महावीर सांगलीकर
सिरीभूवलय हा एक अदभूत आणि जगातील एक महान आश्चर्य म्हणावे असा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकून सहा लाख श्लोक आहेत. या ग्रंथाची अदभूतता म्हणजे तो एक बहुभाषिक ज्ञानकोश आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की तो कन्नड, प्राकृत, संस्कृत, मराठी, तमिळ, तेलुगु अशा अनेक भाषांमध्ये वाचता येतो. शिवाय या एकाच ग्रंथात रामायण, महाभारत, वेद, उपनिषिदे वगैरे ग्रंथांचा समावेश आहे, तसेच गणित, खगोलशास्त्र, रसायन, इतिहास, वैद्यक आणि इतर अनेक विषयांवरील ग्रंथही या एकाच ग्रंथात वाचता येतात! सदर ग्रंथात जैन तत्वज्ञानावरील अनेक महत्वाचे ग्रंथ आहेत!
हे कसे शक्य आहे? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याचे उत्तर असे आहे की हा ग्रंथ इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिला गेला नसून अंकांमध्ये लिहिला गेला आहे. त्यासाठी 1 ते 64 हे अंक वापरण्यात आले आहेत. हे आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की विशिष्ट लिपी, विशिष्ठ भाषा, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथकर्त्याच्या मते हा ग्रंथ 18 लिप्या आणि 718 भाषांमध्ये वाचता येतो. पण वर उल्लेख केलेल्या भाषा व त्यांच्या लिप्या सोडता बाकीच्या भाषा व लिप्या यांचा उलगडा अजून व्हायचा आहे.
या ग्रंथात एकूण 26 अध्याय आणि 6 लाख श्लोक आहेत. त्यापैकी केवळ पहिल्या 3 अध्यायांचा उलगडा करण्यात विद्वानांना यश आले आहे. या ग्रंथाच्या 16000 पानांपैकी केवळ 1270 पानेच उपलब्ध आहेत. बाकीची पाने कुठे आहेत याचा अद्याप शोध लागायचा आहे.
कुमुदेंदू मुनि
सिरीभूवलय या ग्रंथाचे कर्ते कुमुदेंदू हे जैन मुनि होते. ते राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष याच्या समकालीन होते. कुमुदेंदू मुनि हे प्रसिद्ध जैन आचार्य जिनसेन यांचे शिष्य होते. त्यांना असा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा षटखंडागम या जैन आगम ग्रंथामुळे मिळाली. कुमुदेंदू मुनींनी सिरीभूवलय हा ग्रंथ भगवान गोमटेश्वर (बाहुबली) यांना अर्पण केला आहे.
सिरीभूवलय ग्रंथाच्या शोधाची कथा
या ग्रंथाची मूळ प्रत उपलब्ध नाही. मूळ ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती बनवून मलिकब्बे या महिलेने त्या दान केल्या. त्यातील एक प्रत परंपरेने धरणेन्द्र पंडित या जैन विद्वानाकडे आली होती.
सिरीभूवलय हा अदभूत ग्रंथ अस्तित्वात आहे आणि तो धरणेन्द्र पंडित यांच्याकडे आहे हे येल्लप्पा शास्त्री नावाचा तरुण आयुर्वेद पंडित ऐकून होता. धरणेन्द्र पंडित याच्याकडून हे हस्तलिखित कांहीही करून मिळवायचेच याचा येल्लप्पा शास्त्रीने चंग बांधला. त्या हस्तलिखितांपर्यंत पोहोचण्यासाठी यल्लाप्पाने धरणेन्द्र पंडित याच्या पुतणीशी लग्न केले.
कालांतराने धरणेन्द्र पंडित याचा मृत्यू झाला. त्याच्या मुलांची आर्थिक स्थिती कमजोर होती. त्यांनी धरणेन्द्रच्या अनेक वस्तू विकायला काढल्या, त्यात सिरीभूवलयचे हस्तलिखितही होते. अर्थातच येल्लप्पाने ते खरेदी केले. त्या बदल्यात त्याने आपल्या बायकोचे दागिने विकले. 1270 पानांचे ते हस्तलिखित यल्लाप्पाला मिळाले खरे, पण त्यानंतर त्या हस्तलिखितातील सांकेतिक माहितीची कांही प्रमाणात फोड करायला त्याला तब्बल 30 वर्षे लागली!
सिरीभूवलयचे संपादन आणि प्रकाशन
पुढे येल्लप्पा शास्त्री, करलमंगलम श्रीकांतय्या आणि अनंत सुब्बाराव यांनी हा ग्रंथ संपादित केला. यातील श्रीकांतय्या हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते, तर अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. सुब्बाराव यांनी पहिला कन्नड टाईपरायटर बनवला होता. 1953 साली कन्नड साहित्य परिषद, बेंगळूरू यांच्या मदतीने हा संपादित ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. 2003 साली टी.व्ही. व्यंकटचलशास्त्री आणि धर्मपाल यांनी संपादित केलेली नवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.
+++++
अशा या अदभूत ग्रंथाला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ‘जगातले एक आश्चर्य’ असे म्हंटले होते.
भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रख्यात विद्वान एस. श्रीकांत शास्त्री यांनी या ग्रंथाविषयी व्यक्त केलेले मत फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, “हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटकच्या इतिहासावर प्रकाश टाकतो. भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखिल उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भगवत गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरीभूवलय मध्ये सापडू शकतात”.
सिरीभूवलय या ग्रंथात प्राचीन मराठी भाषेचे रूप सापडू शकते. त्या दृष्टीनेही या ग्रंथाचे संशोधन व्हायला पाहिजे.
संदर्भ:
- Siribhoovalaya by Prof. L.S. Seshagiri Rao
https://www.virtuescience.com/siribhoovalaya.html - Siribhoovalaya: https://en.wikipedia.org/wiki/Siribhoovalaya
- Siribhoovalaya: Scholarly opinion by Dr S. Srikanta Sastri (1953)
https://www.srikanta-sastri.org/scholarly-opinion-on-siribhoovalaya - Miscellaneous articles on Siri Bhoovalaya
हेही वाचा ……
संजय सोनवणी: लेखक, इतिहास संशोधक, वक्ता (व्यक्तिपरिचय)
कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जा