जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage

डॉ. राजेंद्र भवाळकर

सेवेनी (मध्यप्रदेश) येथे आंतरजातीय विवाह झाल्याची बातमी दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे बरीच गाजली.

ह्या आणि अशाच स्वरुपाच्या अनेकविध बातम्या वृत्तपत्रातुन व सोशल मिडियाच्या माध्यमातुन वाचावयास मिळतात. क्राईम डायरी सारख्या कार्यक्रमातुन विविध चँनल्सवर अशा गुन्ह्यांचे रुपांतर करुन ते दाखवलेही जाते. यातुन प्रबोधन, उद्बोधन साध्य व्हायला हवे, परंतु आंतरजातीय विवाह करणारे दांपत्य कितीही सुसंस्कृत अथवा ऊच्चशिक्षित असले तरी त्यांनी फार मोठा गुन्हा केला आहे अशा भावनेतुन समाज त्यांच्याकडे विकृत दृष्टिकोनातुन बघतो असे प्रत्ययास येते.

जातीय विषमतेने पोखरल्यामुळे आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, भावनीकदृष्ट्या एकरुप होऊ शकत नाही हे कटुसत्य आहे. जातीयवादामुळे सामाजिक मानसिक दुर्बलता निर्माण होऊन समाजातील ऐक्य नष्ट होते. पालकांनी पुढाकार घेऊन आंतरजातीय स्थळे पहाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. बरेचसे आंतरजातीय विवाह हे प्रेमसंबधातुन निर्माण होतात. अशा आंतरजातीय /आंतरधर्मीय विवाहांची संख्या वाढली पाहिजे. यामुळे मते, अनेक जाती, अनेक धर्मही एकत्रित व एकरुप होताना दिसतील आणि अनेक कुटुंबात सलोखा निर्माण होऊन त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होण्यास हमखास मदत मिळेल.

भारतातील जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर सर्व समाजाने आंतरजातीय /आंतरधर्मिय विवाहांना ऊत्तेजन देणे गरजेचे आहे. एकमेकांच्या सहवासामुळे,सातत्याने बरोबर राहावे लागल्याने ,काँलेज जीवनात, नोकरीच्या ठिकाणी किंवा निरनिराळ्या सेवाभावी संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणुन काम पहात असताना, स्त्री -पुरुष समानतेच्या जमान्यात एकमेकांबद्दल ओढ,प्रेम आकर्षण न वाटले तर नवलच. अशा वेळी आपण एका अनोख्या विश्वात पाऊल ठेवले आहे हे त्या प्रेमी युगुलांना कळतच नाही व प्रेमाने भाराऊन गेलेल्या अवस्थेत विवाह करण्याचा निर्णयही घेऊन टाकतात. पालकांना या बाबत समजाऊन सांगायला गेले तर आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाला कडाडुन विरोधच केला जातो ही वस्तुस्थिती आहे, शोकांतिका आहे. मग चक्क पालकांच्या नकळत पळुन वगैरे जाऊन विवाह करण्याशिवाय दुसरा मार्गच यांच्याकडे उरत नाही.

वधु वरांच्या जोडीदाराबाबत अपेक्षा लक्षात घेऊन जाती धर्माला महत्व न देता बाकी सर्व बाबतीत वधु वर एकमेकांना अनुरुप आहेत किंवा नाहित,एवढेच पाहुन जर विवाह ठरविण्यास पालकांनी पुढाकार घेतल्यास आंतरजातीय /आंतरधर्मिय विवाहाचे प्रमाण वाढीस लागेल. मुलगा किंवा मुलगी एका विशिष्ट जातीतील असल्यासच ती सुसंस्कारीत असतात अन्यथा नाही, हा समज अद्यापही तसाच आहे. सवर्ण, ऊच्चवर्णीय, ऊच्चजातीय माणसेच सुसंस्कृत असतात असे नाही याचाही विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे.

आंतरजातीय /आंतरधर्मिय विवाह केल्यानंतर होणार्या पुढिल पिढीतील मुला मुलींचे विवाह जमण्यास प्रश्न निर्माण होतात आसा एक समज आहे. परंतु तो चुकीचा आहे.30-40 वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह केल्यानंतर आज ज्यांची अपत्ये विवाहयोग्य वयात आहेत त्यांचे विवाह जातीमध्येच जुळलेले मी पाहिले/अनुभवलेले आहेत. किंबहुना असे विवाह जमविण्यात मी यशस्वी झालो आहे असे मी अभिमानाने म्हणु शकतो. अशा विवाहीत जोडप्यांचा निरनिराळ्या सामाजिक संस्थांनी, रोटरी, लायन्स सारख्या प्रतिष्ठित सेवाभावी संस्था़नी जर गौरव, सत्कार घडऊन आणला तर असा विवाह करु इच्छिणार्यांची संख्याही वाढलेली दिसेल. समाजकल्याण खात्यामार्फत असा विवाह करणार्यांना प्रोत्साहन म्हणुन संसारोपयोगी साहित्य देण्याचा अनुदान देण्याचा प्रघात, सुविधा आहेच.

विवाहाचे संस्कार घडविताना आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाह करताना कोणत्या जाती धर्मातील संस्कारानुसार विवाह संपन्न करायचा, हे ठरवणेही अवघड होऊन बसते. त्यासाठी काहीतरी तोडगा काढता आला पाहिजे. विवाह नोंदणीच्या शासकीय फाँर्ममध्ये धर्म हा रकाना आहे तो काढुनच टाकायला हवा. जात व धर्मावरुन वादविवाद नको असतील तर त्याचा ऊल्लेख फाँर्ममध्ये करण्याचा आग्रह का आसावा?

दोन भिन्न धर्मियांना हिंदु विवाह पद्धतीने विवाह करता येत नाही. वधु किंवा वर दोघांपैकी जो हिंदु नाही त्याने हिंदु धर्म धर्मांतर करुन स्विकारावा असे कायदा म्हणतो असे ऐकिवात आहे. त्यानंतरच हिंदु विवाहकायद्यानुसार नोंदणी करता येते. नाहीतर नोंदणी पद्धतीने विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह करावा लागतो.हा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आहे असे मला पामराला वाटते. या बाबत समाजातील सर्वच थरातील व्यक्तींचे प्रबोधन व्हायला हवे असे सुचवावेसे वाटते.

मुला मुलींच्या पालकांनी वधु वर सुचक मंडळातुन नाव नोंदविताना अपेक्षा लिहिताना व्यक्त करताना फारच क्वचित आंतरजातीय स्थळे चालतील असे ऊल्लेखलेले आढळते. इतकेच नाही तर आंतरजातीय स्थळे चालतील परंतु अमुक अमुक जातीतील स्थळे सोडून चालतील असा ऊल्लेख केलेला असतो हे कुठेतरी खटकते, हे बदलायला हवे. समुपदेशनाच्या माध्यमातुन मला भेटायला येणार्या पालकांना,मुला मुलींना मी हे यशस्वीपणे समजाऊन सांगु शकतो. किंवा पालकांच्या विरोधात जाऊन परवानगी शिवाय आंतरजातीय /आंतरधर्मिय विवाह केलेल्या मुला मुलींच्या पालकांना समुपदेशनाच्या माध्यमातुन असा विवाह होणे किंवा करणे कसे गैर नाही हे समजावून सांगु शकतो. असे प्रयत्न व्यापक स्वरुपात झाले तर आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाहांना चालना मिळेल, अशा विवाहांचे प्रमाण वाढीस लागेल. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव,बं धुत्व या सारख्या कागदावर असलेल्या संकल्पना प्रत्यक्षात येतील हे निर्विवाद.

डॉ. राजेंद्र भवाळकर हे सामाजिक
कार्यकर्ते आणि समुपदेशक आहेत

आणखी काही …..

गौरी आणि फेस रीडर | Gauri

Raigad | रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

संपुर्ण जगाचे एकच राष्ट्र! One Global Nation