महावीर सांगलीकर
दीर्घकथा: सिंगल मदर भाग 3
या दीर्घकथेचे पहिले दोन भाग तुम्ही वाचले नसतील तर आधी ते वाचून घ्यावेत:
इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं शोधतेय! तिनं कांही मुली बघूनही ठेवल्या होत्या.
एके दिवशी सुनिलला आईचा फोन आला. ती म्हणाली, ‘सुनिल, तुझा तुझ्या उद्योगात जम बसला असेल, आता लग्न करून टाक. मी तुझ्यासाठी चार-पाच मुली बघून ठेवल्या आहेत. चार दिवस सवडीनं इकडं येऊन मुली बघून जा’
‘आई, मला आताच लग्न करायचं नाही. अजून एखादं वर्ष जाउदे’ सुनिलचं उत्तर.
आई मुली बघण्यासाठी सारखा फोन करायची आणि सुनिल कांहीतरी उत्तर देऊन वेळ निभावून न्यायचा.
पण एके दिवशी जे व्हायचं तेच झालं. सुनिलच्या आईला एक फोन आला.
‘तुमच्या मुलासाठी तुम्ही आमच्या मुलीची चौकशी केली होती. आमच्या मुलीला तुम्ही बघून पण गेलात. पण आम्हाला असं कळलंय की सुनिलचं आधीच लग्न झालंय. तो पुण्यात त्याच्या बायको बरोबर राहतो आणि त्याला एक मुलगीपण आहे. ही काय भानगड आहे?’
‘हे खोटं आहे. कुणी सांगितलं तुम्हाला?’ आई ठामपणे म्हणाली.
‘आम्ही चौकशी केली पुण्यातल्या एका ओळखीच्या माणसाकडं. त्यानं सांगितलं’
‘तो माणूस खोटं बोलतोय. नाहीतर त्याचा कांहीतरी गैरसमज झाला असणार’ असं म्हणत सुनिलच्या आईनं फोन कट केला.
सुनिल असं कांही करणं शक्यच नाही असा त्याच्या आईचा पक्का विश्वास होता, त्यामुळं तिनं यावर अजिबात विचार केला नाही.
दुसऱ्या दिवशी सुनिलच्या आईला तिची एक जुनी मैत्रीण भेटली. म्हणाली, ‘हे काय ऐकतेय मी? सुनिलनं लग्न केलंय आणि तू मला सांगितलं पण नाहीस…’
‘कुणी सांगितलं तुला? खोटं आहे ते’
‘मी तर दोन लोकांच्याकडून ऐकलय’ असं म्हणून ती मैत्रीण निघून गेली.
आता मात्र आईच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. तिनं प्रदीपला फोन करून महत्वाचं काम आहे असं सांगत लगेच घरी बोलावून घेतलं. हा प्रदीप सुनिलचा मित्र होता आणि तो त्याच्या कामासाठी नेहमी पुण्याला जात असे. अधनं-मधनं सुनिलकडंही जायचा. सुनिलच्या आईला हे माहीत होतं.
सिंगल मदर भाग 3

थोड्याच वेळात प्रदीप घरी आला.
‘काय काकू, काय काम होतं का?’ आल्याआल्याच त्यानं विचारलं.
‘अरे प्रदीप, तू पुण्याला कधी गेला होतास अलीकडं?’
‘गेल्या आठवड्यात’
‘सुनिलकडं गेला होतास?’
‘होय’
‘कसं काय चाललंय त्याचं? म्हणजे तो फोन करतो मला अधनं-मधनं… पण तू प्रत्यक्ष भेटलास त्याला म्हणून विचारते’
‘चांगलं चाललंय की’
‘घरी आणखी कोण असतंय?’ आई त्याच्याकडं रोखून बघत म्हणाली.
‘कुणी नाही. तो एकटाच राहतो तिथं’
पण हे म्हणत असताना त्याची नजर झुकली होती. आईला लगेच शंका आली, पण तसं न दाखवता ती म्हणाली, ‘ठीक आहे, परत पुण्याला जायच्या आधी सांग, त्याच्यासाठी फराळाचं देते तुझ्याकडं’.
तो हो म्हणून निघून गेला.
कांहीतरी लपवा-छपवी चालली आहे… सुनिलच्या आईच्या लक्षात आलं. सुनिलला फोन करावा का? नको, त्यापेक्षा सरळ जावं पुण्याला त्याच्याकडं. त्याचा पत्ता होताच तिच्याकडं. दुसऱ्याच दिवशी सुनिलकडं जाऊन येते असं सुनिलच्या वडिलांना सांगून तिनं तडक पुणं गाठलं.
पत्ता शोधत शोधत आई सुनिलच्या फ्लॅटवर पोहोचली त्यावेळी दुपारचे 4 वाजले होते. तिनं बेलचं बटन दाबलं. थोड्याच वेळात सुनितानं दार उघडलं.
ही कोण? सुनिलची बायको? असा विचार करत आई म्हणाली, ‘सुनिल इथंच रहातो ना?’
‘हो. या ना, आत या!’
आई आत येऊन हॉलमधल्या सोफ्यावर बसली.
सुनिता म्हणाली, ‘तुम्ही?’
‘मी सुनिलची आई’
सुनिताच्या छातीत धस्स झालं. तिनं झटपट कांही निर्णय घेतले. काय बोलायचं ते ठरवलं.
‘तू कोण?’ आईनं तिला विचारलं.
‘मी सुनिता. सुनिलनं सांगितलं नाही तुम्हाला माझ्याबद्दल?’
‘नाही’
‘मी तुमची सून आहे’ सुनिता वाकून नमस्कार करत म्हणाली.
अच्छा! म्हणजे आपण जे ऐकलं ते खरंच निघालं! सुनिलनं आपल्याला न सांगता असं परस्पर लग्न का करावं बरं?
एवढ्यात बेडरूममधनं स्वीटी धावत धावत तिथं आली. सुनिलच्या आईला बघून सुनिताच्या मागं लपली.
‘अगं स्वीटी, ही आज्जी आहे तुझी. मी जशी तुझी आई आहे ना, तशी ही तुझ्या पप्पाची आई आहे’ तिला उचलून घेत सुनिता म्हणाली. मग स्वीटीनं आज्जीकडं बघीतलं आणि लाजून आपल्या दोन्ही हातानं आपलं तोंड लपवलं.
ही भानगड आहे होय… सुनिलची आई मनात म्हणाली, सुनिलनं लग्न केलं, त्याला मुलगीही झाली… ही मुलगी दीड-दोन वर्षांची दिसते. म्हणजे सुनिलचं लग्न होऊन कमीत कमी अडीच-तीन वर्षे तरी झालीत. तरीच गेली तीन वर्षं तो सारखा पुण्याला पळायचा. येऊ दे त्याला, चांगलाच जाब विचारू.
सिंगल मदर भाग 3
‘आई तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी कांहीतरी खायला करते’
सुनितानं आईला फ्रेश व्हायला सांगितलं आणि ती किचनमध्ये गेली..
आई बाथरूममध्ये गेली आणि दारावरची बेल वाजली. सुनितानं दार उघडलं तर समोर सुनिल होता. तिनं त्याला हळू आवाजात सांगितलं, तुझी आई आली आहे. सध्या आपण जोशी बाई पुढं जे नाटक करतो तेच आईपुढंही करायचं. तू कांही जास्त बोलू नकोस, मीच सांभाळते सगळं’
सुनिलची बोलतीचं बंद झाली. तो गंभीर होऊन आत आला आणि सरळ सोफ्यावर जाऊन बसला. सुनितानं विचारलं, आईला खायला काय आवडतं? झटपट होणारं?
‘पोहे… उपमा’
‘मी पोहेच करते’ असं म्हणत सुनिता पुन्हा किचनमध्ये गेली.
एवढ्यात आई बाहेर आली.
‘आई तू कधी आलीस?’ सुनिलनं विचारलं. तिनं सुनिलला बघून न बघितल्यासारखं केलं. मग स्वीटीला जवळ बोलावलं आणि तिला घेऊन ती बेडरूममध्ये गेली. बेडरूमचं दार लावून घेतलं.
आतून आई स्वीटीशी लाडानं बोलत असल्याचा आवाज यायला लागला.
थोड्या वेळानं सुनिता परत बाहेर आली तर सुनिलचा चेहरा रडवेला झालेला. ‘आई माझ्याशी बोलली नाही,’ तो केविलवाण्या स्वरात म्हणाला, ‘आता अवघड आहे माझं’
‘होईल सगळं ठीक.. तू टेन्शन घेऊ नकोस’
मग तिनं बेडरूमचं दार वाजवलं. आईनं दार उघडलं. ‘चला आई, पोहे खायला… स्वीटी तू पण चल..’
मग ती सुनिलला म्हणाली, ‘तू पण चल’
सगळेजण किचनमध्ये गेले. पोहे खाता खाता आई सुनिताशी आणि स्वीटीशी गप्पा मारत होती, पण ती सुनिलशी एक शब्दही बोलली नाही. सुनिलला तर आईशी बोलायचं धाडसच होत नव्हतं.
+++
दुसरा दिवस उजाडला. सुनिलची आई सुनिताला म्हणाली, आता मी जाते कोल्हापूरला परत..
मग सुनिलकडं बघत ती म्हणाली, ‘असं मला न सांगता तू लग्न का केलंस? मी तुला नको म्हणाले असते का? मीच तर तुझ्या मागं लागले होते लग्न कर म्हणून. आता झालं ते झालं.. तुम्ही दोघं स्वीटीला घेऊन कोल्हापूरला येऊन जावा. तुझ्या पप्पांना मी समजाऊन सांगते, ते नाहीत तुला रागावणार’
मग तिनं आपल्या बॅगमधनं पर्स बाहेर काढली. पर्समधनं शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल काढलं आणि सुनिताकडं ते देत म्हणाली, ‘हे घे. तुम्हा तिघांना कपडे वगैरे घ्या यातनं. आणि लवकरात लवकर कोल्हापूरला येऊन जावा’.
दोघांनी आईला आणखी चार दिवस रहाण्याचा आग्रह केला. पण ती म्हणाली, ‘मी येईन परत कधी तरी. चांगली महिनाभर राहीन इथं. पण आता मला जाऊदे’
थोड्या वेळानं सुनिलनं आईला कोल्हापूरला जाणाऱ्या लग्झरी बसमध्ये बसवलं. आई त्याला म्हणाली, ‘तुझी बायको खूप चांगली आहे स्वभावानं. तिच्याशी प्रेमानं वाग. प्रेम असेलच म्हणा, प्रेम विवाह आहे म्हणजे. तरीपण उगीच भांडत जाऊ नकोस तिच्याशी, तुझे बाबा माझ्याशी भांडतात तसं. स्वीटीला पुढं चांगल्या शाळेत घाल, इंग्लिश मेडीयमच्या. तुला चांगले पैसे मिळतात असं सुनिता म्हणत होती. तिला पण चांगला पगार आहे. एखादा फ्लॅट बुक कर लगेच. नंतर महाग होईल. आणि फोन करत जा अधनंमधनं’
सुनिलच्या डोळ्यात पाणी आलं. बस सुरू झाली. तो म्हणाला, ‘आई, पोहोचल्यावर फोन कर. आम्ही येतोच कोल्हापूरला पुढच्या महिन्यात’
+++
आता सुनिलचा मोठा प्रश्न मिटला होता. सुनिताशी लग्न न करण्याचं कारण उरलं नव्हतं. दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं. सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊन एक महिन्यानं त्यांचं लग्न झालं.
मग ते दोघं स्वीटीला घेऊन कोल्हापूरला गेले. तिथं स्वीटीचं बारसं पण झालं. स्वीटीच्या आज्जीनं तिचं नाव ‘लक्ष्मी’ असं ठेवलं. बारशाला सुनिताची आई आणि भाऊ देखील आले होते.
सुनिलचे बाबा त्याच्याशी फारसं बोलले नाहीत, पण त्यांनी स्वीटीचं खूप कौतुक केलं. तिच्या नावावर बॅंकेत पैसे ठेवले. सुनिलच्या आईनं स्वीटीसाठी एक सोन्याची अंगठी खरेदी केली.
सगळेजण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आले. मग ज्योतीबाला पण जाऊन आले.
चार दिवस झाल्यावर सुनिल, सुनिता आणि स्वीटी परत पुण्याला आले. सुनिल-सुनिताचा सुखी संसार सुरू झाला.
सिंगल मदर -भाग 4 (शेवटचा भाग)
+++
वाचण्यासारख्या आणखी कथा…..
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स
प्रेमकथा: लव्ह जिहाद | Love Jihad
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
TheyWon English (Online English Magazine)