रामराज्य आणि महात्मा गांधी

संजय सोनवणी

कल्याणकारी राज्य ही पाश्च्यात्य देशात संकल्पना अवतरली ती प्रबोधन काळात. शासनाची मुख्य कर्तव्ये काय कि ज्यायोगे प्रजेचे अधिकाधिक कल्याण होईल याभोवती ही संकल्पना फिरते. त्यामुळे अनेक नैतिक प्रश्नही निर्माण केले गेले असून “चांगले म्हणजे काय?” यापासून ते “चांगले कोणी ठरवायचे?”, “अधिकांचे अधिक सुख ही संकल्पना खरेच सुखमय ठरू शकते काय?” यासारखे गहन तात्विक प्रश्न निर्माण करून कल्याणकारी राज्याची दिशा नेमकी काय असावी यावर चिंतन केले गेले आहे. पण भारतात मात्र रामराज्य या संकल्पनेने गेली हजारो वर्ष राज्य केले आहे असे म्हणायला हरकत नाही.

रामायणात रामाच्या राज्याभिषेकानंतर भरताने वर्णन केल्यानुसार, रामराज्यात कधी दुष्काळ पडत नसे. लोक दीर्घायुषी असून बापाला कधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागत नसत. राज्यात कोणी विधवाही नव्हती. सारे लोक वैभवात राहत असून आनंदी व समाधानी होते. चोर-दरोडेखोरांचा कोणासही उपद्रव नसून आजारपण अथवा शरीरव्यंग कोणासही भोगावे लागत नसे. अग्नी, हिंस्त्र पशु, अथवा नैसर्गिक आपत्तीचा धोका नसे. वैवाहिक जीवन सुखी असून लोक शिक्षित होते.

अशा रीतीने रामकालीन जग हे सुख-समाधानाचे होते असे रामायणात म्हटले असले तरी यात राज्यव्यवस्थेचा काही सहभाग होता असे मात्र दर्शवलेले आढळत नाही. एका विशिष्ट दृष्टीकोनातील आदर्श समाजव्यवस्थेचे हे वर्णन आहे. पण लोकांना समजलेले रामराज्य मात्र खुद्द रामाने निर्माण केलेली आदर्श व्यवस्था अशा स्वरूपाचे होते. या आदर्श समाजव्यवस्थेला आधुनिक परिप्रेक्षात पाहत तशी व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडण्याचे श्रेय नि:संशयपणे महात्मा गांधींना द्यावे लागते. “रामराज्य” हीच आदर्श संकल्पना मानून त्यानुसार स्वतंत्र भारत कशी वाटचाल करेल याचे विस्तृत दिशादर्शन त्यांनी करून ठेवले आहे.

रामराज्य आणि महात्मा गांधी

रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे असामान्य नेतृत्व केले. त्यांच्या दृष्टीतील रामराज्य हे विशाल मानवतावादाचे समग्र रूप होते. रामाला त्यांनी एक आदर्श राजा या रुपात पाहिले. त्याला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत बांधायचा प्रयत्न केला नाही.

१९ सप्टेंबर, १९२९च्या ‘यंग इंडिया’मध्ये महात्मा गांधी लिहितात, ‘मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत; सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर खरोखरच होऊन गेला का, हे मला माहिती नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे असे उदाहरण आहे, जिथे लांबलचक आणि महागड्या प्रक्रियांना सामोरे न जातासुद्धा समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकतो.’

२ ऑगस्ट, १९३४च्या ‘आनंद बाजार पत्रिका’मध्ये गांधीजी लिहितात, ‘माझ्या स्वप्नातील रामायणात राजपुत्र आणि रंक या दोघांनाही समान अधिकारांची खात्री दिली जाते.’ २ जानेवारी, १९३७च्या ‘हरिजन’मध्ये ते म्हणतात, ‘राजकीय स्वातंत्र्य मिळवणे याचा अर्थ आपण ब्रिटिशांचे हाऊस ऑफ कॉमन्स, रशियन राज्यव्यवस्था, इटलीतील फॅसिस्ट अथवा जर्मनीतील नाझी शासन व्यवस्थेचे अनुकरण करावे, असा नाही. आपल्याला आपले, आपले वाटणारे राज्य हवे आणि त्यालाच मी रामराज्य म्हणतो. रामराज्य म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य.’

गांधीजींच्या मते, रामराज्याची राजकीय व्याख्या, ‘धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य’ अशी करता येईल.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिने आधी, १ जून १९४७ रोजी गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये लिहिले होते, ‘ऐश्वर्यात लोळणारे काही लोक आणि पुरेसे अन्नही न मिळणारे सामान्य नागरिक अशा अन्यायकारक असमानतेच्या काळात रामराज्य अस्तित्वात येणे शक्य नाही.’

रामाबद्दलची आस्था महात्मा गांधींनी रामराज्याचे एक व्यापक स्वरूप मांडून व्यक्त केली. त्यांच्याच वरील विधानांवरून लक्षात येईल कि समता आणि न्याय हे रामराज्याचे महत्वाचे लक्षण होते आणि ते पुरातन भारतीय परंपरेला साजेसे होते. मूळ रामकथेतील राम गांधीजीना आकळला कसा होता हे येथे आपल्या लक्षात येईल.

गांधीजींचे रामराज्य

गांधीजींचे रामराज्य केवळ प्रादेशिक अथवा एखाद्या राष्ट्रापुरते सीमित नव्हते तर त्याला वैश्विकतेचे परिमाण होते. रामराज्य हे त्यांच्या मते पाश्चात्य राजकीय धारांचे अनुकरण नव्हे तर शुद्ध राष्ट्रीय विचारमंथनातून रामाच्या जीवनातून आकळलेले एक नवेच सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञान होते जेथे मनुष्य कल्याण हाच शासनाचा प्रधान हेतू असणार होता. थोडक्यांचे हित व्हावे आणि बहुसंख्य लोक मात्र कोणत्याही सुखापासून वंचित रहावे अशी व्यवस्था म्हणजे रामराज्य नोहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. लोकांच्या नैतिक धारणा हा त्यांनी रामराज्याचा पाया मानला. शासनामुळे समाज नैतिक होतो तसेच नैतिक लोकांमुळे शासकांना नैतिक व्हावेच लागते असा हा परस्परावलंबित समाज म्हणजे रामराज्य ही त्यांची व्याख्या होती.

सध्या उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणात आलेली वर्चस्वतावादी तत्वे मूळ रामकथेचा भाग नाहीत ही जाणीव त्यांना असंख्य भारतीयांप्रमाणे होती व त्या जाणीवेला चिंतनाचे अधिष्ठान देवून त्यांनी आधुनिक जगाला रामराज्य म्हणजे काय आणि ते कसे असले पाहिजे याचा मार्गदर्शक सिद्धांत दिला. आज जगाला अशा रामराज्याची आवश्यकता आहे हे कोणीही विचारी मनुष्य मान्य करील.

आज देशात अयोध्येला नव्या राममंदिराच्या रूपाने ते फक्त भावभक्तीचे आणि धार्मिक अहंकाराचे प्रतीक राहील कि खरेच रामराज्याच्या दिशेने पावले उचलण्याचे सुतोवाच होईल हे काळच ठरवेल. रामाचे उदात्त मानवहितैषु चारित्र्य सर्व भारतीय आदर्श मानतील कि भेदाभेदाच्या भिंती उभ्या करत हिंसेच्या तांडवात देशाला ढकलले जाईल हे सुजाण लोकांच्याच विचारक्षमतेवर अवलंबून राहील. राम आणि रामराज्य या संकल्पना जशा मुळच्या होत्या तशाच स्वीकारायच्या कि वर्चस्वतावादाने प्रदूषित झालेली संकल्पना स्वीकारून “रामराज्य” संकल्पनेचा बट्ट्याबोळ करायचा हे या देशातीलच नव्हे तर जागतिक नागरिकांनी ठरवायचे आहे.

हेही वाचा

रामायण: रामकथेचे विश्लेषण

रामराज्य म्हणजे नक्की काय रे भाऊ….!

अलिप्त होणं जमलं तर ठीक …….

Marathi Story: फादर जोसेफ बॅण्ड

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English (Online English Magazine)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *