हौशी लेखकांसाठी चार शब्द ….

महावीर सांगलीकर

8149128895

लेखक-प्रकाशक

लिखाण हे मुख्य करून दोन कारणांसाठी केलं जातं. पहिलं कारण म्हणजे व्यक्त होण्यासाठी आणि दुसरं कारण म्हणजे प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी. तुम्हाला जर पैसा मिळवण्यासाठी लिखाण करायचं असेल तर मराठीत लिखाण करून तुमच्या पदरात फारसं कांही पडणार नाही, कारण बहुतांश मराठी प्रकाशक, नियतकालिके आणि दैनिके हे फुकटे आणि अप्रामाणिक आहेत. तुम्ही अगदी प्रसिद्ध आणि ‘खमके’ लेखक असलात तरी या सगळ्यांचा व्यवहार पारदर्शक नसतो, त्यामुळं त्यांच्याकडून तुमची फसवणूक होणारच.

लेखक आणि शेतकरी

या बाबतीत शेतकऱ्यांची आणि लेखकांची अवस्था कांही वेगळी नाही. ज्याप्रमाणं शेतकऱ्यानं पिकवलेल्या धान्याचा त्याला योग्य मोबदला मिळत नाही, अगदी तसंच लेखकानं आपली बुद्धी, प्रतिभा आणि वेळ खर्चून केलेल्या लिखाणाचाही त्याला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळं लिखाण करण्यामागं तुमचा मुख्य हेतू पैसा कमावणं हा असेल तर मराठी लिखाण करून तो साध्य होणार नाही. त्यासाठी तुम्ही इंग्रजीमध्ये आणि तेही अगदी प्रोफेशनल पद्धतीने लिखाण केलं पाहिजे. (भारतात इंग्रजीतही फुकटे प्रकाशक आहेत, कारण शेवटी तेही ‘भारतीय प्रकाशक’ आहेत. पण इंग्रजी लेखकांच्याबाबतीत मराठीएवढी वाईट परिस्थिती नाही).

मराठीत लेखकांना कदाचित दिल्या जाणाऱ्या रकमेला ‘मानधन’ हा गोंडस शब्द वापरला जातो. मुळात हा शब्द चुकीचा आहे. खरं पहाता हा लेखकाला त्याच्या कामासाठी दिला जाणारा मोबदला आहे आणि मोबदला देण्याचं टाळण्यासाठी ‘मानधन’ हा गोंडस शब्द वापरला जातो.

केवळ थोडासा मान मिळाल्यानं खूष होणारे लेखक उदंड झाले आहेत, त्यामुळं प्रकाशकांची चांदी होत असते. केवळ प्रकाशन या व्यवसायावर प्रकाशक चारचाकी घेऊ शकतो, बंगला बांधू शकतो, पण केवळ लेखन या व्यवसायावर लेखकाच्या एकवेळच्या जेवणाची व्यवस्था होणे शक्य नाही, यातच काय ते ओळखा.

मराठी लिखाण करण्यामागं तुमचा हेतू प्रसिद्धी मिळवणं हा असेल तर मात्र तुम्ही प्रकाशकांच्या, नियतकालिकांच्या आणि दैनिकांच्या फुकटेपणाकडं कानाडोळा करावा. ते जे कांही देतील ते ‘चोराची लंगोटी’ समजून घेऊन टाकावं.

लेखक-प्रकाशक

पण कागदी पुस्तक पाहिजेच कशाला?

तुम्हाला तुमचं एखादं ‘कागदी’ पुस्तक प्रकाशित व्हावं असं वाटत(च) असेल तर पुस्तक प्रकाशकांशी व्यवहार करताना तुम्ही खूप सावध राहिले पाहिजे. एखादा प्रकाशक तुमचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पैसे मागत असेल तर तुम्ही आणखीनच सावध राहिले पाहिजे. आपल्या इथं अनेक असे धूर्त प्रकाशक आहेत जे लेखकाकडूनच त्याच्या पुस्तकाला लागणाऱ्या भांडवलाची उभारणी करतात.

प्रकाशकाला पैसे देऊन आपले पुस्तक प्रकाशित करून घेणे हा तद्दन मूर्खपणा आहे आणि असा मूर्खपणा करणारे अनेक हौशी लेखक मी पहात असतो. असा एखादा शोषक प्रकाशक तुम्हाला जेवढे पैसे मागेल त्या पैशात कदाचित तुम्ही तुमची दोन पुस्तके छापून घेऊ शकाल. त्यामुळं तुम्ही चार ठिकाणी चौकशी करून स्वत:च तुमचं पुस्तक छापून घेणं जास्त चांगलं. एखादा वितरक किंवा कांही पुस्तक विक्रेते गाठून तुम्हाला तुमच्या पुस्तकाची विक्री करता येईल.

त्यापेक्षा स्वतःचा ब्लॉग सुरु करा

तुम्ही केवळ व्यक्त होण्यासाठीच लिहित असाल तर तुम्हाला दुसराही एक सोपा ऑप्शन आहे. तुम्हाला जे कांही लिहायचं आहे ते ब्लॉगवर लिहा. तुमचं लिखाण तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाकलं आणि ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रमोट केलं तर ते लाखो वाचकांच्यापर्यंत पोहोचू शकते. इंटरनेटवरील वाचकांची संख्या वेगानं वाढत आहे, त्यामुळे तुम्ही या ऑप्शनकडं लक्ष देणं जास्त चांगलं.

तुम्ही स्वतः चा ब्लॉग सुरु केलात आणि तो आणि त्यावर सातत्याने लिहीत राहिलात तर तुम्हाला प्रसिद्धी मिळेलच, शिवाय लेखक आणि वाचक यांच्यामध्ये प्रकाशक नावाचा मध्यस्थ राहणार नाही. (तुमचा ब्लॉग कसा सुरु करावा याची माहिती मी एका वेगळ्या लेखात देईन).

सगळ्यात महत्वाचं म्हणजे छापील पुस्तकांना भविष्य नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवावं. जगभर छापील पुस्तकांचं वाचन कमी झालं आहे आणि आणखी कांही वर्षांमध्ये छापील पुस्तकं हा प्रकार बंद होणार आहे. अनेक प्रकाशन संस्था बंद पडण्याच्या  मार्गावर आहेत. त्यामुळं तुम्ही तुमचं एखादं छापील पुस्तकं प्रकाशित व्हावं या इच्छेपासून दूर रहावं. त्या पेक्षा तुमचं लिखाण सोशल मेडियात व्हायरल करून तुम्ही जास्त प्रसिद्धी मिळवू शकाल. पुस्तक हे साध्य नसून साधन आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.

लेखक-प्रकाशक

हेही वाचा:

अलिप्त होणं जमलं तर ठीक …..

मी व्हिगन झालो त्याची गोष्ट….

श्रीमंत व्हा ! पण चांगल्या मार्गाने …..

Cat & Dog : जीवन कसं जगावं…..

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English (Online English Magazine)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *