दिशाची गोष्ट भाग 13 : माझं कन्फेशन

महावीर सांगलीकर

दिशाची गोष्ट भाग 13: माझं कन्फेशन

कन्फेशन लेटरमध्ये नेमके काय लिहायचे ते लिहून काढायची गरज नव्हती. मनात सगळं तयार होतच. सायबर कॅफेत जायचं, टाईप करायचं  आणि पोस्ट करायचं…

मी एक याहू ग्रुप ओपन केला. बघतो तर तेथे माझ्या विरोधात आणखी एक नवीन पोस्ट दिसली..

सांगलीकर बिट्रेयड मी टू….

सांगलीकर यांनी माझाही विश्वासघात केला आहे. मी पुण्यातच रहाणारी एक तरुणी आहे. सांगलीकर यांनी माझ्यावर प्रेमाचे नाटक केले, माझ्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले, माझे शोषण केले आणि नंतर लग्न करण्याचे नाकारले. मी त्यांच्या विरोधात पोलीस केस केली, पण त्याचा कांही उपयोग झाला नाही. मला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही…

-पुणेकर मुलगी

ही पुणेकर मुलगी म्हणजे दिशाच असणार… आणखी किती आरोप माझ्यावर टाकेल सांगता येत नाही. आता तिचा कांहीतरी बंदोबस्त केला पाहिजे.

मग मी राजीव शहा, मुंबई गर्ल आणि पुणेकर मुलगी या नावाने आलेल्या पोस्ट्सचे आय.पी. ऍड्रेस चेक केले. मला धक्का बसला… तिन्ही आय.पी. ऍड्रेस वेगवेगळे होते. पुणेकर मुलगीचा आय.पी. ऍड्रेस तर पुण्यातलाच होता. दिशा फारच पोहोचलेली होती. ती काळजीपूर्वक खेळ खेळत होती. ती सूडाने पेटलेली होती, आक्रमक झाली होती आणि मुळातच तिच्याबद्दल मला आपुलकी असल्याने मी मात्र मवाळ बनून राहिलो होतो. पण असे मवाळ वागत राहिल्यास वागल्यास आपली बदनामी होत रहाणार, आणि आपण आक्रमक झालो तरी तिच्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे मला माहित होते.

काय करावं बरं? संपूर्ण शरणागती पत्करायची? पण असा विचार मनात येताच माझा इगो जागा झाला. आता मरायचंच आहे तर लढून मरायचं…

मी लगेच एक पोस्ट लिहिली…..

नाऊ इट इज इनफ  !
आजवर मी शांत राहिलो, पण माझ्या संयमाचा गैरफायदा घेवून आता ही सो कॉलड मुंबई गर्ल सगळ्या सीमा ओलांडून वेगवेगळ्या नावाने माझ्यावर खोटेनाटे आरोप करत सुटली आहे. बट नाऊ इट इज इनफ. आजच मी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेत या बयेच्या विरोधात केस दाखल करत आहे. या ग्रुपमध्ये ज्या लोकांनी मुंबई गर्लच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून माझी बदनामी केली, त्यांच्यावरही मी केसेस टाकत आहे.

याचा व्हायचा तो परिणाम झालाच. दिशाची साथ देणाऱ्यांनी काढता पाय घेतला. पण मुंबई गर्लची पुन्हा एक पोस्ट आलीच…

व्हाट अबाउट द कन्फेशन?

त्या पोस्टवर मी लगेच उत्तर दिले, तू शांत रहा… मी आजच कन्फेशन देणार होतो, पण तू मध्येच बकवास केली असल्याने आता मी उद्या कन्फेशन देईन.. अर्थातच तू तोपर्यंत कांही बडबड, गडबड केली नाहीस तर.

दिशाची गोष्ट भाग 13

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो. ग्रुप्स चेक केले. सारे कसे शांत होते. मग मी माझे म्हणणं मांडू लागलो…. 

माय कन्फेशन

माझ्या विरोधात वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आजकाल जे कांही लिहिले जात आहे, माझ्यावर जे आरोप केले जात आहेत  त्यामुळे माझी अवस्था खूप विचित्र झाली आहे. माझ्यावरील आरोपांचे उत्तर न द्यावे तर मी दोषी आहे असेच मानले जाईल, आणि जर विस्ताराने उत्तर दिले तर हे प्रकरण आणखीनच वाढत जाईल अशी भीती मला वाटते. मी तुम्हा सर्वांना एवढेच सांगू इच्छितो की सदर मुलीने माझ्यावर जे आरोप केले आहे ते पूर्णपणे खोटे आहेत आणि असे खोटे आरोप करण्यामागे तिचे उद्देश काय आहेत ते मला माहीत नाही.

ही मुलगी दहा वर्षांपूर्वी माझी पत्रमैत्रीण होती. कांही महिन्यांपूर्वीपासून ती माझ्या पुन्हा संपर्कात आली. तिचे विविध विषयांचे सखोल ज्ञान, तिचा गूढ चेहरा यामुळे मी तिच्या कधी प्रेमात पडलो हे माझे मलाच कळले नाही. होय, मी तिच्यावर प्रेम केले… अगदी जीवापाड.. तहान भूक विसरून… तिनेही माझ्यावर तेवढ्याच उत्कटतेने प्रेम केले.. या प्रेमात शारीरिक आकर्षण अजिबात नव्हते. हे व्हर्च्युअल प्रेम होते, आणि ते कायम व्हर्च्युअलच राहावे अशी माझी इच्छा होती. जिच्यावर मी प्रेम करावे अशी माझ्या आयुष्यात आलेली ही एकमेव मुलगी आहे.

मी मुंबईला कामानिमित्त अनेकदा जात असे, पण मी तिची भेट घेणे नेहमी टाळले. खरं म्हणजे तिची भेट घेण्याची मला कधी इच्छाच झाली नाही. पण तिची मात्र मला भेटण्याची इच्छा होती. तिची भेट टाळण्यासाठी मी मुद्दामच तिच्याशी भांडण काढले. त्यात मी किंचित गैरप्रकार केला. त्यामुळे ती दुखावली गेली. त्यातूनच तिने मला धडा शिकवण्यासाठी मला जाहीरपणे बदनाम केले. 

मला धडा शिकवण्यासाठी ती पुढे आणखी काय-काय प्रकार करणार आहे हे तिलाच ठाऊक. 

माझ्या इमेल अकाउंट अकाउंटमध्ये तिच्या इमेल्स, तिचे फोटो होते हे खरे आहे, पण माझे ते अकाउंट हॅक झालेले आहे. ते कोणी हॅक केले असावे हे सांगण्याची गरज नाही. त्या हॅकरने तिचे फोटो आणि इमेल्स डिलीट केल्याच असतील. असो.

या सगळ्या प्रकरणात तिने माझी जी जाहीर बदनामी केली त्याबद्दल मी तिला माफ करत आहे. तिच्याऐवजी दुसऱ्या कोणी माझी अशी बदनामी केली असती तर त्या व्यक्तीला मी जेलमध्ये खडी फोडायला पाठवले असते. पण तिच्या बाबतीत मी हे करू शकत नाही. कारण माझे तिच्यावर प्रेम आहे. काल होते, आजही आहे आणि उद्याही राहील. अगदी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत. मला पुढील काळात एखादी मुलगी भेटली, तिने प्रपोज केले तरी मी या मुंबई गर्लवर जसे प्रेम केले, तसे, तेवढे  प्रेम मुळीच करू शकणार नाही. किंबहुना दुसरी कोणी मुलगी माझ्या आयुष्यात यावी अशी माझी इच्छाच नाही.

कांही विशिष्ट कारणांमुळे मी इच्छा असूनही मी तिला भेटण्याचे पूर्णपणे टाळले…. यामागे माझा तिच्या भल्याचाच हेतू होता. याविषयी मी येथे जास्त कांही बोलू इच्छित नाही. यथावकाश तिला कळेलच की मी असा का वागलो. 

माझ्या वागण्यामुळे तिला बसलेला मानसिक धक्का मी समजू शकतो. तिने मला माफ केले तरी मी माझे मला माफ करू शकत नाही.
डोन्ट वरी फ्रेंड, मी तुझ्या विरोधात पोलिसांमध्ये कसलीही तक्रार दिलेली नाही. देणार नाही.
हम बेवफा हरगीज न थे
पर हम वफा कर न सके…
वुई हॅव टू मीट अगेन इन द नेक्स्ट बर्थ, इफ देअर इज रिअली सच अ थिंग.. टेक केअर, अँड  इफ पॉसिबल फरगेट मी टिल युअर नेक्स्ट बर्थ…. गुड बाय मुंबई गर्ल…

दिशाची गोष्ट भाग 13

माझ्या या कन्फेशन लेटरमुळे दिशापर्यंत योग्य तो संदेश गेला होता. इतरांची मला पर्वा नव्हतीच.

दुसऱ्या दिवशी माझ्या वरील पोस्टला दिशाने उत्तर दिले…

काय ही सहानभुती….. मिस्टर सांगलीकर, आधीच दु:खात असलेल्या एका मुलीला तुम्ही तुमच्या वागण्यामुळे अक्षरश: ठार मारून टाकले आहे. का तुम्ही माझ्याशी असा खेळ खेळलात? का तुम्ही माझ्याशी असे निष्ठूरपणे वागलात? का तुम्ही माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलात? तुम्ही असे कसे करू शकता? 

तुमचे कन्फेशन लेटर वाचल्यावर तर मला मेल्याहून मेल्यासारखे झाले…. हे सगळं लिहायची गरज होती का? आता वाटतं, गेल्या वर्षी माझा जो अपघात झाला, त्याचवेळी मी का नाही मेले… 

पण यात तुमचा कांही दोष नसावा…. मीच गेल्या जन्मी किंवा याच जन्मात जाणते-अजाणतेपनी कुणाचे तरी वाईट चिंतले असावे, त्याचीच ही फळे मी भोगत आहे… 

मी तुम्हाला माफ केले आहे, पण तुम्ही जे कांही केले आहे, त्याची फळे तर तुम्हाला भोगावीच लागणार, नाही का? हाऊएव्हर, आय विल प्रे फॉर यू … तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून.

आता मी हे सगळे इथच थांबवत आहे… या विषयावर आणखी चर्चा होऊ नये अशी माझी इच्छा आहे. गुड बाय मिस्टर सांगलीकर…..

दिशाच्या या पोस्टला उत्तर देण्याचे कारणच नव्हते. दोघांनी एकमेकांना जे सांगायचे होते ते सांगून झाले होते.

चला, एकदाचे आपण या प्रकरणातून बाहेर पडलो… परत असले उद्योग करायचे नाहीत… करण्याचा प्रश्नच नव्हता…

दिशाची गोष्ट भाग 13: माझं कन्फेशन
Marathi Story

एक आठवडा गेला. इमेल्स चेक करत असताना मुंबई पोलिसांकडून आलेली एक इमेल दिसली. मी ती ओपन केली. दिशाने माझ्या विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबरसेलमध्ये तक्रार केली होती. माझ्यावर भयानक आरोप लावले होते. पोलिसांनी मला समन्स पाठवले होते. सात दिवसांच्या आत मुंबई पोलीस मुख्यालयातल्या सायबरसेलमध्ये इन्स्पेक्टर शेख यांना भेटायला सांगितले होते. मी गेलो नाहीतर आम्हाला तुमच्याकडे यावे लागेल असेही लिहिले होते.

ही मेल खरेच मुंबई पोलिसांकडून आली आहे का? की हा दिशाचा आणखी एक खोडसाळपणा आहे? त्या मेलच्या शेवटी दोन फोन नंबर होते. मी टेलेफोन बूथवर जावून त्यातील एका नंबरवर फोन केला.
‘नमस्कार, मुंबई पोलीस..’ तिकडून एक भारदस्त आवाज आला. मी लगेच ओळखले, हा पोलीस स्टेशन मधला आवाज आहे, कारण इतरही अनेक ‘पोलिसी’ आवाज बॅकग्राउंडला येत होते. मी पटकन फोन ठेवून दिला. म्हणजे खरेच दिशाने आपल्यावर केस केलीय तर.

पण तिने तर लिहिले होते की मी तुम्हाला माफ केले आहे.. मग हे काय नवीनच?

मी लगेच दिशाला फोन लावला. रिंग वाजली.
ती फोनवर माझ्याशी बोलेल का याविषयी मला शंकाच होती..
तिने फोन उचलला…

‘मिस्टर सांगलीकर, तुम्ही मला पुन्हा फोन का केलात?’ तिने नाराजीने विचारले.
‘मला आधी सांग तू कशी आहेस?’
‘मी अजून आहे यातच काय ते समजून घ्या’
‘सेम हिअर…. दिशा, तू मला माफ केलं होतस ना?’
‘होय…’
‘मग मुंबई पोलिसात तू माझ्या विरोधात तक्रार का केली आहेस?’
‘ती तक्रार मी तुम्हाला माफ करण्यापूर्वीची आहे’
‘मला त्रास होऊ नये असं तुला वाटतं ना?’
‘होय’
‘मग ती तक्रार मागं घे… प्लीज…’
‘तो एफ. आय. आर. होता… मी तक्रार मागं घ्यायला गेले होते. पोलीस म्हणतात, आता चौकशी झाल्याशिवाय कांही करता येत नाही’
‘मग आता काय करायचे?’
‘चौकशीला सामोरं जायचं… दुसरं काय?’
‘ठीक आहे, मी भेटतो पोलिसांना जाऊन’
‘टेक केअर… मुंबई पोलिसांच्या बाबतीत ऐकलंच असेल’
‘ऐकलंय, वाचलंय…’
‘एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या…. पोलिसांना भेटतांना बरोबर कोणीतरी असू द्या.. एकटे जाऊ नका. मुंबईत आहे का कुणी ओळखीचे?’
‘हो, आहे ना…. दिशा… दिशा नावाची एक मैत्रीण आहे’
‘ती नाही तुम्हाला मदत करणार… म्हणजे तीच तक्रारदार आहे, तिला तुमच्या बाजूने बोलता येणार नाही. दुसरं कोणी आहे का ओळखीचे, मुंबईत?’
‘दुसरं कोणीच नाही….’
‘देन गॉड हेल्प यू… मला तुमची काळजी वाटते. कधी भेटणार आहात पोलिसांना?’
‘गुरुवारी…. आणखी तीन दिवसांनी’
‘या… मी असेनच तिथ बहुधा …. हाहाहाहा….’
‘अच्छा, म्हणजे ही केस म्हणजे तुझं एक नाटक आहे…. मला भेटण्यासाठी..’
‘नाही… रागाच्या भरात मी केस केली… ती आता परत घेता येत नाही. मला तुम्हाला भेटायची इच्छाही आता उरली नाही. जर पोलिसांनी बोलावलं नाही तर मी येणारही नाही…’

दिशाची गोष्ट भाग 13

हे पोलीस प्रकरण जरा गंभीरच होते. आपल्याकडे फक्त तीन दिवस आहेत. एक वकील शोधायला पाहिजे. आणखीही कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे. कोणाला भेटावं बरे? अनेक लोकांची नावे डोळ्यासमोर तरंगायला लागली…..

मी लगेच एक फोन लावला…
‘पी. आय. कदम बोलतोय…’
‘मी महावीर….’
‘बोल महावीरा… आज कशी काय आठवण झाली माझी….’
‘संकट… संकट काळात मला तुझीच आठवण होते….’
‘काय लफडं केलंस…?’
‘लफडं नाही…. वेगळीच भानगड आहे.  सांगतो.. पण मला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे… आता कुठं आहेस तू?’
‘एक मर्डर झालाय, तिकडे आहे. यायला उशीर होईल’.
‘मग कधी भेटू?’
‘रात्री घरी ये… जेवायला’
‘ठीक आहे… जरा लवकरच येतो… सात वाजता… म्हणजे बोलता येईल भरपूर… बरंच कांही सांगायचं आहे तुला..’
‘सातला नको… आठला ये… मी बरोबर आठला घरी हजर होईन…’
‘ओके, येतो…’

दिशाची गोष्ट भाग 13

दिशाची गोष्ट या दीर्घकथेचे आधीचे भाग ….

1 पत्रमैत्रिण2 पत्रमैत्रिण (भाग 2)3 दिशाची पुन्हा एन्ट्री
4 दिशा विविध भारतीवर5 दिशाच्या वागण्यामागील रहस्य6 राजकुमारी निर्भया
7 राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन8 दिशाचं वेगळं रूप9 अनबिलिव्हेबल दिशा
10 1857 ची बंडखोर दिशा11 इन्सल्ट12 पनिशमेंट

वाचण्यासारखं आणखी काही ….

माझं शालेय जीवन: चिंचवड

प्रेमकथा: लव्ह जिहाद

रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी

माझ्या लग्नाची गोष्ट…

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

2 thoughts on “दिशाची गोष्ट भाग 13 : माझं कन्फेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *