महावीर सांगलीकर
सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू होता. अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.
अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.
अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव उपाधी म्हणून देवानाम पियं पियदस्सी असे येते. जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही. शिलालेखात लिहिलेल्या गोष्टी बौद्ध धर्मापेक्षा जैन धर्माला जवळच्या आहेत.
शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत.
समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी अशोकवदन या दुस-या शतकात म्हणजे मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील महावंश आणि 5व्या शतकातील दीपवंश या बौद्ध ग्रंथात येते. हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
अशोकाला त्याच्या जैन राणीपासून झालेला मुलगा म्हणजे कुणाल. अशोकाची एक बौद्ध राणी होती, तिने कुणाल याला कपटाने अंध बनवले होते. अशोकाने आपल्यानंतर कुणालचा मुलगा (म्हणजे अशोकाचा नातू) संप्रती याच्याकडे राज्य सोपवले. संप्रतीने भारतभर जैन धर्माचा प्रचार केला. इथे एक प्रश्न उपस्थित होतो. अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त हे जैन, अशोकाची मुख्य राणी जैन, अशोक आपल्यानंतर आपल्या जैन राणीपासून झालेल्या मुलाच्या मुलाला आपला वारसदार करतो…. असे असताना अशोक मात्र बौद्ध होता हे खरे असू शकत नाही.
अशोकाचे हे तथाकथित बौद्ध धर्मांतर हा इंग्रजांच्या काळात पद्धतशीरपणे तयार करण्यात आलेला एक प्रोपागंडा होता. त्याचा वेगळाच इतिहास आहे, त्या विषयी मी एक वेगळा लेख लिहीन.
हेही वाचा:
TheyWon Online Magazine (English)
TheyWon Online Magazine (Hindi)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
