत्रिण (दिशाची गोष्ट) या दीर्घकथेचा तिसरा भाग)
2002चा जानेवारी महिना उजाडला. गेली तीन वर्षे मी इंटरनेटचा भरपूर वापर करीत आलो होतो. माझ्या अनेक वेबसाईट्स होत्या. त्यातील इतिहास आणि इंडॉलॉजी या विषयावरील वेबसाईट्स फारच लोकप्रिय झाल्या होत्या. इंटरनेट जगतात आणि त्याबाहेरही मी एक प्रसिद्ध व्यक्ति झालो होतो.
एके दिवशी दुपारी नेहमीप्रमाणं सायबर कॅफेमध्ये जावून मी माझ्या इमेल अकाउंटमध्ये लॉग इन झालो. बऱ्याच नवीन इमेल्स आल्या होत्या. त्या पाठवणाऱ्यांच्या नावांवरून मी एक नजर टाकली.
त्यातल्या एका नावावर मी थबकलो. ती दिशा कोठारीची इमेल होती.
ही तीच दिशा आहे का, की त्याच नावाची दुसरी कोणी? असा विचार मनात आला.
मी त्या इमेलवर क्लिक केले.
इमेल ओपन झाली. त्यात केवळ एक वाक्य होते… Do you remember me?
अरे, म्हणजे ही तीच आहे.
तब्बल दहा वर्षांनी संपर्क केलाय तिनं माझ्याशी!
मी लगेच त्या इमेलचं उत्तर दिलं:
What do you think? Is it possible for me to forget you?
मग मी इतर इमेल्स वाचू लागलो.
तेवढ्यात दिशाची आणखी एक इमेल आली:
Thank God, you still remember me. … After 10 years.
How are you? What about your magazine?
या इमेलचंही उत्तर मी लगेच दिलं.
कांही मिनिटातच तिची आणखी एक इमेल आली.
तिनं मला मेसेंजरवर यायला सांगितलं.
मी मेसेंजरमध्ये लॉग इन केलं, तिला add केलं.
मग आम्ही एकमेकांशी चॅटिंग करू लागलो.
एखादा जुना मित्र खूप वर्षांनी भेटल्यावर जो आनंद होतो तो दोघांनाही झाला होता.
गप्पाच गप्पा…. त्या कांही संपेनात.
तेवढ्यात लाईट गेली. ती यायची काही लक्षणं दिसेनात.
नाईलाजानं सायबर कॅफेतून बाहेर पडावं लागलं.
Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री
दुसऱ्या दिवशी दुपारी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो.
मेसेंजरमध्ये लॉग इन केले, तर दिशा ऑंनलाईनच होती.
मी तिच्यासाठी मेसेज टाईप करत होतो, तेवढ्यात तिचाच मेसेज आला…
‘का हो, काल तुम्ही मध्येच चॅटिंग बंद का केले?’
‘अगं, काल इथली लाईटच गेली….’
‘मला वाटले तुम्ही कंटाळला माझ्याशी बोलायला… ’
‘तुला खरंच वाटतं का मी कंटाळलो असेल असं?’
‘तुमचं कांही सांगता येत नाही’
दिशा थोडी रागात दिसत होती. काय करावं बरं?
थोडा वेळ आपण कांहीच बोलायचं नाही. बघू तिची काय प्रतिक्रिया होतेय ती.
‘Hallo… Hallo… Are you there? Hallo… I am sorry….. मला वाटतेय मी जरा जास्तच बोलले, मला माफ करा’
मी कांहीच उत्तर दिले नाही.
‘Hey… I am very sorry’
मग मी मनात म्हणालो, आता जास्त ताणायला नको…
‘हाय दिशा, माझा एक मित्र इथे आल्यामुळे मी आत्ता थोडा वेळ तुझ्याशी चॅटिंग केले नाही, सॉंरी. पण तू माफी का मागत आहेस?’
‘कांही नाही, मला वाटलं तुम्ही रागावलात की काय….’
मी तिला म्हणालो, ‘दिशा, आता आपण उद्या परत बोलू, मला जरा महत्वाच्या कामासाठी सिटीत जायचे आहे’
‘तुम्ही खर बोलताय ना? खरंच काम असेल तर जा… पण उद्या नक्की बोलायचं. आणि थोडं लवकर
या नेटवर ……’
‘बघतो जमलं तर ..’
‘तुम्ही मुद्दाम बोलताय असं? मला चिडवण्यासाठी?’
‘नाही नाही दिशा… मी लवकर उठत नाही. बाकीचीही काम असतात मला…’
‘उद्यापासून तुम्ही लवकर उठाल! माझ्याशी चॅट करण्यासाठी’ असं म्ह्णून ती ऑफ लाईन झाली.
मग मी मेसेंजरमधून लॉग आउट झालो आणि माझी इतर कामं करत बसलो.
Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री
दुसऱ्या दिवशी मी खरंच लवकर उठलो. माझी काही काम लवकर उरकली आणि सायबर कॅफेत गेलो.
मेसेंजर मध्ये लॉग इन झालो
पुढच्याच मिनिटाला दिशा ऑनलाईन हजर.
ती म्हणाली, ‘काल तुम्ही मेसेंजरमधून लॉग आउट करून नेटवर पुढचे तीन तास बसला होता ना?’
कमाल आहे.. दिशानं हे कसं काय ओळखलं असावं बरं ?
हां, आता लक्षात आलं, तिला खोटं सांगून आपण मेसेंजरमधून बाहेर पडलो, त्यानंतर एक लेख लिहिला आणि तो आपल्या वेबसाईटवर अपलोड केला. तिनं तो लेख आणि त्याच्यासोबतची वेळ पाहिली असावी.
पण हे असंच असावं का? खात्री करून घेण्यासाठी मी म्हणालो,
‘हे तुला कसं काय कळलं?’
‘ओळखा पाहू?’
मी मला जे लक्षात आलं होतं ते सांगितलं.
‘बरं झालं तुम्ही मला ही आयडीया सांगितलीत. पण मी या पद्धतीने नाहीच ओळखलं. मी आपलं सहज खडा टाकून बघितला…. आता इथून पुढे तरी माझ्याशी खोटे बोलत जाऊ नका. लगेच पकडले जाल!’
दिशाचं हे बॉसिंग मला जरा जास्तच वाटत होतं, पण ते हवंहवंसं देखील वाटत होतं .
‘तुमचा एखादा फोटो आहे का? मला मेल करा’ तिनं पुढचा आदेश दिला.
‘तू फिमेल आहेस, तुला मेल कशाला करायचं?’ मी विचारलं….
‘पुअर जोक! काहीपण बोलू नका’, ती म्हणाली, ‘तुम्ही तुमचा फोटो मला लगेच पाठवा’
‘पाठवेन, पण जरा प्लीज वगैरे म्हण की… हुकूम कशाला सोडतेस? आणि आधी मला हे सांग माझा फोटो तुला पाहिजे कशाला?’
‘तुम्ही कसे दिसता ते बघायचे आहे मला’
‘ठीक आहे, पण आत्ता या क्षणाला माझ्याकडे माझा फोटो नाही, मी तो तुला उद्या पाठवीन’
‘ओके, पण नक्की पाठवा…. please….…’
‘पाठवतो, पण मला सांग, तू कशी दिसतेस? राणी मुखर्जी सारखी? ऐश्वर्या राय सारखी? की दुसऱ्या कोणत्या हिरोइनीसारखी?’
‘अहो पडद्यावरच्या त्या मेकअप सुंदरीची माझ्याशी कशाला तुलना करता? आणि तुलनाच करायची असेल तर कोणती हिरोईन माझ्यासारखी दिसते असे विचारा ना? थांबा, मी तुम्हाला माझा फोटोच पाठवते. बघा आणि तुम्हीच सांगा मी कशी दिसते ती’
पुढच्याच मिनिटाला तिची एक इमेल आली. सोबत तिने एक फोटो जोडला होता. मी तो ओपन केला आणि त्या फोटोकडे पहातच राहिलो. गुबगुबीत, हसरा आणि निरागस चेहरा, तरीही त्यातून झळकणारा करारीपणा, मोठे-मोठे डोळे, सरळ नाक …..
Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री
‘मिळाला का फोटो?’
‘मिळाला…’
‘मग कशी दिसते मी? सांगा’
‘नक्की तुझाच फोटो आहे ना?’
‘मी कशाला दुसऱ्या कोणाचा फोटो पाठवू?’
‘छान आहे फोटो….’
‘फोटो छान असेल हो, पण फोटोतल्या व्यक्तीचे काय? ती कशी वाटते?’
‘ती तर पहिल्यापासूनच छान वाटते…… फोटो बघितला नव्हता तेव्हाही’
‘मग विचार काय आहे?’
‘माझा कांहीच विचार नाही, पण तुझा विचार कळला. उद्या माझा फोटो बघितल्यावर तुझा विचार नक्कीच बदलेल अशी माझी खात्री आहे’
‘पाठवा तर खरं. मी नाही बदलणार माझे विचार’
‘दिशा, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? तू कशी दिसतेस हे पाहण्याची माझीही इच्छा होती. पण मी तुला तुझा फोटो पाठव असं म्हणालो नाही, तर तू तो स्वत:हून पाठवलास. हे कसं काय घडलं?’
‘कसे ????’
‘मी एक छोटीशी ट्रिक वापरली. मी फक्त एवढंच म्हणालो, तू कशी दिसतेस? राणी मुखर्जी सारखी? ऐश्वर्या राय सारखी? की दुसऱ्या कोणत्या हिरोइनीसारखी? केवळ असं म्हणाल्यानं तू तुझा फोटो स्वत:हून पाठवून दिलास. हे सांगण्याचं कारण म्हणजे आपण बॉसिंग न करताही, हुकूम न सोडताही आणि अगदी विनंती न करताही समोरच्या व्यक्तीला आपल्याला हवं तसं वागायला लावू शकतो’
‘ग्रेट! तुमच्याकडून बरेच कांही शिकायला मिळते’
‘तुला आणखी एक गोष्ट सांगायचे होती…’
‘काय?’
‘तू मला हुकूम सोडतेस, ते मला कधीकधी आवडतं … का कुणास ठाऊक’
‘पहिल्यापासून तसंच आहे तुमचं…’
‘पहिल्यापासून? काय म्हणतेस ते कळलं नाही मला!’
‘कळेल हळू हळू…. ‘
दुसऱ्या दिवशी मी तिला माझा फोटो पाठवून दिला.
तिचं उत्तर आलं, ‘यु आर अ टिपिकल मराठी माणूस. ओके फॉर मी…. मला तुमचा सेल फोन नंबर सांगा….’
‘सॉरी, माझ्याकडं सेलफोन नाही…..’
‘ठीक आहे, मी माझा नंबर देते, त्यावर तुम्ही मला फोन करा….’
‘यु आर अगेन गिव्हिंग ऑर्डर्स…… जमला तर करेन…’
‘जमला तर वगैरे कांही नाही. करायचाच. आज संध्याकाळी सात वाजता. नाही केलात तर मग बघा..’
‘ए… मला धमकी देवू नकोस हं.. काय करशील मी नाही फोन केला तर?’
‘मग मी उद्या नेटवर तुमच्याशी चॅटिंग नाही करणार…’
‘नको करूस…. तेवढाच तुझा वेळ वाचेल..’
‘आज संध्याकाळी सात वाजता….तुम्ही फोन करणारच..’ असे म्हणून तिनं तिचा फोन नंबर दिला आणि ती लॉग आउट झाली.
Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री
संध्याकाळचे 6.50 झाले होते. माझी पावलं एका टेलेफोन बूथकडं वळली.
बरोबर सात वाजता मी दिशाला फोन लावला. फोन लगेच उचलला गेला.
‘इज इट दिशा?’
‘यस मिस्टर महावीर’
‘कैसी हो?’
‘आय एम फाईन, व्हाट अबाउट यु?’
‘आय एम अल्वेज फाईन’
‘मला वाटले होते तुम्ही फोन करणार नाही’
‘खरेच करणार नव्हतो. पण मला काय झालेय ते कळत नाही. तुला फोन करायचा नाही हे पक्के ठरवूनही माझी पावले टेलेफोन बूथकडे वळली’
‘याचा अर्थ तुम्ही माझ्या प्रेमात पडला असा होतो…’
‘आणि तू?’
‘तुम्हाला काय वाटते? हा सगळा माझा टाईम पास चालला आहे?’
‘मला तर हा सगळा भास वाटतो. किंवा एक स्वप्न. प्रत्यक्षात न येवू शकणारे’
‘यु आर अ पेसिमिस्ट … एक निराशावादी’
‘नो, आय एम नॉट. आय एम जस्ट अ प्रॅक्टिकल पर्सन. जमिनीवर पाय ठेवून जगणारा’
‘मला वाटते आपण या विषयावर उद्या बोलू’
‘ओके, पण तुला नाही वाटत हे सगळे वेळ वाया घालवायचे उद्योग आहेत?’
‘अजिबात नाही..’
‘मला काळजी वाटते… पुढे काय होईल याची. माझ्यामुळे तुला नसता मनस्ताप व्हायला नको’
‘तुम्ही त्याची चिंता करू नका. मी सांगेन तसे वागलात तर भलेच होईल आपल्या दोघांचे…’
‘मी नाही समजलो..’
‘समजेल. आपण परत बोलणारच आहोत’
‘ठीक आहे. ठेऊ आता?’
‘मिस्टर महावीर, तुम्ही माझ्यापासून दूर पळायचा प्रयत्न करत आहात असे सारखे वाटते’
‘होय… मलाही ते जाणवतेय…’
‘ठीक आहे… पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही’
‘इज इट अ चॅलेंज?’
‘यस. मी मनात आणले तर तुम्ही पुढचे किमान तीन तास माझ्याशी बोलत रहाल. पण आज नको’
मग विषय बदलत ती म्हणाली,
‘पुण्यात विविध भारतीचे मुंबई केंद्र ऐकू येते का?’
‘मी कधी ऐकलं नाही, पण येत असावं’
‘येत्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता ऐका…’
‘कांही विशेष कार्यक्रम आहे का?’
‘इट इज अ सिक्रेट. ऐका तर खरे’
‘बरं, ऐकेन. ठेऊ फोन आता?’
‘नको’
‘एकदा तरी हो म्हणायला शिक की’
‘बरं ठीक आहे. तेवढं शुक्रवारच्या कार्यक्रमाचं लक्षात असू द्या. परत आठवण करेनच. आणि उद्या भेटूच नेटवर….’
Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री
-पुढे चालू
आधीचे भाग….
पत्रमैत्रिण | Pen Friend: मराठी लघुकथा
पत्रमैत्रिण | Pen Friend (भाग 2)
इतर कथा व लेख
Love Talk: मैं तुमसे प्यार नहीं करती ……
प्रेमकथा: लव्ह जिहाद | Love Jihad
7 thoughts on “Marathi Story: दिशाची पुन्हा एन्ट्री”