महावीर सांगलीकर
उत्तर कोकण, दक्षिण कोकण, कोल्हापूर, गोवा, कारवार या भागावर शिलाहार घराण्यातील विविध शाखांनी अनेक शतके राज्य केले. या शिलाहारांचे मूळ स्थान आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होते. हे शिलाहार नागवंशी, कन्नड-मराठी असे द्विभाषिक आणि धर्माने मुख्यत्वे जैन व शैव होते.
मराठ्यांच्या आजच्या कुळ्यापैकी शेलार आणि सावंत या शिलाहार घराण्याशी संबंधीत आहेत, त्यामुळे शिलाहार हे मराठाही होते.
या राजघराण्याची कुळदेवी कोल्हापूरची अंबाबाई होती.
शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे मानले पाहिजे. या घराण्याने इसवी सन 940 ते 1212 एवढ्या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण 16 राजे सिंहासनावर बसले. त्यातील शेवटचा राजा भोज (दुसरा) हा होता.
राजा भोज (दुसरा) याने 1175 ते 1212 या काळात राज्य केले. तो महापराक्रमी आणि धार्मिक होता.
या राजाने एकूण 15 किल्ले बांधले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे असलेले अनेक किल्ले राजा भोज 2रा याने बांधलेले आहेत. पुढे या किल्ल्यांचा उपयोग यादव राजांना, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांना झाला.
राजा भोज दुसरा याने डोंगरावरील किल्ल्याबरोबरच एक सागरी किल्लाही बांधला. राष्ट्रकुटांसारखेच शिलाहार राजांकडेही त्यांचे स्वत:चे आरमार होते.
येथे मी राजा भोज (दुसरा) बांधलेल्या कांही महत्वाच्या किल्ल्यांची ओझरती ओळख करून देत आहे.
पन्हाळा किल्ला
राजा भोज दुसरा याने बांधलेल्या किल्ल्यांमध्ये पन्हाळा हा किल्ला सगळ्यात महत्वाचा आहे. हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येला 20 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला इसवी सन 1178 ते 1209 या कालावधीत बांधण्यात आला. सामरिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी असलेला हा किल्ला 1191 पासून राजा भोज दुसरा याची राजधानी बनला. समुद्रसपाटी पासून सुमारे 850 मीटर उंच असणारा हा किल्ला दक्खनवरील सगळ्यात मोठा किल्ला आहे.
प्रतापगड
प्रतापगड हा अतिशय महत्वाचा किल्ला सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पासून 24 किलो मीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये या किल्ल्याचे मोठे महत्व आहे.
हा किल्लाही शिलाहार राजा दुसरा भोज याने इसवी सन 1190 च्या दरम्यान बांधला.
अजिंक्यतारा
साताऱ्याचा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार मीटर उंच आहे. हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज याने इसवी सन 1190 मध्ये बांधला. पुढे या किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना फारच उपयोग झाला.
कल्याणगड उर्फ नांदगिरी
हा किल्ला साताऱ्यापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. हा समुद्रसपाटी पासून सुमारे 1050 मीटर उंच आहे. राजा भोज दुसरा याने बांधलेल्या 15 किल्ल्यांपैकी हा एक आहे. या किल्ल्यावर एक जैन गुफा असून गुफेत पाण्याचे तळे आणि एक शिलाहारकालीन जैन मूर्ती आहे.
विजयदुर्ग
विजयदुर्ग हा शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला समुद्री किल्ला आहे. हा किल्ला देवगड तालुक्याच्या किना-यावर आहे. या किल्ल्यापासून पुढील समुद्रात दहा मीटर खोलीवर 122 मीटर लांब, सात मीटर जाड व तीन मीटर उंचीची दगडी भिंत आहे. शत्रूची जहाजे या भिंतीला थडकून फुटावीत यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती.
(या लेखाच्या सुरवातीला दिलेला फोटोही विजयदुर्ग या किल्ल्याचा आहे. तो करण महाजन यांनी काढलेला आहे).
याशिवाय राजा भोज दुसरा याने बांधलेले आणखी कांही किल्ले म्हणजे सज्जनगड, विशालगड, रांगणा, भुदरगड, पांडवगड, चंदन-वंदन, वासोटा वगैरे.
पूर्वी राजा भोज दुसरा याचा फारसा उल्लेख होत नसे, पण विजय दुर्ग या किल्ल्याला इ.स. 2006 मध्ये 800 वर्षे पूर्ण झाल्यापासून या राजाची कांही प्रमाणात दखल घेतली जावू लागली आहे.
सन 1212 मध्ये देवगिरीच्या सिंघन या राजाने शिलाहार राजा भोज दुसरा याचा पराभव केला आणि त्याचे सर्व किल्ले आणि राज्य ताब्यात घेतले. यानंतर राजा भोज दुसरा याचे काय झाले याची माहिती मिळत नाही.
हेही वाचा …….
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास
भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास
रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा
जैन संस्कृतीच्या सांगली जिल्ह्यातील प्राचीन पाऊलखुणा