भारतीयांचा इतिहासबोध | History

© महावीर सांगलीकर

इतिहास म्हणजे काय? इतिहास या शब्दाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भूतकाळातील घटनांचा अभ्यास’ ही आहे. इतिहास संशोधक भूतकाळातील घटनांची माहिती वेगवेगळ्या मार्गाने गोळा करतात आणि त्यातून नेमके काय घडले असावे याची मांडणी करतात. ज्या संशोधकांना सत्य मांडायाचे असते, असे संशोधक त्यांना संशोधनातून जे कांही मिळालेले असते ते लिहून टाकतात. पण बऱ्याच वेळा अनेक ‘सत्यवादी’ इतिहासकार देखील सत्य इतिहास लिहायला धजावत नाहीत. त्यामागे ‘सत्य नको असणा-या’ लोकांपासून असणारा धोका हे कारण असते, शिवाय कित्येकदा सत्य इतिहास मांडल्यास समाजात गोधळ माजण्याचीही शक्यता असते.

इतिहास आणि लोकभावना

मी कांही वर्षांपूर्वी माझ्या दोन अभ्यासू मित्रांबरोबर पुण्यात पुरातत्व खात्याच्या उपसंचालकांना भेटायला गेलो होतो. हे उपसंचालक महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, लेणी या विषयातील तज्ञ आहेत. गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की कांही गोष्टी आम्हाला माहीत असूनही त्या आम्ही जाहीर करू शकत नाही, कारण त्यामुळे लोकभावना दुखावल्या जावू शकतात.

आपल्या इथे इतिहासाची ही एक गम्मतच आहे. एकीकडे लोकभावना दुखावू नयेत म्हणून सत्य इतिहास लपवून ठेवायचा, तर दुसरीकडे लोकांना खूष करण्यासाठी खोटा, पक्षपाती इतिहास लिहित बसायचे. म्हणजे जे घडले ते लिहिण्यापेक्षा लोकांना जे आवडेल ते इतिहास म्हणून मांडले जात आहे. असे करताना जे घडले नाही तेही इतिहास म्हणून पुढे आणले जात आहे. आपल्या देशात तर असा चुकीचा इतिहास मांडण्याची चढाओढच लागली आहे.

भारतात अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक प्रदेश, अनेक जाती आहेत. इतिहासाच्या बाबतीत काय घडले त्यापेक्षा ‘आमचे आणि त्यांचे’ ही गोष्ट लोकांना महत्वाची वाटते. या लोक भावनेला सलाम करत कित्येक इतिहास संशोधक संकुचित प्रकारचे इतिहास लेखन करत असतात. या इतिहास लेखनाला प्रदेशाचे कुंपण असते. म्हणजे महाराष्ट्रातील इतिहास लेखकांना इतर प्रदेशातील इतिहासाशी कांहीच देणेघेणे नसते. अशा प्रादेशिक कुंपणाबरोबरच जाती-धर्मांचे कुंपण ही असते. अनेक इतिहास संशोधक इतर धर्मियांचे, इतर जातीयांचे श्रेयच मानायला तयार नसतात, इतिहास लेखनात इतरांना अनुल्लेखाने मारतात. कांही लेखक इतरांचा ओझरता उल्लेख करतात, आणि ‘आपल्या’ लोकांना नेहमी झुकते माप देतात.

भारतीय इतिहास लेखनातील दोष

राष्ट्रीय पातळीवर पाहिले तर भारताच्या इतिहास लेखनात अनेक दोष आहेत.

• पहिला दोष म्हणजे हा इतिहास वैदिक धर्म व वैदिक लोक यांना मध्यवर्ती ठेवून लिहिला जात असतो. त्यामुळे जैन, शैव, बौद्ध, शीख, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असलेल्या साधनांचा इतिहास लेखनासाठी फारसा उपयोग केला जात नाही.

• दुसरा दोष म्हणजे भारताचा इतिहास लिहिताना उत्तर भारताला महत्व दिले जाते, दक्षिण भारताच्या इतिहासाला दुय्यम स्थान दिले जाते.

• तिसरा दोष म्हणजे राजघराण्यांच्या, राजे-रजवाड्यांच्या आणि लढायांच्या इतिहासाला गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, साहित्यविषयक इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते.

• चौथा दोष म्हणजे मिथ्स, भाकडकथा, दंतकथा, महाकाव्ये यांना इतिहास म्हणून विद्यार्थ्यांच्या आणि वाचकांच्या माथी मारले जाते.

पक्षपाती इतिहासकार

इतिहास लेखनाबद्दल पाश्चात्य संशोधकांमध्ये देखील पक्षपाती लिखाण असते, पण त्याचे प्रमाण आपल्या पेक्षा खूपच कमी असते. इतिहासाचे अनेक युरोपीय आणि अमेरिकन संशोधक ‘आप-पर’ भावाच्या पलीकडे जावून निरपेक्ष इतिहास लेखन करतात.

भारतीय इतिहास संशोधकांबद्दल पाश्चात्य इतिहासकारांचे मत फारसे चांगले नाही. भारतीय इतिहास संशोधक इतिहास संशोधन करताना फारसे खोलात शिरत नाहीत, त्यांना घटनांचे नीट विश्लेषण करता येत नाही, कालक्रमाच्या बाबतीत ते ब-याच वेळा घोळ घालतात, मिथ्स आणि इतिहास यातील फरक त्यांना कळत नाही असे अनेक आक्षेप पाश्चात्य इतिहासकारांकडून भारतीय इतिहासकारांवर घेतले जातात.

त्यांचे हे आरोप खरेच आहेत.

गम्मत म्हणजे भारतीय इतिहासकारांच्या प्रत्येक समूहाला आपला समूह, धर्म इत्यादी इतर सगळ्या समूहांपेक्षा कसा प्राचीन आहे, हे कसलेही पुरावे न देता ठासून सांगण्याचा मनोविकार जडला आहे.

भारतातल्या मोठमोठ्या, नावाजलेल्या इतिहासकारांनीदेखील पक्षपाती लिखाण केले आहे.

उपटसुंभ इतिहासकार, ज्यांची संख्या अलीकडे फारच वाढली आहे, त्यांच्या बाबतीत तर बोलणेच नको.

ज्यांना आपला खरा इतिहास माहीत नसतो……

ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो, ते आपले भविष्य घडवू शकत नाहीत असे वाक्य अनेकांनी म्हंटले आहे. पण या वाक्यात आता एक दुरुस्ती करावी लागेल. त्यात ‘खरा’ हा शब्द घालावा लागेल. ज्यांना आपला खरा इतिहास माहीत नसतो, ते आपले भविष्य घडवू शकत नाहीत असे म्हणायला पाहिजे. आपल्या इतिहासात आपल्या पूर्वजांनी कोणते पराक्रम केले यापेक्षा त्यांनी चुका काय केल्या हे पहाणे आणि अशा चुका परत होवू नयेत म्हणून सावध रहाणे हाच इतिहासाचा खरा उपयोग आहे.

पण खेदाची गोष्ट ही आहे की इतिहासाचा उपयोग आपआपल्या पूर्वजांची, समूहाची टिमकी वाजवून घेण्यासाठी, आपआपल्या समूहाच्या उदात्तीकरणासाठी, वर्चस्ववाद जोपासण्यासाठी, अन्यायाची रडगाणी गाण्यासाठी, एखाद्या समुहाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी आणि इतरांना नावे ठेवण्यासाठी केला जात आहे.

हेही वाचा:

Raigad | रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage

संपुर्ण जगाचे एकच राष्ट्र! One Global Nation

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English

3 thoughts on “भारतीयांचा इतिहासबोध | History

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *