-महावीर सांगलीकर
बौद्ध धर्म हा बहुजनांचा धर्म आहे असे मानले जाते. पण यातील बहुजन या शब्दाचा अर्थ आजचे बहुजनवादी घेतात तसा ‘ब्राम्हणेतर’ असा नाही, तर ‘समाजातील बहुतांश लोक’ असा आहे.
अर्थातच बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या शिष्यांमध्ये समाजातील सर्व थरातील आणि सर्व प्रकारच्या समुहातील लोक होते. त्यांचे ब्राम्हण शिष्यही होते. विशेष म्हणजे भिक्कू झालेल्या ब्राम्हण शिष्यांची संख्या समाजातील त्यांच्या संख्येच्या टक्केवारीपेक्षा खूपच जास्त होती.
बौद्ध धर्मात गेल्या अडीच हजार वर्षात जे महान भिक्कू आणि विद्वान झाले, त्यात ब्राम्हणांची संख्या मोठी आहे, किंबहुना महान आणि विद्वान बौद्ध भिक्कुंमध्ये ब्राम्हणेतरांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. या लेखात मी अशा कांही ब्राम्हण भिक्कू आणि विद्वानांची थोडक्यात माहिती देत आहे. हे लोक जन्माने वैदिक ब्राम्हण होते, पण त्यांना बौद्ध तत्वज्ञान पटल्यामुळे बौद्ध भिक्कू झाले.
सारीपुत्त (सारीपुत्र)
हे गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी एक होते. हे जन्माने ब्राम्हण होते आणि त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला होता. अश्वजीत या भिक्कूकडून त्यांनी गौतम बुद्धांच्याबद्दल ऐकले आणि ते बुद्धांचे शिष्य झाले. सारीपुत्त अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी गौतम बुद्ध यांचा चुलत भाऊ देवदत्त याने बुद्धांच्या विरोधात केलेले बंड मोडून काढले. गौतम बुद्ध यांच्या उपदेशांचा खूप मोठा प्रचार केल्यामुळे त्यांना ‘धम्मसेनापती’ ही पदवी देण्यात आली. त्यांनी आपल्या आईलाही बुद्धांचा उपदेश देवून बौद्ध धर्म स्वीकारायला लावला होता. सारीपुत्त यांचे परीनिर्वाण गौतम बुद्ध यांच्याही आधी झाले.
महाकश्यप
महाकश्यप हेही गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी एक होते. त्यांचा जन्म मगधेतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. हे नेहमी बुद्धांच्या सानिध्यात असत. त्यांचे आचरण अतिशय कडक होते. बौद्ध धर्माची पहिली संगती (council ) भरवण्याचे महत्वाचे काम महाकश्यप यांनी केले. बुद्धांचा सर्वाधिक विश्वास महाकश्यप यांच्यावर होता.
मोग्गलायन
गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी हे आणखी एक. यांचा जन्म कोलीता येथील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांना विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. यांचे परीनिर्वाण बुद्धांच्यांही अगोदर सहा महिने, आणि सारीपुत्रानंतर पंधरवड्यात झाले.
गौतम बुद्ध यांच्या संघात वरील प्रमुख ब्राम्हण शिष्यांशिवाय इतरही अनेक ब्राम्हण शिष्य होते. गौतम बुद्ध यांच्या परीनिर्वाणानंतरही बौद्ध धर्मात अनेक महान बौद्ध भिक्कू, आचार्य व विद्वान झाले. त्यातील कांही प्रमुखांचा परिचय मी पुढे देत आहे:
नागार्जुन
यांचा जन्म दक्षिण भारतात एका ब्राम्हण कुटुंबात झाला (इ.स. १५०). हे सातवहान राजा सातकर्णी याचे सल्लागार होते. नागार्जुन यांनी बौद्ध तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले. हे आयुर्वेदाचेही तज्ञ होते. आयुर्वेदातील ‘भस्म’ प्रकारच्या औषधांचा शोध नागार्जुन यांनी लावला.
अश्वघोष
अश्वघोष (इ.स. ८० ते १५०) यांचा जन्म साकेत येथील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. यांना पहिले संस्कृत नाटककार मानण्यात येते. पण अश्वघोष ब्राम्हण असले तरी ते बौद्ध धर्माचे अनुयायी असल्याने पहिल्या नाटककाराचे श्रेय त्यांना न देता त्यांच्या नंतर सुमारे ३०० वर्षांनी झालेल्या वैदिक ब्राम्हण असलेल्या कालिदासाला देण्यात येते. अश्वघोष यांनी गौतम बुद्ध यांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले, जे संपूर्ण भारतातील नव्हे तर जावा, सुमात्रा, श्री लंका येथील बौद्ध साधूंना उपयोगी पडले. या चरित्राचे चीनी आणि तिबेटी भाषेतही अनुवाद झाले. अश्वघोष यांनी वर्णव्यवस्था आणि जातीवाद यांचे खंडन करणारा वज्रसूची हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.
बुद्धघोष
बुद्धघोष (इ.स. 5वे शतक) यांनी बौद्ध धर्माच्या थेरवाद या पंथाचे पुनर्जीवन केले. त्यांचा जन्म बोधगयेतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. श्रीलंकेतील प्रसिद्ध महावंश या ग्रंथात बुद्धघोष यांचे चरित्र विस्ताराने आले आहे. बुद्धघोष हे वैदिक धर्माचे प्रकांड पंडीत होते. रेवत या बौद्ध भिक्षूने त्यांचा वाद-विवादात पराभव केला, त्यामुळे ते बौद्ध भिक्षू बनले. अर्थात हे रेवत देखील ब्राम्हण होते.
याशिवाय तिबेटी बौद्ध धर्माचे संस्थापक पद्मसंभव, झेन बौद्ध धर्माचे संस्थापक शांतिदेव, ग्रीक राजा मेनेंदर उर्फ मिलिंद याला बौद्ध धर्माचे अनुयायी बनवणारे नागसेन, सम्राट अशोकाला बौद्ध धर्माचे अनुयायी बनवणारे राधास्वामी, नालंदा विद्या पीठातील बौद्ध महापंडित आर्यदेव आणि शांतरक्षित हे सगळेजण जन्माने ब्राम्हण होते. ही यादी फारच लांबवता येईल, पण येथे केवळ वानगीदाखल कांही नावे दिली आहेत.
अगदी आधुनिक काळातही बौद्ध धर्म स्वीकारून त्याचा प्रचार करणारे महापंडित राहुल सांकृत्यायन आणि डी.डी. कोसंबी हे दोघेही जन्माने ब्राम्हण होते.
बौद्ध धर्म तिबेट, चीन, जपान वगैरे देशात नेण्याचे श्रेय ब्राम्हणांनाच जाते.
पीटर मेस फिल्ड या प्रसिद्ध विद्वानाने लिहिले आहे की प्राचीन काळी बौद्ध धर्मात ब्राम्हण लोकांनाच प्राधान्य दिले गेले. दुसरे एक विद्वान असीम चटर्जी म्हणतात की संकट काळात बौद्ध धर्म वाचवण्याचे काम ब्राह्मणांनीच केले आहे.
भारतातून बौद्ध धर्म संपवायला ब्राम्हण जबाबदार आहेत असे अनेक जण मानतात. पण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना हे मत मान्य नाही. त्यांच्या मते बौद्ध धर्माचा ऱ्हास भारतावरील परकीय आक्रमणामुळे झाला.
हे खरे आहे की कांही वैदिक ब्राम्हणांना बौद्ध धर्म नको होता, पण याचा अर्थ सगळेच ब्राम्हण बौद्ध धर्माचे विरोधक होते असा होत नाही. खुद्द गौतम बुद्ध यांच्या संघात त्यांचे सर्वाधिक आणि प्रमुख शिष्य हे ब्राम्हण होते, त्यानंतर क्षत्रिय शिष्यांचा नंबर येतो. या संघात शूद्रांचे स्थान तसे नगण्यच होते. अनेक ब्राम्हणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो वाढवला.
आजच्या ब्राम्हणविरोधी बौद्ध धर्मियांनी तर ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजेच पण ब्राम्हणांनी देखील यावर विचार करायला पाहिजे, कारण बहुतेक ब्राम्हणांना वैदिक धर्माच्या पलीकडचा आपला इतिहास माहित नाही. त्यांनी तो माहीत करून घेण्यात त्यांचाच फायदा आहे.
हेही वाचा ……
अज्ञानवाद्यांचे अजब तत्वज्ञान!
कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जा
राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन (ऐतिहासिक कथा)
सर, आपल्या विद्वत्तेला सलाम! पण अलीकडे आपण प्रस्थापितांचे, ब्राम्हणी विचारांचे समर्थन करत आहात हे पटत नाही.