Education| कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!

डॉ. तानाजी बांगर

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये ब्लॅक, बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर डान्स क्लास
अटेंड करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ
करायचेच. कारण फर्स्ट प्राइझ मिळालंच पाहिजे !!

मग ड्रॉइंग कॉम्पेटीशन असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

अल्बर्ट आईनस्टाईन बनवून देणाऱ्या इंटरनॅशनल शाळा आल्या. पण अल्बर्ट हा आईनस्टाईन
बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो ऍक्टिंग स्कूल उभ्या राहिल्या.
पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही स्कूलमध्ये गेला नव्हता.

आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून
त्यात मुलांना पाठवतील.

आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत. हा बाजार थांबवण्याची गरज निर्माण झालीय.

आता शाळा सुरु केल्या आहेत इन्व्हस्टर्सनी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर…! पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली.

दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की “Who am I” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता- “तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?”
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले एसीमध्ये जन्म घेतात, एसीमध्ये वाढतात. चिप्स खातात, सॉफ्टड्रिंक पितात आणि स्मार्टफोनवर गेम खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही.

पडणं-लागणं, खेळात हरणं माहीतच नाही. स्कूल बस आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि कृत्रिम अन्न ज्यात प्रेझरवटीव्ह, आर्टिफिशियल रंग, स्टेबिलिझर, फ्लेवर एन्हान्सिंग आयटेम्स, स्टार्च मिसळलेले पदार्थ खाणे
सुरु झाले.

अति स्वच्छतेच्या नावाखाली आपण वेगवेगळे हँडवॉश फ्रिक्वेन्टली वापरून ऑटोइम्युन आजार आणि अलर्जीच्या आजाराना आमंत्रण देत आहोत. ह्या इंग्रेडिएंट्सची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात
शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची हार्मोनल आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात.

चुकीची आहारशैली

जास्त कार्बोहाइड्रेट, मिठाई खूप शर्करायुक्त पदार्थ सेवनाने आणि सिडेंटरी जीवनशैलीमुळे भारत लवकरच डायबेटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक घटक नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे
मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग व्हिटॅमिन , डाएट्री सप्लीमेंट्स, मिनरल्स देणारे प्रॉडक्ट विकत आणून ते खायला देतात. सोशल मिडिया, टेलिव्हिजनवरील जाहिरातबाजीला पालक भुलून मुलाना नको ते खायला देतात.

वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भा या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, कॅल्शियम ,
प्रोटीन्स माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात… तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि टीम वर्क कळत नाही. मित्र फक्त व्हॉट्सअँप , फेसबुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही.

मानसिक आरोग्याची वानवा

दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या
करतात.

बरीच एकुलती एक मुले दुसऱ्यांशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.

ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली.

एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या ॲडमिशनची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा
घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट इ =एमसी स्क्वेअर
म्हणायचं बाकी राहिलं आहे.

अशी मुले सर्व फॉर्म्युला पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा फॉर्म्युला कधीही शोधू शकणार नाहीत. गिटार शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत. लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.

जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.

काही जणांना कॅम्पसमध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय….पण त्यात
देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः गण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील…

जपान, जर्मनी, चीनचं वेगळेपण….

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत एसी लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा प्रॅक्टिकलवर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?… असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची
जोपासना करायला लावतात.

निपोन तंत्रज्ञानाने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.

जर्मनी मुलांना ट्रांस्फरन्स शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत प्रॅक्टिकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी
बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्समध्ये भरत नाहीत.
अनावश्यक विषय शिकवत नाहीत.

चीन हा सायकलप्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना सायकल चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर थियरी कमी
आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार नेदरलँड्ससारखा देशही करतो. एकाच द्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?

शिक्षण काय असतं? रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.

सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची
तुम्हाला चिंता वाटत नाही का?” टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या- बागडण्याच्या वयात मोठ्या
माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही.
खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “

टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात. आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!

डॉ. तानाजी बांगर
पुजा क्लिनिक, चिंचवड 19

हेही वाचा:

आज घरी यायला एवढा ऊशिर?

रामराज्य म्हणजे नक्की काय रे भाऊ….!

जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या | Women Issues

TheyWon English

5 thoughts on “Education| कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!

  1. ಒಳ್ಳೆಯ ಲೇಖನ, ಇಂದು ಪಾಲಕರಿಗೆ ಅವಶ್ಯಕ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇದಾಗಿದೆ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *