बारिश
आस…सगळ्यांसाठी असते खास….. भाग दोन | Aas story part 2
पहिला भाग: आस,सगळ्यांसाठी असते खास (1)
++++
बाल्कनीतून शरीराने फ्रेश पण मनाने खिन्न होऊन आलेल्या काव्याने स्वतःसाठी चहा ठेवला.. चहा तिचे सर्वात आवडते पेय. कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय! एक कप चाय हो जाय, असे ती मजेने सर्वांना सांगायची.
उकळत्या चहा कडे बघत होती तेव्हा मागे रेडिओ वरती गाणे चालू होते, तुझ से नाराज नहीं जिंदगी हैराण हूं मैं, तेरे मासुम सवालों से परेशान हूं मैं …
ती भूतकाळात हरवून गेली. कॉलेजचे आयुष्य सरले नाही की लगेच लग्न जॉब संसार…. मग त्यातील जबाबदाऱ्या. पहिली तीन चार वर्ष तर यातच गेली. विशालने तिची कोणतीही हौस मौज कमी केली नव्हती. तिचा त्याचा स्नेही परिवारही मोठा होता. छानच चालले होते सगळे,,
पण दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीला जेव्हा दोघे गावी गेले होते तेव्हा तिच्या मनाला पहिल्यांदा काही गोष्टी खटकल्या होत्या. शेजारील काकू, अलीकडील पलीकडील सगे सोयरे, गावातील काही ओळखीच्या स्त्रिया तिला आडून आडून वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या गर्भधारणेबद्दल विचारत होत्या. अश्या वेळेस त्यांच्या लेव्हलला जाऊन नक्की काय उत्तरे द्यायची हे तिला कळायचे नाही. ती हसून गप्प बसायची.
पण एका वयस्कर आजींनी तर कहरच केला! त्या काव्यासमोरच तिच्या सासूबाईंना म्हणाल्या “आगं ह्या नुकरीवाल्या पोरींस्नि पोर-ठोर नकुच अस्त्याती… नसतं लटांबर वाटतंय त्यासनी… राजाराणी सारखं राहत्याती दोघंच… “
हे असे काही तिला पचत नव्हते. अश्या वेळी विशाल तिच्या मदतीस नेहमी धावून यायचा. पण त्यालाही काही तरी ऐकावे लागायचेच. तिला मनातून राग यायचा. खूप बोलावे जे वास्तव आहे ते सांगावे असे वाटायचे. चीडही यायची. पण त्यांचे वय नि तिचे संस्कार आड यायचे, नि ती गप्प बसायची.
aas story part 2
एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा असा उपहास का करत असेल?? तिलाच समजायचे नाही. ही पिढीतील नि शिक्षणातील तफावत असू शकते असे ती वाटून गप्प बसायची. त्यात भारतीय संस्कृतीत स्त्रीचं पारडं झुकतच असतं. सासूबाईही म्हणायच्या बाईच्या जातीला असले ऐकून घ्यावच लागत बाई, किती काही झाले तरी हे चुकलेल नाही बघ. त्या तीची समजूत काढायच्या. पण त्यांच्या डोळ्यातही तिला प्रश्न दिसायचेच तिच्या मातृवाबद्दलचे.
तिला सारखे वाटायचे, स्त्रीलाच का हे सर्व, पुरुषाला का कोणी विचारत नाहीं?? असे टोचून टोचून किंवा आडवळण घेऊन?? विशाल निवांत गावात फिरून यायचा पण त्याला एका अक्षरानेही कोणी ह्या बाबतीत हटकलेले तिला ऐकिवात नव्हते, ती त्याला हे दाखवून द्यायची. पण तो दुर्लक्ष कर नि निवांत रहा असे एकच बोलायचा. पण हिचे मन कुठे तरी आत आत खिन्न होऊ लागले होते. ती सारखी याच गोष्टीचा विचार करू लागली होती.
माहेरीही दृश्य काही वेगळे नसायचे. भाषा फक्त वेगळी असायची… काळजीची. पण विषय हाच! मान्य आहे की लग्नानंतर स्त्रीचे पूर्णत्व मातृत्वाने होते, पण काही गोष्टींना वेळ नि अपवाद ही असतोच ना??
नंतर गावी काही कार्यक्रमातही तिला जाणीवपूर्वक मागे ठेवलेले जाणवले. मग मात्र ती हळू हळू आतून कोलमडू लागली. तिला ह्या अनुभवाने गावी जाणेच नको झाले. नंतर नंतर कमी झाले.
आज हे सगळे मागचे तिला आठवून खिन्न व्हायला झाले. कोणाशी तरी खूप बोलावे नि मनातील सगळे भरून आलेले बोलून टाकावे असे वाटायचे. पण विशाल तिला हा विषय काढुच देत नव्हता. आई-बाबांना त्रास नको म्हणून तीच त्यांच्याशी हा विषय बोलत नव्हती. आईने तर अलीकडे तिचे खूपच टेन्शन घेतले होते असेही. बहीण भावंडे ही आपल्या संसारात खुश होती. त्यांना उगाच आपले दुःख नको असे तिला वाटायचे. मित्रमैत्रिणीना बोलावे तर ते हिलाच हसायचे. सायन्सचा पुरावा मेडिकल क्षेत्राने केलेली प्रगती ऐकवायचे, नि रिलॅक्स राहायला सांगायचे.
aas story part 2
घरच्या कामवाल्या मावशीही हल्ली तिला यावरून विचारू लागल्या होत्या, नि त्यांच्या गावाकडील कोणाकोणाचे अनुभव कसे होते हेही सांगत होत्या. कोणी बायकोला सोडले, कोणी दुसरे लग्न केले, कोणी च्या जीवावर ही बेतले…. असे काही काही त्या तिला सांगायच्या. तिला सगळे ऐकून अजूनच निराश व्हायला होत होते, नि ती ही काही बाही विशालला विचारू लागली होती.
हल्ली तिचे मन एक शिक्षित अडाणी झाले होते, असे विशाल तिला नेहेमी म्हणू लागला होता. पण तिला नि तिच्या मनालाच समजत होते नक्की काय होत आहे आतमध्ये ते. मग तिला कुठे तरी वाचलेले आठवले, मन की पीड़ा मन ही जाने, जाने और न कोय, मरुस्थल सी मन की भूमि, कुरुक्षेत्र सा हाल, लड़ना ही होगा एक युद्ध, अपने ही मन के विरुद्ध, अश्वथामा के जख्मों जैसे सवाल, कहि तो मिलेगा तेल,,, बन के जवाब,,, ती त्या जवबाच्या प्रतीक्षेत च होती,,, तिने आपला चहा कप मध्ये घेतला नि रिपोर्ट बद्दल परत विचार करत बसून राहिली,, रिपोर्ट काही असला तरी त्या प्रसंगाला सामोरं जावंच लागणार होतं तिला,,,
चुकून रिपोर्ट चांगला आला नाही तर काय हे काल पासून विचार करून करून थकली होती ती. कालच विशालने तिला स्पष्ट सांगितले होते. रिपोर्ट काही आला तरी मला तू महत्वाची आहेस… आपल्या अपत्यप्राप्ती पेक्षा. माझ्या आयुष्यातील फर्स्ट प्रयोरिटी तू आहेस. येणारे बाळ हे सेकंड प्रयोरिटी असेल. सो तू तुला माझ्यासाठी सांभाळ. हे ऐकून ती किती रडली होती. रात्र भर अशी ही झोप झालीच न्हवती,, निवांत झोपलेल्या विशाल कडे बघून तिला कुठे तरी छान वाटले,, पण स्वतःची झोप मात्र ती हरवून बसली. असंख्य प्रश्नांनी व्यापून. सृष्टी चक्रातील नियम दिवस आणि रात्र. पण काही गोष्टी खटकतात मात्र,,, प्रभाकर राम प्रहरी किरणांना घेऊन येतो,, पण प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधकार दूर होतो??,, चंद्र घेऊन येतो निशेला,,, पण निज का नसते प्रत्येकाच्या उशाला??
वाचण्यासारख्या आणखी मराठी कथा …..
माझ्या लग्नाची गोष्ट…| Marathi Love Story
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
3 thoughts on “आस….. भाग 2 | Aas Story Part 2”