असे आहेत शांतीदूत संजय नहार!

संजय नहार Sanjay Nahar

संजय सोनवणी


संजय नहार या जागतिक पातळीवर गाजलेल्या व्यक्तीमत्वाची खरी ओळख म्हणजे मानवतेच्या अपार सहानुभूतीने देशवासियांना दिलासा देत त्यांच्यासाठी रचनात्मक कार्य करणारा माणूस अशी करून देता येईल. सीमावर्ती राज्यांतील दहशतवादाने बाधित विद्यार्थ्यांना नुसते शिक्षणच नाहे तर पित्याच्या ममतेने त्यांना निवाराही देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या सरहद शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आहेत. ते गेली 42 वर्ष सीमावर्ती राज्यांतील तणावग्रस्त माणसे जोडत देश जोडण्याचे ते काम करत आले आहेत. या प्रवासाचा मी जुना साक्षीदार आहे.

त्यांनी केलेली समाजसेवेच्या विविध क्षेत्रातीएल कामेच एवढी अचाट आहेत की एकाच माणसाने ही कामे केली यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. आजच्या मनुष्य-विध्वंसक वातावरणात असा मानवतेचा प्रवास सोपा नसतो याची जाणीव सर्वांना आहेच. जीवावरचे असंख्य धोके पत्करून, टीका-टिप्पणी सहन करत सदैव सकारात्मक नवनवीन कल्पनांचा स्त्रोत त्यांच्या मनातून उसळत असतो व प्रत्येक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची अविरत धडपड चालू असते. एवढी अफाट उर्जा त्यांना कोठून मिळाली असेल? ती केवळ मानवतेच्या, माणसे जोडण्याच्या अविरत ध्यासातून यावर माझा विश्वास आहे.

बालपण आणि शालेय जीवन

संजय नहार यांचा जन्म त्यांचे आजोळ कान्हूर पठार (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथला. पण त्यांचे बालपण आणि शालेय जीवन व्यतीत झाले ते शिरूर (जि. पुणे) या एके काळाच्या प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या गावात. शेती होती पण कुटुंब मोठे असल्याने स्थिती हलाखीची. 1972 च्या दुष्काळात तर स्थिती अजूनच खालावली. आजोबा भोजराज यांनी संजयचे प्रारंभिक शिक्षण केले. संजयचे वडील कांतीलाल पुणे महानगर पालिकेत मलेरिया इन्स्पेक्टर या सेवेत. संजयची मातोश्री कपडे विकण्याचा घरगुती व्यवसाय करीत.

त्यांच्या शिरूरच्या घरात समाजसेवेचे वातावरण पहिल्यापासून होते. संजयचे चुलते धनराज नहार हे शिरूरचे भाग्यविधाते म्हणून आजही ओळखले जातात. त्यांच्या नावावर एक प्रतिष्ठेची व्याख्यानमाला चालवली जावून ज्ञानाचा जागर केला जातो. धनराज नहारांना तत्कालीन यशवंतराव चव्हाण ते शरद पवारांपर्यंत सारे महत्वाचे राज्य-राष्ट्र पातळीवरील नेते भेट देत. अण्णा हजारे यांचे प्रारंभिक कार्य धनराजजींच्याच मार्गदर्शनाखाली सुरु झाले. त्यांच्यात धमासान सामाजिक व राजकीय चर्चा होत. त्या चर्चा ऐकत व पुस्तके वाचत संजयची जडणघडण झाली. बरे, त्याचा स्वभाव आधी खूप तापट असल्याने व क्रांतीकारक डोक्यात भिनलेले असल्याने अन्यायाविरुद्ध अनेकदा थेट मारामारी करायला तो मैदानात उतरत असे.

आठवीला संजय शिकायला पुण्यात आला. राजा धनराज हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. कुटुंब नानापेठेत दहा बाय दहाच्या खोलीत रहायला लागले.

हिंदू एकता आंदोलन ते वंदे मातरम संघटना

त्या काळात पुण्यातील, विशेषता: नाना पेठेतील वातावरण धार्मिक संघर्षाचे होते. या भागात हिंदू-मुस्लीम दंगली नित्याची बाब झालेली होती. सतरा-अठरा वर्षांचा संजय अशा वातावरणात गप्प बसणे शक्य नव्हते.

1980 चा हा काळ असेल, तेंव्हा धनंजय जगताप या हिंदू एकता आंदोलनच्या नेत्याने संजयला आपल्याकडे खेचून घेतले. विलास तुपे, बंडू शिंगरे या व्यक्तीही त्यातीलच. संजय उजव्या विचारांचा झाला व हिंदुंवर अन्याय होतो आहे, त्याचा प्रतिकार करायलाच हवा हे डोक्यात पक्के भिनले.

दीड-दोन वर्ष अशीच गेली आणि संजयच्या लक्षात आले की आपण फक्त द्वेष पसरवण्याचे काम करत आहोत, भगतसिंगांची तर ही काही शिकवणूक नव्हती. रचनात्मक कार्य केल्याखेरीज देशाला भवितव्य नाही या प्रेरणेने त्यांनी हिंदू एकताचा त्याग केला आणि निवडक सहकाऱ्यांना घेऊन वंदेमातरम या संघटनेची स्थापना केली.

कट्टरतावादाकडून सकारात्मकतेकडे अशी वाटचाल सुरु झाली. पुण्याच्या पूर्व भागातील पहिली व्याख्यानमाला हिंदमाता तरुण मंडळातर्फे सुरु केली आणि विचारांचा जागर सुरु केला. नाना पेठेतील द्वेषाचे वातावरण निवळायला यामुळे मोठी मदत झाली. हा भाग आता हिंदू-मुस्लीम द्वेषाचा नव्हे तर हिंदू-मुस्लीम ऐक्याचा म्हणून ओळखला जात असेल तर त्यात संजय नहारांचा खूप मोठा वाटा आहे.

वंदे मातरम संघटनेने कामाचा धडाका सुरु केला. शाखा काढायला सुरुवात केली. चंद्रकांत घाणेकर, विकास हांडे, संजय आहेर सारखे सहकारी होतेच. मुलीची छेड काढणा-यांविरुद्धही तुफानी पथक स्थापन केले.

संजय नहार यांचे पंजाबमधील कार्य

त्याच काळात पंजाब अस्वस्थ होऊ लागला. आमची पहिली भेटही याच काळात झाली. तेंव्हा मी आज का आनंद या वर्तमानपत्रात काम करत होतो. इंदिराजींची दुर्दैवी हत्या झालेली होती. शिखांविरुद्ध जनक्षोभ उसळला होता. संपादक श्याम आगरवाल यांच्यासोबत मी सायकल सोसायटी ते अन्य शीखबहूल भागात त्या शोकसंतप्त वातावरणात फिरत होतो.

बहुदा दुसऱ्याच दिवशी एक माझ्यासारखाच फाटका पण स्वप्नांचे तेज डोळ्यांत घेऊन एक युवक आज का आनंदच्या कार्यालयात आला एक प्रेसनोट घेऊन…… वंदे मातरम अशांत पंजाबमध्ये धावुन जाणार होती. पत्रकार म्हणून मी त्याच्याकडे जरा संशयानेच पाहिले. प्रश्न विचारले खूप आणि आम्ही मग शेजारच्याच कुंदन दवेंच्या अमृततूल्यमधील वन बाय टू चहा पीत बोलत राहिलो. त्याची अनावर तळमळ आणि खूप मोठी स्वप्ने जाणवली. आम्ही मित्र झालो तो हा लक्षात राहिलेला दिवस आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातला.

पंजाब एवढा पेटलेला होता की खरोखर तेथे कोणी महाराष्ट्रीय, प्रामाणिक भावना व इच्छा असली तरी जाईल असे मला खरेच वाटले नव्हते. मुळात सगळीकडे दहशतीचे वातावरण होते आणि त्यात पंजाबात तर आगडोंब उसळलेला. आर्थिक चणचणीचा सतत सामना करावा लागत होता. (अगदी आजही परिमाण बदलले असले तरी ती स्थिती कायम आहे.) पण तरीही संजय नहार आणि त्यांचे पंधरा-वीस कार्यकर्ते अगदी वर्गणी काढून पंजाबमध्ये गेले. तेथे फिरणे सोपे नव्हते. कोठून गोळी येईल किंवा बॉम्ब फेकला जाईल याचा नेम नव्हता.

एकात्मकतेसाठी शांतियात्रा

पंजाब केसरीचे प्रधान संपादक विजयकुमार चोप्रा तर त्यांना म्हणाले, “येथे मरायला आलात काय? पहिले परत घरी जा…” पण भगतसिंग डोक्यात भिनलेले संजय नहार ऐकतात कसले. त्यांनी जालियानवाला बागेत जाऊन आपल्या सहका-यांसह शपथ घेतली ती शांततेसाठी आणि एकात्मकतेसाठी शांतियात्रा काढायची आणि ती यात्रा काढली.

या शांतीयात्रेच्या दरम्यान अनेक विलक्षण अनुभव आले. धोके पत्करावे लागले. संतप्त शीख तरुणांचा विरोध पत्करावा लागला. नहारांनी आपले डोके भडक असतानाही कसलाही त्रागा न करता शांतपणे विरोध सहन केला, नम्रता न सोडता आपला निग्रह सोडला नाही.

एका गावात ते भारत माता कि जय अशा घोषणा देत शांतता यात्रा काढत असताना एक वृद्ध सरदारजी म्हणाला, “ज्या गावामध्ये पिढ्यानपिढ्या घरटी एक पुरुष सैन्यामध्ये आहे, त्या गावामध्ये देशभक्ती शिकवू पाहता आहात, तुमच्यापैकी कुणाच्या कुटुंबामध्ये किती लोक सैन्यात आहेत किंवा होते?” सगळे खजील होऊन एकमेकांकडे पाहू लागले. संजयच्या तेंव्हाच लक्षात आलं की, देशभक्तीबद्दल तावातावानं बोलणं आणि भावनेच्या आहारी दिलेल्या घोषणा किती पोकळ असतात आणि खरंच देशसेवा करायची तर स्वतःला काहीतरी तोशीस लागायला हवी, प्रश्नांच्या मुळाशी जायला हवं. त्यांनी आपला मार्ग अधिक व्यापक करण्याचा निर्धार केला . खरे तर संजय नहार महात्मा गांधींच्या मार्गावर चालू लागले. हे परिवर्तन विलक्षण होते.

शांतिदूत संजय नहार

त्यानंतर संजय नहार पंजाबमध्ये अनेकदा गेले. शांतियात्रा काढत राहिले. पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो व एस.एस. विर्क नहारांचा शांतीदूत म्हणून सर्वत्र उल्लेख करू लागले. हळूहळू पंजाब शांत झाला. पण शांतीचा हाच काळ असतो रचनात्मकतेचा. त्यांनी अनेक क्लुप्त्या लढवत जैनाचार्य सुशीलमुनी आणि प्रोफेसर दर्शनसिंग रागी यांची भेट घडवून आणली आणि त्याची परिणती ऐतिहासिक राजीव गांधी-लोंगोवाल करारात झाली.

1987 मध्ये पंजाबमध्ये महापूर आला असता संजय नहार आपल्या सहाकाऱ्यांसह पुन्हा पंजाबमध्ये धावले. या बचावकार्यात एका शीख कुटुंबाचे प्राण वाचवत असताना दत्तात्रय गायकवाड या सहकाऱ्याने आपले प्राणार्पण केले. शीख नेते जीवन सिंग उमरानानगल व सरदार बेअंतसिंग यांनीही या अचाट धैर्य आणि मानवतावादी कार्याचे कौतुक केले.

पंजाबमध्ये एकदा सुवर्णमंदिरात गेले असताना काही अतिरेकी त्यांना शोधत बंदुका आणि तलवारी घेऊन फिरू लागले. असीम धैर्याची ही परीक्षा होती. संजय नहारांनी कसाबसा आपल्या सहकाऱ्यांचा आणि स्वत:चा जीव वाचवला पण दहशतवाद्यांना मानवतेचा संदेश देऊन.

एव्हाना पंजाबमधील जनता त्यांना ओळखू तर लागलीच होती पण पंतप्रधानांपासून देशातील अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. विजयकुमार चोप्रा तर त्यांना मानसपुत्रच समजतात. आजही कोणत्याही कार्यक्रमात ते नहारांबद्दल एवढे भरभरून बोलतात कि त्यांच्या आत्मीय भावनांची खरी ओळख पटावी. विर्क आणि रिबेरो यांचेही तसेच आहे.

ते पंजाबमधील नामदेव महाराजांच्या घुमान गावी गेले. तेथील नामदेवबाबा का गुरुद्वारा पाहिला. महाराष्ट्रातून साताठशे वर्षापूर्वी आलेल्या या महान संताने, अगदी सिकंदरालाही शस्त्रबळानेही जिंकता न आलेला पंजाब केवळ प्रेमाने जिंकला. मराठीचा जागर पंजाब भूमीत पहिल्यांदा केला तो याच महान राष्ट्रसंताने. नामदेवबाबाच्या भूमीतून आलेला हा माणूस पंजाबचे आज सेवा करतो आहे याचा घुमानवासियांना केवढा आनंद.

घुमानचे मराठी साहित्य संमेलन

त्याच वेळेस नहारांच्या मनात कल्पना आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे का भारावले जाऊ नये? महाराष्ट्रात ते आले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. समकालीन अचाट क्षमता असलेल्या व्यक्तींचे पंख छाटून त्यांना आपल्यासारखेच विचार आणि कृतीबंदिस्त करणाऱ्यांचा सुकाळ बनलेले आणि वर पुरोगामी म्हणून खुरटा झेंडा मिरवणारे हे राज्य. आधी विरोधच प्रचंड झाला. एका प्रख्यात वृत्तपत्राने तर “संजय नहार यांचा मुळात मराठीशी संबंध काय?” असा उद्दाम प्रश्न विचारणारा अग्रलेख लिहिला.

अखिल भारतीय म्हणवणारे हे साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर जावे हा विचारच न सुचणारे असे करणार आणि करत राहणार हे अलीकडेच दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवावे या मागणीला व तशी सोय दिल्लीत करून देण्यात सर्वस्वी पुढाकार घेणाऱ्या संजय नहारांवर मुजोर प्रवृत्तीच्या ठालेपाटील यांनी काय अश्लाघ्य आरोप केले होते व आपलाच बालहट्ट कसा पुढे रेटला होता हे सर्वांच्या स्मरणात असेलच. पण घुमान येथील संमेलन सर्व अडथळ्यावर मात करून भरवायचे निश्चित झाले.

अडचणी दुसऱ्याच सुरु झाल्या. तेथे प्रकाशक-पुस्तकविक्रेते, लेखक वगैरे येणार कसे? बहिष्कारांचे सत्र सुरु झाले.

अशावेळी सर्वात आधी “मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अगदी आफ्रिकेत झाले तरी तेथे जाईल. घुमान तर महाराष्ट्राचाच विस्तारित भाग आहे…” अशी घोषणा चपराक प्रकाशनाच्या घनश्याम पाटील यांनी केली आणि मग कोठे विरोध मावळत गेला. महाराष्ट्राबाहेर, संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे साहित्य संमेलन दिमाखात पार पडले ते संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक, संशोधक, तत्वद्न्य आणि साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली. पंजाब आणि महाराष्ट्राची नव्याने नाळ जुळली व एकोपा आणि सद्भाव याचे अनोखे पर्व दृढ होऊ लागले ते यामुळे. घुमान येथेच “भाषा भवन” निर्माण करून तेथे भारतीय भाषांचा तुलनात्मक अभ्यास व संशोधन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. आता पायाभरणी झाली असून लवकरच देशातील अत्यंत महत्वाचे ज्ञानकेंद्र आकार घेईल.

विश्व पंजाबी साहित्य संमेलन

हे येथेच थांबणार नव्हते. सांस्कृतिक इतिहासाची पुनरावृत्ती करायची तर महाराष्ट्रातही पंजाबी संस्कृतीचा झेंडा फडकणे आवश्यक होते. त्यातून संजय नहार यांनी पुण्यात पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन भरवले. यशस्वी केले. पंजाबवर अत्यंत देखणे कॉफी-टेबल बुक अत्यंत देखण्या स्वरूपात प्रकाशित करून त्यांनी पंजाब व महाराष्ट्रीय सांस्कृतिक इतिहासाला उजाळा दिला.

1990च्या आसपास देशात एक नवी विपत्ती सुरु झाली. काश्मीर पेटू लागला. हिंसाचाराने थैमान घालायला सुरुवात केली. सारा देश भांबावून गेला. विद्वेषाच्या गरळी उभय पक्षाकडून ओकल्या जाऊ लागल्या. संजय नहार कसे स्वस्थ बसू शकत होते? या धुमसत्या वातावरणात शांती स्थापन करायला ते पुन्हा रवाना झाले. काश्मिरी पंडित असोत कि हिंसाचारात पोळून निघालेले मुस्लीम नागरिक असोत, सर्वांना पोटाशी धरत त्यांनी तेथेही अगदी दहशतवादाच्या अड्ड्यातही घुसून शांतीचा संदेश द्यायला सुरुवात केली. “उध्वस्त काश्मीर” या शीर्षकाचे काश्मीरची व्यथा मांडणारे पुस्तकही लिहिले. मी तेंव्हा प्रकाशन संस्थाही सुरु केली होती. हे पुस्तक मी प्रकाशित केले आणि काश्मीर प्रश्नाचा वेगळा पैलू त्यातून महाराष्ट्रासमोर आला.

काश्मीरमधला दहशतवाद आणि सरहद संस्थेची स्थापना

भारताच्या सरहदी या नेहमीच तणावग्रस्त ठेवण्यात शेजारी राष्ट्रांचा स्वार्थ आहे हे लक्षात येताच त्यांनी काश्मीरसह सर्वच सीमेलागत असलेल्या राज्यांत व्यापक संदेश देत त्यांना मुख्य भूमीशी जोडून घेण्याचा संकल्प सोडत सरहद या संस्थेची स्थापना केली. या स्थापनाक्षणाचा मी साक्षीदार आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.

काश्मीरमध्ये ते सातत्याने जात राहिले. राजकीय नेते, दहशतवादी संघटनेच्या गटांचे प्रमुख, पत्रकार ते सामान्य जनता यांच्याशी संवाद साधत राहिले. त्यांना तेथेच उडवून देण्याचे कट तर अनेक दहशतवाद्यांनी केले. अनेकदा ते बालबाल वाचले.

अण्णा हजारे प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना त्यांनाही तेथे नेले व शांतीचा संदेश देण्यास प्रवृत्त केले.

काश्मीरमध्ये आदर्श गाव संकल्पना राबवायचे ठरल्यावर संजय नहारांनी त्याचे स्वतंत्र व तेथील भूमीला मानवेल आणि स्वीकारले जाईल असे प्रारूप तयार केले. पण तेथील महत्वाचा प्रश्न आहे शिक्षण आणि रोजगार हे त्यांच्या लक्षात आले. शिक्षणाची धुरा त्यांनी उचलली. मी उद्योग स्थापनेची.

गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात कारखाना काढण्याचा लोकांलेखी एडचापपणा मी केलेलाच होता. काश्मीरमध्ये उद्योग काढणे मग मला काय अशक्य होते? मी तेथे जमीन मिळवली. सफरचंद आणि एप्रीकोट प्रक्रियेचा अवाढव्य कारखाना काढायचे ठरवले. पण राजकीय नग आडवे आले. त्यांना काश्मीरमध्ये रोजगार हवाय कि नकोय हेच मला कळेना. तोवर माझे दहा-पंधरा लाख रुपयेही खर्च झालेले होते. पुणे-श्रीनगर एवढे हेलपाटे घालूनही, प्रक्रिया तंत्रज्ञान आयात करून ठेवले असूनही काम काही केल्या पुढे सरकत नव्हते.

मीही माथेफिरू. एकदा तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची शेवटची भेटही निराशाजनक झाल्यावर मी सरळ काश्मीर टाइम्सच्या कार्यालयात आलो आणि त्यांच्या विरुद्ध एक अत्यंत भडक मुलाखत देवून परत पुण्याला आलो. मुलाखत दिली मी पण माझ्याबरोबरच अकारण त्रास झाला तो संजय नहारांना. ते कधी मला एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो त्रास परस्पर सहन केला आणि आपले काम चालू ठेवले.

दहशतवादग्रस्त काश्मिरी मुले

तेथील दहशतवादात ठार झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला होता. तशा सुविधा उरलेल्या नव्हत्या. दर्दपोरा हे गाव तर विधवांचे गाव म्हणून ओळखले जाते. अनेकांनी यावर लघुपट काढले, पारितोषिके मिळवली, धन कमावले पण प्रत्यक्ष काही करावे असे वाटले नाही.

संजय नहार यांनी सकाळ फौंडेशनच्या मदतीने येथे शाळा उभारली व “हर घर स्कूल…घर घर स्कूल” ही घोषणा दिली. संजय नहार यांनी त्या वेळच्या काश्मीरच्या अशांत स्थितीचा विचार करत पुण्यातच सरहद हायस्कूल व कॉलेज काढण्याचा निर्णय घेतला तो सीमावर्ती राज्यांतील दहशतवादी कृत्यांत अनाथ झालेल्या व हलाखीची परिस्थिती असलेल्या मुलांसाठी. 105 कश्मीरी मुलांना त्यांनी दत्तक घेतले.

हीही एक रेस होती समाजातील अपप्रवृत्तींच्या विरोधात. दहशतवाद फक्त बंदुकी वा हिंसेने केला जात नाही. तो अगदी वैचारिक पातळीवरही उतरतो, काही नवे करण्याच्या उमेदीने झपाटलेल्यांना नाउमेद करण्यासाठी सर्व हिणकस मार्ग वापरणारे एक प्रकारचे दहशतवादीच असतात. खरे तर संजय नहारांना आजवर अशाच दहशतवाद्यांनी जास्त त्रास दिला आहे. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत निर्धाराने आपल्या ध्येयाच्या दिशेने सतत वाटचाल करत राहण्याचे कौशल्य त्यांनी साधलेले आहे.

संजय नहारांनी पुण्यात सर्वप्रथम 500 काश्मिरी मुलांना पुण्यात आणले तेंव्हा “या मुलांचे धर्मांतर केले जाणार” अशी आवई उठवली गेली होती. पण जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद यांनी तिकडे दुर्लक्ष तर केलेच पण काश्मीरमध्ये भूकंप झाला तेंव्हा मदतीसाठी नहारांना पाचारण केले. आजाद त्यांना “भारताचे काश्मीरमधील राज्यपाल” असे कौतुकाने अलीकडेच एका कार्यक्रमात कौतुकाने म्हणाले.

संजय नहार यांनी काश्मीरच नव्हे तर सर्व सीमावर्ती राज्यांतील दहशतवादाने अनाथ झालेल्या मुलांना आपल्या पंखाखाली घेतले. यात त्यांना मोलाची साथ मिळाले ती सुषमा वहिनींची आणि सरहदच्या कार्याला मनापासून झोकून देणाऱ्या शैलेश वाडेकरांची. काश्मीरी माणूस तर सुषमा वाहिनीना “काश्मीरची माय” म्हणतो. सरहदच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांपासून देशातील सर्वच सर्वोच्च नेतृत्वाने केलेले आहे.

“बॉंडिंग विथ काश्मीर” या पुस्तकात त्यांनी काश्मीरमधील संघर्षाने भरलेल्या कार्यावर विस्तृत लिहिलेले आहे. ते वाचकांनी अवश्य वाचले पाहिजे. एखादी थरारकथा वाचल्याचा अनुभव येईल हे नक्की.

सरहदचे काश्मिरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संजय नहार यांच्यासोबत

पुण्यात “पुणे-काश्मीर फ्रेंडशिप चौक” झाला तो त्यांच्या अविरत प्रयत्नानी. देशातील पहिला ‘सिस्टर सिटी करार/ पुणे मनपा व श्रीनगर मनपामध्ये होऊन परस्पर सहकार्याची त्यांनी नांदी केली. केवळ शिक्षण हे यशाचे साधन नाही तर आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या लोकांना उत्पन्नाचे साधनाही मिळाले पाहिजे यासाठी “आश” या संस्थेची निर्मिती करत काश्मीर-आसाममधील हस्तोद्योगात बनाना-या कलात्मक वस्तूंना पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न केला.

कलम 370 रद्द

कलम 370 रद्द केल्यानंतरच्या अभूतपूर्व कर्फ्यूच्या काळात काश्मीरमधून एकही ट्रक बाहेर पडू शकत नसल्याने सफरचंदे व अन्य फळफळावळ सडून नष्ट होण्याचा धोका उत्पन्न झाला असता धावाधाव करून, विशेष अनुमत्या मिळवून त्यांची पुण्यात व महाराष्ट्रात अन्य ठिकाणी विक्रीकेंद्रे काढून दिली व ना-नफा-ना-तोटा या पद्धतीने वीस-बावीस ट्रक शेतमालाची विक्री करून दिली. याचा लाभ हलाखीत गेलेल्या काश्मिरी शेतकऱ्यांना झाला. तेथील शेतकऱ्यांच्या दैन्यावास्थेकडे देशाचे लक्ष वेधले गेले.

देश म्हणजे देशातील माणसे आणि तेच सुखात नसतील तर भौगोलिक सीमा कुचकामी ठरतात.

नहारांनी लोकांच्या हिताचा विचार केला. काश्मीरच्या पंडितांपासून ते चिनाब खोरे ते काश्मीर खोऱ्यातील लोकांनी त्यांना पाठींबा दिला कारण ते निरपेक्ष दृष्टीने हे कार्य करत आहेत याची जाण काश्मिरी लोकांना आहे.

370 कलम रद्द झाल्यावर देशात अशा विचारांची लाट आली की आता काय, आपणही तेथे प्लॉट घेऊ शकतो, सेकंड होम करू शकतो, सरकार सवलती देईल मग आपण तेथे कोणतेही उद्योग उभारू शकतो. प्रधानमंत्री मोदी तर दुबईला जाऊन “काश्मीरमध्ये उद्योग काढा” अशी आवाहने जागतिक समुदायाला करत होते. अशा स्थितीत काश्मीरमध्ये कोणते उद्योग यावेत, कोणत्या पद्धतीने यावेत, त्यात स्थानिक नागरिकांची भागीदारी कशी आवश्यक आहे यावर संजय नहार यांनी “पुणे मॉडेल” मांडले. त्या पद्धतीनेच आम्ही काश्मीरमध्ये शैक्षणिक संस्था काढू अशी पुणे विद्यापीठासह डॉ. शैलेश पगारिया यांच्या अर्हम फौंडेशनपर्यंत किमान सोळा प्रस्ताव गेले. देशात पुणे मॉडेलवर चर्चा होऊ लागली.

मी तत्वज्ञानावर आधारित “Pune Model- Jammu-Kashmir and Ladakh, On the Path of Development” हे पुस्तक लिहिले. देशातील नामांकित अर्थतज्ञानीही पुणे मॉडेल डोक्यावर घेतले. मुळात उद्योजकांनी तेथील पर्यावरण, भौगोलिक स्थिती, संसाधने आणि जनसंस्कृती यांना धक्का न लागता त्यांच्याच सहयोगातून उद्योग, शैक्षणिक संस्था, चित्रपट निर्मितीसाठी आलिशान स्टुडीओ, वनौषधी व फळप्रक्रिया यांनाच प्राधान्य द्यावे हा विचार काश्मीरचा भूगोल, पर्यावरण, तेथील संस्कृती आणि मानसिकतेशी सुसंगत होता.

तेथे चित्रपट निर्मिती केंद्र करण्यासाठी नहारांनी निलेश नवलाखा व देशातील महत्वाच्या निर्मात्यांच्या सहकार्याने प्रयत्नही सुरु केला होता पण त्यात कोविडने देशच घरात बंद केला. सर्वच कार्यांत एक तात्पुरता थांबा आला. पण त्यातूनही पुण्यातच काश्मिरी फिल्म फेस्टिवल भरवून काश्मीरी प्रतिभावंत स्वत:कडे आणि जगाकडे कसे पाहतात हे मुख्य धारेतील लोकांपर्यंत पोचवले. जगात भरलेला हा असा काश्मीरचा पहिलाच फिल्म फेस्टिवल.

काश्मीरबाबत आपण जो विचार करतो तसा काश्मीर आणि काश्मिरी माणूस नाही हे समजायला फार मोठी मदत झाली. काश्मीरमध्ये अगदी कारगिलला साडेतेरा हजार फुट उंचावरची सैन्य व पोलिसांच्या मदतीने भरवलेल्या कारगिल मॅरेथॉन असो कि दुर्गम भागांमध्ये केलेल्या ऍम्ब्युलन्सच्या सुविधा असोत, संजय नहार नाहीत असे एक ही क्षेत्र नाही. सीमावर्ती भागातील पर्यटनाने देश जोडायचे काम वेगाने होते हे लक्षात घेऊन त्यावरही त्यांनी जोर दिला.

तेथील संस्कृती व इतिहासाचे मराठी-इंग्रजीत प्रकाशन, मग ते ललितादित्यासारख्या महान सम्राटाचा विस्मृतीत गेलेला इतिहास असो, कल्हनची राजतरंगिणी असो कि अभिनव गुप्त ते लल्लदेद असो, प्रकाशित करून मराठी व इंग्रजी वाचकांसमोर ठेवत काश्मीर हा असाही आहे आणि त्याचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे, तो डावलता येणार नाही कारण तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे हे समजावून सांगत माणसे जोडण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे तर काश्मीरची तरुण गायिका शमीमा अख्तर यांच्याकडून ज्ञानेश्वरांचे पसायदान ते तुकोबा, नामदेवांचे अभंग मराठीत गाऊन घेऊन संगीतही माणसे जोडण्याचे साधन बनवले. मराठी बांधव व देशवासियांनी सरहद म्युझिकच्या याही उपक्रमाला मनमुराद पाठींबा दिला.

सरहदमधून तयार झालेली गायिका शमीम अख्तर

उत्तर-पूर्व भारतातील राज्ये

उत्तर-पूर्वेच्या राज्यातही संह्जय नहार यांनी अपार कार्य केले. 1987 साली आसाम गण परिषदेचे आंदोलन ऐन शिखरावर असताना नहारांनी एजीपीचे नेते प्रफुल्ल कुमार महंत यांच्याशी संपर्क साधून आसामी माणसाला मुख्य भूमिशी कसे जोडता येईल आणि खऱ्या अर्थाने त्याला राष्ट्रीय कसे बनवता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले. बोडो समाजातील विभाजनवादी वृत्तीला आळा घालत सरहद आणि ऑल बोडो स्टुडंट युनियनची युती करून सहकार्याची भूमिका घेतली.

2015 साली पहिली अठरा बोडो विद्यार्थ्यांचे तुकडी पुणे येथे सरहदमध्ये शिक्षणासाठी दाखल झाली. आसामचा शिवाजी म्हणून ओळख असलेल्या लचित बोरफुकनचा चैतन्यदायी इतिहास मराठी माणसासमोर ठेवला. भाषा हे मानवी अभिव्यक्तीचे एक महत्वाचे साधन. पंजाबमध्ये भाषा भवन जसे सुरु करण्याचा प्रस्ताव आहे तसेच जागतिक प्राकृत-पाली भाषांचे संमेलन घेऊन या भाषांचा संगतवार अभ्यास करण्याचे अध्यासन सुरु करायचे आहे. हे काम कोविडमुळे मागे पडले होते पण आता त्यालाही वेग आला आहे.

थोडक्यात सीमावर्ती राज्ये आणि मुख्य भूमीवरील देश यांना हरेक मार्गाने जोडणारा संजय नहार हा एक दुवा बनला. तोच त्यांचा ध्यास बनला व त्याची सुमधुर फळे आपल्याला पहायला मिळत आहेत. माणसे जोडणे हे त्यांचे एकमेव स्वप्न आहे.

संजय नहार यांच्या हत्त्येचा प्रयत्न

काही वर्षांपूर्वीच टपाल बॉम्ब पाठवून संजय नहार यांच्या हत्येचा अजून एक प्रयत्न झाला. महाराष्ट्र शासनाला अजून त्या कटाचा सूत्रधार गवसलेला नाही आणि महाराष्ट्रानेही त्याबाबत कधी आवाज उठवल्याचे माहित नाही.

कडव्या हिंदुत्वाकडून मानवतावादी रस्त्याकडे झालेली त्यांची वैचारिक प्रवासाची वाटचाल तर आदर्श म्हणता येईल अशी आहे. बंदुकी-रिव्हाल्वर्स या क्रांतीकारी स्वप्नातून बाहेर पडत गांधी-महावीर-बुद्धाची स्वप्ने नुसती पाहणेच नव्हे तर जगणे हे त्यांना साधले आणि हा एक ख-या अर्थाने स्वत:वर मिळवलेला विजय आहे. ख-या अर्थाने ते “जिन” आहेत.

संजय नहार यांच्याबद्दल काश्मीरी लोकांना काय वाटते?

संजय नहार ही व्यक्तीच एक वेगळे रसायन आहे. संजय नहार यांच्याबद्दल काश्मीरी लोकांना काय वाटते याचे उत्तर माझ्या गेल्या भेटीत दोन प्रसंगात मिळाले. ज्या वाहनातून मी सम्राट ललितादित्याच्या आता अवशेषग्रस्त असलेल्या परिहासपुरला जायला निघालो होतो त्या वाहनाचा चालक मला म्हणाला, “नहारसाब यहां चुनाव लडेंगे तो उन्हे बिना किसी तकरीर या प्रचार के चून दिया जायेगा.”

असाच अनुभव परिहासपुरच्या भग्नावशेषांमधेही मिळाला. तेथे खेळणारी, त्या स्थानाचा इतिहास माहिती नसलेली उनाड मुले जेंव्हा मी व पत्रकार स्नेजी संजय आवटे यांनी ललितादित्याचे मी लिहिलेले चरित्र त्याच्या प्रासादाच्या भग्नावशेषी पाय-यांवर अर्पण करत होतो तेंव्हा ती आमच्याजवळ आली. कुतुहलाने प्रश्न विचारले आणि संजय नहार हे नाव घेताच आनंदाचे चित्कार उठले. “संजयभाईने छापा है तो पातशहा जरूर महान होगा…” हे वाक्य त्यापैकी एका पोराचे.

एक मराठी माणूस काश्मीरमध्ये केवळ सहृदयतायुक्त मानवतेच्या जीवावर लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो हे अद्भूत आहे. अनेक काश्मीरी मुले आज शुद्ध मराठी बोलतात हेही त्यांचे यश, हे येथील मराठीप्रेमींनी लक्षात घेतले पाहिजे.

आजही रोज नव्या रचनात्मक संकल्पना

संजय नहारांचे मस्तक हे आजही रोज नव्या रचनात्मक संकल्पना, कल्पना, योजना आणि अजरामर उत्साह यांनी उसळणारा ज्वालामुखी आहे. हे झोपतात तरी कधी? का एवढी उमेद? स्वप्ने अनेकदा ढासळूनही, अगदी हत्येचे प्रयत्न होऊनही कोणती उमेद या माझ्या मित्राला अजरामर मानवतेची स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देते? तेही परतीत कसलीही अपेक्षा न ठेवता?

असा माणूस जगात अन्यत्र कोठेही झाला असता तर त्याला जगाने डोक्यावर घेतले असते. पण त्याचा विचारही त्यांना स्पर्शत नाही. अशी कोणती उर्जा आहे जी विपरित स्थितीतही नाउमेद न होता चिरंतन उत्साहाने विपरिततेही सृजनाचे स्वप्न पाहते…कृती करते? कसलाही बडेजाव न मिरवता एवढे साधे व निरपेक्ष राहणे कसे जमते? आजवर शेकडो अनाथांचे जीवन सावरून ज्ञानात्मकतेकडे नेउनही तटस्थ राहणे त्यांना कसे जमते? प्रश्न सोडवणे हेच आपले प्रधान कर्तव्य आहे असे मानत प्रश्नांची व्याप्ती कितीही मोठी असली तरी त्यात झोकून देणे कसे जमते? तेही अनिवार साधेपणा ठेवून व चेह-यावर प्रसन्न स्मित ठेवून? मला अजूनही उलगडलेले नाही.

तसा मी त्यांचा एक वर्ष एक दिवसाने थोरला. खरे तर थोरला भाऊ म्हणून मी त्यांची जपणूक खूप शक्तीने करायला हवी होती. त्यांच्या कार्यात साथ द्यायला हवी होती. मला ते जमले नाही. त्यांच्या हत्येचा प्रयत्न होऊनही जेवढे रान उठवता यायला हवे होते तसे करता आले नाही याची खंत आहे. उलट माझ्या पडत्या काळात त्यांनाच माझ्या थोरल्या भावाच्या भूमिकेत जावे लागले.

ज्यातून काय घडणार आहे याचा किंचितसाही अंदाज नाही अशा माझ्या संशोधनांना त्यांनी सर्वार्थाने मदत केली आहे व करत आहेत. तेही आपले कसलेही विचार न लादता. संशोधकांना खिजगणतीत न धारणा-या देशात असे घडणे हाच एक चमत्कार आहे. पण ते मात्र कधीही भाषणाची वेळ आली कि मी त्यांना सुरुवातीच्या काळात केलेल्या तुटपुंज्या मदतीचेही एवढे कौतुक करतात कि मला अक्षरश: भरून येते. पण आश्चर्य हे कि ते मात्र माझ्यासाठी काय करत आहेत याबाबत एक अवाक्षरही ते कधी काढत नाहीत.

कोणी कोणाचेच काहीही लक्षात ठेवायचे नाही (म्हणजे वाईट सोडून) अशा काळात अशी माणसे जेंव्हा दिसतात तेंव्हा जगात ईश्वराचे अस्तित्व असल्याचा भास माझ्यासारख्या ईश्वरी शक्तीवर विश्वास नसलेल्यालाही होतो. पण नियती मात्र असते यावर माझा आता विश्वास बसू लागलेला आहे. आणि ती नियती आहे ती सर्जनाची, मानवतेची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची.

महावीर, बुद्ध आणि गांधीजींच्या तत्वज्ञानाला जगण्यातून नवे रुप देत जगणे शिकवण्याचा, दुभंगलेल्या मनांना जोडत नवा मार्ग संजय नहार बनवताहेत. त्यांचे जीवनविषयकचे तत्वज्ञान हाच एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आज ते कदाचित आपल्याला समजणार नाही. पण शेवटी आमचा महाराष्ट्र तिरडीवर पाय ताणल्याखेरीज कोणाला ओळखले हे मान्यच करत नाही. ही महाराष्ट्राची नियती आहे. तीही कधीतरी बदलेल अशी आशा आहे कारण अत्यंत विपरीत स्थितीतही अनिवार आशेने आपले कार्य निरंतर करत राहणारा संजय माझा मित्र आहे.

मी वर जे संजय नहार यांच्या कार्याबाबत लिहिले आहे ते फारतर 20-25% असेल. एक मोठा ग्रंथ होईल एवढे त्यांचे आजवरचे कार्य आहे.

हेही वाचा:

संजय सोनवणी: लेखक, इतिहास संशोधक, वक्ता

महावीर सांगलीकर | न्यूमरॉलॉजिस्ट, लेखक आणि मेंटॉर

डिम्पल ओसवाल: लेखिका, संपादिका, सामाजिक कार्यकर्त्या

ऍडव्होकेट रमेश उमरगे : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

One thought on “असे आहेत शांतीदूत संजय नहार!

  1. मी किमान ३५वर्षापासून श्री संजय नहार यांना ओळखतो.
    वरील लेख उत्तम आहे.
    संजय नहार यांच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा पैलू राहून गेला आहे, असे वाटते.
    इतके अफाट कार्य करुनही ते जमीनीवरच असतात.
    गर्व, अहंकार, घमेंड हे शब्द त्या़ना स्पर्श सुद्धा करू शकलेले नाहीत.
    आजही ते फुटपाथवर बसून गप्पा मारू शकतात.
    माणूस आपलं कार्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करीत राहिला की श्रेष्ठत्व आपोआप त्यांच्याकडे येते.
    श्री.संजय नहार यांना त्रिवार मुजरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *