अँजेलिना बॅण्डची गोष्ट | Angelina

महावीर सांगलीकर

भारतात जन्म झालेल्या पण नंतर जर्मनीत स्थायिक झालेल्या अँजेलिना बॅण्ड या तरुणीची यांनी लिहिलेली मजेशीर कथा

फादर जोसेफ बॅण्ड यांना विल्यम नावाचा मुलगा होता. तरुणपणी शिक्षणासाठी तो कलकत्ता इथं होता. भारताचा प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास हा त्याचा अभ्यासाचा विषय होता. अभ्यासासाठी कलकत्त्याच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये तो नेहमी जात असे. तिथं जर्मनीवरून एक तरुणी भारतीय धर्मांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तिची विल्यमबरोबर चांगलीच गट्टी जमली.

पुढं विल्यमला पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विल्यमनं त्या जर्मन तरुणीस पुण्याला बोलावून घेतले. तिलाही पुण्यातच नोकरी मिळाली.

लवकरच त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलीचं नाव अंजली असं भारतीय पद्धतीचं ठेवण्यात आलं. सर्व काही ठीक चाललं असतानाच पहिलं महायुद्ध सुरू झालं. इंग्लंड आणि जर्मनीचे संबंध बिघडल्यामुळे विल्यम आणि त्याच्या बायकोचे संबंधही बिघडले.

एके दिवशी तिनं नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मुलीला घेवून ती जर्मनीला निघून गेली. मुलगा मात्र इथे पुण्यातच राहिला. त्याचं नाव जेम्स. जेम्स बॅण्ड. पण तो तो नव्हे. आपणाला माहीत आहे त्या दुसऱ्याचे नाव जेम्स बॉन्ड होते. हा जेम्स बॅण्ड होता. उच्चारातील फरक आपल्या ध्यानात आलाच असेल. शिवाय जेम्स बॉन्ड हा 007 होता. जेम्स बॅण्ड मात्र आपल्या नावापुढे कधीच आकडे लावत नसे. असो.

जेम्स बॅण्ड

तर अशा या जेम्स बॅण्डची आई त्याला आणि त्याच्या बापाला सोडून जर्मनीला निघून गेली तेंव्हा तो अवघा 16 वर्षांचा होता. ते त्याचं Matriculationचं वर्ष असल्यानं विल्यमनं पुण्यातल्यालच एका शिक्षिकेशी लग्न केलं. आपल्या नव्या आईच्या कडक शिकवणीमुळं जेम्स चांगल्या मार्कानं पास झाला. त्यानंतर त्याला विल्यमनं इंग्लंडमधल्या रॉयल मिलिटरी अकादमीत पाठवलं. तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर जेम्स लवकरच भारतात परतला आणि सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाला.

त्यावेळी पहिलं महायुद्ध चालू होतं. त्याची युद्धावर जाण्याची इच्छा होती, पण तो सैन्यात दाखल व्हायला आणि युद्ध संपायला एकच गाठ पडली. त्यामुळं त्याची पराक्रम गाजवायची इच्छा त्यावेळी अपूर्णच राहिली. असो.

अंजली बॅण्ड

तिकडं जर्मनीत त्याची बहिण अंजली बॅण्ड इंगजी हा स्पेशल विषय घेवून पदवीधर झाली. मग तिनं अनेक छोटेछोटे कोर्सेस केले. ती शिवणकामही शिकली. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्यानं ती टाईपरायटर चालवायला शिकली. ती टायपिंग इतक्या वेगानं करत असे की ती वापरत असलेले भारीभक्कम टाईपरायटर देखील कांही दिवसातच खिळखिळे होत असत.

अँजेलिना बॅण्ड आपल्या पर्सनल टाईपरायटर सोबत!

मग तिनं नोकरी शोधायला सुरवात केली. लवकरच तिला एका मोठ्या कंपनीत छोटीशी नोकरी मिळाली. पण तिचं मन कांही तिथं रमेना. पुढं ती नोकऱ्या बदलत राहिली. पण तिला मनाजोगती नोकरी कांही मिळेना. तेंव्हा तिला तिच्या एका मैत्रिणीनं ‘सँग लीला भेट एकदा, तुझा हा प्रॉब्लेम लगेच सुटेल आणि तुला पाहिजे तशी नोकरी मिळून जाईल’ असं सांगितलं.

अंजलीची सँग ली शी भेट

सँग ली हा एक चिनी न्यूमरॉलॉजिस्ट होता. तो जर्मनीला नेहमी भेट देत असे. चक्क हिटलर देखील त्याच्याकडून सल्ला घेत असे. असो. सांगायचा मुद्दा हा कि अंजली सँग ली ला भेटायला त्याच्या ऑफीसमध्ये गेली. तिथं खूप गर्दी होती.

तिला रिसेप्शनिस्टनं सांगितलं की एक महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळेल. अंजली निराश होउन परत जाऊ लागली, तेंव्हा रिसेप्शनिस्ट पटकन म्हणाली, ‘मॅडम, एक मिनिट थांबा…. मी रजिस्टर बघते…’ रजिस्टर बघत ती हळू आवाजात म्हणाली, ‘तुम्ही 15 मिनिटं थांबा, मी पाठवते तुम्हाला आत.’

थोड्याच वेळात आतला क्लाएंट बाहेर आला आणि रिशेप्शनिस्टनं अंजलीला आत पाठवलं.

अंजलीनं सँग ली हा चिनी आहे म्हणजे तो चायनीज लोकांसारखा दिसत असेल अशी कल्पना केली होती, पण तो तर चक्क मराठी माणसासारखा दिसत होता! असो. त्यानं अंजलीला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि ‘बोल काय समस्या आहे तुझी? पाहिजे तशी नोकरी लागत नाही हीच ना? की अजून तुझं लग्न झालं नाही म्हणून आलीस?’ असं चक्क मराठीत विचारलं!

अंजलीला तीन प्रश्न पडले… तिनं सँग लीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्यालाच प्रश्न विचारले…. सर आधी मला तुम्ही सांगा, तुम्ही चिनी आहेत तर मराठी माणसासारखे कसे काय दिसता? आणि मला मराठी येतं हे तुम्हाला कसं माहीत? आणि तुम्हाला माझी नेमकी समस्या कशी काय कळली?
सँग ली हसत म्हणाला, हे आपण नंतर कधी तरी बोलू, आधी तुझी समस्या सोडवू. मला तुझं पूर्ण नाव सांग बघू.. आणि तुझी जन्मतारीखही सांग….

‘अंजली विल्यम बॅण्ड …. जन्मतारीख 26 सप्टेंबर 1912’ तिनं आपलं नाव आणि जन्मतारीख सांगितली. ते ऐकून सँग ली जरा गंभीर झाला, पण लगेच आश्वासक स्वरात म्हणाला, तुला पाहिजे तशी नोकरी लागून जाईल, पण तुझं हे नाव बदल… अंजली नाव इथं जर्मनीत चालणार नाही… अँजेला असं नाव वापर… किंवा मग अँजेलिना पण चालेल.. तुला महिनाभरात एक ‘लई भारी आणि कायम स्वरूपी’ नोकरी मिळेल…. जा आता…

सर तुमची फी? अंजलीनं विचारलं.. तर तो म्हणाला, ते बघू आपण तुला नोकरी लागल्यावर… आजपासनंच सगळ्यांना तुझं नाव अँजेलिना आहे असं सांगायला सुरवात कर… कागदोपत्री नंतर करून घे अंजलीचं अँजेलिना …

अंजली खुर्चीतनं उठली आणि निघाली … तिला थांबवत आपल्या डायरीत बघत सँग लीन विचारलं , ‘पोरी, काय नाव म्हणालीस तुझं? अंजली विल्यम बॅण्ड ना?’
‘नाही नाही.. अँजेलिना विल्यम बॅण्ड असं नाव आहे माझं!’ असं म्हणत ती केबिनच्या बाहेर पडली.

अंजलीची अँजेलिना झाली आणि ….

……आणि काय आश्चर्य… सँग लीनं सांगितल्याप्रमाणं थोड्याच दिवसात कुणाला कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी अँजेलिनाला नोकरी मिळाली. तिला तशी नोकरी मिळावी म्हणून आणि सँग लीचे शब्द नेहमी प्रमाणे खरे ठरावेत म्हणून की काय, जर्मनीवर युद्धाचे ढग जमू लागले. वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरभरती सुरू झाली.

अँजेलिनानं एका जर्मन पेप्रात वाचले की जर्मन सरकारच्या मुख्यालयात स्टेनो-टायपिस्टांची भरती चालू आहे. तिनं लगेच टायपिस्टच्या नोकरीसाठी एक अर्ज अक्षरश: खरडला. (आजही हा अर्ज जर्मन सरकारच्या अर्काइव्हजमध्ये पहायला मिळतो. त्याच्यावर जोरात खरडल्याच्या खुणा आहेत. कधी गेलात तर पाहून घ्या. असो ). कांही दिवसातच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आलं.

ती वेळेआधी पाच मिनिटं इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहचली. तिथं इंटरव्ह्यूसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. अँजेलिना सुंदर होती, पण तिच्यापेक्षा खूपच सुंदर तरुणी रांगेत उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यामुळं इथं कांही आपला निभाव लागणार नाही याची तिला पक्की खात्री झाली. ती परत फिरणारच होती, तेवढ्यात दोन गार्ड तिच्याकडं आले आणि त्यांनी तिला चक्क सॅल्यूट ठोकला! ते तिला अदबीनं इंटरव्ह्यू केबिनकडं घेवून गेले. तिथल्या वॉचमननेही तिला सॅल्यूट ठोकला आणि तिच्यासाठी अदबीनं केबिनचं दार उघडलं..

अँजेलिनाचा इंटरव्ह्यू

अँजेलिनाला कळेनाच की हे लोक आपल्याशी एवढ्या अदबीनं का वागत आहेत. त्या विचारातच ती केबिनमध्ये शिरली आणि तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारच उरला नाही. तिथं इंटरव्ह्यू घेण्यासाठी तीन तरुण बाया बसल्या होत्या आणि त्या तिघीही अँजेलिनाच्या हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या वर्गमैत्रिणी होत्या. त्यातली मधल्या खुर्चीवर बसलेली बया तर हिची खास मैत्रीण होती. कोण असावी बरं ती? ती तर चक्क इव्हा ब्राऊन होती. हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन. ही आपला इंटरव्ह्यू घेणार?

त्या तिघी उठून उभ्या राहिल्या आणि धावतच तिच्याकडं आल्या. सगळ्यांनी तिला आळीपाळीनं मिठ्या मारल्या. मग त्या तिघी आपापल्या खुर्चीत जाऊन बसल्या. मैत्रिणीच्या भूमिकेतून बॉसच्या भूमिकेत शिरल्या. अँजेलिनाला समोरच्या खुर्चीत बसण्याची ऑर्डर देण्यात आली. इव्हानं फाईलमधून अंजलीनाचा अर्ज बाहेर काढला. म्हणाली, ‘तुझा जन्म इंडियात झाला आहे. इंडिया इंग्लंडच्या ताब्यात असल्यानं इंग्लंडसारखाच जर्मनीचा शत्रू आहे. मग तुला आम्ही कशी काय नोकरी देणार?’

हे ऐकून अँजेलिनाचा चेहरा पडला. तेवढ्यात इव्हा म्हणाली, ‘पण आम्ही तुझी पूर्ण चौकशी केली आहे. तुझी आई तुझ्या बापाशी भांडून भारतातून तुझ्यासह इइकडं निघून आली. भांडणाचं कारणही तुझ्या आईचं देशप्रेम हेच होतं. तुलाही ते असणारच याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं आम्ही तुला नोकरी देत आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. टायपिंग जरा स्लो करत जा. आणि पेननं लिहितानादेखील खरडत जावू नकोस. नीप आणि कागद दोन्ही खराब होतात. हा अर्ज बघ तुझा, किती ठिकाणी चक्क फाटला आहे. एक तारखेपासून रुजू हो. चल जा आता.’

‘धन्यवाद’ ती म्हणाली, ‘पण मला एका प्रश्नाचे उत्तर मिळालं तर बरं होईल’
‘काय?’
‘माझ्या आई-बाबांचं भांडण झालं, आणि ते का झालं, हे तुम्हाला कसं काय कळलं? माझी आई तर ते कुणालाही सांगत नाही. आख्ख्या जर्मनीत तर ही गोष्ट फक्त माझ्या आईला आणि मलाच माहीत आहे असं मी आत्तापर्यंत समजत होते’
‘ ही माहिती मिळवणं कांही अवघड नाही. तुझे बाबा पुण्यात ज्या कॉलेजमध्ये शिकवतात, तिथं एक जर्मन विद्यार्थिनी आहे. तिनं मिळवली ही माहिती आमच्यासाठी. डायरेक्ट तुझ्या बाबांच्याकडून. आणि तुझा भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी आहे हेही आम्हाला माहीत आहे.’

हे ऐकून अँजेलिना गारच झाली. आता गरमागरम चहा किंवा कॉफी घेतलीच पाहिजे असं तिला वाटू लागलं. ती बाहेर पडणारच होती, तेवढ्यात इव्हा म्हणाली, थांब, कॉफी पिऊन जा!

इतर कथा, लेख ….

गूढकथा: सलोनी राठोड

गौरी आणि फेस रीडर

प्रेम-काजवा | Love Letter

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!