महावीर सांगलीकर
पत्रमैत्रिण भाग 2 (पत्रमैत्रिण या लघुकथेचा दुसरा भाग)
आज दिशाचं पत्र येईल असा माझा अंदाज होता आणि खरंच दुपारच्या वेळी पोस्टमननं आणून दिलेल्या पत्रांच्या गठ्ठ्यात तिचं पत्र होते. मी ते पाकीट अधीरतेने उघडलं आणि वाचू लागलो. पहिल्या पत्रात मला Dear Mr. Sanglikar म्हणणाऱ्या, दुसऱ्या दोन पत्रात Mr. Sanglikar म्हणणाऱ्या दिशानं या पत्राची सुरवात चक्क Dear Mahaveer अशी केली होती. ते दोन शब्द वाचताना मनाला मोरपिसांचा स्पर्श व्हावा तशी माझी अवस्था झाली.
प्रिय महावीर,
शेवटी लिहिले एकदाचे पत्र तुम्ही मला. माझा तुमच्यावरचा राग क्षणात नाहीसा झाला. तुमचे हे पत्र म्हणजे तुम्ही काय चीज आहात हे दाखवणारा एक पुरावाच आहे. पत्रात तुम्ही पेरलेले सूक्ष्म विनोद फारच छान.
‘तुझे अक्षर फारसे चांगले नसले तरी माझ्या अक्षरांपेक्षा खूपच चांगले दिसते. बुद्धिमान माणसांचे अक्षर चांगले नसते असे म्हणतात, त्यामुळे माझे(ही) अक्षर वाईट झाले असावे.‘ हा विनोद लई भारी. यातून तुम्ही माझे अक्षर फारसे चांगले नाही असा टोमणा मला मारता मारता ते तुमच्या अक्षरापेक्षा चांगले आहे असे म्हणत एकीकडे माझे कौतुक केले आहे, पण पुढच्याच वाक्यात तुमचे अक्षर चांगले नाही याचा अर्थ तुम्ही बुद्धिमान आहात असे स्वत:ला म्हणवून घेतले आहे. कळस म्हणजे तसे स्पष्ट न म्हणताही तुम्ही मी फारसी बुद्धिमान नाही हे दाखवले आहे. पण तसं नाही, नाहीतर मला हा तुमचा विनोद आणि टोमणा कसा काय कळाला असता?
‘माझ्याकडे फोन नाही. शेजाऱ्यांकडे आहे, पण ते शेजारी असल्याने माझे त्यांच्याशी फारसे पटत नाही.‘ हा विनोदही भारीच. असे विनोद पेरण्यात तुमचा उद्देश कदाचित माझी आकलन शक्ती मोजणे हा असावा.
तुमच्या पत्रात मी, मला, माझे हे शब्द अनेकदा आले आहेत. यावरून तुमच्यात बऱ्यापैकी मीपणा दिसतो. असो.
मैत्रीसाठी तुम्ही मला ज्या अटी घातल्या आहेत त्या मान्यच. मलाही फालतूपणा आवडत नाही, आणि तुमच्याशी मैत्री करण्यामागे माझा उद्देश वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे हाच आहे.
पत्रांची उत्तरे न देण्याचे कारण म्हणजे अशा पत्रव्यवहारातून पत्रमैत्री सुरू होते आणि पुढे ती नको त्या दिशेने फुलत रहाते, असे तुम्ही लिहिले आहे. यावरून तुमचा याबाबत बराच पूर्वानुभव दिसतो.
माझी सुखदु:खे… सध्या त्याबद्दल न बोललेलेच बरे.
मी सध्या फारसे कांही करत नाही. ठरवेन सावकाश काय करायचे ते.
आपली,
दिशा
+++
पत्रमैत्रिण भाग 2
अशा प्रकारे दिशा आणि माझ्यात पत्रव्यवहार सुरू झाला. मला तिची दर आठवड्याला किमान दोन तरी पत्रे यायची. मीही तिला लगेच उत्तर द्यायचो. ती अनेक विषयांवर अधिकारवाणीने लिहायची. खगोलशास्त्र, विज्ञान, धर्म, तत्वज्ञान, संगीत, साहित्य वगैरे. त्या विषयांवर ती मला कांही शंका, प्रश्न विचारायची. ज्यांची उत्तरे मला माहीत असायची, ती मी द्यायचो, पण जर उत्तर माहीत नसेल तर मला वेळ मारून न्यावी लागे. पुढे पुढे तर तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही, तूच अभ्यास करून मलाही उत्तर सांग असे लिहून मी माझे अज्ञान मान्य करायला शिकलो.
मला खगोलशास्त्राचे बऱ्यापैकी ज्ञान होते, पण ती मला माहीत नसलेल्या अनेक नव्या गोष्टी सांगायची. एकदा तिने लिहिले, आपल्या आकाशगंगेभोवती 60 छोट्या आकाशगंगा फिरतात. त्यातील अँड्रोमेडा ही आकाशगंगा सर्वात मोठी असून ती आणखी कांही अब्ज वर्षांनी आपल्या आकाशगंगेत मिसळून जाणार आहे.
तिच्या बहुतेक पत्रात एखादे puzzle असायचे. ती ते सोडवायचे मला आव्हान देत असे. कोडी सोडवण्याचा मला जाम कंटाळा. त्यामुळे मी कसलाही प्रयत्न न करता शरणागती पत्करायचो. ‘सुटत नाही. तूच सांग आता त्याचे उत्तर’ हे माझे ठरलेले उत्तर असयाचे. मग ती विजयी झाल्याच्या थाटात ते कोडे उकलून दाखवत असे.
कधी कधी तिची कोडी फारच बाळबोध असत. एकदा तिने विचारले, ‘प्रश्न यह है कि उत्तर क्या है’. पुढे हिंट दिली होती, ‘उत्तर माझ्यात शोधा’. ‘उत्तर एक दिशा है’ हे मला आधीच माहीत होते, तरीही मी नेहमीप्रमाणे ‘मला येत नाही, तूच सांग’ असे लिहिले. पुढच्या पत्रात ती म्हणाली, ‘मला शंका येतेय. तुम्हाला सगळ्या कोड्यांची उत्तरे येत असावीत पण तुम्ही मुद्दाम ती येत नसल्याचे दाखवता’. तिचे हे म्हणणे पूर्ण नाही, पण बरंचसं खरंही होतं.
मग एका पत्रात तिनं लिहिले, मला तुम्हाला भेटायचे आहे. Please…. तुम्ही मुंबईला आलात की मला भेटायला या. जर मुंबईला येणार नसाल तर मी पुण्याला येते. पण मला तुम्हाला भेटायचेच.
तिची ही मागणी मला मुळीच मान्य नव्हती. मी तिला समजावून सांगणारे एक पत्र लिहिले:
मला माहीत आहे की आपण मैत्रीच्या पलीकडे पोहोचलो आहोत. कधी कधी मलाही वाटतं की तुला भेटावं, पण मी तो विचार लगेच झटकून टाकत असतो. आपलं काय ठरले होते? आपण आयुष्यात कधीच भेटायचे नाही असं. कितीही भेटावंसं वाटलं तरी. तू मान्य केलेली गोष्ट तुला पाळावीच लागेल.
तिचं उत्तर आलं, ‘पण का? का नाही भेटायचे? आपण जे ठरवले होते, ते दोघेही मिळून रद्द करूया आणि भेटूया. निदान एकदा तरी’.
माझं परत उत्तर, ‘नाही, मुळीच नाही. आणि आता तर तुला न भेटण्यामागं माझ्याकडं आणखीही मोठी कारणं आहेत. एकतर तू मोठ्या घरची लेक आहेस. तुझ्यापुढं मी एक सामान्य माणूस आहे. आपली कोणत्याही बाबतीत बरोबरी होवू शकत नाही. या जगात प्रेमाबरोबरच व्यवहारही पाहिला पाहिजे. प्रेम म्हणजे सर्व कांही नव्हे. त्यामुळं पुन्हा मला भेटण्याचा आग्रह करू नकोस. आपण पत्रमित्र झालो, आपली मैत्री देखील व्हर्च्युअलच आहे. त्याच्यापुढे आपल्याला जायचे नाही. आपण एकेमेकांसाठी व्हर्च्युअल रहाण्यातच शहाणपणा आहे.”
या पत्रामुळे दिशा थोडी नाराज झाली. तिनं लिहिलं, ‘जशी तुमची मर्जी. तुम्हाला भेटायचा विचार मी मोठ्या मुश्किलीने मनातून काढून टाकला आहे. तुम्ही तुमच्या आणि माझ्या परिस्थितीची मोकळेपणाने तुलना केली तिचे कौतुकही वाटले आणि ती खटकली देखील. पण तुम्ही मला ओळखण्यात कमी पडला आहात मिस्टर सांगलीकर. तुम्ही स्वत:लाही नीट ओळखलेलं नाहीत असे मला वाटते. असो.
आपली कधी ना कधी, कुठे ना कुठे, या जन्मात नाही तर पुढील जन्मात, या जगात नाही तर दुसऱ्या जगात गाठ पडेल अशी मला आशा वाटते..
आता आपण काय करायचे? पत्रव्यवहार असाच चालू ठेवायचा का? की आपण आता एकमेकांना विसरून जायचे? मी तर तुम्हाला विसरू शकत नाही, तुम्हाला काय करायचे हे तुम्हीच ठरवा.’
तिच्या या पत्राला काय उत्तर द्यायचं ते मला कळेना. शेवटी I am sorry, but I can not help you’ असं कांहीतरी लिहिलेलं एक पात्र मी तिला पाठवलं.
पुढं तिची पत्रं यायचं कमी-कमी होत गेलं. नंतर तर ती पूर्णच बंद झाली. त्याचं मला विशेष कांही वाटलं नाही.
पत्रमैत्रिण भाग 2
मला क्वचित कधीतरी दिशाची आठवण होत असे. त्यावेळी मग मी तिची जपून ठेवलेली पत्रं वाचून काढत असे.
2001 ची दिवाळी जवळ आली होती होती. त्यावेळी स्टुडीओची साफ सफाई करताना मनात विचार आला, ‘अजून किती दिवस आपण दिशाची पत्रे जपून ठेवणार? वाचत रहाणार? आत्तापर्यंत तिचं लग्न झालेलं असेल. तेंव्हा आपले हे वागणं बरं नाही’. असा विचार करून मी तिची सगळी पत्रं जाळून टाकली.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यादिवशी मी Times of India घेतला. तो चाळत असताना त्याच्यात मला दिशानं लिहिलेला एक लेख दिसला. तो लेख वाचावा अशी माझी इच्छा झाली नाही, तरीही मी त्यावर एक नजर टाकली. लेखाच्या शेवटी तिचा परिचय Disha is a freelance writer असा दिला होता.
दिशाची पत्रं जाळणं आणि दुसऱ्याच दिवशी तिचा लेख पहाणं या गोष्टी इतरांना केवळ योगायोग वाटल्या असत्या, पण माझ्या मनानं पटकन निष्कर्ष काढला, आपली एकेकाळची ही पत्रमैत्रीण पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात येणार आहे. अगदी स्वत:हून. मला असं वाटण्याचं कारण म्हणजे मी त्याकाळी विविध गूढ विद्यांचा बराच अभ्यास केला होता, आणि कधी-कधी मला पुढच्या काळाशी संबंधीत अस्पष्ट का होईना, पण पूर्वसूचना मिळत असत.
मी ठरवलं, सध्या याचा जास्त विचार करायला नको. जे होईल त्याला सामोरे जायचे. आपली भूमिका पूर्वीसारखीच ठेवायची. No Involvement…. आणि भेटायचं नाही तिला.
पुढं मी ही गोष्ट विसरूनही गेलो.…..
पुढे चालू …..
वाचण्यासारखा आणखी लघुकथा…..
Love Talk: मैं तुमसे प्यार नहीं करती ……
प्रेमकथा: लव्ह जिहाद | Love Jihad
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
12 thoughts on “लघुकथा: पत्रमैत्रिण | Pen Friend (भाग 2)”