संजय सोनवणी
जगात भाषेद्वारा अभिव्यक्त होणारा एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य होय. किंबहुना त्याला भाषा येणे हेच त्याला अन्य प्राणीविश्वापेक्षा वेगळे पाडते. असे असले तरी भाषेचा जन्म कसा झाला याबाबत अजूनही सर्वसंमत सिद्धांत जन्माला आलेला नाही.
जगातील सर्व मानवी जमाती भाषेच्या जन्माचे श्रेय निशंकपणे परमेश्वराला देत असतात. परमेश्वरानेच भाषा निर्माण केली म्हटले कि पुढील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नसते.
भाषेचा जन्म कसा झाला?
पण आधुनिक काळात मात्र भाषेच्या जन्माबाबत काही सिद्धांत जन्माला आले आणि त्यावर हिरीरीने चर्चाही होत असतात. याचे कारण म्हणजे कोणती भाषा श्रेष्ठ हा उपप्रश्न ओघाने निर्माण होतो आणि आपापल्या भाषेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाषेचाच उपयोग करायचा असतो. किंबहुना त्यासाठीच भाषेचा उदय कसा झाला असावा व तिच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य, ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती.
आजही भाषांचा विवाद कधी कधी टोकाला जातांना आपण पाहतो. “संस्कृत भाषाच आधीची असून तिच्यापासून सर्व भाषा निर्माण झाल्या” असे अशास्त्रीय मतही हिरीरेने प्रचारित केले जाते तेही वर्चस्ववादाच्या भावनेपोटीच. पण मुल प्रश्न अनुत्तरीतच राहतो तो हा कि मुळात भाषेचा जन्म कसा झाला? ती क्षमता मनुष्यप्राण्यातच का?
जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक) भाषा आहेत. काही भाषा मृत झाल्या असुन काही मृत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही.
माणसाचे नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे त्याला विविध व गुंतागुंतीचे आवाज काढता येतील असे स्वरयंत्र लाभलेले आहे. तो निसर्गातील अनेक आवाजांची नक्कलही करू शकतो. भाषेच्या जन्माच्या आणि विकासाच्या इतिहासात स्वरयंत्राने मोलाची कामगिरी बजावलेली आहे. पण केवळ आवाज काढता येतात तेवढ्याने भाषेचा जन्म होऊ शकत नाही.
मानवी उत्क्रांतीच्या कोणत्यातरी टप्प्यावर भाषा अचानक अवतरली असे काही विद्वान मानतात. नोआम चोम्स्की या मताचा पुरस्कर्त्ता असून या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवी शरीरातील, विशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे.
अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. किंबहुना माणसात भाषेची गुणसूत्रे उपजतच असतात असा एकूण या म्हणण्याचा मतितार्थ आहे.
अलीकडेच टेकुमेश फिच यांनी “मातृभाषा” सिद्धांत डार्विनच्या नाते-निवड सिद्धांताचा आधार घेत मांडला होता. या सिद्धांतानुसार आई आणि मुल यांच्यातील संवादाच्या निकडीतुन भाषेचा उदय झाला असावा. हीच पद्धत निकटच्या नातेवाईकांसाठीही वापरली गेल्याने भाषेच विस्तारही झाला असावा असे हा सिद्धांत सुचवतो. अर्थात या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले. कारण अपत्याशी संवाद अन्य प्राणीजगतही साधायचा प्रयत्न करतेच, पण त्यातून भाषेचा उगम झालेला नाही हे एक वास्तव आहे.
मानवी मेंदू आणि भाषा यात निकटचा संबंध असावा असे वाटून काही शास्त्रज्ञ मेंदुच्याच अंतरंगाचा अधिक अभ्यास करु लागले. मानवी मेंदूतील ब्रोका आणि वेर्निक क्षेत्र हे भाषेच्या क्षमतेवर परिणाम करतात हे लक्षात आले असले तरी भाषेचा जन्म कोठून होतो या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.
अन्य प्राण्यांमध्येही अत्यंत मर्यादित का होईना पण काही भाषा असते. ती काही शब्द व हावभाव यापुरती मर्यादित असते हा अनुभव आहेच. म्हणजे अभिव्यक्तीची मुलभूत प्रेरणा आणि भाषेच्या जन्माचा जवळचा संबंध असला पाहिजे हे तर निश्चित आहे. आदिम काळातील भयजनक आणि आनंदाचीही स्थिती त्याला अभिव्यक्तीसाठी प्रेरित करत त्यातून जगभरच्या मानवी समुदायांमध्ये भाषेचा जन्म झाला असावा.
मानवाचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. तो भावनाशील प्राणी आहे.
निसर्गाने त्याला स्वरक्षणासाठी अन्य नैसर्गिक हत्यारे न दिल्यामुळे समूह करून राहणे त्याला भाग होते. या सामुहिक निकडीतून परस्पर संवादासाठी अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती करत आदिम शब्दसंग्रह तयार झाला असावा. हे आदिम शब्द हेच भाषेचे निर्मितीकारण ठरले. त्यातून प्राथमिक बाबी, उदा. भूक, तहान, झोप, शत्रू, धोकेदायक आणि मित्र प्राणी यांचे निर्देश करता येणे सोपे झाले आणि उपयुक्ततेमुळे तिचा जाणीवपुर्वकही विकास सुरु केला.
आपापसातील टोळ्यांच्या सहचर्यातून शब्दांची देवाण-घेवाण करत शब्दसंग्रहही वाढत गेले.
टोळीजीवनातून मनुष्य बाहेर पडल्यावर नव्या जीवनाशी जुळवून घेण्यासाठी त्याला अधिक शब्दांची गरज पडली आणि त्यातूनच प्राथमिक व्याकरणही निर्माण झाले. जीवनातील जटीलता जशी वाढते तशी भाषाही नवनव्या शब्दांची निर्मिती करत अर्थवाहकता निर्माण करण्यासाठी काटेकोर व्याकरणाची निर्मिती करते.
मानवी भावनिक आंदोलने टिपण्याच्या उर्मीतुनही भाषा प्रगल्भ होत जाते. मानवी जीवनातील शेतीचा शोध हा जेवढा महत्वाचा टप्पा आहे तेवढाच हा टप्पा भाषेच्या विकासात मोठा हातभार लावणारा टप्पा आहे. भाषा आणि मानवी संस्कृती हातात हात घालूनच चालत आलेली आहे.
थोडक्यात संवादाची निकड हेच मानवी भाषिक क्षमतेला विकसित करणारे कारण झाले. या निकडीची तीव्रता जेवढी जास्त तेवढीच भाषेची विकसनशीलताही जास्त. खरे तर साधारणपणे एकाच कोणत्यातरी आदीम काळात कोणातरी माणसाच्या तोंडातून निघणा-या शब्दाला सामुहिक मनाने अर्थ दिला, जतन केला तेथेच भाषेचा जन्म झाला.
भाषा ही सामुहिक मनाची निर्मिती आहे. त्यामुळेच एका भागात राहणा-या लोकांना तेथील भाषा समजते, संवाद करता येतो. अन्य भाषा शिकल्या जातात आणि शब्द-व्याकरणही समृद्ध होत जाते. प्रमुख जनसमुहांपासून अलग राहणा-या लोकांची भाषा मात्र तेवढी विकसित होत नाही कारण त्यांचे जीवनही तेवढे गुंतागुंतीचे नसते.
कोणातरी एखाद्या मानवी गटाने श्रेष्ठ भाषा निर्माण केली आणि ती इतरांवर लादली ही मते आता कालबाह्य झाली आहेत. या मतांमागे केवळ वर्चस्वतावादी भावना होत्या. भाषा या जागतिक सामुहिक मानसिकतेतून व आपापल्या प्रादेशिक भूगर्भशास्त्रीय प्रभावातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत. म्हणून जगात भाषांचे प्रमाणही मोठे आहे. पण जसजसे जग अजून जवळ येत जाईल तसतसे भाषांची संख्याही कमी होत जाईल आणि सध्याच्या भाषांमधूनच एकच एक वैश्विक भाषेची निर्मिती होईल.
कोणत्याही भाषेचा अभिमान असणे आणि भाषाश्रेष्ठत्वाचा अहंकार असणे यात फार मोठा फरक आहे. भाषा हे मानवी संस्कृतीचे संचित असल्याने त्याबद्दल अभिमान बाळगणे योग्यच. पण भाषेचा अहंकार बाळगत अमुक एकच भाषा श्रेष्ठ मानणे अमानवीय आहे.
जगातील एकही भाषा आज पूर्णपणे स्वतंत्र राहिलेली नाही एवढा अन्य भाषिक प्रभाव सर्वच भाषांनी तिच्या निर्मिती काळापासून पचवलेले आहेत. भाषा हे संवादाचे, अभिव्यक्तीचे मोलाचे साधन आहे आणि भाषेमुळेच आपण “माणूस” ठरतो हे विसरता कामा नये.
संजय सोनवणी हे प्रसिद्ध लेखक, विचारवंत, धर्म चिकित्सक आणि इतिहास संशोधक आहेत. |
हेही वाचा:
भारतीयांचा इतिहासबोध | History
धर्म आणि विज्ञान | Religion and Science
महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
3 thoughts on “भाषेचा जन्म कसा झाला?”