वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

भोरडी येथी राममंदिराच्या शिलाहारकालीन चौकट

महावीर सांगलीकर

फोन: 91 8149703595

माझे वेल्हे येथील मित्र मधुकर जाधव यांचा एकदा अचानक फोन आला. फोनवर ते उत्तेजित स्वरात सांगत होते, ’अहो सांगलीकर, वेल्ह्यापासून जवळच जैन अवशेष सापडले आहेत, तुम्ही ते बघायला या’.

त्याच दिवशी माझे दुसरे मित्र जैन पुरातत्वाचे जाणकार दिलीप खोबरे हे पुण्यात कांही कामासाठी आले होते. मी त्यांना फोन करून वेल्ह्याला येणार का हे विचारले. त्यांनी तयारी दाखवल्यावर मी मधुकर जाधव यांना वेल्ह्याला आम्ही दोघे उद्या येत आहोत असे सांगितले.

त्यानुसार दुसऱ्या दिवशी आम्ही वेल्हे गाठले. वेल्हे येथील मुख्य चौकात मधुकर जाधव आणि त्यांचे खास मित्र गणेश देवगिरीकर हे दोघे आमची वाट पहातच उभे होते. त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. तेथून जवळच असलेल्या वाघदरा येथे गणेश देवगिरीकर यांचे घर होते. त्या रात्री आम्ही तेथे मुक्काम केला.

सकाळी सहा वाजता उठून आंघोळ करून आम्ही प्रवासाला सुरवात केली. आमच्याबरोबर वेल्हे येथील एक कार्यकर्ते सारनाथ गायकवाड हेही आले. दोन मोटरसायकलवर पाच जणांची ट्रिप सुरू झाली. मी आणि गणेश पुढे निघालो.

वळणावळणाच्या आणि चढउतारांच्या रस्त्यावरून जात असताना वाटेत भट्टी येथे रामाचे एक मंदीर लागले. गणेशने मोटरसायकल मंदिराच्या गेटमधून आत घेतली. हे राम-लक्ष्मण-सीतेचे आधुनिक मंदीर होते, पण या मंदिराची चौकट शिलाहारकालीन होती. चौकटीच्या वरच्या बाजूस जैन तीर्थंकरांची पद्मासनात बसलेली छोटी मूर्ती दिसत होती. चौकटीच्या खालच्या बाजूस दोन्हीकडे विद्याधर आणि देवांगनांची शिल्पे होती. नक्कीच ही चौकट शिलाहारकालीन जैन मंदिराची होती.

भट्टी येथील राम मंदिराची चौकट

ही चौकट वेल्हे तालुक्यातीलच सिद्धनाथाच्या एका उध्वस्त मंदिराची होती असे कळले.

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक जैन अवशेष सापडत असले तरी ते वेल्हे तालुक्यातही सापडावे याचे मला जरा आश्चर्यच वाटले.

त्या चौकटीचे आणि मंदीराचे कांही फोटो काढून आम्ही पुढे निघालो. हा भाग डोंगर आणि दऱ्यांनी नटलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असूनही पहातच रहावे असे निसर्गसौन्दर्य दिसत होते. मग पावसाळ्यात जेंव्हा सगळीकडे हिरवळ असते त्यावेळी हा भाग खूपच सुंदर दिसत असेल.

या रस्त्याने जाताना तोरणा किल्ल्याची मागची बाजू, राजगड किल्ला आणि रायगड किल्लाही स्पष्टपणे दिसतात. वाटेत लागणारी महाकाय दरी पहाण्यासारखी आहे. वाटेत बरेच फोटो काढले.

एवढ्यात सारनाथ गायकवाड आणि जाधव, खोबरे यांनी आम्हाला गाठले. आमचा प्रवास भोरडी या गावाच्या दिशेने सुरू झाला. थोड्याच वेळात आम्ही भोरडी गावात पोहोचलो. हे गाव सारनाथ गायकवाड यांचे आजोळ. लहानपणी ते जेंव्हा या गावी येत तेंव्हा गावाबाहेरील जंगलासारख्या भागात असणाऱ्या केळेश्वर मंदिरात येत असत. त्यावेळीच त्यांनी जंगलात सगळीकडे पडलेल्या मूर्त्या पाहिल्या होत्या. पण त्या नेमक्या कसल्या आहेत हे त्यांना त्यावेळी माहीत नव्हते.

भोरडी येथील केळेश्वर मंदिर, जैनांचा धोंडा आणि वीरगळ

आम्ही भोरडी गावात न थांबता सरळ केळेश्वर मंदिराकडे निघालो. मंदिराच्या गेटजवळ पोहोचलो. माझी पावले मंदिराच्या दिशेने वळाली, पण सारनाथ गायकवाड यांनी आधी झाडीत विखुरलेली शिल्पे बघावीत असे सुचवले. त्याप्रमाणे आम्ही सगळेजण देवळाच्या उलट्या दिशेने निघालो. तेथील झाडीत अनेक शिल्पे पडलेली होती. त्यातील बहुतेक शिल्पे म्हणजे वीरगळ, म्हणजे लढाईच्या वेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणासाठी कोरलेल्या शिळा होत्या. असे वीरगळ बनवण्याची पद्धत राष्ट्रकूटांच्या राजवटीत सुरू झाली होती व ती यादव राजवटीपर्यंत चालू होती. हे वीरगळ महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रदेशात जास्त करून सापडतात.

केळेश्वर मंदिराच्या आवारातील वीरगळ व इतर शिल्पे

विशेष म्हणजे भोरडी येथील वीरगळांमध्ये महिला सैनिकांचे वीरगळही मोठ्या संख्येने आहेत. आजवर सापडलेल्या वीरगळांमध्ये महिला सैनिकांचे वीरगळ असल्याचे ऐकिवात नव्हते. सारनाथ गायकवाड यांनी सांगितले की या भागातील अनेक गावांमध्ये असे वीरगळ दिसून येतात, पण भोरडी येथे अशा वीरगळांचे संख्या सगळ्यात जास्त आहे.

गणेश देवगिरीकर याच्या घराच्या परीसरातही अनेक वीरगळ पडलेले दिसले.

शिवपूर्वकाळात येथे फार मोठी लढाई झाली असवी, पण ही लढाई नेमकी कोण-कोणत्या राजांमध्ये झाली असावी हे समजू शकत नाही. एकाही वीरगळावर अथवा जवळपास एकही शिलालेख नाही. कांही अंदाज मात्र बांधता येतात. बहुतेक करून ही लढाई कोकणच्या शिलाहार आणि देशावरच्या यादव राजांमध्ये झाली असावी.

वीरगळांवर वरच्या बाजूस शिवाची पिंड आणि त्याची पूजा करणारी व्यक्ती कोरलेली दिसते. वीरगळावरील ही खून त्या शहीद सैनिकाचा धर्म शैव होता हे सांगते. कोकण आणि देश यांना जोडणारा हा सामरिकदृष्ट्या महत्वाचा भाग असल्याने तो ताब्यात घेण्यासाठी ही लढाई झाली असावी. या विषयावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

नंतर आम्ही देवळाच्या गेटमधून आत गेलो. देवळासमोर नंदी आहेत, तसेच मानस्तंभही आहे. दक्षिण भारतातील जैन मंदिरांसमोर मानस्तंभ हा असतोच. नंदी आणि मानस्तंभ बघून मी लगेच ओळखले की आधी हे जैन मंदीर होते, नंतर ते शिवाचे मंदिर झाले. संपूर्ण कोकणात असा प्रकार फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. याची प्राथमिक माहीती शिवलीलामृत या पोथीच्या पंधराव्या अध्यायात मिळते.

शिवलीलामृतमधील पंधराव्या अध्यायाचा सारांश असा की जेंव्हा पृथ्वीवर जैन आणि बौद्ध या ’पाखंडी’ मतांचे प्रस्थ माजले तेंव्हा शंकराने आदिशंकराचार्यांचा अवतार घेवून या दोन्ही धर्माचा नाश केला आणि ब्राम्हण धर्माचे रक्षण केले. शंकराचार्यांनी जैनांनी स्थापन केलेल्या मंदिरांमधून जैन दैवतांची हकालपट्टी करून तेथे शंकराच्या पिंडी बसवल्या. लोकांच्या विनंतीवरून जैनांची कांही तरी खुण शिल्लक रहावी म्हणून शंकराचार्यांनी अशा देवळांमध्ये ’जैनाचा धोंडा’ स्थापन केला.

याचा अर्थ असा होतो की एकेकाळी जैन असलेली मंदिरे शंकराचार्यांनी शिवाच्या मंदिरात बदलली. अशा मंदिरांमध्ये जैनाचा धोंडा स्थापन केला. म्हणजे आज ज्या मंदिरामध्ये जैनाचा धोंडा दिसून येतो, ती मंदिरे एके काळी जैन मंदिरे होती.

मी आणि गणेश भोरडीतील त्या मंदीराच्या गाभाऱ्यात गेलो. तेथे देवळीत एका ग्रामदैवताची मूर्ती होती, तर खाली जमीनीवर शंकराचा मुखवटा आणि जैनाचा धोंडा होता. असा जैनाचा धोंडा याआधी मी कोकणातील कणकवली येथे जैन इतिहास परीषदेसाठी गेलो होतो तेंव्हा बोर्डवे या गावातील मारुतीच्या देवळात पाहिला होता.

केळेश्वर मंदिरातील शंकराची पिंड, मुखवटा व जैनाचा दगड

संपूर्ण कोकणात आणि सह्याद्रिला लागून असणाऱ्या घाटमाथ्यावर ग्रामदैवतांच्या अनेक देवळात असे जैनाचे धोंडे दिसून येतात. याचा अर्थ कोणे एके काळी या भागात जैन मंदिरांचे मोठ्या प्रमाणावर ’सामूहिक धर्मांतर’ झाले असा होतो. शिवलीलामृताच्या अध्याय 15 नुसार हे परीवर्तन आदिशंकराचार्य यांनी केले असावे असे वाटते, पण तसे नसावे. कारण आदिशंकराचार्यांचा काळ इसवी सनाचे नववे शतक हा होता, तर दक्षिण व उत्तर कोकणात जैन धर्माचे अस्तित्व अगदी 13 व्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर होते.

ते कांहीही असले तरी जैन मंदिरांचे परीवर्तन हिंदू मंदिरांमध्ये झाले हे खरे. पण हे परीवर्तन केवळ देवळांचेच झाले नाही, तर माणसांचेही झाले. या भागातील जो बहुजन समाज जैन धर्म पाळत असे तो आता ’ब्राम्हण’ धर्माकडे वळला. पण त्यांच्या इच्छेनुसार देवळांमध्ये आपल्या आधीच्या धर्माची आठवण म्हणून देवळांमध्ये ‘जैनाचा दगड’ त्यांनी कायम ठेवला. आजही या भागातील बहुजन समाजातील लग्ने या ‘जैनाच्या धोंड्याला’ आणि जैना-ब्राह्मणांना साक्ष ठेवून केली जातात.

केळेश्वर मंदिरातून परत येताना आम्ही भोरडीत सारनाथ गायकवाड यांच्या मामाच्या घरी गेलो. तेथे गायकवाड यांनी आम्हाला एक शिवकालीन तलवार दाखवली. ती तलवार वजनाला हलकी आणि बाक नसणारी होती.

भोरडीहून आम्ही सगळे परत वेल्ह्याला आलो. तेथे एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर आणखीही दोन-तीन ठिकाणी भटकंती केली. मग रात्री मी आणि दिलीप खोबरे यांनी मधुकर जाधव यांच्या वेल्हे येथील घरी मुक्काम केला. रात्री कित्येक वर्षांनी आकाश निरीक्षणाची संधी मिळाली. प्रदूषण नसलेल्या येथील आकाशात ग्रह, तारे, आकाशगंगा, नक्षत्रे अगदी स्पष्ट दिसतात. यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. दुस-या दिवशी पुणे गाठले.

माझ्या या ट्रीपमध्ये मला बरेच फोटो काढता आले. त्यातील कांही या लेखासोबत दिले आहेत.

जैनांचा धोंडा आणि वीरगळ

वाचण्यासारखे आणखी काही …..

जैन संस्कृतीच्या सांगली जिल्ह्यातील प्राचीन पाऊलखुणा

रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

भारतीयांचा इतिहासबोध

कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जा

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

2 thoughts on “वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

  1. अतिशय वेगळा मुद्दा “जैनांचा धोंडा”. यावर नेटाने संशोधन होणे आवश्यक आहे..संशोधनात्मक लेख करून तो सादर करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *