महावीर सांगलीकर
माझं शालेय जीवन: चिंचवड
सहावी पास झाल्यावर मी चिंचवडला माझ्या काकांच्याकडं आलो. इथल्या प्रसिद्ध अशा फत्तेचंद जैन विद्यालयात मी सातवीत दाखल झालो. म्हणजे प्राथमिक शाळेतून पुन्हा हायस्कुलमध्ये.
माझे काका याच हायस्कुमध्ये शिक्षक होते. ते गणित आणि इंग्रजी शिकवत असत. पण ते शाळेत मला शिकवायला कधीच नव्हते.
आम्ही चिंचवड स्टेशनला राहायचो तर शाळा चिंचवड गावात होती. अंतर सुमारे अडीच किलोमीटर. मी आणि माझे चिंचवड स्टेशनचे वर्गमित्र शाळेला चालत जायचो आणि चालत परत यायचो. कधी कधी बसनं परत यायचो. मधल्या वाटेनं चालत परत येताना वाटेत एक मळा लागायचा. तिथं चिंचेची खूप झाडं होती. आम्ही तिथं बऱ्याचदा चिंचा खायचो. (मुळात चिंचवड हे नाव तिथं चिंचेची आणि वडाची खूप झाडं होती म्हणून पडलं!).
सातवीत असतानाची एक गोष्ट आठवते. माझं एका विद्यार्थ्याशी भांडण झालं. मग मी रडू लागलो. हे कसं काय ठाऊक पण माझ्या काकांच्या कानावर गेले. ते आमच्या वर्गावर आले. आधीच ते एक कडक शिक्षक म्हणून आक्ख्या शाळेत प्रसिद्ध होते. ते आमच्या वर्गावर येताच सर्वजण चिडीचूप झाले. काका गरजले, ‘परत जर याला कुणी त्रास दिला तर याद राखा’. मग ते निघून गेले. त्यानंतर अकरावीपर्यंत शाळेत माझ्या वाटेला कुणीच गेलं नाही!
सातवीत सहामाही परीक्षेत मला सगळ्या विषयात चांगले मार्क मिळाले, पण इंग्रजीत काठावर पास झालो. त्याबद्दल काकांच्याकडून बोलणीही खाल्ली. मग मात्र मी इंग्रजी या विषयाकडं जरा जास्त लक्ष देऊ लागलो. घरी काकू मला इंग्रजी शिकवत असे. काकांनी गोष्टींची इंग्रजी पुस्तके आणून दिली. त्यामुळं माझं इंग्रजी सुधरू लागलं आणि वार्षिक परीक्षेत मी इतर सर्व विषयांबरोबरच इंग्रजीतही चांगले मार्क मिळवले.
माझं शालेय जीवन: चिंचवड
आगगाडी आणि विमानं !
त्यावेळी आम्ही एका चाळीत राहत होतो. रेल्वे स्टेशन घरापासून जवळच होते. रेल्वेगाड्या सारख्या ये जा करत. रेल्वेचा आवाज ऐकला की मी पटकन घराबाहेर पडून रेल्वे लाईनकडं जात असे. लांबूनच रेल्वे पहात उभा रहात असे. वेगानं जाणारी रेल्वे, तिचा धडक धडक आवाज आणि कर्कश शिट्टी हा माझ्यासाठी त्या वयात एक थ्रिलिंग अनुभव असे. काकू मला शोधत यायची आणि परत घरी घेऊन जायची.
चाळीतले सगळे लोक माझ्या काकूला माझी आईच समजायचे.
संध्याकाळच्या वेळी चाळीतली इतर कांही मुलं आणि मी रेल्वेचा खेळ खेळत असू. म्हणजे मी इंजिन बनायचो, आणि इतर मुले माझ्या मागे रांगेत पुढच्याच्या शर्टला हाताने धरत आणि आमच्या रेल्वेचे डबे बनत. मग मी रेल्वेच्या शिट्टीचा आवाज काढत धावायला लागे. इतर मुलंही माझ्या मागोमाग धावायचे.
आकाशात एखादं विमान चाललं की त्याच्या आवाजानं ही मी घराच्या बाहेर धावत असे आणि विमान पहात असे.
माझं शालेय जीवन: चिंचवड
पुढे काकांनी ती चाळ सोडून दिली आणि आम्ही सगळे जवळच गणेश कॉलनी येथे राहायला गेलो. ही कॉलनी चाळवाल्यांच्या दृष्टीने थोडी हाय फाय होती. त्यावेळी मी आठवीत होतो.
आठवीत चौमाही परीक्षेत मी वर्गात पहिला आलो होतो. मी संस्कृत हा विषय घेतला होता. संस्कृतात मला शंभर पैकी अठ्ठयाणव तर गणितात शंभर पैकी शंभर मार्क पडले होते. इंग्रजीत शंभर पैकी साठ मार्क पडले होते. माझ्या वर्गातल्या मुलांना, विशेषतः स्पर्धकांना वाटलं की याचे काका शिक्षक आहेत, त्यांनी याला आधीच प्रश्नपत्रिका दिल्या असतील! पण अर्थातच तस कांही नव्हतं.
माझ्या आजोळचा माझा एक मित्र होता. त्याचं नाव अनिल होते. त्याचे वडील खूप श्रीमंत होते. त्यांनी अनिलला पाचगणी येथील संजीवनी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाठवलं होतं. अनिलनं तिथनं मला एक पत्र लिहिलं होतं. इंग्रजीत. त्यावेळी मीही त्याला इंग्रजीमध्ये उत्तर पाठवलं होतं.
आठमाही परीक्षेतही मी चांगल्या मार्कांने पास झालो. ते 1971 साल होते. 1971 च्या नोव्हेंबर महिन्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे वारे वाहू लागले. सगळीकडे युद्धाचे वातावरण होते. एकदा तर मी विमानाचा आवाज येतोय म्हणून घरातून बाहेर आलो आणि बघतो तर काय लढाऊ विमानांचा एक मोठा ताफा आकाशातून खूप उंचावरून आणि संथ गतीने चालला होता. मी ती विमाने मोजली, चक्क 19 विमाने होती!
मला अवांतर वाचनाची तिसरीत असल्यापासूनच सवय होती. मला युद्धाच्या बातम्या वाचायची, रेडिओवरील बातम्या ऐकायची चटक लागली. अभ्यासाकडं थोडं दुर्लक्ष झालं. पण मी चांगल्या मार्कांनी पास होणार याची मला खात्री होती.
माझं आजारपण
पण वार्षिक परीक्षेच्या आधी मी भयंकर आजारी पडलो. इतका की मला चालता येत नसे, बोलता येत नसे, स्पष्ट दिसत नसे. त्याकाळात काकूनं माझी खूप सुश्रुषा केली. त्यावेळी चिंचवड स्टेशनला डॉ. लोहाडे हे प्रसिद्ध डॉक्टर होते. ते रोज घरी येऊन मला तपासत असत. रोज कमरेत इंजेक्शन देत. इतर औषधे देत. डॉक्टरांना यायला वेळ मिळाला नाही तर काकू मला आधार देऊन डॉक्टरांच्याकडे घेऊन जात असे.
आजारी पडायच्या आधीच्या काळात मला प्रचंड भूक लागत असे. इतकी की मी दुपारच्या जेवणात 12-15 चपात्या खात असे, तरीही माझी भूक भागत नसे!
आजारपणामुळे मला आठवीची परीक्षाच देता आली नाही. पण शाळेनं मला चौमाही आणि आठमाही परीक्षेत मी मिळवलेल्या मार्कांच्या आधारावर पास केले.
पुढच्या काळातही नववी, दहावी आणि अकरावीमध्ये मी हुशार विद्यार्थी म्हणूनच ओळखला जायचो. पण आजारपणाचा परिणाम असा झाला होता की मला भरभर लिहिता येत नसे. माझे हातही थरथरत असत. त्यामुळं मला परीक्षेच्या वेळी पेपर पूर्ण करायला वेळ मिळत नसे. तरीही मी प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कांनी पास होत गेलो. पण परत कांही वर्गात पहिला नंबर मिळवता आला नाही! असो.
माझं शालेय जीवन: चिंचवड
नववीत असताना काका-काकूंना पहिला मुलगा झाला. त्याचं नाव जयदीप ठेवण्यात आलं. आम्ही लाडानं त्याला गोटू म्हणत असू. पुढे मी अकरावीत असताना प्रेमजीतचा जन्म झाला. त्याला लाडानं आम्ही बिटू म्हणत असू. गोटू -बिटू लहानपणी माझ्या अंगाखांद्यावर खेळले, मोठे झाले.
चिंचवडच्या शालेय जीवनात मला भरपूर मित्र मिळाले. त्यातील खास मित्र म्हणजे सुधाकर मेहंदळे, राजेंद्र कुलकर्णी, विलास चिंचवडे, कैलास गावडे, प्रकाश गावडे, भगवान लोहार, राजेंद्र जोशी, मकरंद टोणगांवकर, शशिकांत परांजपे वगैरे. दर रविवारी दुपारी मी सुधाकरच्या घरी अभ्यास करायला जात असे.
अवांतर वाचन
चिंचवडच्या शालेय जीवनात माझे अवांतर वाचन खूपच वाढलं होतं. चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार यांची बहुतेक सगळी पुस्तके वाचून झाली होती. याशिवाय मी इतर अनेक लेखकांची अनेक पुस्तके वाचली. जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथा वाचल्या. भालबा केळकर यांनी केलेला शेरलॉक होम्सच्या कथांचा मराठी अनुवाद वाचला. ‘अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक कथा’ (अरेबियन नाईट्स) वाचल्या. चांदोबाचे मराठी आणि इंग्रजी अंक वाचले. याशिवाय दिवाळी अंकही खूप वाचले.
पण याशिवाय मी कांही पुस्तके गुप्तपणे वाचत असे. ही पुस्तके म्हणजे रहस्यकथा. गुप्तपणे वाचण्याचं कारण म्हणजे त्याकाळात साहित्याचा हा प्रकार रद्दड समजला जात असे. मी रहस्यकथांची अक्षरश: शेकडो पुस्तके वाचली. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे त्यावेळचे आवडते रहस्य कथाकार. माझा मित्र कैलास गावडे यालाही रहस्यकथा आवडायच्या. त्यानं मला रहस्यकथांची 50-60 पुस्तके गिफ्ट म्हणून दिली होती. ही पुस्तके मी लपवून ठेवत असे. पण पुढे काकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी ही सगळी पुस्तके जप्त केली!
माझे काका एक शिक्षक होते पण त्याबरोबरच त्यांना फोटोग्राफीचीही आवड होती. फोटोग्राफीचं त्यांचं ज्ञान अप टू डेट होतं. त्यांच्याकडं फोटोग्राफीची अनेक अमेरिकन आणि ब्रिटिश पुस्तकं असायची. अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या Modern Photography आणि Popular Photography या प्रसिद्ध मासिकांचे लेटेस्ट अंक त्यांच्याकडे असायचे. ही पुस्तकं आणि मासिकं ते पुण्यात कॅम्पमधील एखाद्या दुकानातून अथवा मुंबईत फोर्टमधून मिळवत असत. ही सगळी पुस्तकं आणि मासिकं मी वाचून काढत असे.
माझं शालेय जीवन: चिंचवड
काकांच्या संग्रहात Encyclopedia of Photography हे एक मोठं पुस्तक होतं. ते मी पूर्ण वाचून काढलं. त्यातून मला फोटोग्राफीचा इतिहास, फोटोग्राफीत नवीन शोध लावणाऱ्या व्यक्ती, कॅमेऱ्याची रचना, कॅमेऱ्याचे प्रकार, विविध प्रकारच्या लेन्सेस, स्टुडिओची रचना, डार्करूमची रचना, फोटोग्राफीत लागणारे केमिकल्स, फॉर्म्युले, इतर मशिनरी अशा शेकडो विषयांची माहिती मिळत गेली. या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या वाचनातून माझा झालेला आणखी एक फायदा म्हणजे माझं इंग्रजी आणखी सुधरत गेले.
काकांच्या संग्रहात इतरही अनेक विषयांची मराठी आणि इंग्रजी पुस्तकं असत. त्यात मेझमेरीझम, हिप्नॉटिझम, मॅजिक, तर्कशास्त्र, रेडिओ, इलेकट्रीकल्स, इलेकट्रोनिक्स असे विषय असत. मला वाचनाची प्रचंड आवड असल्यानं काकांच्या संग्रहातली सगळीच पुस्तके मी वाचून काढत असे. विशेष म्हणजे काका हौस म्हणून हिप्नॉटिझम करत असत. त्यांनी एकदा आमच्या शाळेच्या कबड्डी टीममधील खेळाडूंवर हिप्नॉटिझमचा प्रयोग केला होता, त्यामुळं ती टीम सहजपणे जिंकली. काकांनी एकदा माझ्यावर देखील हिप्नॉटिझमचा प्रयोग केला होता, त्यामुळं माझं अक्षर चांगलंच सुधारलं होतं.
शालेय जीवनात भरपूर आणि चौफेर वाचन झाल्यानं माझ्या डोक्यात माहितीचा प्रचंड खजिना जमा झाला.
आमचे शिक्षक
या पूर्ण शालेय जीवनात माझ्यावर एकाही शिक्षकाचा मोठा असा प्रभाव पडला नाही. बहुतेक शिक्षकांची तर मी नावं देखील विसरून गेलो आहे. नाही म्हणायला आम्हाला साठे नावाचे एक सर होते. मी 10 वीत असताना आम्हाला इंग्रजी शिकवत. त्यांचं इंग्रजीच ज्ञान फारच पुढचं होतं. त्यामुळे ते माझ्या लक्षात आहेत. आमच्या शाळेचे प्रिन्सिपॉल सी.एन. शहा होते. ते आम्हाला शिकवायला कधीच नव्हते. त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं. त्यामुळे तेही माझ्या लक्षात आहेत.
माझ्यावर मोठा प्रभाव पडला तो माझ्या काकांचा. अप टू डेट ज्ञान मिळवणं, तर्क वापरणं, मुक्त विचार करणं, परफेक्शनिस्ट बनणं, चौफेर वाचन करणं, इंग्रजी वाचणं, उच्च दर्जाचे विनोद करणं अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. मला वाचनाची आवड काकांच्याकडं यायच्या आधीपासूनच होती, पण काकांच्यामुळे या आवडीला मोठं खतपाणी मिळालं. तसंच इंग्रजी पुस्तकं आणि मासिकं वाचण्याची मोठी संधी मिळाली.
आज मी मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लिखाण करू शकतो त्याचं मूळ माझ्या चौफेर वाचनातून आलेल्या चिंतनप्रक्रियेमध्ये आहे.
माझं शालेय जीवन: चिंचवड
वाचण्यासारखं आणखी काही…..
माझं शालेय जीवन: तासगाव आणि समडोळी
Education| कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!
रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
काकांनी घडवलेली मुलं अयशस्वी होत नाही.