संजय सोनवणी
भारतात वेगवेगळ्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्याने भारतीयांचे काय हित केले ते प्रश्न अलाहिदा. आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत. बहुदा हे समजुनच भारतात एकमेवाद्वितीय असा तत्वज्ञानाचा पंथ अस्तित्वात आला होता आणि त्याचे नांव होते “अज्ञानवाद”. म्हणजे ज्ञान तुच्छ असून अज्ञानातच मोक्ष व मुक्ती आहे असे मानणारा हा पंथ होता. हा पंथ अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला कि त्याचे पुढे ६७ उपपंथ पडले.
जैन साहित्यात या पंथाची माहिती मिळते.
हे होते अज्ञानवाद्यांचे तत्वज्ञान …….
१. दोन भिन्न व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते. या दोन व्यक्तींमधील ज्ञानाच्या चर्चा, कोणाचे बरोबर याबाबतचे वाद यामुळे ज्ञानाबद्दलच शंका निर्माण होतात. मने कलुषित होतात ते वेगळेच!
२. कलुषित मनाच्या माणसांना जास्त काळ संसार बंधात रहावे लागते. मग ज्ञानामुळे मोक्ष कसा मिळणार?
३. ज्ञानच नसले तर अभिमान आणि द्वेष निर्माण होत नाहे व मोक्ष पटकन मिळतो.
४. ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात. इच्छा निर्माण झाल्या कि ओघाने कर्म आलेच! मनाच्या प्रेरणांमुळे निर्माण होणाऱ्या कर्माचे परिणाम हे तीव्र असतात. ते लोकांना लाभकारकच असतील असे नाही. आणि लाभ म्हणजे काय हे कोणी ठरवायचे?
५. मनाच्या प्रेरणेवाचून केवळ शरीराने घडणाऱ्या नैसर्गिक आपसूक होणा-या कर्मांचे परिणाम फार वाइट अथवा दु:खदायक नसतात. प्रेरणेने होणारी कर्मे मात्र दु:खदायकच होण्याची शक्यता असते.
६. मुमुक्षूने अज्ञानात राहणे कधीही चांगले. मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे असे जे म्हणतात त्यांना तरी खरे ज्ञान म्हणजे नेमके काय हे कोठे माहित असते? प्रत्येक तत्वज्ञानी पुरुषाचे ज्ञान निराळे असते. अमुकचेच खरे कि खोटे हे ठरवण्यातच वेळ वाया जाईल.
७. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की “मला दिव्य ज्ञान झाले आहे.” पण याला प्रमाण काय? ते खरे मानायचे निकष कोणते? आणि ते कोणी ठरवायचे? थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमाणावाचून विश्वास ठेवता येत नाही. मग हे उपद्व्याप करण्यात, प्रमाणे गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अज्ञानात राहणे काय वाईट?

भारतीयांनी आत्मसात केला अज्ञानवाद!
तर हा झाला अज्ञानवाद. फारसा माहित नसलेला पण भारतीयांनी पुरेपूर आपल्या हाडीमांसी रुजवलेला.
हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच! कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो.
प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार? प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतीयांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्ट कोण करणार? कशाला? कोणी सांगितली नसती उठाठेव? दृष्टीआड ते सृष्टीआड हा आपला मुलमंत्र आहे की काय?
अज्ञानाची आस ही अशी आहे. अज्ञानातील जगण्यात आम्ही संतुष्ट आहोत. म्हणजे अज्ञानवाद्यांच्या मतानुसार आम्ही मोक्षप्राप्तीला खरे लायक आहोत. जय अज्ञानवाद!
![]() | संजय सोनवणी हे प्रसिद्ध लेखक, विचारवंत, धर्म चिकित्सक आणि इतिहास संशोधक आहेत. विविध विषयांवर त्यांची आजपर्यंत ११० पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये लिहितात. |
हेही वाचा….
जागतिकीकरण: नव्या जगाची आव्हाने कशी पेलणार ?
Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!