फुल तुम्हें भेजा है खत में ….

©️ राजश्री शिरोडकर, कोल्हापूर

“फुल तुम्हें भेजा है खत में
फूल नहीं मेरा दिल है
प्रियतम मेरे तुम भी लिखना क्या ये तुम्हारे काबील है…”
फिल्म “सरस्वतीचंद्र” मधलं हे गाणं म्हणजे प्रेमाचं मस्त मूर्तिमंत प्रतिकच..!!

तसंच “लिखे जो खत तुझे वो तेरी याद मे हजारो रंग के नजारे बन गये
सवेरा जब हुआ तो फुल बन गये जो रात आई तो सितारे बन गये” हे गाणं देखील..!!!

तर सांगायचं म्हणजे आता प्रेमाचा आठवडा अगदी जवळ म्हणजे उद्यावर येऊन ठेपलाय. फुलं आणि प्रेम यांचा अतूट संबंध आहे हे तुम्हालाही माहिती आहे. प्रपोज करताना लाल गुलाबाचे फुल देणं हा प्रेमाच्या शास्त्रातला पहिला नियम. प्रेमाची भाषा ही फुलांची भाषा असते आणि प्रेमिकांच्या भाव विश्वात फुलांच्या भाषेला अतिशय महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान असते.

प्रेम ही एक हळुवार भावना आहे. या आपल्या मनातील हळुवार भावनेचा आविष्कार अधिक प्रभावी करण्यासाठी पुष्प प्रतिमांचा वापर तरुणाई करते आणि त्यामुळे या प्रेमाच्या भाषेला एक वेगळेच परिमाण प्राप्त होते.

परवाच एक प्रसंग घडला. माझ्या मैत्रिणीच्या भाचीला बघण्यासाठी एक स्थळ आले होते. जो मुलगा तिला पहायला आला होता, त्या मुलाच्या मित्राने त्याला विचारले, “काय रे? कशी काय वाटली मुलगी?” तर तो मुलगा म्हणाला,” तिचा आवाज म्हणजे कोकिळकंठ.. तिचे शब्द म्हणजे टपटपणारी फुले, तिचं हास्य म्हणजे उमलते फूल, तिचं समोर असणं म्हणजे गुलाब गंधाची भूल..!!” तर अशी असते बघा फुलांची भाषा.. फुलांची म्हणजेच प्रेमाची भाषा. तो मुलगा तर मला वाटतं त्या माझ्या मैत्रिणीच्या भाचीला बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडला असावा. असो.

फुलांची भाषा ही मोठी लडिवाळ भाषा. ती तुमच्याशी जवळीक साधते .तुमच्या हृदयालाही हात घालते बऱ्याच अर्थाने…!!

मध्यंतरी एक तीन-चार वर्षांपूर्वी आमच्या कोल्हापूरमधील डी.डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये मी मानसशास्त्राच्या एका सेमिनार मध्ये लेक्चर द्यायला गेले होते (या महाविद्यालयात मी पूर्वी लेक्चरर म्हणून दोन वर्षे काम केले होते.) त्यावेळी लेक्चर संपल्यावर आणि तो पूर्ण कार्यक्रम आटोपल्यावर महावीर कॉलेजच्या एक दोन मुली (त्या कार्यक्रमात महावीर कॉलेज, शिंदे सरकार कॉलेज आणि अजून एक कॉलेज यांचा समावेश होता) माझा ऑटोग्राफ घ्यायला आल्या. मी त्यांना लिहिले की तुमचं जीवन सदाफुली सारखे नेहमीच फुलत राहो.

अजून एक मुलगा त्याचवेळी माझ्याशी बोलायला आला होता, ज्याच्या बोलण्यात प्रचंड निराशा होती. त्याला कोणत्याच गोष्टीत यश मिळत नसल्याने थोडेसे डिप्रेशन आले होते. तेव्हा मी त्याला म्हणाले,” हे बघ दुःख काय, अपयश काय, निराशा काय… या सर्व गोष्टी कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्याच वाट्याला येत असतात.

पण त्यामुळे एवढं निराश होण्याचं काहीच कारण नसतं. आपण नेहमी आपल्यापेक्षा दुःखी कष्टी असणाऱ्या अन्य लोकांकडे पहावं. त्यामुळे आपलं दुःख हलकं होतं .तुला अजून थोडं सांगते. आपण आपली स्वप्नं नेहमी पेरत जावे .त्या स्वप्नांची नेहमी मशागत करावी. समजा गुलाब नाही बहरला तर दुसरे एखादे फूल फुलेल आणि जर तेही नाही झालं तर किमान आपलं मन तरी फुलेल. आपल्या जीवनातील लहान सहान गोष्टींचा आनंद लुटायचा प्रयत्न कर आणि प्रत्येक क्षण आनंददायी बनवून तो फुलांप्रमाणे वेचण्याचा प्रयत्न कर.”

“प्रेम आणि फुलं” यांच्या विषयी लिहिताना गझलकार सुरेश भट यांची प्रकर्षाने आठवण होते. सुरेश भट यांना फुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यांच्या कवितांमध्ये आणि गजलांमध्ये फुले प्रकर्षाने फुललेली दिसतात.
“या अशा वेळी तुझे लाजणे बरे नव्हे
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नव्हे”

गझलकार सुरेश भटच काय तर अन्य कवी सुद्धा फुलांना आपल्या कवितांमध्ये स्थान देतात. “दुःखाची राणी” या गजल काव्यात कवी श्रीकृष्ण राऊत यांनी असे लिहिले आहे
“फुले कागदी बघता इथली
फुले माळणे जमले नाही
या बागेच्या रूपावरती
मला भाळणे जमले नाही”

ज्या हताश प्रेमिकांच्या वाट्याला स्वप्न फुलांचे निर्माल्य येते , त्या प्रेमिकांचे दुःख गजलकारांना कधीच नवीन नाही. फुलांची ही बहुपेडी भाषा निश्चितच सलाम करण्यासारखी आहे.

सुरेश भट यांच्या या ओळी पुन्हा एकदा आठवतात.
“नको चर्चा नको येथे उन्हाची
फुलांची वेळ येथे संभाषणाची”

कवी इरफान शेख (चंदपूर) म्हणतात…
“कधी कोणाच्या ओठावरले आपण व्हावे गाणे
मग खुलतील कळ्या कळ्या अन झुलतील हिरवी पाने
कधी कुणाच्या डोळ्यांमधली आपण व्हावीत स्वप्ने
मग उजळतील दिशा दिशा आणि बहरतील राने
कधी कुणाच्या हातांवरल्या आपण व्हाव्यात रेषा
मग हसेल कोणी चेहरा आणि गाईल आनंदाने”

“प्यार ये आग का दरिया है” याबद्दल जवळपास सर्व शायरांचे एकमत आहे. “इश्क” या झपाटून टाकणाऱ्या भावनेमुळे लोकांना इश्काची बाधा होते. त्यांना एक वेगळी धुंदी चढते. जगाचा विसरच त्यांना पडून जातो आणि ते वेगळ्याच विश्वात वापरायला लागतात. “आजकल पांव जमीं पर नहीं पडते मेरे” अशी गाणी ते म्हणायला लागतात.

आपल्या प्रेयसीच्या आपादमस्तक सौंदर्यापुढे चंद्र देखील फिका वाटतो म्हणून अंजुम म्हणतात,
“तुम्हारे हुस्न मुजस्सम की बात क्या कहीये
हमें तो चांद भी पत्थर जैसा लगता है”

आणि मग या गाण्याची आठवण आली नाही तरच नवल…
“धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्द रुप आले मुक्या भावनांना”

चला.. उद्या रोझ डे साजरा करा.

06.02.2024

वाचण्यासारखं आणखी काही….

प्रेम-काजवा | Love Letter

Marathi Short Story : अनबिलिव्हेबल दिशा…..

माझ्या लग्नाची गोष्ट…

रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी

TheyWon English

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

One thought on “फुल तुम्हें भेजा है खत में ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *