ईश्वर आहे कि नाही? God Existence

संजय सोनवणी

ईश्वर आहे कि नाही? हा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे.

बुद्धीवादी पातळीवर सदय असलेला, प्रार्थनांनी खूष होणारा, न केल्यास कोपणारा “भावनिक” परमेश्वर अस्तित्वात असणे शक्य नाही. तसा ईश्वर मानल्यास त्याला अतिमानवी रूप देणे सहज शक्य होते. मानवासारख्याच, पण अचाट लीला तो सहज करू शकतो. मानवासारखेच त्यालाही राग-लोभ असू शकतात. पुराकथा पाहिल्या तर त्यातील बव्हंशी सामान्यांचा देव हा असाच असतो.

फार आध्यात्मिक झाले तर सर्व सृष्टीचा निर्माता, सर्व चराचरात भरलेला तरीही दशांगुळे व्यापून उरलेला अचिंत्य असा पण अंतिम मोक्षदाता असा परमेश्वर अस्तित्वात तात्विक पातळीवर येतो. असाही परमेश्वर अस्तित्वात असू शकेल अशी कल्पना करणे श्रद्धीय बुद्धीवादी मनुष्याला संयुक्तिक असले तरी ते तार्किक बुद्धीवादी पातळीवर ते मान्य करता येत नाही.

परंतू भावनात्मक पातळीवर, जी वास्तवच असते, अशा परमेश्वराचे अस्तित्व असणे, त्याचा आधार वाटणे अस्वाभाविक आहे काय? मनुष्य हा मुळात भावनिक प्राणी आहे आणि भावनिक विश्व हे वास्तव रखरखीत विश्वापेक्षा वेगळे व तरल असते. त्यात देव/ईश्वर असू शकतो. माणसं त्याला सखा-सवंगडी मानत, आपल्या संकटांचा भार त्याच्यावर टाकत वाट दाखवण्याची अथवा संकटमूक्त करण्याची अपेक्षा बाळगत आपल्या जीवनातील अनिश्चिततेला भावगम्य स्थिरता देवू पाहतात. हे मानवी भावनिक स्वभावाला साजेशेच आहे.

ईश्वर आहे कि नाही?

शेवटी मनुष्याला स्वत: तो मनुष्यच वाट दाखवतो, पण त्या प्रेरणा ईश्वरविषयक जाणीवांतून अधिक टोकदार होतात हे सामान्य मानसशास्त्र आहे. संकटांशी झुंजतांना काहीतरी अलौकिक सोबत आहे ही जाणीव माणसाला बळ देवू शकते. ते वास्तवात नसले तरी भावनिक पातळीवर ते अस्तित्व प्रबळ असते म्हणून ते भावनेपुरते ते सत्यही असते.

प्रेम हीसुद्धा मग एक अमूर्त व सिद्ध न होऊ शकणारी गोष्ट आहे. पण प्रेमभावनेच्या बळावर मनुष्य अशक्यप्राय कार्ये करू शकतो हे सिद्ध झालेले आहे. “प्रेम” खोटे आहे असे म्हणने प्रेमभंग झालेल्यांसाठी ठीक असले तरी कशाचा तरी भंग झाला असेल तर ते वास्तव का नसेल? प्रेमभावना आणि ईश्वरविषयकच्या भावनेत साम्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.

पण ईश्वर आहे कि नाही? हा खरा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. प्रत्येकाचा ईश्वर वेगळा. संकल्पना वेगळी. खरे तर जेवढी माणसे तेवढे ईश्वर. त्याच्याकडून अपेक्षाही वेगवेगळ्या. अशा स्थितीत ईश्वर ही संकल्पना एका व्याख्येत बसवता येणे हेही अशक्य आहे असे आपल्या लक्षात येईल!

ईश्वर नाकारणे नाकारणाऱ्यांसाठी ठीक आहे. पण ते नेमके काय नाकारत आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे!

मानवी मानसिकता सबल करण्यात ईश्वराविषयकची संकल्पना उपयुक्त ठरली आहे. धर्मांधांनी, ईश्वर संकल्पनेचा स्वार्थासाठी उपयोग करून घेत लोकांचे शोषण करणारे व करू दिले जाणारे हे निश्चितच दंडणीय आहेत. पण म्हणून संकल्पनेलाच कसे उध्वस्त करता येईल?

प्रेम ही संकल्पना असंख्यदा दुरुपयोगिली जाते म्हणून प्रेमच नको अथवा ती खोटी आहे असे भावनामय माणूस कसे म्हणू शकेल? किंबहुना भावनायुक्त माणसाची ती अपरिहार्य निकड बनते. मग संकल्पनेला नांव काहीही दिले तरी काही फरक पडत नाही.

ईश्वर आहे कि नाही?

मुळात ईश्वर या संकल्पनेचा उगम अखिल मानवाच्या असुरक्षिततेच्या, अनिश्चिततेच्या आणि भयभीततेच्या पुराआदिम जाणीवांच्या विस्फोटातून निर्माण झाली आहे. किंबहुना आपल्या भयभीत मनाला सुरक्षेचे एक कवच म्हणून ती त्याने विकसीत केली आहे.

माणसाचा ईश्वर म्हणजे स्वत:च्या काळोखावर/संकटांवर मात करणारा त्याच्याच मानसिकतेचा एक घटक. त्या घटकाला माणूस स्वत:पेक्षा वेगळा व श्रेष्ठ-शक्तीशाली मानतो. जीवनातील अनाकलनीय सृष्ट-दूष्ट घटना या त्याच्याच इच्छेमुळे होतात असेही तो मानतो. माणुस जितका असुरक्षीत होत जातो तितकीच ईश्वराची गरज त्याला जास्त भासते.

आदिम काळात मनुष्य जितका असुरक्षित होता किंबहुना तितकाच असुरक्षीत आजही आहे. न्याय/कायदेव्यवस्था/प्रशासन त्याला अजुनही पुरेशी सुरक्षा देवू शकलेली नाही. आर्थिक असुरक्षितता आणि अनिश्चितता तर त्याला सदैव ग्रासून असते. कोणताही निर्णय अंतिम परिणाम काय देईल हेही परिणाम दिसेपर्यंत त्याला सांगता येत नाही. त्याचे असे गणितही नाही कारण परिणामावर परिणाम करणाऱ्या अनंत घटकांच्या परस्पर संबंधंचे भाकीत करणे जवळपास अशक्य होऊन जाते. हे जे काही अनाकलनीय आहे त्याचे निराकरण माणुस करू शकत नाही.

मानवी जीवनात वास्तवापलीकडेही वास्तवे असतात. कल्पनांपलीकडेही कल्पना असतात. मानवी शरीर गणिती-भौतिकी नियमांनी जावू शकते पण गणीतही शेवटी मानवनिर्मितच असते. मानवी आकलनाबाहेरही गणित उरतेच. नाहीतर त्यातही नवी संशोधने होत नवी प्रमेये मांडली गेली नसती.

माणसाला समजलेले भौतिक विश्वही मानवी मर्यादेच्या आतच असते. आपण निरपेक्ष असू शकत नाही म्हणूणच आपण सापेक्षतेच्या चौकटीत वैश्विक नियम बांधतो. पण विश्व मानवी नियमांना बांधील असतेच असे नाही. म्हणून प्रश्न अनंत व उत्तरे थोडी अशी अवस्था असतेच. एक उत्तर सापडले कि त्यावरही नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सोडवायला माणुस अजून धावतो. किंबहुना ही धाव अजरामर आहे.

माणसाच्या या अजरामर कुतुहलाला व ते शमवण्यासाठी केलेल्या, करीत असलेल्या धडपडीला त्रिवार सलाम. मानवी विचारांच्याही चौकटी तोडता येतील तेंव्हाच वैश्विक सत्ये सापडू शकतील. तोवर त्यांना आपण केवळ “मानवी सत्ये” (जी अनिश्चित आहेत) म्हणू शकतो. त्यांना अंतिम सत्य म्हणता येणार नाही. विज्ञानातही अनेक मित्या, अनेक विश्वे, कृष्णविवरे, धनात्मक गुरुत्वाकर्षण अशा अनेक कल्पना विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. गणित सोडवण्यासाठे क्षणभर तरी ही गृहितके खरीच धरावी लागतात. ही आपली मर्यादा आहे. अज्ञानाच्या गहन कुहरात आपण आहोत आणि आपण प्रकाशाच्या शोधात आहोत.

ईश्वर आहे कि नाही?

हा शोध कशावर तरी श्रद्धा असल्याखेरीज कसा पुर्ण होईल? परमेश्वर हीसुद्धा एक संकल्पनाच आहे. जीवनाचा एक निराकार मानसिक आधार शोधणारी संकल्पना. म्हणून जेवढ्या व्यक्ती तेवढे ईश्वर. निरपेक्ष स्थितीत ईश्वराचे मुळात अस्तित्वच नाही. ते वास्तव असू शकत नाही. तरीही ती जोवर माणसाला उपयुक्त आहे किंवा तिला सक्षम पर्याय मिळत नाही तोवर ईश्वरवादी सामान्य माणसांना “देवभोळे”, “भोळसट”, “अंधश्रद्ध” वगैरे म्हणत हीणवायचा काय अधिकार आहे? जोवर कोणाच्याही श्रद्धा स्वत:च्या व इतरांच्याही शरिरीक/मानसिक किंवा आर्थिक हानीचे कारण होत नाही तोवर त्या अंधश्रद्धा कशा?

ईश्वराची गरज जीवनातील अनिश्चिततेमुळे आहे. असुरक्षिततेमुळे आहे. आणि लोकांना उद्याची शाश्वती देता येईल अशी व्यवस्था आपण जोवर आणत नाही तोवर लोकांचे देवभोळेपण जाईल ही आपली अंधश्रद्धा आहे. असुरक्षिततेचे प्रमाण आणि ईश्वरी अस्तित्वाची तीव्रता यात असा हा अन्योन्य संबंध आहे.

हेही वाचा…..

अलिप्त होणं जमलं तर ठीक

धर्म आणि विज्ञान

श्रीमंत व्हा ! पण चांगल्या मार्गाने …..

कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!

TheyWon English (Online Magazine)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *