सिंगल मदर -भाग 4 | Single Mother Story

महावीर सांगलीकर

सिंगल मदर -भाग 4 (शेवटचा भाग)

या कथेचे पहिले तीन भाग तुम्ही वाचले नसतील तर ते पुढील लिंक्स वर वाचून घ्यावेत:

सिंगल मदरसिंगल मदर (भाग 2)सिंगल मदर -भाग 3

भाग 4 (शेवटचा भाग):

एके दिवशी सुनिल एका बिझनेस सेमिनारमध्ये लेक्चर देण्यासाठी गेला होता. सेमिनार संपल्यावर एक तरुणी सुनिलला भेटली आणि म्हणाली, ‘सर मी सीमा. मला तुमचा फोन नंबर हवाय’
सुनिलनं त्या तरुणीला आपलं कार्ड देण्यासाठी त्याच्या मागच्या खिशातनं पाकीट काढलं आणि तिला आपलं बिझनेस कार्ड दिलं. ते घेता घेता ती तरुणी म्हणाली, ‘सर तुमच्या पाकिटात तो फोटो कुणाचा आहे?’
‘तो माझ्या मुलीचा फोटो आहे.
‘ती तर सुनिताची मुलगी आहे…. स्वीटी…. म्हणजे तुम्ही सुनिताचे मिस्टर आहात?’
‘होय.. तू सुनिताला ओळखतेस वाटतं..’
‘ओळखते म्हणजे? ती माझी खास मैत्रीण आहे’
‘ग्लॅड टू मीट यू मिस सीमा’
‘पण तिनं मला लग्नाला बोलवलं नाही. बरेच दिवस झाले भेटली नाही, फोन पण करत नाही. माझा फोन उचलत नाही…. मला तुमच्याशी जरा खाजगी बोलायचं आहे. पण आत्ता नको, इथं लोक आहेत. आपण उद्या भेटूया का कुठतरी?’
‘चालेल’

दुसऱ्या दिवशी सुनिल आणि सीमा एका हॉटेलमध्ये भेटले.
सीमा म्हणाली, ‘सर तुम्ही सुनिताशी लग्न केलं ते बरंच झालं. तिचं लग्नच होत नव्हतं आणि तिची तशी फारशी इच्छा पण नव्हती लग्न करायची…. सुनितानं तुम्हाला स्वीटीबद्दल सांगितलंच असेल’
‘नाही! तिचं काय?’
‘म्हणजे तुम्हाला सुनिता आणि स्वीटी बद्दल कांहीच माहीत नाही?’
‘मला फक्त एवढंच माहीत आहे की स्वीटी सुनिताची मुलगी आहे. मी सुनिताच्या आधीच्या आयुष्याबद्दल तिला कधीच कांही विचारलं नाही. तिचा नवरा कोण होता, घटस्फोट का झाला वगैरे. मला त्या गोष्टीशी कांही देणं-घेणंही नाही’
‘यू आर ग्रेट सर… पण मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे’
‘सुनिताबद्दल माझ्या मनात वाईट भावना येतील असलं कांही सांगणार असशील तर मला ते ऐकायचं नाही’
‘नाही सर…. मी सुनिताबद्दल वाईट कांहीच सांगणार नाही. सुनिता माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे. मी जे सांगणार आहे ते खरं म्हणजे सुनितानंच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. पण तिनं का सांगितलं नाही त्याचं कारण तिलाच माहीत’
‘ठीक आहे. सांग तुला काय सांगायचं ते’
‘सर, स्वीटी सुनिताची मुलगी नाही आहे’
‘आंऽऽ’ सुनिलला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानं उत्तेजित होऊन विचारलं, ‘मग कुणाची मुलगी आहे ती?’
‘ती एक विचित्र कहाणी आहे,’ सीमा म्हणाली, ‘त्यावेळी मी आणि सुनिता एकत्र रहायचो. एकदा आम्ही दोघी फिरायला सारसबागेत गेलो होतो. मला अचानक एक काम निघालं म्हणून मी घरी आले. तिकडे बागेत सुनिता एका बाकावर बसली होती. थोड्या वेळानं एक तरुणी तिच्या शेजारी येऊन बसली. ती तरुणी खूप सुंदर होती. मध्यमवर्गीय घरातली वाटत होती. तिच्या हातात एक बाळ होतं. ती तरुणी सुनिताशी गप्पा मारू लागली. दोघींच्यात चांगलीच मैत्री झाली. सुनिताला ते बाळ फार आवडलं. तिनं त्या बाळाला आपल्याकडं घेतलं आणि ती त्याचे लाड करू लागली.

थोड्या वेळानं ती तरुणी सुनिताला म्हणाली, ‘मी जरा गणपतीचं दर्शन घेऊन येते लगेच. इथला गणपती आपल्या इच्छा पूर्ण करतो म्हणे. माझ्या बाळाचं आयुष्य मजेत आणि सुखाचं जाऊ दे म्हणून मी प्रार्थना करणार आहे. तू पण चल पाहिजे तर’
‘नको’, सुनिता म्हणाली, ‘तू जाऊन ये. तोपर्यंत मी बाळाला सांभाळते’
‘ठीक आहे,’ ती तरुणी म्हणाली, ‘ मी येतेच पाच मिनिटात. माझी पर्स इथंच असू दे तुझ्याकडं’

सिंगल मदर -भाग 4

पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली, अर्धा तास झाला पण ती तरुणी कांही परत आली नाही. सुनिताचा जीव घाबरला. आता काय करायचं हे तिला कळेना. तिनं मला फोन लावला. ती फोनवर नुसतीच रडली. घाबरली होती. मी लगेच परत सारसबागेत गेले. बघते तर सुनिताच्या हातात एक बाळ होतं. आजूबाजूचे लोक बघत होते. काय झालं असेल याचा मला अंदाज आला. मी तिला म्हणाले, ‘तू रडायचं बंद कर बघू आधी. लोक बघत आहेत. आपण घरी जाऊया चल’.
सुनितानं बाळाला आपल्या कडेवर घेतलं आणि बरोबर त्या तरुणीची पर्सही घेतली.

आम्ही घरी आलो. सुनितानं काय झालं ते रडत रडत मला सविस्तर सांगितलं.
‘आता काय करायचं सीमा’ तिनं भोकाड पसरलं. मग तीच म्हणाली, चल आपण पोलीसात जाऊ’
‘नको,’ मी म्हणाले, ‘पोलीस म्हणतील हे तुझंच बाळ आहे. तुला नकोय म्हणून तू खोटी कथा रचून सांगतेस. उगीच चौकशी चालू होईल तुझी आणि बदनामी पण होईल’
‘मग काय करायचं? अनाथाश्रमात जाऊया का?’
‘नको… त्यापेक्षा आता तू या बाळाला तुझंच बाळ म्हणून सांभाळ’

आधी ती याला तयार झाली नाही. मी तिला म्हणाले, ‘आपल्याकडं दुसरा ऑप्शन नाही. तुला नसेल सांभाळायचं तर राहू दे. मीच सांभाळते त्या बाळाला. पण मग ते बाळ मलाच आई म्हणेल, तुला नाही…’
मी असं म्हणाल्यावर सुनितानं त्या बाळाला आपल्या छातीशी कवटाळलं. म्हणाली, ‘ठीक आहे. आजपासून मीच या बाळाची आई’.

सिंगल मदर -भाग 4

मग मी सुनितानं आणलेली त्या तरुणीची पर्स उघडली. त्या पर्समध्ये एक हजार रुपयांच्या करकरीत नोटांचं एक बंडल होतं. सोबत एक चिट्ठी होती. मी ती चिट्ठी उघडली आणि वाचू लागले,

‘प्रिय भगिनी,   

हे बाळ जे तुझ्याकडे आहे, तिला तिच्या जन्मापूर्वीच मारण्याचा खूपदा प्रयत्न झाला, कारण मला मुलगा नव्हे तर मुलगी होणार हे माझ्या नवऱ्याला आणि सासूला मुळीचं पसंत नव्हतं. तरीपण मी मोठ्या जिद्दीनं या बाळाला जन्म दिला. पण अजून देखील माझी सासू आणि नवरा या बाळाला मारायला टपले आहेत.

या मुलीचं भविष्य तर उज्वल आहेच, पण ही ज्या घरी जाईल त्या घराचं देखील भलं होणार आहे. या मुलीसाठी नवी आई शोधायचे प्रयत्न मी गेले कित्येक दिवस करत आहे. जी तरुणी माझ्या बाळाला चांगलं सांभाळू शकेल अशा तरुणीचा चेहरा दिसला की मी तिच्याकडं हे बाळ द्यायचं आणि गायब व्हायचं असं मी ठरवून ठेवलेलं होतं.

सोबत एक लाख रुपये आहेत. हे माझ्या स्वत:च्या कष्टाचे पैसे आहेत. बाळाला आणखी एखादं वर्ष धोक्याचं जाणार आहे. वेळ आली तर तिच्यासाठी हे पैसे उपयोगी पडतील.  

तुझे माझ्यावरचे उपकार न फिटण्यारखे आहेत. तुझं आणि माझ्या बाळाचं भलं होणारच आहे आणि तुम्हा दोघांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या भलं होणार आहे.    

आणखी काय लिहू?

-बाळाची आई’

हे ऐकून सुनिल चकित झाला. म्हणजे सुनिताचं आधी लग्न झालेलंच नव्हतं. सुनितानं हे सगळं आपल्यापासून लपवून का ठेवलं असावं? अगदी आपण तिच्याशी लग्नाला नकार दिला, तिचं आधी लग्न झालाय म्हणून, त्यावेळी देखील तिनं हे आपल्याला सांगितलं नाही. कमाल आहे तिची. आणि ते लाख रुपये? सुनितानं ते बॅंकेत एफ.डी. करून ठेवलेत स्वीटीसाठी.
मग तो सीमाला म्हणाला, ‘तू मला हे सगळं का सांगितलंस? यामागं तुझा काय हेतू आहे?’
‘जस्ट फॉर यूवर इन्फोर्मेशन… यामागं माझा कसलाही वाईट हेतू नाही. मी हे गुपित आजपर्यंत कुणालाही सांगितलेलं नाही. पुढेही कुणाला सांगणार नाही’
‘ठीक आहे… तू मला आता एक वचन दे..’
‘काय?’
‘तू मला हे सांगितलं आहेस हे सुनिताला कधीही सांगायचं नाहीस’
‘नाही सांगणार. प्रॉमिस’
‘थॅंक यू. मी पण तिला हे मला कळलंय हे कधीच बोलणार नाही’

संध्याकाळी सुनिल घरी आला. सुनिताला म्हणाला, ‘आज आपण एखादा सिनेमा बघू आणि जेवणही बाहेरच करू. चालेल ना?’
‘हो, चालेल. पळेल सुद्धा!’

सिंगल मदर -भाग 4

या कथाही वाचा:

प्रेमकथा: लव्ह जिहाद | Love Jihad

दिनकरचं लग्न

गौरी आणि फेस रीडर

गूढकथा: व्हर्च्युअल डॉटर

कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स

TheyWon English (Online Magazine)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

2 thoughts on “सिंगल मदर -भाग 4 | Single Mother Story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *