आज घरी यायला एवढा ऊशिर?

डॉ. राजेंद्र भवाळकर

गैरसमजाचे वारे टाळण्यासाठी . …..

आज घरी यायला एवढा ऊशिर? माझ्या माहितीप्रमाणे कुठलिही विशेष मिटिंग वगैरे नव्हती आँफिसमध्ये. नुकतीच इयर एंडची सर्व कामे संपल्याचे तुम्ही गेल्या आठवड्यातच म्हणाला होतात. मोबाईलही बंद होता. ऑफीसमध्ये फोन केला तर तुम्ही ऑफीसमधुन बाहेर पडल्याचं समजल. मग गेला तरी कुठे होतात? …….

एकामागून एक प्रश्नांची मालिका. तोफ डागल्यासारखे रागारागाने, तावातावाने विचारलेले प्रश्न अनेक पतिराजांनी अनुभवलेले असणार! अर्थात त्यांची ऊत्तरेही ठरलेली असतात. मोबाईलची बॅटरी चार्ज करायची राहुन गेली….. खुप जुने शाळेत असतानाचे वर्ग मित्र भेटले म्हणुन बसलो होतो गप्पा मारत, त्यामुळे झाला उशिर! त्यात एवढं रागावण्याचं काय कारण?

प्रसंग तसा फारच छोटा. पण दुरगामी परिणाम वाईट होऊ शकतील असा. मित्र मंडळी भेटल्यामुळे आपल्याला घरी जायला ऊशिर होणार आहे हे मोबाईल बंद असला तरी कोठुनही घरी कॉल करुन कळविणे शक्य असते. त्यातुनही शालेय जिवनातले हा मित्र भेटले तर त्यांना सरळ घरी देखिल आणता आले असते गप्पा मारायला. (पण मग तो “ढोसण्याचा”कार्यक्रम कसा होणार?).

खाजगी कंपनीमध्ये काम करताना महत्वाच्या मिटिंग्ज, टेंडर, डिस्पॅच, कन्साईनमेंट, ऑडिट रिपोर्ट किंवा परदेशातल्या अधिकाऱ्यांबरोबरची चर्चा अशा अनेकविध कामांमुळे बऱ्याच वेळा ऑफीस नियोजित वेळेव्यतिरिक्त जास्त वेळ थांबावे लागते हे क्रमपात्र असल्याने ठिक. पण इतर वेळी पूर्वसुचना न देता घरी उशिरा जाणे अयोग्य नाही का? आपली पत्नी आणि मुलं घरी वाट पहात असतील याची जाणिव का बरं नसावी? यातुन निर्माण होतात गैरसमज.

चुकून ऑफीसमधल्या एखाद्या सहकारी महिलेला तुम्ही लिफ्ट दिलीत आणि ते घरी सांगितलं नाहीत व हीच गोष्ट जर दुसरीकडुन कळाली की अशाच गैरसमजांचे वारे वाहु लागतात.

किटी पार्टिज, भिशीची मिटिंग यामध्ये जमणाऱ्या, रमणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या एकमेकिंच्या पतिराजांची ऊणीदुणी काढण्यात धन्यता मानतात. कोणाकडे कोणकोणत्या वस्तु आहेत इथपासुन कोण, कोठे परदेशात जाऊन आले इथंपर्यंत सगळ्यांवर चर्चा होते व त्याची तुलना मनातल्या मनात सुरु होते. ती आपल्या स्वताच्या नवऱ्याबरोबर.

अमुक अमुक बाईचा नवरा नियमितपणे वेळेवर घरी येतो, येताना भाजी घेऊन येतो. लाईटबिले, टेलिफोन बिले वेळच्या वेळी भरतो. बायको-मुलांना फिरायला, हॉटेलिंगला, शॉपिंगला घेऊन जातो. मुलांचे वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी विसरत नाही. उलट या बाबतीत त्याचे पुर्वनियोजन असते. मग माझा नवरा असा का? तो यातल्या बऱ्याच गोष्टी करताना आढळत नाही. त्यामागची कारणे लक्षात न घेता तुलनात्मक विचार केल्याने गैरसमजाला सुरुवात होते.

हीच गोष्ट पतीराजांकडूनही घडते. बरोबरच्या मित्राची बायको कशी उत्तम स्वयंपाक करते, आदर्श गृहिणी कशी आहे? नोकरी आणि मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा घर कस चकाचक आणि स्वच्छ ठेवते, पगार झाला की तो सुद्धा नवऱ्याच्या हातात देते, हे सगळं ऐकलं की पुन्हा मनात तुलना सुरु होते त्या मित्राच्या व स्वत:च्या बायकोची. मग आपली बायको कोणकोणत्या बाबतीत कमी आहे याचा मनातल्या मनात आढावा घेतला जातो व तो कळत नकळत उपदेशाचे डोस पाजतो आपल्या बायकोला. समजावणीच्या सुरात सांगण आणि अधिकाराने त्रासुन रागानं सांगण यातला फरक बायकोच्या लक्षात येतो, मग व पहिली ठिणगी पडते आणि भांडणाला सुरुवात होते.

पती पत्नी दोघांनीही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रिणी या आगीत तेल ओतणाऱ्याया कशा नाहीत याची काळजी घ्यायला हवी. आपल्या मनाच्या आतल्या कप्यात असणारी एखादी गोष्ट एखाद्याच जिवलग मित्र मैत्रीणीला सांगितली तर त्याचं भांडवल करुन समोरची व्यक्ती आपला कसा व किती फायदा घेईल हे सांगता येत नाही.

परिचयात एखादी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मैत्रीण असेल तर स्त्री दाक्षिण्य किती दाखवायचे याला मर्यादा घालुन घ्यायला हव्यात. नाहीतर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

आपल्या जोडीदाराबरोबर आपले असलेले शारीरिक संबंध कसे आहेत? या विषयावरही आजकालची पिढी चर्चा करताना आढळते यामुळेही “वादळ” निर्माण होते. काही फॅंटसीज बाबत रसभरीत वर्णन ऐकली की त्याची आपल्या पती किंवा पत्नीशी केली जाते. त्याही बाबतीतील अपेक्षा वाढतात व हे ही कारण वादविवाद, भांडणतंटे व्हायला पुरेसे ठरते.

आपली आर्थिक स्थिती, आपल्या नोकरीचे किंवा व्यवसायाचे स्वरूप, प्रापंचिक इतर जबाबदाऱ्या यांचा विचार इतर कोणाशी तुलना करताना करायला हवा. साड्या दागदागिने इत्यादींचा हव्यास अती असु नये. कोणत्याही बाबतीत स्वतःला, स्वतःच्या आर्थिक स्थितीला कमी लेखु नये.

काही कमतरता जाणवल्या, तर पती पत्नीने मिळुन चर्चा करुन त्या कशा पुर्ण करता येतील यावर उपाय करायला हवा. आठवडा पंधरा दिवसांतुन मुद्दाम यासाठी वेळ काढुन चर्चेसाठी बसावे म्हणजे पुढे निर्माण होणारी कटूता टाळता येते.

बरोबरच्या मित्र मैत्रिणिंचे कपडे, ड्रेसेस, फॅशन्स, हेअर स्टाईल्स याही गोष्टींची तुलना मनातल्या मनात होत असते. त्यानेही गैरसमज होताना दिसतात. सहवासात येणाऱ्याया नवनवीन व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत असतोच. त्यामुळेही काही प्रसंग ओढवतात.

बाह्यरुपावर भाळल्यानेही लग्न झाल्यावर १०-१२ वर्षांनी सुद्धा आपली पत्नी किंवा पती कशी दिसायला ऍवरेज आहे असे वाटुन एकमेकांमधील आकर्षण कमी होत गेल्याने एक तिरस्काराची भावना निर्माण झाल्याने त्याचे पर्यवसान घटस्फोटापर्यंत झालेले मी विवाह समुपदेशक या नात्याने जवळुन पाहिले आहे. हे टाळणे पती पत्नीच्याच हातात आहे. आपले सगे सोयरे, मित्र मैत्रिणी असेच असावेत की, ज्यांची काही तत्वं आहेत, मुल्यं आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. मोठा मित्र संग्रह असायला हरकत नाही, परंतु मोजकेच चांगले मित्र मैत्रिणी फॅमिली फ्रेंड म्हणुन असतील तर कुटुंबव्यवस्था टिकायला ते खचितय उपयोगी ठरतील असे वाटते.

एकमेकांना समजुन घेणे, एकमेकांच्या भावभावना जपणे, मनं जपणे हेच तर खरं महत्वाचे असते. हे जमलं की संसार सुखाचाच होणार हे निर्विवाद.

डॉ. राजेंन्द्र भवाळकर
अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था
संपर्क क्रमांक 8087203131, 8237093455, 02024457095

हेही वाचा:

प्रेम-काजवा | Love Letter

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

TheyWon English