निसर्गात फिरताना ….

नाग- Cobra

पक्षीमित्र दीपक शिंदे (पुणे)

निसर्गात फिरताना येणाऱ्या अनुभवांचे पक्षीमित्र दीपक शिंदे यांनी केलेले वर्णन, आणि कोणती काळजी घ्यायची याच्या त्यांनी दिलेल्या सूचना ….

भांबुर्डा- वनपरीक्षेत्रातील हनुमान टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याने वनविहार करित फिरत होतो. माझ्या पुढे अनेक निसर्ग प्रेमी चालत होते. मात्र ते त्यांच्या गप्पांमध्ये रंगले होते. रानात फ़िरताना आपल्या सभोवतालच्या परिसरातील हालचालींवर तीक्ष्ण नजर असायला हवी. माझ्या उजव्या बाजूला असलेल्या रान-उतारावर नजर फ़िरवत पुढे जात होतो. अचानक एका वाळलेल्या वृक्षाच्या खोडावर माझी नजर स्थिरावली. त्या खोडाच्या आत एक धामण जातीचा सर्प वाळवी व वाळवीची अंडी, खाण्यासाठी अर्धा शिरला होता आणि त्या धामणीच्या शरीराचा अर्धा भाग खोडा बाहेर होता.

मी त्या खोडाजवळ जाऊन थांबलो. त्या सर्पापासून माझ्यापर्यंत फक्त एक मीटर अंतर असावे. बराच वेळ झाला तरी तो सर्प काही बाहेर येईना, त्याला बाहेर कोणी आपल्या जवळपास आले असेल? याची काहीच पर्वा नव्हती. इतका तो सर्प आपले भक्ष्य शोधण्यात दंग झाला होता. जवळ-जवळ पंधरा मिनिटांनंतर मला त्याची बारीक हाल-चाल जाणवली. कारण बाहेर येताच तो सर्प मला पाहून सुसाट वेगाने धावणार होता. मी आधीच त्याचे एक छायाचित्र घेऊन ठेवले होते. तो सर्प मागे सरकत आपले शरीर खोडा बाहेर टाकत होता. आणि बाहेर पडताच त्याने मला पाहून, क्षणाचाही विलंब न लावता सुसाट वेगाने निघून गेला.

आपण रानात फिरत असताना आपली नजर सभोवताली चोख असायला हवी. कारण नाग, घोणस, यांसारखे विषारी सर्प, सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होऊन भक्ष्याची शिकार करण्यासाठी टपलेले असतात. जर त्या वेळी पक्षी आपल्या जवळपास असतील, तर ते आपल्याला कल-कलाट करून सूचना देत असतात. या बाबत “सातभाई” पक्षी खूप अग्रेसर असतात. पण एक दिवस त्यांचा हा अग्रेसरपणा त्यांच्यावरच उलटला.

सातभाई पक्षी आणि धामण

येरवडा येथिल “सलीम अली” पक्षी अभयारण्यात विणीच्या हंगामात या “सातभाई” पक्ष्याच्या एका जोडीने पाय वाटेच्या बाजूस असलेल्या शिसूच्या झाडावर घरटे तयार केले होते. मी अधूनमधून या घरट्यावर लक्ष ठेवून असे. एके दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास मी पक्षी निरीक्षण करीत या वाटेत असलेल्या घरट्याजवळ आलो आणि थबकलोच! ज्या शिसूच्या झाडावर “सातभाई”- ( Large Grey Babbler) पक्ष्यांचे घरटे होते, त्या झाडावरून सातभाईची जोडी जोरजोराने कलकलाट करीत होती. मी त्यांच्याकडे पाहात असता, झाडाच्या बुंध्याकडे खाली पाहात हि जोडी आक्रोश करीत होती. मी त्या झाडाच्या बुंध्याकडे पाहिले तर काय? एक मोठी धामण त्या झाडाच्या बुंध्यापासून अर्धवट उभी राहून घरट्याकडे पाहात होती.

ती धामण झाडावर चढून घरट्यातील पिलांची शिकार करणार याची मला जाणीव होती. मी पुढे जाऊन त्या धामणीला हुश — हुश — करून हातवारे करीत हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु ती मोठी धामण खूप धीट होती. उलट माझ्याकडेच उभे राहून पाहात होती. थोड्याच वेळात तिने त्या शिसूच्या झाडाला विळखे देत वर घरट्याच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. सातभाईची जोडी खूप मोठ्याने आक्रोश करीत होती. आता आणखी सातभाई पक्षी या जोडीच्या मदतीस धावून आले होते. ते ही आक्रोश करीत धामणीला चोची मारत परतवून लावण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु धामण अजिबात न घाबरता वर जात होती.

घरट्यातील पिलांजवळ बसलेल्या त्या सातभाईंच्या जोडीने धामण जवळ येताच, धामणीवर चोचीने जोरात हल्ला केला. पण व्यर्थ! त्यांचा प्रयत्न निष्फळ झाला होता. धामण घरट्यावर गेली आणि तिने चारही पिले एकापाठोपाठ मटकावली होती.

सातभाईंची जोडी शेजारच्या झुडूपावर अस्वस्थ होऊन बसली होती. संपूर्ण परिसर शांत झाला होता. एकाही पक्ष्याचा आवाज ऐकू येत नव्हता. धामण शिसूच्या झाडावरून उतरून माझ्या समोरून निघून गेली. मी खूप निराश झालो होतो. क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो व तिथून निघालो.

निसर्गात फिरताना

रानावनात फिरणाऱ्या सापांना आपली शिकार करायची नसते. ते स्वतःचे रक्षण करीत असतात. पण त्यांच्यावर आपला पाय पडणार नाही याची काळजी आपण घेणे गरजेचे आहे.

पुण्यातील भांबुर्डा या वनउद्याना प्रमाणेच, पाचगाव पर्वती येथील ‘तळजाई” हे देखिल एक वनउद्यान आहे. जिथे रोज सकाळी व संध्या काळी अनेक निसर्गप्रेमी पर्यटक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यात लहान मुले देखिल असतात. निसर्गाच्या सानिध्यात चालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण निसर्गात फिरताना किती सावध असायला हवे हे देखिल तितकेच महत्त्वाचे आहे. वेळ सांगून येत नाही.

नाग

मी एकदा अभयारण्यात फिरत असताना वाटेत एक भला मोठा नाग आडवा पसरला होता. माझ्या व त्या नागामध्ये साधारण तीन मीटर अंतर असता तो माझ्या नजरेत आला. मी त्याला आजमावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. त्याला माझ्या हलण्याची चाहूल लागली. आणि तो माझ्याकडे पाहत मोठा फणा काढून ताठ उभा राहिला. तो नाग आणि मी, एकमेकांकडे पाहात होतो. बराच वेळ थांबून मी पुन्हा एक पाऊल पुढे टाकू लागताच, त्या नागाने ताठर भूमिका घेत आपला फणा विस्फारला. त्याने मला दिलेली वॉर्निंगच होती ती.

मी लगेच एक पाय मागे घेतला तसा तो जरा शांत झाल्याचे मला जाणवले. मी आणखी दोन पावले मागे सरकलो, तसा त्याने आपला फणा आवरला आणि निघून गेला.

श्रावण महिन्यापासून साप ऊन्ह घेण्यासाठी तापिला बाहेर पडतात. या वेळी ते रानातील पायवाटेवर आडवे पसरतात. या वेळी आपण सावध राहणे आवश्यक आहे. त्यांच्यावर आपला पाय तर पडणार नाही ना? याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा साप भीतीपोटी स्वतःचे रक्षण करीत असताना, मिळालेले फळ आपल्या वाट्याला येते. ते भोगायचे नसेल, तर निसर्गात फिरताना हि काळजी घेणे हिताचे असेल? हे तितकेच खरे आहे.

निसर्गात फिरताना

हेही वाचा….

Cat & Dog : जीवन कसं जगावं…..

रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स

जैन संस्कृतीच्या सांगली जिल्ह्यातील प्राचीन पाऊलखुणा

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

One thought on “निसर्गात फिरताना ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *