-चित्तरंजन
भारतामध्ये स्वतःला पुरोगामी समजणारे खूप लोक आहेत. पण ते प्रत्यक्षात पुरोगामी वगैरे काही नाहीत.
पुरोगामी असणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असणारे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, जातपात न मानणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असणे.
पण प्रत्यक्षात स्वतः ला पुरोगामी समजणारे वरील व्याख्येत बसत नाहीत. त्यांची पुरोगामी असण्याची व्याख्या वेगळीच आहे. त्यांच्या मते पुरोगामी असणे म्हणजे हिंदू धर्मावर टीका करणे, बौद्ध धर्माविषयी प्रेम बाळगणे, साम्यवादाला कवटाळून राहणे, सामाजिक समस्यांना ब्राम्हण जबाबदार आहेत असे मानणे, प्रस्थापितांवर सतत टीका करत राहणे, एखाद्याच्या जातीचा उल्लेख करणे होय.
असो. माझ्या या लेखाचा विषय पुरोगाम्यांना असणारा हिंदू धर्माचा द्वेष आणि बौद्ध धर्माविषयी असणारे प्रेम हा आहे.
पुरोगाम्यांचा हिंदुविरोध
भारतातील या तथाकथित पुरोगाम्यांमध्ये हिंदू पुरोगाम्यांची संख्या आणि प्रमाण हे सर्वात जास्त आहे. यांचे मुख्य लक्षण म्हणजे हे हिंदू धर्मावर सातत्याने टीका करत असतात. यांची विचारसरणी अशी असते की ज्यामुळे हिंदूमध्ये आपल्या धर्माविषयी न्यूनगंड तयार व्हावा. किंबहुना हिंदू धर्मीयांमध्ये न्यूनगंड तयार व्हावा यासाठीच हे झटत असतात.
अर्थातच या तथाकथित पुरोगाम्यांना हिंदूंच्या इतिहासातले आणि वर्तमानातले चांगले काहीच दिसत नाही. म्हणजे ऐतिहासिक काळात हिंदूंनी तत्वज्ञान, गणित, विज्ञान, मेडिकल सायन्स, ऑकल्ट सायन्स, तर्कशास्त्र, कथासाहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये केलेली प्रचंड ग्रंथनिर्मिती, (आणि अर्थातच त्यासाठी त्यांनी केलेले संशोधन) यांच्याविषयी या पुरोगाम्यांना कसलेच ममत्व नाही. हिंदू राजांनी केलेला पराक्रम, हिंदूंनी विकसित केलेली संस्कृती, स्थापत्यकला, तिचा भारताबाहेर केलेला आणि झालेला प्रचार याविषयीही हे पुरोगामी अनभिज्ञ असतात.
हिंदूंच्या या योगदानाचा कोणी उल्लेख केला तर या पुरोगाम्यांना ते आवडत ही नाही. हे लोक लगेच त्याची टिंगल-टवाळी उडवतात.
पुरोगाम्यांच्या या मानसिकतेमागे त्यांचा एक मोठा गैरसमज दडलेला आहे. हे लोक कट्टर ब्राह्मणविरोधी असतात, हिंदू धर्म अवनत झालेला आहे हे गृहीत धरतात, या अवनतीला ब्राम्हण जबाबदार आहेत, आणि हिंदू म्हणजे एकगठ्ठा, एकच विचारसरणी आणि एकच संस्कृती सणारर असा धर्म आहे असे मानतात.
पुरोगाम्यांचं बौद्ध प्रेम
एकीकडे या तथाकथित पुरोगाम्यांना हिंदू धर्म आवडत नाही, तर दुसरीकडे यांचे बौद्ध धर्मावर खूपच प्रेम असते. अर्थात हे प्रेम बौद्ध धर्मावर नसून नवबौध्द लोकांवर असते. या प्रेमात हे पुरोगामी लोक एवढे वाहवत गेले आहेत की यांना स्वतःचा काही अजेंडाच उरलेला नाही, तर ते नवबौद्धांचा सामाजिक आणि राजकीय अजेंडा चालवत आहेत.
मी काही बौद्ध धर्माचा विरोधक नाही. पण नवबौद्धांनी बौद्ध धर्माला एक पॉलिटिकल मोव्हमेन्ट बनवलेले आहे. अशा पॉलिटिकल मोव्हमेन्ट बनलेल्या कुठल्याही धर्मापासून समंजस लोकांनी दूरच राहिले पाहिजे.
धर्म हा माणसाच्या वैयक्तिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी असतो. नवबौध्द धर्म अशा कोणत्याही उन्नतीसाठी उपयोगी नाही.
पुरोगामी हे बहुतांश करून साम्यवादी असतात. साम्यवादामध्ये धर्माला स्थान नाही. कार्ल मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्हंटले आहे. माझ्या मते पॉलिटिकल धर्माला तर अफूची गोळी नव्हे, तर सायनाईड म्हणायला पाहिजे. असे असताना भारतातले हे पुरोगामी लोक बौद्ध धर्माची भलावण करतात, हा एक मोठाच विनोद आहे.
हेही वाचावे…..
धर्मांतर: वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर……..
नव्या सामाजिक क्रांतीची गरज – आता विचार नव्हे, कृती हवी!
TheyWon Online Magazine (English)
TheyWon Online Magazine (Hindi)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
