Expressing | बोलो जी बोलो ये राज खोलो …..

©️ राजश्री सतीश शिरोडकर

“राधा ना बोले ना बोले ना बोले रे घुंगट के पट ना खोले रे”

गाण्यांची आणि रेडिओ ऐकण्याची खूप आवड असली की मग दररोज सतत वेगवेगळी गाणी कानावर पडत असतात. कालही तसंच झालं. अगदी चहा करताना हे गाणं लागलेलं होतं आणि हे गाणं लागल्यानंतर पहिल्यांदा डोक्यात पिक्चरचे जे नाव आलं ते म्हणजे “मै चुप रहूंगी”..!!

मुळात आपल्याकडे असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीत बायका खूपच कमी बोलतात. अलीकडे हे चित्र थोडेफार बदललेले असले तरी अजूनही ग्रामीण भागात स्त्रियांना फारशी बोलण्याची परवानगी नाही. एवढेच काय तर घरात पुरुष मंडळी असताना त्यांना त्या ठिकाणी जायची परवानगी नाही. मोठ्यांदा हसण्याची परवानगी नाही. थोडक्यात काय तर उन्हें चुप रहने की आदत सी हो गई है…!!!

आता हे सर्व आठवण्याचं कारण एकच.., परवा मी एका ठिकाणी गेले होते, तर त्यांच्या घरात माय लेकरांचा भारी संवाद सुरू होता (अर्थात त्याला संवाद म्हणणं म्हणजे लोखंडाला सोन्याची उपमा दिल्या सारखं आहे).
आई मुलगीला म्हणाली, “अगं तुला काय झालंय? तू काहीतरी बोलल्याशिवाय मला कळणार आहे का?”
आणि मुलगी म्हणत होती, “जा ग.. तू नको बोलूस माझ्याशी…”
मग आई म्हणाली, “अग, असं काय करतेस ? गप्प राहून प्रश्न सुटणार आहेत का?” मग लेक म्हणाली ,
“अगं ,सगळं मीच सांगायचं का तुला? आई आहेस ना तू ? मग लेकीला काय होते तुला कळत नाही का ? जरा समजून घे ना..!”
आणि मग ती तरा तरा तरा तरा पावले टाकत आपल्या खोलीत निघून गेली.
मुळात हे सगळं माझ्यासमोर घडलं.

या प्रसंगावर माझ्या मैत्रिणीशी काय बोलावं हे मला कळेना. ती मुलगी तिची सख्खी पुतणी होती.

हे वयच असं असतं… ज्याला आपण “अडनीड” म्हणतो. नेमकं काय होत असतं हे ह्यांना पण समजत नसतं… आणि सतत चिडचिड सुरू असते. मनाचा नुसता गोंधळ असतो… थोडी घाबरलेली पण असतात ही मुलं.

हे जे संभाषण झालं ,याला आपण संवाद म्हणू शकतो का ? कारण यातून खरं तर काहीच साध्य झालेलं नाही. मग कधी कधी मला असं वाटतं की “मौनम सर्वार्थ साधनम”. सरळ आपण मूग गिळून गप्प रहावं. जिथे पटत नाही तिथे विषय सोडून द्यावा किंवा चक्क विषय तरी बदलावा.‌ हा असा विचार करत असताना मला अदालत(१९५८) मधली लता मंगेशकर यांनी म्हटलेली एक गझल आठवली…

“उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहतें
अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहतें”

खरं तर बोलायचं खूप असतं… मनात खूप काही साठलेलं असतं ,पण बोलायची सवय नसते. व्यक्त व्हायला शब्द सापडत नाहीत . त्यावेळी आपल्या मनाची सिच्युएशन अशी होते. कधी कधी काय होतं की जी गोष्ट जिभेवर आणण्याची आपण तयारी करत असतो तीच जिभेवर येऊ द्यायला तुमचं हृदयच तुम्हाला परवानगी देत नाही आणि मग दोलायमान परिस्थिती होते. खरंतर अशी वेळ कोणावरही येऊ नये.

“मजबूर बहोत करता है ये दिल तो जुबान को
कुछ ऐसी ही हालत है के हम कुछ नहीं कहतें
कहने को बहोत कुछ था अगर कहने पे आते
दुनिया की इनायत है के हम कुछ नहीं कहतें”

बऱ्याच वेळा काय होतं की समाजाला किंवा लोक काय म्हणतील या आंतरराष्ट्रीय प्रश्नाला घाबरून आपण काहीच बोलत नाही. ज्यावेळी बोलायची इच्छा होते त्यावेळी जर आपण बोललो नाही तर मग ज्या काही चांगल्या गोष्टी घडू शकल्या असत्या त्या घडत नाहीत आणि मग आपण जेव्हा त्या बोलतो तेव्हा योग्य वेळ निघून गेलेली असते.

आपण न बोलण्याची कारणं आपल्याला माहित असतात ..कारण आपण जर काही बोललो तर त्यावरून कितीतरी मोठी सुनामी येऊ शकेल याची आपल्यालाच कल्पना असते आणि म्हणून आपण काहीच बोलत नाही. ओठ दाबून गप्प बसतो आणि अपने होठोंपर जो बात होती है वो कभी जुबां पर नहीं आती….!!!

“कुछ कहने पे तूफान उठा लेती है दुनिया
अब इस पे कयामत है के हम कुछ नहीं कहतें”

म्हणूनच बोलते व्हा…. बोलत रहा… मनात कुठलाही कचरा साठवून ठेवू नका….

“होठों में ऐसी बात…. होंठों में ऐसी बात मैं दबाके चली आयी
खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई
हां रे हां बात जिसमे प्यार तो है जहर भी है हाय ..”

राजश्री सतीश शिरोडकर
कोल्हापूर 30.01.2024

राजश्री सतीश शिरोडकर, कोल्हापूर या लेखिका,
मोटिव्हेटर, अनुवादिका आणि ट्रेनर आहेत.
त्यांनी बरीच वर्षे मानसशास्त्र व इतिहास या
विषयांची प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.

वाचण्यासारखं आणखी काही…..

कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!

आज घरी यायला एवढा ऊशिर?

प्रेम-काजवा | Love Letter

Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!

TheyWon English

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

One thought on “Expressing | बोलो जी बोलो ये राज खोलो …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *