पक्षीमित्र दीपक शिंदे
9850704294
पक्षीनिरीक्षण:
दीपक शिंदे हे अनुभवी पक्षीनिरीक्षक, पक्षीमित्र आणि एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. या लेखातील सर्व फोटो दीपक शिंदे यांनी काढलेले आहेत.
कोकणातील ओवळी गावच्या पूर्वेस उभ्या ठाकलेल्या सह्याद्रिपर्वताच्या परिसरातील उतरणीवरील रानात, पक्षी निरीक्षण करीत होतो. रानातील वृक्षावरून कुटूर्रगा पक्ष्याचा घुमणारा आवाज दुर- दुर पर्यंत रान गाजवत होता. वाटेत पांढरी-शुभ्र तकतकीत पाच पाकळ्यांची खूपच सूंदर दिसत असणारी रान फुले पाहून, ती फुले पुन्हा-पुन्हा पहातच रहावेसे वाटत होते. अनेक प्रकारच्या रंगी-बेरंगी फुलपाखरांचा थवा माझ्या अवती-भवती भिरभीरत होता. स्वर्गीय नर्तक, बुरख्या हळद्या, सुभग, सोनपाठी सुतार, शिंजीर, निलपरी, तांबट, निलमणी, शिक्रा, पत्रगुप्त, पन्नगाद गरुड, टकाचोर, तांबूला, इ. विविध प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी पाहून मन प्रफुल्लित होत होते.
या घनदाट रानातील वृक्षांच्या पाना-पानातून पक्ष्यांचे छायाचित्र टिपणे म्हणजे एक आव्हानच होते, आणि ते आपल्याच गावात राहून न स्वीकारणे हे मला मान्य नव्हते. आजच ते आव्हान स्विकारण्याची वेळ आली होती. पहाटे लवकर उठून शिकीवले-वाडीच्या मागील नदी ओलांडून दाट रानात शिरलो होतो. कधी तोरणी, करवंदीच्या काटेरी जाळीखालून वाकून, तर कधी पायात गुरफटलेल्या काटेरी वेलींच्या विळख्यातून स्वतःची सुटका करुन घेत पुढे जात होतो.
पक्षीनिरीक्षण
वर रानात वानर हुप- हुप आवाज काढत गर्जत होते. तर कधी पन्नगाद गरुड अधून-मधून किक – किक, किक – किक, कि असा आवाज काढत, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देताना, रानातील शांत वातावरणात नाद भरत होता. मला रानवाट मात्र प्रयत्न करुनही सापडत नव्हती. मी पक्ष्यांच्या आवाजाच्या दिशेने पुढे पाऊल टाकत वाट करीत पुढे सरकत होतो.
पन्नगाद गरुड मला झाडीतून, वर डोंगर उतारावर असलेल्या एका कमी पानाच्या वृक्षावर दिसत होता, मी त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी आतुर झालो होतो. पण उंच झाडीतून व सकाळच्या धुरकट वातावरणात तो गरुड मला स्पष्ट दिसत नव्हता. तरी तो माझ्या पावलांच्या आवाजाने उडून जाईल, म्हणून मी त्याचा एक फोटो टिपून ठेवला. मी पुढे पाऊल टाकताच पायाखालील पाल्या-पाचोळ्याच्या आवाजाने तो उडत दुर निघून गेला. मी निराश झालो.
उन्हाची तिरीप वाढू लागली. पण रानातील झुडूपांची पाने मात्र पहाटे पडलेल्या धुक्यामुळे ओली होती. जवळच एका अर्धवट अशा, वाळलेल्या ऐनाच्या झाडाच्या फांदीवर, सोनपाठी सुतार पक्षी चोच आपटून ठोके मारत असताना दिसत होता. तर बुरख्या हळद्या पक्षी, आपल्या पिल्लांना अधून-मधून व्हॅक-व्हॅक, असा आवाज काढत सूचना देत होता.
पक्षीनिरीक्षण
रानात व गावातील परिसरात मला अनेक पक्ष्यांच्या मागील विणीतील नवीन पिलांची प्रजाती आढळून आली. त्यामध्ये टकाचोर, शिंपी, रानभाई, तांबूला, राखी वट्वट्या, राखी धनेश, सुभग, शिंजीर, पत्रगुप्त, ठिपकेबाज कवडा, इ. पक्ष्यांचा समावेश होता.
उन्हाची तिरीप अधिकच तीव्र होत होती. त्यातून वाचण्यासाठी अनेक पक्षी दाट पाने असलेल्या वृक्षाचा आधार घेत होते. तांबूस पंखांच्या हरियल पक्ष्यांच्या जोड्या एका आम्रवृक्षाच्या दाट सावलीत ठिक-ठिकाणी जोडीने बसलेल्या पहावयास मिळत होत्या.
जवळच एक ऐनाचे झाड होते. मी त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता, त्या झाडाचे खोड सांभराने पोखरलेले होते. त्यावर सांभराने आपली शिंगे घासून कायमच्या खुणा करून ठेवलेल्या स्पष्ट दिसत होत्या.
उन्हाचे चटके बसू लागल्याने मी रानातून काढता पाय घेत कसा-बसा खाली उतरत नदीजवळ आलो. मनात पुन्हा सकाळी रानात जाण्याचा निश्चय करीत, घराजवळ येउन ठेपलो.
पक्षीनिरीक्षण
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून, नदीच्या पात्रात असलेले असंख्य लहानमोठे दगड गोटे ओलांडून पाणवठ्याच्या जवळ आलो. समोर व पाठीमागे दाट जंगल होते. रान दाट धुक्याने आच्छादले होते. पूर्वेस समोर उभा ठाकलेल्या सह्याद्री पर्वतावरून सूर्य वर यायला खूपच अवकाश होता. नदी पात्रात मोठ्या दगडाआड बसून पक्षी पाण्यावर कधी येतात, याची वाट पहात होतो. माझ्या जवळच दगड गोट्यांखालून वहात जाणाऱ्या पाण्याचा खळखळाट निसर्गाच्या अस्तित्वात भर घालत होता.
पण बराचवेळ झाला तरी पक्षी काही येईनात. थंडीने खूप गारठून गेलो होतो. काही वेळाने सूर्य वर येत असल्याची चिन्हे दिसू लागली. सह्याद्रीच्या शिखरावर तांबड फुटू लागले होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. काही वेळातच सूर्याची किरणे मागील रानावर पसरली.
पन्नगाद गरुड समोरच्या रानातील वृक्षावरून आवाज देत होता. मला माहीत होते कि, आता हा काही वेळातच हवेत स्वार होईल म्हणून. मला काही करुन त्याचे फोटो मिळवायचे होते. मी तयारीत असतानाच त्याने हवेत भरारी घेतली. तो गरुड अगदी माझ्या डोक्यावरून जाणार होता. मी बसल्याजागी पाठीवर मागे झेपावत, त्याचे फोटो मिळवले.
पक्षीनिरीक्षण
आता उन्हाची ताप वाढू लागली होती. पक्षी हळुहळू पाणवठ्यावर येत असल्याची चिन्हे दिसू लागली. स्वर्गीयनर्तक, निलमणी पक्ष्याबरोबर समोरच्या वेलीवर आपली लांब शेपटी हलवत साद देत होता. हवेत इकडून तिकडे भरारी घेत अखेर तो पाण्यावर आला. त्याच्या पाठोपाठ निलमणी, निलपरि, दयाळ, निखार, मोठा निखार, सुभग, इ. पक्षी येउन पाणी पिता-पिता पाण्यात डुबकीही मारून जात होते.
उन्हाची तिरीप अधिकच तीव्र वाटू लागली. सकाळचे फक्त साढे नऊ वाजले होते. भव्य सह्याद्री पर्वतावरून सूर्य वर यायला उशीर होत असल्याने काही वेळातच उन्हाची तिरीप जाणवू लागते. पक्षीही झाडांच्या दाट पानांमध्ये घुसू लागले.
नदी ओलांडून मी परतत असताना, दुरूनच मला एका आम्र- वृक्षाच्या फांदीवर एक मोठा पक्षी बसलेला दिसत होता. माझी पूर्ण खात्री होती कि, माझ्या डोक्यावरून उडत गेलेला पन्नगाद गरुडच होता तो. मी लगबगीने पाय उचलत, त्या वृक्षावर बसलेल्या सावटावरील नजर न हटविता पुढे जात होतो. जस-जसा जवळ जात होतो, तस-तसे त्या सावजाचे मी फोटो काढतच होतो. मला जे पाहिजे होत ते मी मिळवले होते. मनाला खूप आनंद होत होता. माझ्या प्रयत्नाचे सार्थक झाले होते. कारण मी ज्या गरुडाचे छायाचित्र टिपण्यासाठी आतुर झालो होतो, तोच पन्नगाद गरुड, माझ्यासमोर फांदीवर बसलेला पाहून मन प्रसन्न झाले होते. माझ्या जीवनातील पक्षी निरिक्षणाच्या साधनेतील तो एक विलक्षण क्षणच म्हणावे लागेल.
पक्षीनिरीक्षण
© दीपक शिंदे
वाचण्यासारखे आणखी काही…..
रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा
भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास