महावीर सांगलीकर
पत्रमैत्रिण ही लघुकथा माझ्या दिशाची गोष्टया दीर्घकथेचा पहिला भाग आहे. ही माझ्या आयुष्यात घडलेली सत्यकथा आहे आहे. विचित्र आणि अनपेक्षित घटनांनी भरलेल्या या दीर्घकथेत मुलीचं नाव बदललं आहे.
पत्रमैत्रिण
ते 1991चं वर्ष होतं. त्यावेळी इंटरनेट, मोबाईल फोन या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. फोन हा प्रकारही त्याकाळी फार मोठ्या प्रमाणात दिसत नव्हता.
त्यावेळी माझ्या काकांचा एक फोटो स्टुडीओ होता. तो मीच चालवत असे. दुपारच्या वेळी सहसा कोणी फोटो काढायला येत नसे. त्यामुळं तो वेळ वाचन, लेखन यात जात असे. शिवाय त्या काळी मी एक छोटे इंग्रजी मासिक चालवत असे. त्या काळात मला खूप पत्रं येत असत. देशातून आणि परदेशातूनही. ती पत्रं वाचणंं, त्यातील कांहीची उत्तरं देणंं यात मस्त वेळ जात असे.
पहिलं पत्र ….
एके दिवशी नेहमीप्रमाणंं 12 वाजण्याच्या सुमारास पोस्टमन आला. त्यावेळी मी डार्करूममध्ये होतो. ‘सांगलीकर, पत्रे…’ असा आवाज देवून तो निघून गेला. मी बाहेर येवून बघतोय तर काउंटरवर पत्रांचा भला मोठा ढीग पडलेला. पाकिटं, पोस्टकार्डं, अंतर्देशिय पत्रं, परदेशातनं आलेली पत्रं, शिवाय नियतकालिकं…..
त्यातल्या एका पाकिटावर माझी नजर खिळली. त्याच्यावरचं अक्षर एखाद्या मुलीचं आहे हे मी लगेच ओळखलं होतं! पत्रावरचा पोस्टाचा शिक्का बघितला, तो मुंबईचा होता. बाकी सगळी पत्रं बाजूला ठेवून ते पाकीट मी हातात घेतलं. उघडलं. ते इंग्रजीत लिहिलेलं एकपानी पत्र होतं. पत्राची सुरवात Dear Mr. Sanglikar अशी होती. पत्राचा सारांश असा होता:
गेल्या आठवड्यात मी अहमदाबादला गेले असताना तिथं एका प्रदर्शनात तुमचं मासिक पाहिलं. अशा प्रकारचं, वेगळी माहिती देणारं मासिक मी पहिल्यांदाच पाहिलं. ते मला फार आवडलं. त्याची
वर्गणी मी मनीऑर्डरनं पाठवत आहे.
मला तुमच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायची आहे. मला धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान या
विषयांची खूप आवड आहे. या विषयांच्या संदर्भात मला अनेक प्रश्न पडतात. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळतील असं मला वाटतं.
मासिक चालवण्याबरोबर तुम्ही आणखी काय करता? तुमचे छंद काय-काय आहेत? तुम्हाला कोण-कोणत्या भाषा येतात? तुमचं वय किती आहे? तुम्ही कधी मुंबईला येता का?
या पत्राचं उत्तर लवकरात लवकर द्यावे ही विनंती. वाट पहात आहे. तुमचा फोन नंबर कळवावा.
-दिशा
पत्रातील भाषाशैलीवरून ती मुलगी इंग्रजी मेडियममध्ये शिकलेली असावी याचा मला अंदाज आला. ते पत्र मुंबईतील उच्चभ्रू भागातून आले होते.
दुसऱ्या दिवशी तिनं पाठवलेली मनीऑर्डरही मिळाली. मी लगेच तिच्या पत्त्यावर माझ्या मासिकाचा लेटेस्ट अंक पाठवून दिला. पण का कुणास ठावूक, मला तिच्या पत्राचं उत्तर द्यावं असं वाटलं नाही. माझ्या सुप्त मनानं त्या मुलीला एक वर्गणीदार म्हणूनच वागवायचं ठरवलं असावं.
पत्रमैत्रिण
दुसरं पत्र
पुढच्याच आठवड्यात तिचं पुन्हा पत्र आलं.
Mr. Sanglikar
आपण पाठवलेला अंक मिळाला. धन्यवाद. पण तुम्ही माझ्या या आधीच्या पत्राचं उत्तर दिलं नाही. कृपया उत्तर द्यावं.
या पत्राचंही मी उत्तर दिलं नाही.
एखाद्या व्यक्तिची आपण दखल घेतली नाही तर ती व्यक्ति चिडू शकते. या मुलीचंही तसंच झालं. कांही दिवसातच तिनं मला एक खरमरीत पत्र पाठवले.
तिसरं पत्र
Mr. Sanglikar,
हे माझं तिसरं पत्र. या आधी मी तुम्हाला दोन पत्रे पाठवली, पण तुम्ही त्यांची उत्तरं दिली नाहीत. तुम्हाला तुमच्या वाचकांची किम्मत दिसत नाही. ही कांही चांगली गोष्ट नाही. माझ्या पत्राला निदान चार ओळींचं तरी उत्तर द्यावं तुम्हाला का वाटत नाही? जर तुम्हाला माझ्या पत्रांची उत्तरे द्यायची नाहीत तर राहू द्या, मलाही आता तुमच्या मासिकाचं वर्गणीदार राहायचं नाही. तुम्ही पाठवलेला अंक मी परत पाठवत आहे. कृपया मी भरलेली वर्गणी मला ताबडतोब परत पाठवून द्यावी.
हे पत्र वाचून मला धक्काच बसला. तिच्या पत्रांची उत्तरं न दिल्यानं तिचं मन दुखावलं गेलं याचं मला वाईट वाटलं. पण माझ्या अशा वागण्याला माझा नाईलाज होता. नसते उद्योग मला नको होते. तिनं वर्गणी परत मागवली याचा मला एक प्रकारे आनंदच झाला. मी ताबडतोब पोस्टात गेलो आणि मनीऑर्डरनं तिचे पैसे परत पाठवून दिले. सुटलो बुवा त्या मुलीच्या तावडीतून अशा आनंदात माझे पुढचे तीन दिवस गेले.
पण चार दिवसांनी मी तिला पाठवलेली मनीऑर्डर परत आली. तिच्यावर Rejected असा शेरा होता.
कमाल आहे.. तिनं स्वत:च वर्गणी परत मागितली आणि ती तिला परत पाठवल्यावर रिजेक्ट करते…. सगळंच विचित्र. आता तिच्या पत्रांची उत्तरं दिली नाहीत म्हणून तिनं एवढे चिडायचं काय कारण आहे? ही मुलगी अशी विचित्र का वागतेय?
पत्रमैत्रिण
चौथं पत्र
दुसऱ्या दिवशी तिचं आणखी एक पत्र आलं. ते उघडून वाचावे की नको या विचारात मी पडलो. शेवटी न रहावून मी ते पाकीट उघडले. पत्रात तिनं माझी माफी मागितली होती. वर्गणी परत मागितल्याबद्दल. तिच्या मागणीनुसार मी खरंच वर्गणी परत पाठवली याचा तिला धक्का बसला होता. तिला वाटलं होतं की निदान वर्गणी परत मागितल्यामुळं तरी मी तिला पत्र लिहीन. पत्राच्या शेवटी तिनं कळकळीची विनंती केली होती… मला एकदा तरी पत्र लिहा.. Please….

एव्हाना ती मुलगी एकाकी पडलेली, भावूक, उदास आणि दु:खी आहे, समजून घेणाऱ्या मित्राच्या शोधात आहे हे मी समजून चुकलो होतो. आपण तिच्याशी फारच कठोरपणं वागलो आहोत याचीही मला जाणीव झाली होती. त्या मुलीला पत्र लिहून तिची माफी मागणं गरजेचं आहे, तसं केलं तरच तिच्या आणि माझ्या डोक्यावरील ओझं कमी होईल असं मला वाटू लागलं.
पत्रमैत्रिण
माझं पहिलं उत्तर
तिची आधीची पत्रं मी पुन्हा वाचून काढली. मग एका फूल्स स्केप कागदावर तिला एक पत्र लिहायला घेतले. वरच्या बाजूला माझा पत्ता लिहिला. आता सुरवात काय करावी बरं? चला, आता मैत्री करायचीच आहे तर परकेपणा कशाला दाखवायचा? म्हणून मी पत्राची सुरवात Dear Disha अशी केली.
प्रिय दिशा,
मी तुझ्या पत्रांची उत्तरे दिली नाहीत याबद्दल तुझी क्षमा मागतो. पत्रांची उत्तरे न देण्याचे कारण म्हणजे अशा पत्रव्यवहारातून पत्रमैत्री सुरू होते आणि पुढे ती नको त्या दिशेने फुलत रहाते. असे होतेच. मला कोणत्याही मुलीमध्ये भावनिक दृष्ट्या गुंतून जायचे नाही. त्यामुळे मुलींच्या पत्रांना मी उत्तरे देत नाही.
पण तुझ्या बाबतीत माझ्याकडून चूक झाली असे मला वाटू लागले आहे. तुझ्याशी मैत्री करायला मला आवडेल. अपवाद म्हणून. पण फक्त मैत्रीच, तीही केवळ पत्रानेच. आपण आयुष्यात कधीच भेटायचे नाही. कितीही भेटावेसे वाटले तरी. शिवाय नो फालतूपणा. आपण केवळ आपल्या आवडीच्या विषयावर आणि शक्यतो गंभीरपणे लिहायचे. तशी तू हलकी-फुलकी चेष्टामस्करी करू शकतेस, पण अति नको. तुझी सुख-दु:खे तू मला सांगू शकतेस.
तू लिहिले आहेस, तुमचे वय किती आहे? तुम्ही कधी मुंबईला येता का? तुमचा फोन नंबर कळवावा…. वगैरे.
सध्या माझे वय 32 वर्षे आहे. आपल्या वयात थोडे अंतर असावे असे वाटते, पण तू माझ्यापेक्षा फार लहान नसावीस असेही वाटते. शिवाय मैत्रीमध्ये वयाचा काय संबंध? असो.
मी मुंबईला बऱ्याच वेळा येत असतो, आणि तू मुंबईच्या ज्या भागात रहातेस तिकडेही येत असतो, पण मी तुला भेटायला येईन अशी मुळीच अपेक्षा ठेवू नकोस. माफ कर, माझ्याकडे फोन नाही. शेजाऱ्यांकडे, पण ते शेजारी असल्याने माझं त्यांच्याशी फारसं पटत नाही. त्यामुळे मी तुला त्यांचा नंबर देवू शकत नाही. शिवाय फोनवर कशाला बोलायचं? पत्र लिहिण्यात, त्याच्या उत्तराची वाट पहाण्यात आणि आलेले पत्र वाचण्यात जो आनंद आहे तो फोनवर मिळणार आहे का? असो.
पत्रमैत्रिण
तुझं अक्षर फारसं चांगलं नसलं तरी माझ्या अक्षरांपेक्षा खूपच चांगलं दिसते. बुद्धिमान माणसांचं अक्षर चांगलं नसतं असं म्हणतात, त्यामुळे माझं(ही) अक्षर वाईट झालं असावे.
तू काय करतेस? जाणायला आवडेल.
आजवर तुझं पत्र येईल की काय याची भीती वाटत असे, आता मात्र मी तुझ्या पत्राची आतुरतेनं वाट पहात आहे. मला वाटतं आजपासून चार-पाच दिवसात मला तुझं पत्र मिळेल. त्याच्या आधी मिळालं तर विशेष कांही नाही, पण उशीरा मिळालं तर ते एक आश्चर्यच.
-महावीर
पत्र पूर्ण करून मी पोस्टाच्या पेटीत टाकले आणि माझे बाकीची कामे करायला मोकळा झालो.

पुढे चालू: लघुकथा: पत्रमैत्रिण | Pen Friend (भाग 2)
वाचण्यासारखं आणखी काही ….
Marathi Short Story : अनबिलिव्हेबल दिशा…..
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
खूप छान.. उत्कंठावर्धक कहाणी.आवडली.
आता इतिहासजमा झालेल्या पत्र पेटीचा उल्लेख वाचून आनंद वाटला.तो पत्रांचा काळ खूप छान होता.तो आठवला.