-महावीर सांगलीकर
टीप: धर्म आणि विज्ञान हा लेख कोणत्याही एका धर्माला उद्देशून लिहिलेला नाही, पण अनेकांना तो त्यांच्याच धर्माविषयी आहे असे वाटेल.
धर्म आणि विज्ञान
अनेकांना असे वाटते की त्यांचा धर्म जगातील सर्वात जास्त शास्त्रीय (Scientific) धर्म आहे. त्याहीपुढे जावून अनेकाना असे वाटते की आजच्या विज्ञानाला माहित नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या पूर्वजांना ठाऊक होत्या. एवढेच नाही तर आमच्या धर्माला अंतिम सत्य माहीत आहे, पण विज्ञानाला अंतिम सत्य माहीत नाही, त्यामुळे विज्ञान नेहमी आपली मते बदलत असते.
धर्मवेडे लोक असे बोलत असतात कारण त्यांना त्यांच्या धर्मगुरूंनी तसेच सांगितलेले असते. हे धर्मगुरू अडाणी असले तरी ते बोलतात ते ‘सत्य’ असते असे भक्तांना वाटत असते. हे भक्त लोक स्वत: कसलाही विचार अथवा चिंतन करत नसतात.
भारतातील कांही धर्माच्या अनुयायांचे तर असे म्हणणे असते की आज जगात जे कांही शोध लागले आहेत ते सर्व त्यांच्या धर्मग्रंथात फार प्राचीन काळीच लिहून ठेवलेले होते. युरोपिअन लोकांनी ते ग्रंथ पळवून नेवून ते वाचून विमाने, रेडिओ, टी.व्ही., कॉम्प्युटर वगैरे अनेक शोध लावले. (हे ग्रंथ तुमच्या ताब्यात गेली हजारो वर्षे होते, मग तुम्हीच का नाही ते शोध लावले हा प्रश्न विचारायचा नाही बरे का…)
गम्मत म्हणजे विज्ञानाच्या बाता मारणाऱ्या या लोकांना विज्ञान म्हणजे नेमके काय हेच माहीत नसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांच्या गावीच नसते आणि ते तंत्रज्ञानालाच विज्ञान समजतात.
हे खरे आहे की विविध भारतीय धर्मांच्या कांही महान आचार्यांनी प्राचीन काळी मुलभूत विज्ञानाच्या बाबतीत भरीव चिंतन केले होते. प्रगत गणित, फिजिक्स, मानसशास्त्र, आरोग्यविज्ञान, कालमापन वगैरे क्षेत्रातील कांही आचार्यांचे योगदान फार महत्वाचे आहे. पण याचा धर्माशी संबंध नसून ते त्या-त्या आचार्याचे वैयक्तिक कार्य आहे. अर्थात यातील बऱ्याच गोष्टी कालबाह्य झाल्या असून त्यांना आधुनिक विज्ञानाने चुकीचे ठरवले आहे. उदाहरणार्थ या आचार्यांनी पृथ्वी चपटी आहे असे सांगितले आहे. अनेक धर्मांध लोक आजही पृथ्वी चपटी आहे असे मानतात.
एकीकडे विज्ञानावर आधारीत तंत्रज्ञानाचे सगळे फायदे हे धर्मवादी लोक आणि त्यांचे धर्मगुरू घेत असतात. पण दुसरीकडे हे लोक विज्ञानाला नावे ठेवतात, विज्ञानापेक्षा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगत असतात. ही तर कृतघ्नता झाली.
विज्ञानावर यांचा एक आरोप असा असतो की विज्ञानामुळे जगाचा नाश होवू शकतो. ही गोष्ट ते मुख्यत: युद्धांच्या बाबतीत बोलतात. पण त्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की जगात आजपर्यंत झालेली बहुतेक युद्धे, संहार हा धर्मांमुळे झाला आहे.
धर्मवादी लोक असे म्हणतात की विज्ञानाला अंतिम सत्य माहीत नसते पण धर्माला ते माहीत असते. येथे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की विज्ञान म्हणजे धर्म नव्हे, की ज्याला खोट्या गोष्टींना अंतिम सत्य म्हणायची हौस असते. विज्ञान कधीही अंतिम सत्य सापडल्याचा दावा करत नाही, पण ते नेहमीच सत्याच्या जवळ असते.
धर्मवाद्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की विज्ञान नेहमी अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करते, याउलट धर्म हे अंधश्रद्धा पसरवण्याचे सगळ्यात मोठे साधन आहे. आता तर हे धर्मवादी लोक विज्ञानाने शोधलेल्या टी.व्ही., इंटरनेट, मोबाईल फोन अशा गोष्टींचा वापर अंधश्रद्धा पसरविण्यासाठी करत आहेत. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग धर्मवादी लोकच सगळ्यात जास्त करत आहेत.
जगातील बहुतेक सर्व धर्म हे एखाद्या जातीय, वांशिक अथवा प्रादेशिक समूहाचे बटिक बनले आहेत पण विज्ञानाचे तसे नाही. विज्ञान सगळ्यांसाठीच खुले आहे. त्यावर कुणाची मक्तेदारी नाही.
आजचे विज्ञान फार पुढे गेले आहे. विज्ञानाने देवाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उभे केले आहे. विज्ञानामुळे विविध धर्मांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. अशावेळी धर्मवादी लोक विज्ञानाला नावे ठेवण्या पलीकडे काय करू शकतात?
हेही वाचा:
Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!
6 thoughts on “धर्म आणि विज्ञान | Religion and Science”