रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी

महावीर सांगलीकर

दिनकर कदम अकरावीमध्ये होता त्यावेळची गोष्ट. खूप वर्षांपूर्वीची. त्याकाळी कॉम्प्यूटर नव्हते. मोबाईल फोन नव्हते. मुले-मुली एकमेकांशी डायरेक्ट किंवा चिट्ठी, पत्र लिहून संपर्क साधत असत.

दिनकर वर्गाचा मॉनिटर होता. एके दिवशी मधल्या सुट्टीत त्याच्याच वर्गातली एक मुलगी, जाई त्याला म्हणाली, ‘माझं तुझ्याकडं जरा काम आहे. शाळा सुटल्यावर भेटणार का?’
‘काय काम आहे?’ त्यानं जरा तिरसटपणेच विचारलं. तो मुलींपासून दूरच रहात असे, आणि एखादी मुलगी जवळ यायला बघत असेल तर तिच्याशी तिरसट बोलून तिला पळवून लावत असे.
‘एक प्रॉब्लेम आहे..’ ती मुलगी म्हणाली.
‘कसला प्रॉब्लेम आहे? गणितातला?’
‘नाही, वेगळा प्रॉब्लेम आहे. आत्ता नाही सांगू शकत. प्लीज मला शाळा सुटल्यावर भेट’ असं म्हणताना तिच्या डोळ्यात टचकन आसवं आली.
हे कांहीतरी वेगळे प्रकरण आहे हे दिनकरच्या लगेच लक्षात आलं. तो म्हणाला, ‘चल, आपण बाहेर जाऊन कुठंतरी लगेच बोलू. नाहीतरी जाधव सर आज आलेले नाहीत, पुढचा तास ऑफच आहे’
मग ती दोघं शाळेपासून थोडं लांब असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले. एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसले. जाईनं तिच्या एका वहीत ठेवलेली एक चिट्ठी बाहेर काढली. दिनकरला दिली.
दिनकर ती चिट्ठी वाचू लागला.

‘प्रिय जाई,
तू मला फार आवडतेस. तू माझ्याशी मैत्री करशील का? मी तुला फुलासारखं जपेन. प्लीज नाही म्हणू नकोस. नाही म्हणालीस तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव……
तुझाच….
ओळख पाहू कोण?’

त्याचं वाचून झाल्यावर जाई त्याला म्हणाली, ‘ही चिट्ठी कोणी पाठवली हे शोधून काढायचं आहे’.

ती चिट्ठी टाईप केलेली होती. चिट्ठीमध्ये पाठवणाऱ्याचं नाव, सही वगैरे कांही नव्हतं. तारीखही नव्हती. दिनकरनं विचारलं, ‘ही चिट्ठी तुझ्यापर्यंत आली कशी?’
‘पोस्टानं’, जाई म्हणाली, ‘पोस्टमननं आणून दिली’
‘याच्यावरचं पाकीट कुठाय?’ दिनकरनं विचारलं.
जाईनं तिच्या वहीतनं एक पाकीट काढून दिनकरपुढं केलं. त्या पाकीटावरचा जाईचा पत्ता देखील टाईप केलेला होता. पाकिटावर दोन शिक्के होते, एक पुढच्या बाजूस आणि दुसरा मागच्या बाजूस. दोन्ही शिक्के एकाच पोस्टाचे होते.
‘त्यानं तुला सरळ सरळ धमकी दिली आहे. चल आपण पोलीसात जाऊ’ दिनकर म्हणाला.
‘नको नको,’ जाई घाईत म्हणाली, ‘पोलीसात नको जायला. उगीच लोकांच्यामध्ये चर्चा होईल’
‘मग काय करायचं?’
‘तूच शोधून काढ कोणी चिट्ठी पाठवली ते आणि सांग मला, मग मीच बघते त्याच्याकडं,’ जाई म्हणाली.
दिनकरनं ती चिट्ठी आणि पाकीट आपल्या ताब्यात घेतले.
ते दोघं परत शाळेवर आले.

दिनकरला रहस्यकथा वाचायचा नाद होता. तो शेरलॉक होम्सपासून जेम्स बॉण्डपर्यंत सगळ्यांचा चाहता होता. तो ओरिजिनल इंग्रजी रहस्यकथा वाचत असे. शिवाय मराठी रहस्यकथाही वाचत असे. कोणती मराठी रहस्यकथा कोणत्या इंग्रजी रहस्य कथेवरून चोरली आहे हे तो सहज सांगू शकत असे, इतका त्याचा रहस्यकथांचा अभ्यास होता. त्यामुळं हे प्रकरण सोडवणं त्याच्यासाठी फारसं अवघड नव्हतं.

दिनकर कामाला लागला. तो विचार करू लागला, ही टाईप केलेली चिट्ठी आहे, म्हणजे ज्या मुलाला टायपिंग करता येते त्याचंच हे काम असणार. तो मुलगा शक्यतो आपल्याच वर्गातला असणार, नाहीतर किमान आपल्याच शाळेतला तरी असणार.

त्यानं ती चिट्ठी पुन्हा एकदा नीट बघितली. चिट्ठीवरचं टायपिंग स्मूथ नव्हतं. काही अक्षरं तुटलेली होती. टाईपरायटर जुना असवा. बऱ्याच टायपिंग मिस्टेक होत्या. कांही ठिकाणी टाईप जोरात झाल्यानं कागद जास्त प्रेस झाला होता. म्हणजे हे नवशिक्याचं काम असणार. नक्कीच तो टायपिंगच्या क्लासला जात असणार. आपल्या वर्गातली, शाळेतली किती मुलं टायपिंगच्या क्लासला जातात ते शोधायला पाहिजे.

त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत दिनकरनं ती माहिती गोळाही केली. त्याच्या वर्गातले पाच जण, तर इतर वर्गांमधले सातजण टायपिंगच्या क्लासला जात असत. त्या पाच जणांपैकी तीन आणि सातपैकी पाच या मुली होत्या. म्हणजे एकूण बारापैकी आठजण मुली. राहिलेल्या चार मुलांपैकी एकाचं हे काम असणार. दिनकरनं आपले सगळं लक्ष या चार मुलांवर केंद्रित केलं. आधी तो त्याच्या वर्गातल्या त्या दोन मुलांना वेगवेगळा भेटला.

‘अरे राजेंद्र, तू टायपिंगच्या क्लासला जातोस ना?’
‘हो’
‘मला एक पत्र टाईप करून पाहिजे’ असं म्हणत दिनकरनं राजेंद्रला एका कागदावर मजकूर लिहून दिला.
‘आजच रात्री देतो. आत्ता मी चाललोच आहे टायपिंगच्या क्लासला’
‘ठीक आहे, पण कुणाला दाखवू नकोस ती चिट्ठी. गुपचूप टाईप कर, आणि कागद तिथलाच वापर’ मग तो पुढं म्हणाला, ‘अरे आपल्या वर्गातली ती जाई, ती कुठं रहाते हे माहीत आहे का तुला?’ हा प्रश्न विचारताना दिनकर राजेंद्रच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखून पहात होता.
राजेंद्रने उत्तर दिले, ‘मला नाही माहीत’.

नंतर दिनकरनं त्याच्या वर्गातल्या सतिशला त्याच्या घरी गाठून त्यालाही एक मजकूर टाईप करायला सांगितला. त्यालाही जाई कुठं रहाते हे विचारलं. त्यानंही ‘माहीत नाही’ असं सांगितलं.

त्याच रात्री त्या दोघांनी टाईप केलेला मजकूर दिनकरला मिळाला. जाईला मिळालेल्या चिट्ठीचा कागद आणि राजेंद्रने टाईप केलेला कागद एकसारखा होता, पण राजेंद्रनं केलेलं टायपिंग सुबक होतं. फॉन्टमध्ये फरक दिसत होता. शिवाय त्याला ‘जाई कुठे रहाते?’ हा प्रश्न विचारताना दिनकरनं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले होते, त्यात कांही संशयास्पद नव्हतं. म्हणजे जाईला आलेली चिट्ठी राजेंद्रनं पाठवली नव्हती.

मग दिनकर सतिशला भेटला. सतीशनं टाईप केलेल्या मजकुराचा कागद वेगळा होता, टायपिंग बऱ्यापैकी सुबक होतं, आणि त्यात एकही चूक नव्हती. सतीशबद्दल संशय घेण्यासारखं कांहीही नव्हतं.

दुसऱ्या दिवशी दिनकरनं हाच प्रयोग इतर वर्गांमधल्या त्या 2 मुलांवर केला. पण त्यातल्या कोणावर संशय घेण्यासारखं दिनकरला कांहीच सापडलं नाही.

तिसऱ्या दिवशी आता काय आयडिया या लढवावी याचा दिनकर विचार करत होता, तेवढ्यात मधल्या सुट्टीत जाईनं दिनकरला एक वही दिली आणि ती निघून गेली. दिनकरनं ती वही उघडून बघितली तर तिच्यात एक पोस्टाचं पाकीट होतं. त्या पाकिटात एक चिट्ठी होती.

‘प्रिय जाई,
या रविवारी आपण लोणावळ्यात भेटू. मी शनिवारी मुंबईला मामाकडं जाणार आहे, रविवारी दुपारी परत निघणार आहे. लोणावळ्याला उतरेन. तू पण तिथं ये. लोणावळ्याला राजमाची पॉइंटवर तीन वाजता तुझी वाट पहातो. नक्की ये. संध्याकाळी आपण चिंचवडला परत जाऊ.’

तोच कागद, तेच ओबडधोबड टायपिंग.

रविवारी दिनकर आणि जाई लोकल ट्रेननं लोणावळ्याला निघाले. आज त्या प्रेमवीराला पकडायचंच असं दिनकरनं पक्कं ठरवलं होतं. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. दिनकरची नजर शोधक दृष्टीनं फिरत होती. कदाचित त्या पोरानं मुंबईची थाप मारलेली असू शकते, आणि एखादेवेळी तो याच लोकलमध्ये असायचा. पण दिनकरला कोणीही संशयास्पद आढळलं नाही.

मस्त गप्पा मारत त्या दोघांचा प्रवास चालला होता. लोणावळा कधी आले ते जाईला आणि दिनकरलाही कळलंही नाही. दोघेजण गाडीतून उतरले. तीन वाजायला आणखी चार तास वेळ होता. मग ते दोघं आधी एका हॉटेलमध्ये गेले. तिथे दोघांनी नाश्ता केला. मग ते हॉटेल मधून बाहेर पडले आणि लोणावळा बघत भटकू लागले. भेळ खाल्ली, चिक्की खाल्ली आणि वडापावही खाल्ला.

तीन वाजत आले. ते दोघं राजमाची पॉइंटजवळ आले. दिनकर जाईला म्हणाला, ‘आता तू तिथं जा. मी लपून तुझ्यावर वॉच ठेवीन’. त्या प्लॅनप्रमाणं जाई त्या ठिकाणी गेली. साडेतीन झाले, चार झाले, तरी कोणी आलं नाही. जाईनं आणखी अर्धा तास वाट पाहिली, मग ती तिथनं निघाली, दिनकरकडं आली. म्हणाली, ‘त्याला संशय आलेला दिसतोय. जाउंदे, मरू दे त्याला. आपण जाऊ आता परत’.

ते निघालेच, एवढ्यात पावसाला सुरवात झाली. दोघांनी आपापल्या छत्र्या उघडल्या… पण हाय…… जाईची छत्री तिच्या हातून निसटली आणि वाऱ्यानं उडून गेली. जाई धावतेय छत्रीमागं, पण छत्री दरीच्या दिशेनं गेली. मोठा पाऊस सुरु झाला. आता तिला दिनकरच्या छत्रीत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

दोघंही एकाच छत्रीतून कसंबसं लोणावळा स्टेशनपर्यंत आले. ते लोकलनं परत चिंचवडला आले. थंडीनं कुडकुडत, एकमेकांना चिकटून.

दोन दिवसांनं जाईला आणखी एक चिट्ठी मिळाली.

‘प्रिय जाई,
रविवारी तू लोणावळ्याला दिनकरला घेऊन का आली होतीस? आपल्या प्रेमात तो कशाला मधे पाहिजे? हे तू चांगलं केलं नाहीस. आता मी तुझ्याकडं आणि दिनकरकडंही बघून घेईन…’

दिनकरनं ती चिट्ठी वाचली. तोच कागद, त्याच पद्धतीचं टायपिंग… पण यावेळी एक फरक होता. अक्षरे स्पष्ट आणि काळीभोर होती. म्हणजे त्या टाईपरायटरला नवीन रिबन टाकली होती.

त्यावेळी चिंचवडमध्ये दोन टाईपरायटिंग इंन्स्टिट्यूट्स होत्या. फास्ट टाईपरायटिंग इंन्स्टिट्यूट आणि स्पीड टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट. राजेंद्र स्पीड टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये जात होता आणि त्यानं दिनकरला टाईप करून दिलेल्या मजकूराचा कागद जाईला आलेल्या चिठ्ठ्यांच्या कागदासारखाच होता. त्यामुळे दिनकर सरळ स्पीड टाईपरायटिंग इंन्स्टिट्यूटमध्ये गेला. संचालकास म्हणाला,
‘काका, मला तुमच्याकडून एक माहिती पाहिजे’
‘बोल, कसली माहिती पाहिजे?’
दिनकरनं त्या संचालकास सगळं प्रकरण सांगितलं. मग विचारलं, ‘तुम्ही गेल्या दोन-चार दिवसात एखाद्या जुन्या मराठी टाईपरायटरला नवीन रिबन बसवलेली आहे का?’
‘हो,’ एका टाईपरायटरकडं बोट दाखवत संचालक म्हणाला, ‘तो बघ डावीकडचा दुसरा टाईपरायटर’

दिनकर लगेच तिकडं गेला, टाईपरायटरसमोरच्या खुर्चीवर बसला, समोरचा एक कागद घेऊन त्यावर चार ओळी टाईप केल्या. तो टाईपरायटर जुना होता आणि अक्षरे जोरानं बडवावी लागत असत. त्यामुळं टायपिंग स्मूथपणे होत नसे. तोच फॉन्ट.. येस, हा तोच टाईपरायटर होता. त्या सगळ्या चिठ्या याच टाईपरायटरवर टाईप करण्यात आल्या होत्या. आता प्रश्न होता त्या कोणी टाईप केल्या याचा. शेवटची चिट्ठी ज्या पाकिटातून आली त्यावर पोस्टाचा शिक्का होता. त्यात पाकीट पोस्ट केल्याची तारीख 5 ही होती.

दिनकरनं संचालकास विचारलं, ‘काका, तुम्ही रिबन किती तारखेस चेंज केली होती?’
‘चार तारखेस संध्याकाळी’
‘मग त्याच्यानंतर आणि पाच तारखेस सकाळच्या बॅच पर्यंत तो टाईपरायटर कोणी कोणी वापरला हे तुम्ही सांगू शकाल का?’
‘तो टाईपरायटर चार तारखेला संध्याकाळी फक्त एकाच स्टुडंटनं वापरला होता, आणि पाच तारखेच्या सकाळच्या बॅचला तो कोणीच वापरला नाही’ संचालकानं रजिस्टर बघत उत्तर दिलं.
‘मला त्या विद्यार्थ्याचं नाव कळेल का?’
‘विद्यार्थी नाही, विद्यार्थिनी’, संचालक म्हणाला, ‘कविता काळे तिचे नाव’

दिनकरला आश्चर्य वाटलं. कविता काळे त्याच्याच वर्गात शिकत होती. तिनं त्या चिठ्या लिहिल्या? की आपलं कांही चुकत आहे? त्यानं कविता काळेलाच विचारायचं ठरवलं. तो सरळ तिच्या घरी तिला भेटायला गेला.
त्याला पाहून ती चपापली. पण चेहऱ्यावर उसनं हसू आणून तिनं त्याचं स्वागत केलं. त्याला बसायला खुर्ची दिली. पाणी आणून दिलं. ‘चहा करते’ म्हणून आत चालली.
‘चहा नको,’ दिनकर म्हणाला, ‘मला तुझ्याशी बोलायचं आहे’
ती त्याच्यासमोरील एका खुर्चीवर बसली.
‘काय म्हणते जाई? तुझी खास मैत्रीण आहे ना ती?’
‘हो, पण का बरं?’तिनं पडेल चेहऱ्यानं विचारलं.
‘कांही नाही’, दिनकर म्हणाला, ‘तू तिला पाठवलेल्या सगळ्या चिट्ठ्या तिनं मला वाचायला दिल्या’
‘चिट्ठ्या? मी कशाला तिला चिट्ठ्या पाठवू? ती काय मुलगा आहे काय?’ ती हसत म्हणाली.
‘तू तिला चिट्ठ्या पाठवल्यास कारण तिनं तुला तसं करायला सांगितलं म्हणून’
‘हे तुला कुणी सांगितलं? जाईनं?’
‘ती कशाला सांगेल? मी सांगतो! त्या चिट्ठ्या तू टाईप केल्यास आणि तिला पाठवल्यास याचा माझ्याकडं पुरावा आहे. मला फक्त एवढं सांग, तुम्ही दोघींनी मिळून हा उद्योग केला ना?’

कवितापुढं आता खरं सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ती बोलू लागली,
‘जाईची आणि तुझ्या एका मित्राची पैज लागली होती. जाईनं तिच्यासोबत तुला लोणावळा फिरवून आणायचं अशी’
‘माझा मित्र? कोण तो?’
‘तूच काढ ना शोधून… ’
‘ठीक आहे, पण अशी पैज लावण्याचं कारण काय?’
‘कारण तू मुलींशी कामाशिवाय फारसं बोलत नाहीस, मुलींमध्ये फारसा मिसळत नाहीस, एखादी मुलगी स्वत:हून तुझ्याशी बोलायला लागली तर तिच्याशी तिरसटपणे बोलून तिला पळवून लावतोस… तुझ्या मित्राला जाई ही पैज जिंकणार नाही याची पक्की खात्री होती. पण हरला बिचारा’
‘छान,’ दिनकर मान हलवत म्हणाला, ‘एवढी बुद्धी अभ्यासात लावली तर तुमचा जास्त फायदा होईल’

दिनकर उठला आणि जाऊ लागला. एवढ्यात कविता म्हणाली,
‘जाई म्हणत होती, लोणावळ्याची ट्रीप मस्त झाली..’
‘असं का? मग तिला एक निरोप दे. विचार, परत कधी जायचं लोणावळ्याला ते…’
‘लोणावळा एवढं आवडलं?’
‘नाही, जाई आवडली,’ दिनकर लाजत म्हणाला, ‘आणि थॅंक यू कविता, तू या प्लॅनमध्ये जाईला साथ दिल्याबद्दल’
‘वेलकम’ कविता म्हणाली.
‘जाई याच एरियात रहाते ना?’
‘तो काय रस्त्याच्या पलीकडे बंगला दिसतोय.. जाई-जुई… तिथं रहाते ती’
‘ठीक आहे, भेटेन तिला नंतर……. बाय ’ असं म्हणून दिनकर झपझप पावलं टाकत निघून गेला.

दिनकर गेल्यावर कवितानं तिच्या बंगल्याच्या खिडकीतनं समोरच्या बंगल्यातील जाईला ‘काम फत्ते’ अशी खूण केली.

वाचण्यासारखं आणखी काही…….

माझ्या लग्नाची गोष्ट…| Marathi Love Story

गूढकथा: व्हर्च्युअल डॉटर

प्रेम-काजवा | Love Letter

गूढकथा: सलोनी राठोड

TheyWon English

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

5 thoughts on “रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *