माझं शालेय जीवन: तासगाव आणि समडोळी

महावीर सांगलीकर

माझं चौथी आणि पाचवीचं शिक्षण सांगली जिल्ह्यातल्या तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी झालं. त्यानंतर सहावीचं शिक्षण सांगली जवळील समडोळी या गावी झालं. त्याकाळातील माझं शालेय जीवन.

माझं शालेय जीवन : तासगांव

तिसरीपर्यंत अंकलखोप येथे आजोळी शिकल्यानंतर मला तासगांवला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात घालण्यात आले. तासगांव हे सांगली जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण. हे एक छोटं पण प्रगत शहर होतं. तिथं माझे वडील शेतकी खात्यात सरकारी अधिकारी होते.

तासगावला आम्ही एका वाड्यात भाड्याने रहात असू. आमच्या घरात आईवडील, मी, माझा धाकटा भाऊ अनिल आणि लहान बहीण मनिषा असे पाचजण होतो.

वडील कडक स्वभावाचे आणि स्पष्टवक्ते. आपल्या कामाच्या बाबतीत चोख. मी क्वचित कधीतरी त्यांच्या ऑफीसला गेलेलो आठवते…. त्यांच्या सरकारी जीपमधून.

चौथीत असताना आमच्या वर्गात एक हुशार मुलगा होता. त्याचं नाव आठवत नाही. त्याची आणि माझी कॉम्पिटिशन असे. तो माझ्याशी कधीच बोलत नसे. त्यामुळे मीही त्याला किंमत देत नसे.

पाटील गुरुजी

आम्हाला पाटील नावाचे गुरुजी होते. त्यांनी माझी हुशारी आधीच ओळखली होती आणि माझ्याकडं विशेष लक्ष दिलं होतं. एकदा वर्गात सर्वांपुढं त्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि ‘हा महावीर पहिला नंबर काढणार’ असे उदगार काढले होते. माझ्या वडिलांचीही इच्छा होती की माझा पहिला नंबर यायला पाहिजे.

चौथीची वार्षिक परीक्षा सेंटरची परीक्षा होती. वार्षिक परीक्षेत माझा वर्गातच नव्हे तर आक्ख्या तालुक्यात पहिला नंबर आला!

हायस्कुलला गेल्यावर…..

पाचवीला मी तासगांवच्याच एका हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. तिथं आम्हाला इंग्रजी हा एक विषय होता. आमचे इंग्रजीचे शिक्षक फारच कडक होते. एखाद्या विद्यार्थ्याचे उच्चार चुकले तर ते त्याच्या कानशिलात लगावत असत. मीही एकदा त्यांचा मार खाल्ला होता. विनाकारणच.

त्याचं असं झालं की सर्व विद्यार्थ्यांना उभे करून सामूहिकरित्या ते कांहीतरी ‘घोकून’ घेत होते. माझ्या पुढे उभे असलेल्या विद्यार्थ्याने चुकीचा उच्चार केला. सरांना वाटलं की मीच चुकीचा उच्चार केला. त्यामुळे मला मार खावा लागला. त्या सरांचं नाव आता आठवत नाही.

एखाद्या शिक्षकाकडून खाल्लेला तो माझा पहिला आणि शेवटचा मार. पण तेंव्हापासून घोंकंपट्टीला आणि उच्चारांना अवास्तव महत्व देणाऱ्या, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या, शारीरिक शिक्षा करणाऱ्या शिक्षकांबद्दल माझ्या मनात तिरस्कार निर्माण झाला, तो अजूनही आहे. (पुढे मी ‘शिक्षक विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा का करतात?’ या विषयावर मी थोडंसं रिसर्चही केलं, त्याविषयी एक वेगळा लेख लवकरच येईल).

पाचवीमध्ये असताना मी इतर विषयांप्रमाणे इंग्रजीतही चांगले मार्क मिळवले. मला इंग्रजी चांगलं लिहिता-वाचता येत असे. अर्थात याचा शिक्षकाचा मार खाण्याशी काही संबंध नव्हता.

माझं शालेय जीवन

आमच्या वर्गात मुलीही होत्या. त्यात एक सुंदर, कुरळ्या केसांची, गोरीपान गुजराती मुलगी होती. तिची आमच्या वर्गात मुलींची मॉनिटर म्हणून निवड झाली होती, तर एका मुलाची मुलांचा मॉनिटर म्हणून निवड झाली होती. या मुलाला त्या मुलीशी कांहीतरी बोलायचं होतं, पण त्याचं धाडस होत नव्हतं. शेवटी त्यानं एक चिट्ठी लिहून माझ्याकडं दिली आणि तिला द्यायला सांगितली.

त्यावेळी बहुधा ऑफ तास असावा. मी चिट्ठी घेऊन तिच्याकडं गेलो. ती दुसऱ्या एका मुलीशी बोलत उभी होती, त्यामुळे तिचं माझ्याकडं लक्ष गेलं नाही. मग मी तिच्या दंडाला माझं बोट लावलं, तेंव्हा कुठं तिचं लक्ष माझ्याकडं लक्ष गेलं. मग मी तिला ती चिट्ठी दिली आणि माझ्या जागी जाऊन बसलो.

मधल्या सुट्टीतलं जेवण

माझ्या वर्गात माझे तीन खास मित्र होते. गोखले, काळे आणि शेवाळे. गोखले आणि काळे हे दोघंही आमच्या घराशेजारील एका वाड्यात राहत असत. ते दोघंही गोरेपान, घाऱ्या डोळ्याचे आणि देखणे होते.

आम्ही चौघं मधल्या सुट्टीत वेरळा नदीच्या काठी जेवायला जात असू. या नदीला पाणी नसे. सगळीकडे वाळूच वाळू दिसत असे. पण ही वाळू थोडी खोदली की खाली पाणी लागत असे.

आम्ही पहिल्यांदा जेवायला गेलो तेंव्हा एक गम्मतच झाली. आम्ही आपापल्या डब्यातलं थोडं थोडं एकमेकांना दिलं. मग जेवायला सुरवात झाली. मी शेवाळेनं दिलेला थालीपिठाचा तुकडा खायला माझा हात माझ्या तोंडापाशी नेला.
तेवढ्यात गोखले म्हणाला, ‘महावीर, थांब थांब! हा कोण आहे माहीत आहे का तुला?’
मी मानेनंच नाही असं म्हणालो. तेंव्हा काळे म्हणाला, ‘अरे हा चांभार आहे’.
‘मग काय झालं?’ असं म्हणत मी तो घास तोंडात टाकला.
तेंव्हा गोखले म्हणाला, ‘कांही नाही, मला बघायचं होतं तू जात-पात मानतोस की नाही ते!’

वर्गातले जुळे भाऊ

आमच्या वर्गात दोन भाऊ होते, ते जुळे होते. हसऱ्या चेहऱ्याचे, हुशार आणि चपळ. ते इतके सेम तो सेम दिसत की आम्हा विद्यार्थ्यांचेच काय, शिक्षकांचेही कन्फ्युजन होई. जुळी मूळ हा प्रकार तेंव्हा मी पहिल्यांदाच पाहिला होता. मला त्यांची नावं आठवत नाहीत, कारण ओळख असली तरी खास मैत्री नव्हती.

केळकर सर

आम्हाला केळकर नावाचे एक सर होते. ते आम्हाला त्यांच्या घरी अभ्यास करायला म्हणून बोलावत असत. पण बहुतेकदा अभ्यास राहायचा बाजूला आणि सर आम्हाला त्यांची पाय चेपायला लावायचे, गुरुसेवा करायला लावायचे! त्यांचा मुलगा महेंद्र आमच्याच वर्गात होता, पण सरांनी त्याला कधी पाय चेपायला लावले नाहीत! आम्ही सरांचे पाय चेपत असताना तो अभ्यास करत बसलेला असे!

भांडण

एकदा माझा धाकटा भाऊ अनिल याच्याशी त्याच्या वर्गातल्या एका मुलानं भांडण केलं होतं. अनिलनं त्याच्याबद्दल माझ्याकडं तक्रार केली.
मग आम्ही दोघांनी त्याला रस्त्यात गाठलं. मी त्या मुलाच्या थोबाडीत मारली.
कुणाच्या तरी थोबाडीत मारणं हा माझ्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा प्रकार!
(पण पुढे मी चिंचवडला असताना एका मित्राच्या पोटात ठोसा मारला होता. त्यावेळी तो कळवळून खाली बसला. त्याला अपेंडिक्सचा त्रास होता हे मला नंतर कळलं. पण हे प्रकरण आमच्या घरापर्यंत पोहोचलं नाही).

माझं शालेय जीवन: समडोळी

पुढे सहावीला मी आमच्या समडोळी या गावी शिकायला आलो. तिथं जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. म्हणजे हायस्कूलमधनं पुन्हा प्राथमिक शाळेत!

आमच्या शाळेत पाटील नावाचे एक गुरुजी होते. त्यांच्याकडं आम्हाला इंग्रजी शिकवायची जबाबदारी होती. त्यांनी हेरलं की माझं इंग्रजी चांगलं आहे. मग ते करायचे काय की मला सर्व मुलांच्या पुढे इंग्रजीच्या पुस्तकातला आक्खा धडा मोठ्या आवाजात वाचायला सांगायचे. मग स्वत: जुजबी कांही तरी शिकवायचे. पण यामुळं झालं काय की आक्ख्या गावात मी इंग्रजीमध्ये खूप हुशार आहे अशी प्रसिद्धी झाली.

माझं डोकं त्या वयात शरीराच्या मानानं जरा मोठाच होतं. आकारानं आणि बुद्धीनं पण. त्याबद्दल गल्लीत होणारी चर्चा माझ्या कानावर पडली होती.

माझा मित्र श्रीकांत

माझ्या वर्गात श्रीकांत नावाचा विद्यार्थी होता. त्याला आम्ही राजा म्हणून बोलावायचो. त्याची आई शिक्षिका होती. मामाही शिक्षक. राजा एक हुशार विद्यार्थी होता. राजाचे घर आमच्या घराजवळच होतं. त्यामुळं माझी त्याच्याशी चांगली मैत्री झाली.

गावात एक तालीम होती. कधीतरी संध्याकाळच्या वेळी मी तालमीत जात असे. राजाही कधी कधी तालमीत जात असे. एकदा तालमीत त्याची माझी कुस्ती लागली आणि मी त्याला चितपट केलं. राजा शरीराने मजबूत होता, त्यामुळं आपण कुस्ती जिंकली याचं मलाही आश्चर्य वाटलं होतं!

विशेष म्हणजे या राजानं पुढे गावात झालेल्या कुस्तीस्पर्धेत त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या एका पैलवानाला सहज चितपट करून पाच रुपयांचं बक्षीस मिळवलं होतं. (ही रक्कम त्या काळात तशी फारच मोठी होती).

हेही वाचा:

आठवणी: माझं आजोळ अंकलखोप

पत्रमैत्रिण | Pen Friend: मराठी लघुकथा

माझ्या लग्नाची गोष्ट…| Marathi Love Story

Raigad | रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

TheyWon English

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

One thought on “माझं शालेय जीवन: तासगाव आणि समडोळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *