Marathi Story: फादर जोसेफ बॅण्ड

महावीर सांगलीकर

भारतात नशीब काढण्यासाठी आलेल्या मायकेल बॅण्ड उर्फ बॅण्ड साहेब यांची कहाणी आपण वाचलीच आहे. आता वाचा त्याचा मुलगा जोसेफ, जो पुढे फादर जोसेफ बॅण्ड या नावाने प्रसिद्ध झाला, याची कथा:

फादर जोसेफ बॅण्ड

मायकेल बॅण्ड यांचा मुलगा जोसेफ आपल्या वडिलांप्रमाणेच सैन्यात अधिकारी म्हणून भरती झाला, पण त्याचा ओढा धर्माकडे होता. सैन्यात कांही वर्षे काढल्यावर त्यानं रिटायरमेंट घेतली आणि धर्मप्रसाराला वाहून घ्यायचे ठरवले.

त्याला अनेक भाषा येत होत्या. मराठी तर त्याची मायबोलीच होती, तर इंग्रजी त्याची ‘बापबोली’ होती. या दोन भाषांबरोबरच त्याला हिंदी, कन्नड, तमिळ, प्राकृत, संस्कृत या भाषाही चांगल्याच अवगत होत्या. मराठी तो इतकी शुद्ध बोलत असे की ती बोलताना संस्कृत शब्द चुकून-माकूनच वापरत असे. त्याला फारसी भाषा फारशी बोलता येत नव्हती, पण ती वाचता येत होती.

त्याचा मामा संस्कृत पंडीत होता आणि त्याने आपल्या या भाच्याला लहानपणापासूनच संस्कृतचे धडे दिले होते. मामामुळेच जोसेफ अगदी तरुण वयात सगळे वेद, उपनिषिदे यात पारंगत झाला होता. आपला मामा नुसतेच घोकंपट्टी करतो, त्याला सगळं पाठ असलं तरी कशाचाच अर्थ कळत नाही हे जोसेफला लहाणपणीच उमजले होते. तो स्वत: मात्र वेद-उप निषिदातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ लावत असे.

जोसेफने संत नामदेवाचे अभंग, संत तुकारामाची गाथा, कबीराचे दोहे आणि इतरही अनेक संतांच्या साहित्याचा अभ्यास केला होता. त्यातील निवडक अभंग, दोहे याचे इंग्रजीत अनुवाद देखील केले होते. ते इंग्लंडमधील अनेक पेपरातून छापून देखील आले होते. सध्याचे अनेक मराठी अनुवादक इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद करताना बऱ्याच लांड्या लबाड्या करतात, पण जोसेफने तसे कांही केले नव्हते.

सैन्यातून रिटायर झाल्यावर जोसेफने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचे ठरवले. त्याची सुरवात पुण्यापासूनच करावी अशी त्याचे इच्छा होती, पण पुण्यात कर्मठपणा फारच असल्याने सध्यातरी तेथे आपली डाळ शिजणार नाही हे त्याला माहीत होते, म्हणून त्याने कोकणात आपली डाळ शिजवण्याचे ठरवले. शिवाय पुण्यात बरेच लोक त्याला ओळखत होते. तो जे कांही करणार होता, तेथे फारसे कोणी ओळखीचे नसणे त्याच्या फायद्याचे ठरणार होते.

एका पहाटे तो कोकणात समुद्रमार्गे अवतरला. त्याने आपला ड्रेस कोड बदलला होता. धोतर-पंचा, डोक्याचे मुंडण, त्यावर भली मोठी शेंडी, गळ्यात जानवे, त्या जानव्याला लटकावलेला क्रॉस असा त्याचा अवतार होता. कोकणच्या किनाऱ्यावर पाउल ठेवताच त्याला आपल्या आईची कहाणी आठवली. येथेच या माणुसकीहीन लोकांनी त्याच्या आईला सतीच्या नावावर बळी देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या डोळ्यात आसवे आली. त्याने आपल्या भरदार शेंडीला गाठ मारली आणि प्रतिज्ञा केली, ‘या लोकांना माणूस बनवल्याशिवाय मी माझा ड्रेस कोड बदलणार नाही, डोक्याचे केस वाढवणार नाही आणि शेंडीची गाठही सोडणार नाही’.

फादर जोसेफ बॅण्ड

जोसेफ शांतपणे चालत गावात शिरला. अजून उजाडायचे होते. सगळे सामसूम होते. तो चौकातल्या पारावर जावून पद्मासनात बसला. डोळे मिटून घेतले.

ते त्याच्या आईचे गाव असले तरी तेथे त्याचा मामा सोडून त्याला कोणीच ओळखत नव्हते. तांबडे फुटताच तेथे गर्दी जमू लागली. एवढा तेजस्वी पुरुष आज पर्यंत त्या गावातील कोणीच पाहिला नव्हता. हा इंद्र तर नव्हे? की उत्तर ध्रुवावरून आपला कोणी पूर्वज आला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला.

बरीच गर्दी जमली आहे याची खात्री होताच त्याने आपले डोळे उघडले. जमलेल्या लोकांकडे मंद स्मित करत पाहिले.

“आपण कोण आहात?” एकाने पुढे होत विचारले.

“मी देवाचा दूत आहे. आताच आकाशातून खाली उतरलो” जोसेफ आकाशाकडे बोट दाखवत म्हणाला.
सगळेजण एकमेकाकडे टकामका बघू लागले. मग त्यांच्यापैकी कांही जण जोसेफच्या पाया पडण्यास पुढे सरसावले.

“थांबा”, जोसेफ म्हणाला, “माझ्या पाया पडू नका. देवाशिवाय दुस-या कोणाच्या पाया पडणे पाप आहे”
मग तो पारावरून खाली उतरला आणि उभा राहिला.

+++

फादर जोसेफ बॅंड यांच्याकडे सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर आकर्षित व्हायला लागले. त्यांची कीर्ती संपूर्ण कोकणात पसरायला लागली. लांबून-लांबून लोक त्यांचा उपदेश ऐकायला येवू लागले.

एके दिवशी लोकांपुढे त्यांनी जाहीर केले की मी पुढच्या आठवड्यात इथे एक शाळा सुरू करत आहे. आपल्या गावचे पाटील त्यांचा जुना वाडा आपल्या शाळेसाठी देणार आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना माझ्या शाळेत पाठवा. त्यांना लिहायला वाचायला शिकू द्या.

लवकरच त्यांनी त्या गावात एक शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी पाच मुले शाळेत आली. दुसऱ्या दिवशी ही संख्या दहा झाली. ही संख्या वाढत वाढत तीस पर्यंत पोहोचली.

फादर मुलांना व्यवहारोपयोगी गोष्टी शिकवत.

पण असे चांगले चालेलेले दुष्ट लोकांना किती दिवस बघवणार? एक कोणीतरी अनोळखी माणूस आपल्या गावात येतो, पंचक्रोशीतले लोक त्याचे ऐकतात, तो शाळा काढतो, शाळेसाठी खुद्द पाटीलच त्याला आपला वाडा देतो, गावकरी आपली पोरे तिथे शिकायला पाठवतात….. अरे हे चाललंय तरी काय? याचा कांहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे.

रविवारी शाळेला सुट्टी असे. त्यादिवशी फादर आपल्या वाड्यात एकटेच होते. अचानक वाड्यात दोन लोक घुसले. त्यांच्या हातात धारदार कुऱ्हाडी होत्या. त्यांनी फादरना दमबाजी केली. ताबडतोब गाव सोडून जायला सांगितले. तसे केले नाही तर तंगडी तोडायची धमकी दिली.

त्या दोघांना वाटले की फादर घाबरतील, गयावया करायला लागतील आणि गाव सोडून निघून जातील. पण कसचे काय. फादर शांत होते. ते स्मितहास्य करत त्या दोघांना म्हणाले, “तुम्हाला माझी तंगडी तोडायची आहे का? तोडा ना मग.”

फादर बॅण्ड यांच्या या बोलण्याने ते दोघे चमकले. एकमेकाकडे बघू लागले. फादर म्हणाले, ” अरे तुम्ही असे एकमेकाकडे काय बघत बसलाय? तुम्ही घाबरू नका. तुम्ही मला मारून टाकले तरी देव तुम्हाला शिक्षा करणार नाही, कारण तो फार दयाळू आहे.”

ते दोघे चुळबूळ करू लागले.

“चला आटपा लवकर. अरे तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला ज्यांनी हे काम करायला सांगितले आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार?”

फादर जोसेफ यांचे हे बोलणे ऐकून ते दोघे रडू लागले. त्यांनी फादर जोसेफ यांच्या पायावर लोळण घेतली.
“चुकले, आमचे चुकले. आमाला माफ करा. आता आमी त्या लोकांच्याच तंगड्या तोडतो, बघा तुमी” त्यातला एकजण म्हणाला. दुसऱ्यानेही ‘व्हय व्हय’ म्हणत त्याची री ओढली. फादर म्हणाले, “तसे कांही करू नका. देव आपल्याला माफ करतो, आपण पण दुसऱ्यांना माफ करायला शिकले पाहिजे”

मग फादर त्या दोघाना म्हणाले, “तुम्ही या गावचे दिसत नाही… “
“नाही जी, आम्ही पल्याडल्या गावचे आहोत”
“पोरं काय करतात?”
“काय नाय जी”
“आता शाळेचे हे वर्ष संपत आले. पुढच्या वर्षी पोरांना शाळेत घाला”
“व्हय जी, घालणार म्हणजे घालणार” दोघे एकदम म्हणाले.
“आणि तुम्ही दोघे इथून पुढे असली कामे करू नका”.
“नाही करणार”

फादर जोसेफ बॅण्ड

वरील घटना घडल्यानंतर कांही दिवसांनी आणखी एक गोष्ट घडली. त्या दिवशीही रविवार होता. फादर जोसेफ बॅण्ड गावात फेरफटका मारायला वाड्याबाहेर पडणार होते, इतक्यात गावातलेच चार लोक त्यांना भेटायला आले. गोरे गोरे, उंचेपुरे…. पण फादर जोसेफ व्हय यांच्यापुढे ते खुजेच होते ते. त्यांना व्हय यांच्याशी धार्मिक विषयावर चर्चा करायची होती.

फादर त्यांना सोप्यात घेवून आले. म्हणाले, “बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेवून येतो”
“नको नको” त्यातला एकजण घाई घाईत म्हणाला, “आम्ही घरून निघताना पाणी घेवूनच आलो”.

फादर मनात हसले. विषय बदलत म्हणाले, “बोला, कशावर बोलायचे आहे ते”

“तुम्ही वेद वाचले आहेत का?” त्यांच्यापैकी एकाने डायरेक्ट विषयालाच हात घातला.
“होय, वाचले आहेत”
“मग तुमचे वेदांच्या विषयी काय मत आहे”
“माझ्या मते वेद हे मानवाच्या प्राथमिक अवस्थेतले साहित्य आहे. त्या दृष्टीने ते जगातील प्राचीन साहित्य असू शकते. पण वेदात कांही फारसे ज्ञान नाही. फारतर ते प्राचीन काळातील लोकजीवनाचा अभ्यास करायला उपयोगी पडू शकते. ज्ञान आहे ते वेदांतात म्हणजे उपनिषिदांत आहे. तेही प्राथमिक अवस्थेतले आत्मज्ञान आहे. तुम्हाला खरे, व्यवहारोपयोगी ज्ञान पाहिजे असेल तर ते वेद आणि उपनिषिदांत नव्हे तर कबीराच्या दोह्यांमध्ये आणि तुकारामाच्या गाथांमध्ये सापडेल”

हे विवेचन ऐकून ते चौघे थोडे खट्टू झाले. मग एकाने विचारले, “ब्राम्हण श्रेष्ठ आहेत हे तुम्ही मानता का?”

या प्रश्नाचे उत्तर फादर ‘नाही’ असेच देणार असे त्या चौघांना वाटले, पण फादर जोसेफ यांनी गुगलीच टाकली. “होय, ब्राम्हण श्रेष्ठ आहेत” ते ऐकून त्या चौघांना नवलही वाटले आणि हायसेही वाटले. तेवढ्यात फादर पुढे म्हणाले, “पण त्यासाठी आधी ब्राम्हण कोण, ब्राम्हण म्हणजे काय हे ठरवले पाहिजे. महावीरांनी म्हंटले होते, ‘कर्माने ब्राम्हण होतो, जन्माने नव्हे’. आज जे स्वत:ला ब्राम्हण म्हणवून घेतात ते जन्माने ब्राम्हण आहेत. त्यांचे आई-वडील ब्राम्हण म्हणून ते ब्राम्हण” हे ऐकतांना त्या चौघांच्या चेह-यावर ‘हे महावीर कोण?” असे भाव होते.
” तुम्ही कोण आहात? तुम्ही ब्राम्हण आहात का?” त्यांच्या पैकी एकाने विचारले.
” मी कर्माने ब्राम्हण आहे, जन्माने नाही. पण ब्राम्हणत्वाच्या तुमच्या व्याख्येनुसार देखील मी ब्राम्हण आहे”
“ते कसे काय?”
“म्हणजे बघा, ब्राम्हण श्रेष्ठ असतात, हे तुम्हाला मान्य आहे. मग श्रेष्ठ लोक ब्राम्हण असतात हेही तुम्हाला मान्य करावे लागेल. आता मी तुमच्यापेक्षा सगळ्याच दृष्टीने श्रेष्ठ आहे. मी तुमच्यापेक्षा जास्त वाचले आहे. जास्त लिहिले आहे. माझी शारीरिक आणि मानसिक उंची तुमच्यापेक्षा जास्त आहे. माझा रंग तुमच्यापेक्षा गोरा आहे. माझे डोळे अस्सल घारे आहेत. तुम्ही अधून मधून का होईना मासे खाता, मी तर शाकाहारी आहे. मग सांगा बघू, खरा ब्राम्हण कोण? मी की तुम्ही?”

त्या चौघांकडे याचे उत्तर नव्हते. न बोलता त्यांनी फादर जोसेफ यांची रजा घेतली.

पण ज्ञानी पुरुषाने घातलेली भुरळ अनेकांना स्व:स्थ बसू देत नाही. पुढील काळात ते चौघे वारंवार फादर जोसेफ यांच्याकडे येऊ लागले. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू लागले. कळत नकळत जोसेफ यांना त्यांच्या कामात मदत करू लागले. पुढे जोसेफ यांनी त्या चौघांनाही चार वेगवेगळ्या गावात शिक्षण प्रसारासाठी पाठवले. जोसेफ यांनी लावलेल्या रोपट्याचे कांही काळातच एक मोठे झाड तयार झाले.

फादर जोसेफ यांचा वेगळेपणा म्हणजे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा अजिबात प्रचार केला नाही. त्यांनी एखादे चर्चही बांधले नाही, आणि कुणाला बाप्तिस्माही दिला नाही. आपल्या प्रवचनात, बोलण्यात ते ख्रिस्ती धर्मातील, बायबलमधील उदाहरणे फारसी देत नसत. त्यांचा भर कबीराचे दोहे आणि तुकारामांची गाथा यावरच असायचा.

त्यांनी इतर ख्रिस्ती मिशनऱ्यांबरोबर फारसा संबंध ठेवला नाही. आपल्या कार्यासाठी त्यांच्याकडून मदत घेतली नाही, आणि इंग्रज सरकार कडूनही मदत घेतली नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेल्या जोसेफ यांनी धर्म ही गोष्टच बाजूला ठेवली आणि त्या ऐवजी शिक्षणाचा प्रचार केला.

असे हे फादर जोसेफ बॅण्ड. वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते वारले. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे काम चालूच होते. कसला रोग नाही आणि डोळे, कान पूर्ण शाबूत. ते गेले त्या दिवशी रविवार होता. वाड्यात ते एकटेच होते. रोज सकाळी ते बाहेर फेरफटका मारायला निघत, त्यादिवशी बाहेर दिसले नाहीत म्हणून सहज कोणीतरी चौकशीसाठी वाड्यात गेले, तर ते आपल्या चटईवर शांतपणे झोपले असल्याचे दिसले. खूप हाका मारूनही उठले नाहीत. ही बातमी गावभर पसरली. दुपारपर्यंत त्या गावातील आणि जवळपासच्या गावांमधील हजारो लोक गोळा झाले.

आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना त्यांनी पूर्वीच एक गोष्ट सांगून ठेवली होती, ती म्हणजे त्यांचे दफन न करता दहन करण्यात यावे, पण इतर कोणतेही धार्मिक विधी, कर्मकांडे करू नयेत. दहनासाठी झाडे तोडून आणलेली लाकडे वापरू नयेत, त्याऐवजी एखादे वठलेले झाड आणि इतर साहित्य वापरावे. त्यांच्या या इच्छा पुऱ्या करण्यात आल्या.

त्यांचा मुलगा विल्यम त्यावेळी हिमाचल प्रदेशात होता. एका गुरुजींनी शहराच्या ठिकाणी जाऊन फादर वारल्याचे विल्यमला तार पाठवून कळवले.

आणखी कथा ….

पत्रमैत्रिण | Pen Friend: मराठी लघुकथा

प्रेमकथा: लव्ह जिहाद | Love Jihad

दिनकरचं लग्न

माझ्या लग्नाची गोष्ट…| Marathi Love Story

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा

TheyWon English (Online English Magaine)

2 thoughts on “Marathi Story: फादर जोसेफ बॅण्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *