© महावीर सांगलीकर
जीवन कसं जगावं ते मांजराकडनं शिकावं. कसं जगू नये ते कुत्र्याकडनं शिकावं.
मांजर नेहमी आपल्याच विश्वात दंग असतं. कुणाच्या अध्यात-मध्यात नसतं. ते शांत, ध्यानमग्न असतं. तरीही ते सावधचित्त असतं.
याउलट कुत्रं बेचैन असतं, उठ-सुठ भुंकत असतं.
मांजर कुणाच्या वाटेला जात नाही. कोणी त्याच्या वाटेला गेलं तर आधी नमतं घेतं पण फारच कुणी त्रास द्यायला लागलं त्याला चांगलाच धडा शिकवतं. मांजर आणि कुत्रा यांच्या लढाईत मांजरच जिंकत असतं.
मांजराला शिस्त शिकवावी लागत नाही, ती त्याच्याकडं उपजतच असते. याउलट कुत्र्याला शिस्त लावावी लागते. शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत मांजर खूप जागरूक असतं, कुत्र्याचं तसं नसतं.
मांजराचं वागणं, जीवनपद्धत एखाद्या राणीसारखी असते, तर कुत्रं हे वॉच डॉग किंवा स्ट्रीट डॉग असतं. दिसेल त्याच्यावर आणि एकमेकांवर भुंकणं किंवा मालकापुढं शेपूट हलवणं हेच कुत्र्याचं जीवन असतं.
कुत्री टोळ्यांनी राहतात, तर मांजराला टोळीचा मेंबर होऊन रहाणं आवडत नाही.
कुत्रं तुमच्यावर विनाकारण हल्ला करेल, तुम्हाला विनाकारण चावेल, मांजर कांही गंभीर प्रसंग असेल, धोका असेल तरच तुमच्यावर हल्ला करेल.
एखाद्या कुत्रीच्या मागं चार-पाच कुत्री लागली आहेत, तिच्यावरून त्यांच्यात एकमेकांवर भुंकणं चालू आहे, चावाचावी चालू आहे असं तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. मांजरांच्या बाबतीत असा असंस्कृतपणा दिसत नाही!
मांजरामध्ये स्त्रियांचे गुण दिसून येतात, कुत्र्यांमध्ये वर्चस्ववादी पुरुषी अहंकार आणि आक्रमकता दिसून येते.
मांजर पाहिलं तर भीती वाटत नाही, कुत्रा बघताच बरेच लोक घाबरतात. कुत्र्यांनी माणसाला चावण्याच्या, मुलांना चावण्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, ऐकत असतो. कुत्रं मागं लागण्याचा अनुभव तर बहुतेकांनी अनेकदा घेतलेला असतो. असा त्रास मांजराकडून कधीच होत नसतो.
माणूस पण कसा आहे बघा… निरुपद्रवी मांजर आडवं गेलं की माणसाला अपशकून होतो म्हणे. पण माणसाला आपल्याबद्दल काय वाटतं याच्याशी मांजराला कांही देणं-घेणं नसतं. कारण मांजराला जीवन कसं जगावं हे कळलेलं असतं.
वाचण्यासारखं आणखी काही …..
Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!
Education| कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!
विचारधन परिवर्तन | Marathi Quotes
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
फारच छान लिहिलंय… कुत्रा आणि मांजर यांच्या तील तुलना आवडली
धन्यवाद !