महावीर सांगलीकर
भयकथा: न जन्मलेली बाळं
चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर…. किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तिशी ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं. लग्न न होण्याचं कारण म्हणजे त्याच्या आणि त्याची आई यमुनाताई हिच्याही अवास्तव अपेक्षा. अतिसुंदर पाहिजे, गोरी पाहिजे, खूप शिकलेली पाहिजे, कमावती पाहिजे, हुंडा पाहिजे, जातीतलीच पाहिजे, तिचे केस गुढघ्यापर्यंत असायला पाहिजेत वगैरे वगैरे. यात कोणतीही तडजोड करायची त्यांची तयारी नव्हती. त्यात त्यांचं घराणं वाईट अर्थानं प्रसिद्ध होतं.
वय वाढत गेलं आणि दोघांच्याही अपेक्षा कमी कमी होत चालल्या. शेवटी त्याच्या मामानं त्याच्यासाठी एका गरीब घरातली मुलगी शोधली. तिचं नाव सुमन. दिसायला आणि स्वभावानं पण चांगली होती. हुंडा मिळण्याचा प्रश्नच नव्हता, उलट मुलीच्या बापालाच लाखभर रुपये द्यावे लागले. लागलं एकदाचं त्याचं लग्न.
थोड्याचं दिवसात सुमन प्रेग्नंट राहिली. यमुनाताईनं किशोरला सांगितलं, तिची सोनोग्राफी कर… मुलगा आहे की मुलगी ते बघ. या कारणासाठी सोनोग्राफी करायला बंदी असली तरी कांही ठिकाणी अशी तपासणी गुपचूपपणे व्हायचीच. किशोर आपल्या बायकोला घेऊन तशा एका हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरनं भरपूर पैसे घेऊन सांगितलं, मुलगी आहे. ते ऐकून किशोरचा चेहरा उतरला. घरी येऊन त्यानं आईला सांगितलं तर तिनं धिंगाणा घातला. ती सुनेवर ओरडली, ‘मला वाटलंच होतं…. आता पाडून टाकायचं…. ठेवायचं नाही अजिबात’. सुमन या गोष्टीला तयार झाली नाही. मग सासूनं तिला उपाशी ठेवलं, तिचा आणखी छळ करायला सुरवात केली. नवरा तिला मारहाण करू लागला. तरीही ती ऐकत नाही हे बघून त्या दोघांनी सुमनला जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.
डॉक्टरनं भरपूर चार्जेस लावत सुमनच्या पोटातल्या त्या मुलीला मारून टाकलं.
पुढचं वर्ष आलं. सुमन पुन्हा प्रेग्नंट राहिली. किशोर तिला घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरनं सुमनची पुन्हा सोनोग्राफी केली. तिच्या पोटात पुन्हा मुलगीच वाढत होती. किशोरचा चेहरा पुन्हा एकदा उतरला. घरी गेल्यावर त्याच्या आईनं गेल्यावेळेपेक्षा जास्तच धिंगाणा घातला. ती सुमनचा आणखीन छळ करू लागली.
सुमनला पुन्हा जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मग डॉक्टरनं पुन्हा भरपूर पैसे घेत पोटातल्या त्या मुलीलाही जन्मायच्या आधीच मारून टाकलं.
पुढच्या वर्षी हे सगळं पुन्हा एकदा झालं.
भयकथा: न जन्मलेली बाळं
आपल्या बायकोच्या पोटात मुलीच वाढतात हे बघून किशोरच्या मनात दुसरं लग्न करायचा विचार आला. पण आहे हीच बायको मोठ्या मुश्किलीनं मिळालेली आहे, दुसरी बायको कुठनं आणणार या विचारानं तो ताळ्यावर आला. त्यात त्याच्या एका मित्रानं त्याला सांगितलं, ‘मुलगा की मुलगी हे नवऱ्यावर ठरत असतं, यात बायकोचा कांही संबंध नसतो. मुलगी होणं याला जर तू दोष मानत असशील तर तो दोष तुझा आहे, तुझ्या बायकोचा नाही’.
पुढं सुमन चौथ्यांदा प्रेग्नंट राहिली. पुन्हा मुलगी. नवऱ्यानं आणि सासूनं तिला बडवून काढलं. तिच्या पोटात लाथा घातल्या. सुमन बेशुद्ध पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सुमन मेली असल्याचं डॉक्टरनं सांगितलं. हा तर ‘डबल मर्डर’ होता. पण डॉक्टरनं भरपूर पैसे घेऊन सुमनचा नैसर्गिक मृत्यू झाला असं सर्टिफिकेट देऊन टाकलं.
आठवडाभर गेला आणि एक विचित्र घटना घडली. त्या हॉस्पिटलमधली एक नर्स, जी असल्या प्रकारची कामं करण्यात एक्स्पर्ट होती, एकदा रात्र पाळीला असताना तिला तिथल्या ऑपरेशन थिएटरमधनं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि बंदही झाला. तिला थोडी भिती वाटली, पण दुसऱ्या एका नर्सला, वार्डबॉयला सोबत घेऊन तिनं मोठ्या धाडसानं ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. लाईट लावली. आत लहान मुल वगैरे कांहीच नव्हतं. तरीपण ते तिघं सगळं थिएटर भीत-भीत धुंडाळू लागले. एवढ्यात अचानक लाईट गेली. ते तिघं घाबरून दरवाज्याच्या दिशेनं पळाले. पण दरवाजाजवळ पोहोचायच्या आतच तो खाडकन बंद झाला.
तिघं इतके घाबरले होते की त्यांच्या तोंडून आवाजही फुटेना. एवढ्यात त्या अंधारात त्यांना एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मग आणखी एका बाळाच्या रडण्याचा. रडणाऱ्या बाळांची संख्या वाढत चालली. शेकडो बाळं. आता ती बाळं हसू लागली. त्यांचं हसणं कुणालाही भिती वाटेल असंच होतं.
भयकथा: न जन्मलेली बाळं
ऑपरेशन थिएटरमधली ही गडबड बाहेर कुणाच्याच लक्षात आली नाही.
सकाळी सकाळी एक ऑपरेशन होतं म्हणून एक डॉक्टर आले. ऑपरेशन थिएटर आतनं बंद होतं. डॉक्टरनं वॉचमनला बोलावलं. खूप प्रयत्नं करूनही दार उघडलं नाही तेंव्हा पोलिसांना बोलावण्यात आलं. मग त्यांच्या मदतीनं आणि साक्षीनं दार तोडण्यात आलं. आत बघतात तर त्या दोन नर्सेस आणि तो वार्डबॉय निपचित पडलेले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भिती होती. त्या डॉक्टरनं लगेच ओळखलं, ते तिघंही मेलेले आहेत.
नंतर त्या तीनही प्रेतांच पोस्ट मोर्टेम झालं. ते तिघं हार्ट ऍटॅक येऊन मेले होते.
पोलीस तपास सुरू झाला. त्यांना आधीच माहीत होतं की इथं नेमकं काय चालतं ते. हे सगळं प्रकरण मेडीयाच्या हातात गेलं. ती अगदी नॅशनल आणि ब्रेकिंग न्यूज झाली. पोलिसांनी आत्तापर्यंत त्या हॉस्पिटलकडं दुर्लक्ष का केलं असावं याच्यावरही मिडियात चर्चा होऊ लागली. कांही पोलीस अधिकाऱ्यांची तडका फडकी बदली करण्यात आली.
त्या हॉस्पिटलमधले तीन डॉक्टर्स पळून गेले. पोलीस त्यांना शोधू लागले. ते डॉक्टर्स पोलीसांना हुलकावणी देत राहिले..
एके दिवशी पोलीसांना त्या पळून गेलेल्या तीन डॉक्टर्सपैकी एका डॉक्टरचं प्रेत सापडलं. एका लॉजमध्ये. त्या प्रेताची अवस्था बिलकुल तशीच होती… भेदरलेला चेहरा. पोस्ट मॉर्टेममध्ये निदान झालं हार्ट ऍटॅकचं. त्याच दिवशी दुसऱ्या एका लॉजमध्ये दुसऱ्या डॉक्टरनं विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती.
भयकथा: न जन्मलेली बाळं
पोलिसांना तिसरा डॉक्टर एके ठिकाणी लपून राहत असल्याचं कळलं. पोलिसांनी छापा टाकून त्या तिसऱ्या डॉक्टरला पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरची कोर्टातनं पोलीस कोठडी घ्यायची होती, पण सकाळी पोलीसांना तो डॉक्टर मेलेल्या अवस्थेत आढळला.
या प्रकरणावर पडदा पडणारच होता, तेवढ्यात थोड्या फार फरकाने असाच प्रकार दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये झाला. रात्रपाळीच्या दोन नर्सना हार्ट ऍटॅक आला आणि दुसऱ्या दिवशी तिथले दोन डॉक्टर्स गायब झाले. पुढे त्यांचीही प्रेते सापडली. मृत्यूचे कारण हार्ट ऍटॅक.
एके दिवशी तर गहजबच झाला! एक सासू, जिनं आपल्या सुनेच्या पोटातील मुलीला जन्मण्याअगोदरच मरायला लावलं होतं, दुपारच्या वेळी घरी एकटीच असताना आपली आवडती सिरीअल बघण्यासाठी टी.व्ही. सुरू करतेय तर तिला पडद्यावर एक न जन्मलेलं बाळं दुसऱ्या न जन्मलेल्या बाळाची मुलाखत घेत असल्याचं दिसलं. तिनं घाबरून चॅनल बदललं तर दुसऱ्या चॅनलवर तीच मुलाखत चालू होती. ती कधी नव्हे ते भराभर चॅनल्स बदलत राहिली. जिकडे तिकडे तीच मुलाखत चालू होती. तिला दरदरदरून घाम फुटला. तिनं टी.व्ही. बंद केला आणि आपल्या एका मैत्रीणीला फोन करून विचारलं, टी.व्ही. बघितलास का? तिकडून उत्तर आलं, हो मी सिरीअल बघत आहे.
म्हणजे तिला तसलं कांही दिसलं नाही?
तेवढ्यात तिला तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीचा फोन आला. घाबरलेल्या आवाजात. ‘अगं तू टी.व्ही. बघितलास का? लहान मुलांची भूतं मुलाखत देत आहेत. एक भूत म्हणालं, आम्ही कुणालाच सोडणार नाही…. आता आपलं कांही खरं नाही’
या सासूला पटकन आठवलं, आत्ता फोन केला तिनं पण तिच्या सुनेला मुली होऊ दिल्या नाहीत आणि जिला टी.व्ही. वर तसलं कांही दिसलं नाही तिच्या सुनेला दोन मुली आहेत!
या सासूला तिची देवी आठवली. ती देवघरात गेली ‘आई मला वाचव’ म्हणायला तर तिथला देवीचा फोटो गायब होता. त्या जागी रेड्यावर बसलेल्या यमाचा फोटो होता. ती घाबरून धावत बाहेर आली आणि खाली कोसळली.
…आणि मग यमुनाताईचा नंबर आला. ती रात्री पाणी प्यायला म्हणून किचन मध्ये गेली. तिनं फ्रीज उघडला आणि फ्रीजमध्ये दबा धरून बसलेल्या एका बाळानं तिच्या छातीवर उडी घेतली. यमुनाताई किंचाळली. बाळाच्या हातांनी तिच्या गळ्याला विळखा घातला. यमुनाताईंचा आवाज बंद झाला. एवढ्यात किशोर धावत-धावत तिथं आला. आईच्या छातीवर बसलेलं ते बाळ बघून त्याची बोबडी वळली. एवढ्यात दुसरं एक बाळ किशोरच्या मानगुटीवर येऊन बसलं. तो ओरडू लागला.
थोड्याच वेळात त्याचं ही ओरडणं बंद झालं. कायमचं.
भयकथा: न जन्मलेली बाळं
या सगळ्या घटनांचा व्हायचा तो परिणाम झालाच. अनेक लोकांना मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखेच असा साक्षात्कार झाला. पुढच्या वर्षी नवीन जन्माला येणाऱ्या बाळांच्यामध्ये मुलींचं प्रमाण चांगलंच वाढलं. समाजावरचं एक संकट दूर झालं. कांही काळासाठी तरी.
ज्या बाळांनी हे सगळं घडवून आणलं, त्यांची नंतर एक गुप्त मीटिंग झाली. तिथं ठरलं, ‘आता आपल्याला पुढची कांही वर्षं तरी परत असं करायची कांही गरज नाही. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी आपण पुन्हा एकदा हे करू. हे लोक भित्रे असतात हे आपण बघितलंच आहे. जरा भिती घातली की लगेच वठणीवर येतात. सध्या केवळ प्रिकॉशन म्हणून आपल्यापैकी कांही जणांनी ज्या-ज्या बाईच्या पोटात मुलगी आहे त्या-त्या घरावर वॉच ठेवायचा आहे. बाकीच्यांनी तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये मेलात त्याच्या आसपासच्या एखाद्या झाडावर आपला निवास करायचा आहे’
+++
या कथाही वाचा ….
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
भारी