प्रेम-काजवा | Love Letter

डॉ. राखी बांगर

चिंचवड PCMC

काजव्याने जसे स्वयंप्रकाशीत असावे, स्वतःच्या प्रकाशाने स्वतःचा मार्ग निवडावा… आणि त्यावर यशस्वी वाटचाल करावी.. अगदी तशीच स्वयंप्रकाशीत मी आहे आणि दिवसेंदिवस तो माझ्यातला प्रकाश उजळतो आहे तो फक्त आणि फक्त तुझ्या सावलीत.. होय तुझी प्रेमाची सावली..तुझी आश्वासक साथ…तुझी अखंड प्रेरणा… तुझ्या डोळ्यातली ती प्रेमाची सोबत. 18 वर्ष झाली ना…पण मी रोज नव्याने जन्म घेतेय..नवीन भरारी साठी… आणि तू माझ्या पंखातले बळ बनुन मला अखंड सोबत करतो आहेस.. त्यामुळे असे कधी झालेच नाही की आपल्या मध्ये परिस्थिती मुळे कधी प्रेम कमी झाले किंवा दुरावा आला याउलट जसे जसे दिवस गेले तशी मी तुझ्यात समरसून गेले आणि तुही त्या अनंत सागरासारखा मला विलीन करत गेलास… माझ्या प्रत्येक प्रेममयी थेंबाचा साक्षीदार होऊन.

प्रेम व्यक्त करणे … बोलून दाखवणे हे तुला कधी जमलेच नाही.. ते फक्त तू माझ्या डोळ्यात पहावे आणि मी त्यात न्हाऊन निघावे असेच आहे ना… पण मला हे तुझे अबोल प्रेम खूप काही सांगून जाते…तुझी जिद्द… तुझी तळमळ.. काहीतरी मिळवण्याची… खूप चांगला माणुस म्हणून तुझ्या डोळ्यातील ती काळजी… मी आजारी असताना रात्रभर उठून हळूच माझी नाडी.. ताप तपासणे ….सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करूनच मग औषध देणे… मी काय खाते…माझे वर्क आऊट..

मी फिट राहावी म्हणून तू मला क्रिकेट साठी.. trekking साठी दिलेली प्रेरणा आणि सूटच म्हणेल मी… या अश्या खूप काही गोष्टी आहेत जे मला तुझ्याकडे आणि खेचून आणतात. त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात मुंगी जाईल इतकेही अंतर पडलेले नाही… मी आजही तुझ्या प्रेमात तितकीच वेडी आहे जितकी राधा होती कृष्णाच्या प्रेमात… तू नेहमी नजरेसमोर असावा असे वाटते… सकाळी ऑफिस ला निघताना एक एक मिनिट मोजत राहते..पायच निघत नाही रे घरातून..आणि संध्याकाळी पण कधी एकदाचे 5:30 होतात आणि मी घरी पोहोचते असे होते.. घरी आल्यावर तुला पाहिले की आत्मा… डोळे तृप्त होतात…दिवसभराचा थकवा निघून जातो एका क्षणात… आणि कधी तू नसलास घरी की मन सैरभैर होते… नजर तुला शोधत राहते घरभर… हे सांगतेय कारण इतक्या वर्षांनी आपल्यामध्ये दुरावा नाही आला तर आपण आणि जवळ आलो आहोत…कधीही दूर न जाण्यासाठी….

तुझी साथ… तुझी आर्त हाक… तुझे मौन प्रेम… तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट तू न सांगताही मी समजून घेणे आणि माझ्या सर्व गोष्टींचा तू न बोलताही काळजी ने सर्व विचार करून मला प्रोत्साहीत करत राहणे अश्या खूप काही गोष्टी आहेत ज्या मला रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायला प्रोत्साहन देतात आणि ज्या संजीवनी बनुन आपल्यातील आकर्षण, उत्साह कायम ठेवतात आणि म्हणूनच ही आपली लव्ह स्टोरी वर्षानुवर्षे बहरत जात आहे…. आपली संसार वेल अशीच फुलत राहात आहे..आणि म्हणूनच मी तुझी सदैव हृणी आहे कारण माझ्या आयुष्याचा प्रेम- काजवा तूच आहेस ….मी नव्हे!! आणि मी कधी असणार ही नाही!!!!!

शेवटी एकच म्हणावेसे वाटते….
Each day I love you more, today more than yesterday but less than tomorrow…..

Love you forever….!

आणखी काही …

Raigad | रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

गौरी आणि फेस रीडर | Gauri

विचारधन परिवर्तन | Marathi Quotes

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!