संजय सोनवणी
माझं सुरवातीचं स्ट्रगल
१९७९. मी एफ. वाय. बी. कॉमला होतो. डॉ. अशोक वैद्य यांचा कंपाउंडर म्हणून काम करायचो. नियमित कॉलेज कधी केले नाही. फक्त सेमिनार व परिक्षेपुरता जायचो. पाबळ (तेच मस्तानीचे) येथे रहायचो. कॉलेज राजगुरुनगरला. एसटीचा पास ४० रुपयांत मिळायचा. तेवढे पैसे नसायचेच. त्यामुळे ते कधी शक्य झाले नाही. सेमिनार-परिक्षेला वाळूच्या ट्रकने जायचो.
मी प्रेमात पडलो
डॉ. अशोक वैद्य यांचे एक मित्र होते पुण्याला. कलतारसिंग पंजाबी. त्यांच्याबरोबर एकदा पुण्यात आलो. त्यांच्या घरी गेलो. तेथे भेट झाली पुष्पा पंजाबीशी. तिचा नववीचा रिझल्ट आला होता. उत्साहाने दाखवत होती. मी प्रेमात पडलो.
मी कधी प्रेम व्यक्त केलं नाही. डायरी मात्र लिहू लागलो. पुण्याला मला एकटं येता येणं शक्यच नसायचे. पैसे कोठायत? गेलो तर वैद्यजींबरोबर. आम्ही गप्पा खूप मारायचो. त्या काळात मी रशियन कादंबऱ्या अनेक वाचत असल्याने इंप्रेशन मारायला टॉलस्टॉय ते शोलोखोव यांच्यावरच जास्त बोलायचो. कपडे म्हणाल तर पायजमा व छपरी शर्ट. (त्या शर्टाचीही एक कहाणी आहे.)
आपल्यातल्या न्यूनता माणूस दुसऱ्या अंगाने भरुन काढायचा प्रयत्न करतो म्हणतात… मी माझी अक्कल पाजळायचा उद्योग केला.
ती दहावी पास झाली. तिला अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून अनेक कॉलेजांचे फॉर्म रांगेत उभे राहून आणले. पण प्रयत्न होता सेंट मीराजचा. आणि लागला नंबर सेंट मीराजमध्ये. कारण ती फक्त मुलींची शाळा-कॉलेज वगैरे. किमान संभाव्य स्पर्धकांचा मी असा बालीश बंदोबस्त केला.
अजून तिला मी तिच्यावर प्रेम करतो हे माहित नव्हते. मी सांगायची हिंम्मत करणे शक्य नव्हते.
वर्षामागून वर्षे गेली. मी एम. कॉम. करायला पुण्यात आलो. आधी एका मराठी नंतर हिंदी पेपरमध्ये काम करत शिकत होतो. पगार होता दिडशे रुपये. तेंव्हा खानावळ होती महिना २५० ते ३०० रुपयांची. एक वेळचीच खानावळ लावत महिना ५ रुपये भाड्याचे शनिवार वाड्याजवळील शिक्षकांच्या मुलांच्यासाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये आधी आणि नंतर खुद्द दैनिकाच्याच कार्यालयात राहत होतो.
डॉ. वैद्य पाबळलाच सुटल्याने तिच्या घरी जायला निमित्तही नव्हते. माझ्या मित्रांना पिडत तिच्या इमारतीखाली तासंतास ती दिसेल या आशेने उभा रहायचो.
मी तिच्या घरी जातो …..
एकदा तिच्या घरी जायची संधी मिळवली. माझ्या हाती त्या दिवशी माझी डायरी होती. घरी ती होती. तिची मम्मीही होती. (बाप महाखडूस). गप्पा मारत बसलो. तिने मला अचानक माझी डायरी मागितली. मी काही देईना. तिने घेतलीच. दोनचार पाने उलटली. मी आता जातो जीव कि नंतर असा बसलो. म्हटलो आता खा खेटर. या घरातला आजचा शेवटचा दिवस नि हे शेवटचे दर्शन.
तिचा चेहरा गंभीर झाला. डायरी माझ्या हाती दिली. “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती…” ती म्हणाली. मी गारेगार झालो होतो. मी “येतो…” म्हणून जे सटकलो तो सटकलोच.
आता तिला माझ्या मनात काय आहे हे तर माहित होतेच. माझी आर्थिक स्थिती तर दरिद्र वस्त्रे घालून बसलेली. पण म्हणतात ना… दिल है कि मानता नहीं. मी तिला कॉलेजच्या बाहेर तिष्ठत भेटायचा प्रयत्न करायचो… तर ती झुरळाकडे टाकावा तसा कटाक्ष टाके.
तिच्या मैत्रिणींना माझी दया येई. माझी निष्ठा पाहून तर एक मैतरणी मला म्हणाली, असला लव्हर मला मिळायला हवा होता. (कोणता चित्रपट पाहून आली होती कोणास ठाऊक!) ती काही त्या लायकीची मला वाटलीच नाही, पण मी तिलाच माझा पोस्टवुमन बनवले. माझी प्रदिर्घ (तेवढी मी कथाही लिहित नाही) पत्रे तिच्या माध्यमातून तिला पाठवे. उत्तर कधी आले नाही.
तिच्या वाढदिवसाला तर मी एकदा कॉलेजच्या पत्त्यावर चक्क तार पाठवली. तिच्या मास्तरणीने तिला झाप झाप झापले हे मला नंतर समजले. पण मामला काही केल्या फिट होईना. उलट बिघडला.
सात वर्षं गेली. तोवर माझी काही पुस्तकंही प्रसिद्ध झाली होती. ती आवर्जुन धकधकत्या हृदयाने मैत्रीणीमार्फत पाठवलीही होती. पण तिला त्याचं कसलं कौतूक?
कलाटणी ….
पण १९८६ साल पावलं. माझा प्री-थिसीस इंग्लंडमधील एका विद्यापीठाने स्विकारला आणि मला आशिया खंडातील धर्मांवर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी निमंत्रित केलं गेलं.
माझा जीव तर इकडे. मी कळवळून शेवटचं पत्र लिहिलं. “आता तरी हो म्हण…नाहीतर मी चाललो इंग्लंडला…”
आणि काय चमत्कार…. दुसऱ्या दिवशीच मला उत्तर मिळाले. पहिले उत्तर!
झाले. इंग्लंड रद्द! ती भेटली बाहेर. हृदय तळहातावर ठेवून बोललो. तशी ती भावनिक नाही. पण त्या दिवशी तीही भावूक होती. मी अजून दरिद्रीच होतो. भविष्याची स्वप्ने दाखवायची माझी लायकीच नव्हती.
मी व्यवसायात पडलो ….
नंतर मी व्यवसायात पडलो… जाहिरात व्यवसायात. आणि पैशांचा माझ्याकडे ओघ सुरु झाला. भाड्याच्या सायकलने पुणे पालथे घालणारा मी चक्क एम-५० चा मालक झालो. नंतर फियाटही घेतली. (नंतर माझ्या आयुष्यात सगळ्या अत्याधुनिक कार्स येवून गेल्या).
एम्प्रेस गार्डन हे आमचे संकेतस्थळ बनले. दर सोमवारी आम्ही भेटायचो. हा सोमवार एवढा मित्र-मैत्रीणींत गाजलेला कि अमिता नायडू “Waiting on Monday!” नांवाची कादंबरी लिहिन म्हणत होती.
१९८९ आले. मी तिला एम्प्रेस गार्डनमधुन तिच्या घराच्या जवळ कोपऱ्यावर सोडायला आलो. कसे कोणास ठाऊक कलतारसिंग पंजाबींनी आम्हाला पाहिलं. काही बोलले नाहीत. घरी जाऊन पोरीवर जाळ काढला. ते तिला घेऊन दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयात रिक्षाने आले. प्रशांत पोखरकरांसोबत मी तेंव्हा चित्रपट पहायला गेलेलो. वाचलो. कारण महाराज सुरा बरोबर घेऊन आलेले.
पण नंतर वार्ता समजली. मी हतबुद्ध झालो.
मी आमचे दादाजी उर्फ दिनेश गंगावणेंना कळवले. ते म्हणाले… आलोच! आम्ही भेटलो. आम्ही तिच्या घरावर धाड घालायचा निर्णय घेतला. त्याच सायंकाळी मी आणि दादाजी तिच्या घरात हजर. बापाने मला पाहिले आणि सन्नकण त्यांच्या मुलीच्या थोबाडीत वाजवली.
काही चर्चा करावी अशी स्थिती नव्हती. मी राणीला (हे तिचे घरातील नांव) म्हणालो…”चल…”
एका सेकंदात ती बाहेर पडली. आम्हीही बाहेर पडलो. दार बंद करून बाहेरची कडी लावली. खाली आलो. दादाजींनी रिक्षा करुन दिली. सरळ चिखली गाठली. आईने आम्हा उभयतांना पाहिले. आया मनकवड्या. घरात घेतले. काही विचारत बसली नाही. दादा घरात आले… वेगळे वातावरण पाहून बालसुलभ प्रश्न विचारले… पंचांग काढले… म्हणाले… परवा आळंदीला जावून लग्न लावून टाकु.
तिचा जीव किती भांड्यात पडला मला माहित नाही… पण मला तर स्वर्ग जिंकलो असे झाले होते.
खिशात पैसे नव्हते. पिंपरीला माझे क्लायंट होते. परमानंद झमतानी. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी ड्रावरमधून एक सेकंदात ३,००० रुपये काढून दिले. खरं तर एक मराठी पोरगा सिंधी मुलीशी लग्न करतोय म्हटल्यावर त्यांनी, एकुणातील जातीय/प्रांतवादी स्थिती पाहता मदत नसती केली तरी वाईट वाटलं नसतं. पण केली.
मी घरी येईपर्यंत माझ्या बहिणीचेही पिनाककांत दत्त यांच्याबरोबर प्रलंबित असलेले लग्न आळंदीलाच करायचे ठरलं होतं.
दुधात साखर…
आम्ही घरचे पाचसहा आणि नियोजित वधू-वर एका मालवाहतूक टेंपोत बसून-लटकून आळंदीला पोहोचलो. कोणत्यातरी देवळात आमचं लग्न लागलं. दोन हजार रुपये खर्च आला. दोन लग्नांचा, म्हणजे हजारी एक लग्न पडलं. सायंकाळी आम्ही नव्या भावनिक जगात जायला, नवी आव्हाने घ्यायला सज्ज झालो.
सासरे नंतर मुलगी झाल्यानंतरसुद्धा भेटायला आले नाहीत. सासू तर आईच. मी नसतांना लेकीला भेटून जायची. सासऱ्यांना मी भेटलो लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर!
झमतानींना मी ३००० रुपये परत करू शकलो नाही… म्हणजे त्यांनी घेतलेच नाहीत. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी. त्यांचा फोन आला नाही असा एक वाढदिवस गेला नाही.
हे का सांगत आहे?
प्रेम ही शक्ती आहे. लग्नात तुम्ही किती उधळता याने तुमचे प्रेम किंवा प्रतिष्ठा ठरत नाही. प्रतिष्ठा ही नेक जगूनच मिळते. एकमेकांचे होऊनच मिळते. लग्न करतो म्हणजे आपण एकमेकांना वचन देतो… समाजासमोर! ते वैभव दाखवण्यासाठी नाही. निष्ठा आणि समर्पण दाखवण्यासाठी!
मी नंतर चांगलाच वागलो असे नाही. मी रुढ सामाजिक संकेत धिडकारले आणि प्रेमाचे अद्वितीय आविष्कार भोगले…जगलो… .पण तेही निष्ठेने.. सवंगपणे नाही.
लग्नात तुम्ही किती खर्च करता हे महत्वाचे नाही….तुम्हाला प्रेम करता येते का, निस्सीम मन:पूत जगता येते का… हा खरा प्रश्न आहे!
वाचण्यासारखं आणखी काही …..
जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage
गौरी आणि फेस रीडर (लघुकथा)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
12 thoughts on “माझ्या लग्नाची गोष्ट…| Marathi Love Story”