महावीर सांगलीकर
व्हिगन डाएट
ज्यांना व्हिगन म्हणजे काय हे माहित नाही, त्यांच्यासाठी: व्हिगन म्हणजे असे लोक जे कोणताही प्राणिज पदार्थ खात नाहीत, अगदी दूध आणि दुधापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप, पनीर असे पदार्थ ते खात नाहीत, दुधाचा चहाही घेत नाहीत, मध वगैरे पदार्थ खात नाहीत. त्याचप्रमाणे प्राण्यांपासून निर्मित वस्तू (उदा. कातड्यांच्या वस्तू, लोकरीचे कपडे, फर पासून बनलेल्या वस्तू इत्यादी) वापरत नाहीत.
व्हिगनिज्म ही एक लाईफ स्टाईल आहे, आणि त्यामागे प्राण्यांविषयी करुणा हे एक मुख्य कारण आहे. याशिवाय अनेक लोक आपलं आरोग्य चांगलं रहावं यासाठी व्हिगन होत असतात.
गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्य शाकाहारी लोकांमध्ये व्हिगन डाएट लोकप्रिय झाले आहे, आणि आता हा ट्रेंड भारतातही आला आहे.
कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, काय प्यावं आणि काय पिऊ नये हा ज्याचा त्याचा (आणि जिचा तिचा) प्रश्न आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक चॉईस असतात, आवडीनिवडी असतात, सामाजिक आणि धार्मिक परंपरा असतात. त्यानुसार प्रत्येकाचे खानपान असते.
तेव्हा मी काय खातो आणि खात नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, हे आधीच सांगितलेलं बरं! माझी लाईफ स्टाईल, खाद्य संस्कृती तुम्हीही पाळावी हा माझा अजिबात आग्रह नाही.
व्हिगन डाएट
माझा शाकाहार
तर मी जन्मापासून शाकाहारी. जैन कुटुंबात जन्म झाल्याने परंपरेने, संस्काराने शाकाहारी. पुढे जैन समाजातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांशी, चळवळींशी सततचा संबंध आल्याने, त्याचप्रमाणे जैनिज्म या विषयावर मी बरंच संशोधन केल्याने मी शाकाहारापासून कधीही दूर गेलो नाही.
त्यात मला असे भरपूर जैन मित्र मिळाले की ज्यांच्याबरोबर वारंवार हॉटेलमध्ये जाऊन शुद्ध शाकाहारी जेवण घ्यायची सवय लागली. त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना जेवायला न्यायचीही सवय लागली.
असं असलं तरी शाकाहारातली एक गोष्ट मला नेहमीच खटकायची. ती म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ हे शाकाहारी कसे काय असू शकतात?
विशेष म्हणजे मला लहानपणापासून दूध आवडतंच नव्हते, पण मला ताक, दही, लोणी, तूप वगैरे गोष्टी चालत असत. हे सगळंच बंद करावं अशी माझी सुप्त इच्छा होती. पण गेली कित्येक वर्ष ही इच्छा प्रत्यक्षात आली नव्हती.
व्हिगन डाएट
….. आणि मी व्हिगन झालो!
28 डिसेंबर 2023 रोजी मी ठरवलं की 1 जानेवारी 2024 पासून आपण व्हिगन व्हायचं! म्हणजे दूध आणि दुधापासून बनणारे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत, अगदी दुधाचा चहाही प्यायचा नाही.
पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला, 1 जानेवारीची वाट बघत कशाला बसायचं? आजपासूनच व्हिगन व्हायला काय हरकत आहे? नाहीतरी बहुतेकांचे नविन वर्षाचे संकल्प हे संकल्पच राहतात! मग ठरलं, आजपासूनच, या क्षणापासून आपण व्हिगन व्हायचं … नव्हे, झालेलो आहोत. वयाच्या 66 व्या वर्षी!
मी व्हिगन झाल्याचं त्यावेळी मी सोशल मीडियात वगैरे जाहीर केलं नाही. पण कोणाच्या घरी गेल्यावर, किंवा कोणाबरोबर बाहेर जेवायला गेल्यावर मी व्हिगन असल्याचं सांगत असे, सांगावं लागतं.
28 डिसेंबर पासूनच मी दुधाचा चहा घायचा बंद केला आणि ब्लॅक टी घ्यायला सुरवात केली. तसेच मिठाई खायचं पूर्ण बंद केलं, कारण बहुतांश मिठाईमध्ये खवा किंवा तूप वापरलेलं असतं.
डाएट चेंजमुळं झालेली जादू
माझ्या या डाएट चेंजमुळे एक मोठी जादू झाली. पहिली जादू म्हणजे रोज सकाळी 9 च्या दरम्यान उठणारा मी 6 वाजायच्या आतच उठू लागलो. तेही अलार्म न लावता! दुसरं म्हणजे मी एकदम ऍलर्ट, ताजातवाना आणि प्रसन्न राहू लागलो. माझ्या कामामध्ये शिस्तबद्धता आली, त्यामुळे ती झटपट पूर्ण व्हायला लागली.
पण याहून महत्वाचं म्हणजे व्हिगन झाल्यामुळं आणि ब्लॅक टी मुळं माझ्या शरीरातल्या सगळ्या सिस्टिम्स सुधारल्या! म्हणजे अगदी डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून ब्लड सर्क्युलेशन पर्यंत! शरीरातलं सगळं टॉक्सिक निघून गेलं! पूर्वी माझी ब्लड शुगर चेक केली होती तेंव्हा ती धोक्याची पातळी ओलांडण्याचा तयारीत होती, आता ती एकदमच नॉर्मल आहे. विशेष म्हणजे माझं वजन 3 किलोनं कमी झालं!
हे सगळं व्हायचं कारण म्हणजे शरीरात दूध नावाचं विष आणि साखर जायचं पूर्ण बंद झालं, त्याचबरोबर ब्लॅक टीच्या औषधी गुणधर्माचा मोठा परिणाम झाला. (मला हाही प्रश्न पडला की आयुर्वेदामध्ये चहा या वनस्पतीचा आणि अर्थातच तिच्या औषधी गुणधर्माचा कसलाच उल्लेख का नाही? असो).
व्हिगन डाएट: असेही अनुभव…..
एक मजेशीर अनुभव असा आला की दूध आणि दुधाचे पदार्थ घेत नाही हे कळल्यावर काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले, मला शरीराला दूध कसं आवश्यक आहे हे ठासून सांगायला लागले! पण मी यासंदर्भात चिंचवड येथिल डॉ तानाजी बांगर यांचा सल्ला घेतला होता, त्यामुळे मी या इतर लोकांच्या सल्ल्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
एक चांगला अनुभव असाही आला की ज्यांना व्हिगन होण्याचे फायदे माहीत आहेत, आणि व्हिगन होणं किती कठीण आहे हेही माहीत आहे, त्यांनी मात्र माझं अभिनंदन केलं, आणि त्यांच्यामध्ये माझ्याविषयी आदरभावही वाढला!
माझ्यासाठी व्हिगन होणं फारसं अवघड गेलं नाही. काही अडचणी जरूर आल्या. पण मी व्हिगन डाएटच्या बाबतीत कसलीही तडजोड केली नाही. पुढेही याबाबतीत कसलीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही.
तुम्हाला व्हिगन व्हायचं असेल आणि त्या संदर्भात काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला 8149703595 या नंबरवर 11AM ते 7PM या वेळेत फोन करू शकता.
हेही वाचा…..
झोपेबाबत रिसर्चमधून मोठा खुलासा, माणसाला झोप येण्याचं कारण
वास्तुदोष: वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
2 thoughts on “मी व्हिगन झालो त्याची गोष्ट….”