महावीर सांगलीकर
मराठी लघुकथा वॉचब्लॉक | Marathi Short Story
फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अपलोड करायची.
ती फोटोजेनिक, सुंदर, तरुण आणि हसऱ्या चेहऱ्याची होती. त्यामुळं तिच्या फोटोला लाईक्सही भरपूर मिळायचे.
‘सुंदर!’ छान!’ ‘लव्हली’ ‘व्हाट अ स्माईल’ अशा प्रकारच्या अनेक कॉमेंट्स यायच्या. त्या वाचून ती हरकून जायची.
अर्थातच तिचे फोटो लाईक करणाऱ्यामध्ये मुलांचाच भरणा होता. मुली तिचे फोटो फारसे लाईक करत नसत. कॉमेंटही देत नसत. जेलसी! दुसरं काय?
कधी कधी तिला प्राईव्हेट मेसेज यायचा, ‘तू खूप सुंदर आहेस’
तिला बरं वाटायचं ते वाचून. पण प्राईव्हेट मेसेजला ती सहसा उत्तर देत नसे.
एकदा एक मेसेज आला, ‘तुझं लग्न झालंय का? झालेलं नसल्यास माझा विचार कर’
तिला तो मेसेज पाठवणाऱ्याचा राग आला. पण असं बिनदिक्कत विचारणाऱ्या त्या तरुणाचं फेसबुक प्रोफाईल बघण्याचा मोह ती आवरू शकली नाही. त्या प्रोफाईलवर गेल्यावर तिच्या लक्षात आलं, ते अगदीच फालतू कार्टं होतं. युजलेस अॅण्ड होपलेस गाय.
कांही प्राईव्हेट मेसेज अगदीच घाणेरडे असत. कुणी अश्लिल फोटोही पाठवत असत. अशा लोकांना ती सरळ ब्लॉक करून टाकत असे.
पण एके दिवशी तिला एक आगळा-वेगळा मेसेज आला. ही कोणीतरी नवीन व्यक्ति होती.
‘गेले अनेक दिवस मी बघतोय, तू तुझे फोटो तुझ्या वॉलवर टाकत असतेस. तुझ्या या फोटोंचा दुरुपयोग होऊ शकतो. एक तर तू अतिशय सुंदर आहेस आणि दुसरं म्हणजे तुझे फोटो स्पष्ट आणि हाय क्वालिटीचे असतात. त्यामुळं ते भल्या-बुऱ्या कारणासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे’
आधी तिला हा मेसेज पाठवणाऱ्याचा राग आला. ‘हा कोण मला शिकवणारा?’ असं तिच्या मनात आलं. तो कोण हे बघण्यासाठी तिनं त्याच्या नावावर कर्सर नेला आणि क्लिक केलं. ती व्यक्ति तिच्या वडिलांच्या वयाची होती. प्रसिद्ध व्यक्ति असावी.
तिनं त्या मेसेजला उत्तर दिलं, ‘Thanks. इथून पुढं मी माझे फोटो फेसबुकवर टाकणार नाही, काका!’
तिकडून उत्तर आलं, ‘गुड गर्ल! पण तू याआधी टाकलेले फोटो पण डिलीट करून टाक’
ती हो म्हणाली.
मराठी लघुकथा वॉचब्लॉक
नंतर तिनं तिचे सगळेच फोटो डिलीट करून टाकले. अगदी तिचा प्रोफाईल फोटो सुद्धा. प्रोफाईल फोटोच्या जागी तिनं एक फ्लॉवरपॉटचा फोटो ठेऊन दिला.
आणखी कांही दिवस गेले. तिला त्या व्यक्तिचा, काकांचा परत एक मेसेज आला,
‘आज तू फेसबुकवर हिटलरचं पेज लाईक केलं आहेस. ते बघितल्यावर मी तू लाईक केलेले इतर पेजेस तपासले. हिटलर, नथुराम, सद्दाम हुसेन, ओसामा…. मुली, ही कांही चांगली गोष्ट नाही. तुम्ही काय लाईक करता यावरनं तुमचे विचार काय आहेत हे कळतं. तू जिथं जॉब करतेस, तिथल्या वरिष्ठांनी हे बघितलं तर तुझ्याबद्दल त्यांचं मत वाईट होईल. तुला प्रमोशन मिळण्यात अडचणी येतील आणि तू पुढं दूसरीकडं जॉबसाठी प्रयत्न केलास तरीदेखील प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काय आहे, आता जॉब देण्याच्या अगोदर त्या व्यक्तिचं फेसबुक प्रोफाईल तपासलं जातं. ती व्यक्ति काय लिहिते, काय कॉमेंट करते, काय लाईक करते, तिचे मित्र कोण कोण आहेत वगैरे. अगदी तुला बघायला येणारा मुलगा देखील आधी तुझं फेसबुक प्रोफाईल तपासेल आणि मग योग्य वाटलं तरच तुला बघायला येईल. प्राईव्हेट डिटेक्टिक्व्हला पैसे देऊन एखाद्या व्यक्तिची माहिती काढण्यापेक्षा तिचं फेसबुक प्रोफाईल बघून बरीच माहिती मिळवता येते’
ती म्हणाली, ‘Thanks Kaka! आजच मी माझ्या अकाऊन्टची साफसफाई करते’.
मग तिनं रात्रभर जागून आपल्या अनेक फेसबुक फ्रेंड्सना डच्चू दिला. अनेक पेजेस अनलाईक केले.
तिचं फेसबुकवर येणंही कमी झालं.
एके दिवशी whats app वर तिला एक मेसेज आला,
‘हाय! हाऊ आर यू? बरेच दिवस तू फेसबुकवर आली नाहीस. चांगलंच आहे म्हणा! फेसबुकपेक्षा तुझं काम महत्वाचं आहे –काका ’
तिला आश्चर्य वाटलं! या काकांना आपला फोन नंबर कसा मिळाला? मग तिच्या लक्षात आलं, आपल्या फेसबुक अकाउंटला आपण आपला फोन नंबर ठेवला आहे. ती लगेच फेसबुकवर गेली आणि तिनं आधी आपला फोन नंबर तिथनं डिलीट केला.
दुसऱ्या दिवशी त्या काकांच्याकडनं whats app वर आणखी एक मेसेज आला, ‘बरं झालं, तू तुझा फोन नंबर फेसबुकवरनं डिलीट केलास ते!’
ती अस्वस्थ झाली. हे काका सारखं आपलं फेसबुक प्रोफाईल का चेक करतात? पण तिनं या मेसेजला उत्तर दिलं नाही.
पुढे काका तिला सारखे whats app मेसेजेस पाठवू लागले. ती ते वाचायची. बहुतेक सगळे मेसेजेस तिनं कसं वागायला पाहिजे या विषयीच असायचे.
एकदा तिनं काकांचं whats app स्टेटस चेक केलं. तिथं लिहिलं होतं,
‘Beware!!! I am watching you, always!’
तिला थोडी भिती वाटली.
तिनं काकांना मेसेज पाठवला, ‘PLZ remove your whats app status. Please…. मला भिती वाटते त्या स्टेटसची’
‘ok ok… लगेच रिमोव्ह करतो. पण तुला भिती वाटायचं कारणच काय? तू तर नारायण धारपांच्या कथा रात्री तीन-तीन वाजेपर्यंत वाचत असतेस. तुझी भिती मरून गेली असेल आत्तापर्यंत’
मराठी लघुकथा वॉचब्लॉक
या काकांना कसं कळलं आपण धारपांच्या कथा वाचतो, त्याही रात्री उशीरापर्यंत?
तिनं उत्तर दिलं, ‘नाही हो काका! त्या कथा वाचून मला आणखीनच भिती वाटायला लागलीय सध्या. तुमच्याकडे आहे का कांही उपाय यावर?’
‘हो, आहे ना!’
‘काय?’
‘धारपांच्या कथा वाचायचं बंद कर. चांगलं कांहीतरी वाचत जा. तुला गूढकथाच वाचायच्या असतील तर सांगलीकरांच्या वाचत जा!’
‘त्या वाचते मी. छानच असतात. डोकं चक्रावून जातं नुसतं त्या कथा वाचून. कांहीतरी चांगलं शिकायला पण मिळतं. पण त्या कथांची मला भितीच वाटत नाही हो’
‘म्हणजे तुला भिती वाटावी असलंच वाचायचं आहे?’
‘हो! तसलं कांही वाचताना भिती वाटते, पण मजा पण येते. मी मुद्दाम रात्री तसल्या कथा वाचते. मग झोपायच्या आधी बाथरूमला जायचं धाडस पण होतं नाही’
‘एक काम कर. अशा कथा वाचायच्या सोडून दे आणि खरोखरचा एखादा भीतीदायक अनुभव घे’.
‘म्हणजे? मला नाही समजले’
‘म्हणजे दुसऱ्यांनी लिहिलेल्या कथेची वाचक होऊन भिण्यापेक्षा एखादा भीतीदायक जिवंत अनुभव घे’
‘ते कसं काय?’
‘तुझी तयारी असेल तर सांग. तू आयुष्यात कधी अनुभवलं नसेल असं भीतीदायक थ्रील…. आहे तयारी?’
‘हो, आहे’
‘ठीक आहे, मग आता झोपी जा. आपण उद्या बोलू यावर’
थोड्याच वेळात ती झोपी गेली. मग तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात दिसलं, तिनं आपली एक सेल्फी काढली आणि ती फेसबुकवर टाकली. त्या फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा भडीमार सुरू झाला.
एक कॉमेंट आली, ‘बऱ्याच दिवसानं नवीन फोटो बघतोय तुझा … जरा जास्तच हॉट दिसतेस या फोटोत’
तिला त्या कॉमेंटचा राग आला. तिनं ती कॉमेंट डिलीट केली. परत दुसरी कॉमेंट आली, ‘माझी कॉमेंट डिलीट का केलीस? थांब, बघ आता मी काय करतो ते’
थोड्या वेळानं त्या पोरानं तिचा एक फोटो तिलाच टॅग केला. त्या फोटोत तिच्या अंगावर कपडेच नव्हते. म्हणजे त्या पोरानं तो फोटो मॉर्फ केला होता. ती जाम भडकली. तिनं त्या पोराला मेसेज पाठवला, ‘आता तू बघ मी काय करते ते’.
तिनं त्या पोराला धडा शिकवायचा ठरवला. ठरवलं, आपण आता त्या पोराच्या विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार करायची.
ती त्याचं प्रोफाईल चेक करून त्याची माहिती काढतेय एवढ्यात तिच्या दारावर टकटक झाली. तिनं दार उघडलं तर समोर तर समोर काका उभे. ते आत आले आणि तिच्याकडं रागानं बघू लागले. ‘तुला सांगितलं होतं ना तुझे फोटो फेसबुकवर टाकत जाऊ नकोस म्हणून?’ असं म्हणत काकांनी दातओठ खात तिच्यावर हात उगारला आणि तिच्या डोक्यात जोरात एक टप्पल मारली. ती कळवळली आणि दचकून जागी झाली.
मराठी लघुकथा वॉचब्लॉक
दुसऱ्या दिवशी तिला काकांचा मेसेज आला, ‘सॉरी, मी रात्री तुला जरा जोरातच टप्पल मारली. लागलं नाही ना, पोरी?’
ती हादरली. म्हणाली, ‘म्हणजे? मला कांही कळेनासं झालंय… हे काय आहे सगळं?’
‘तुला एक भीतीदायक अनुभव पाहिजे होता ना? म्हणून मी तुला एक स्वप्न पाडलं. त्या स्वप्नात तू तुझा फोटो फेसबुकवर टाकलास. मग तुझ्या त्या फोटोचा दुरुपयोग झाला. मी तुझ्या स्वप्नात येऊन तुझ्यावर रागावलो आणि तुझ्या डोक्यात जोरात टप्पल मारली’.
‘हे कसं शक्य आहे? तुम्हाला हे कसं काय करता येतं?’
‘हा टेलेपथीक ड्रीम्सचा एक सोपा प्रयोग आहे. तूही करू शकशील’
‘मला शिकवाल?’
‘जरूर… पण आधी अनुभव तर घे वेगवेगळे….. आगे आगे देखो होता है क्या… अर्थात तुझी तयारी असेल तरच’
‘हे इंटरेस्टिंग वाटतं. माझी तयारी आहे. पण हे सगळे अनुभव स्वप्नातच येणार का?’
‘तसं कांही नाही. प्रत्यक्षात पण येतील. पण जास्त घाबरण्याचं कांही कारण नाही. म्हणजे तुला दगाफटका कांही होणार नाही. थ्रिलिंग अनुभव मात्र येईल. त्यातून तू बरंच कांही शिकशील जे तुला आयुष्यभर उपयोगी पडेल’
‘मग पुढचा अनुभव कधी?’
‘अचानक… तुझ्या ध्यानीमनी नसताना होईल कांहीतरी’
++
तिच्या वडिलांनी तिच्या नावावर एका पतसंस्थेत लाखभर रुपये एफ.डी. करून ठेवले होते. एके दिवशी तिला एका मैत्रिणीचा फोन आला, ‘अगं तुला कळलं का?’
‘काय?’
‘तुझी ती पतसंस्था बुडाली. तरी मी तुला सांगत होते की पतसंस्थेत पैसे ठेवत जाऊ नकोस म्हणून’.
ती घाबरली. आपल्या मोपेडवरनं लगेच त्या पतसंस्थेकडे गेली. तिथं प्रचंड गर्दी. ठेवीदार, बघे यांची. पाच-सहा पोलीसही होते. कांही वयस्क ठेवीदार हबकून आपल्या डोक्याला हात लावून बसले होते. कांही बाया रडत होत्या.
एवढ्यात एक वयस्क ठेवीदार उभा राहिला आणि अचानक खाली कोसळला. त्याला चक्कर आली असावी बहुतेक, असं वाटलं लोकांना. पण तो कांही हालचालच करेना. पतसंस्थेच्या समोरच एक क्लिनिक होतं, तिथल्या डॉक्टरला बोलावण्यात आलं. डॉक्टरनं तपासून सांगितलं, ‘हार्ट अटॅक. ही इज नो मोअर’. खळबळ उडाली. लोक पतसंस्थेला आणि तिच्या संचालकांना उघड शिव्या घालू लागले. गर्दी वाढत गेली. कुणीतरी पतसंस्थेच्या दिशेने दगड टाकला. पोलिसांची आणखी कुमक आली. लाठीमार सुरू झाला. पळापळ सुरू झाली. तरीपण कांही लोक दगडफेक करतच होते. एक दगड हिला छाटून गेला आणि ही हडबडून जागी झाली.
कसलं भयानक स्वप्न होतं हे! हॉरिबल.
मराठी लघुकथा वॉचब्लॉक
सकाळी-सकाळी तिनं Whats app ओपन केलं. तिथं काकांचा मेसेज होता,
‘गुड मॉर्निंग! आजची टीप: एफ.डी. मध्ये पैसे ठेवणं म्हणजे एक मूर्खपणाच असतो. तिथं वर्षाला जेवढे टक्के व्याज मिळतं त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी महागाई वाढते. म्हणजे तिथं पैसे थोडे वाढल्यासारखं वाटलं तरी त्या पैशांची किंमत मुद्दलापेक्षा कमी झालेली असते. त्यापेक्षा तू चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये पैसे ठेव. भरपूर रिटर्न्स मिळतील तुला. इमर्जन्सीसाठी थोडे पैसे सेविंग्ज बँकेत ठेवायला हरकत नाही.’
कमाल आहे! म्हणजे रात्री पडलेलं स्वप्न काकांनी पाडलेलं टेलेपथीक स्वप्न होतं!
तिनं लगेच काकांना फोन लावला.
‘तुम्हाला कसं कळलं की माझे एका पतसंस्थेत पैसे आहेत?’
‘मला तुझ्याबद्दल बरंच कांही माहिती आहे. मला हेही माहीत आहे, की तू कोण आणि काय आहेस आणि काय करतेस दिवसभर’
‘म्हणजे?’
‘म्हणजे तू तुझ्या आई-वडिलांपासून दूर, पुण्यात एकटीच रहातेस. तू एक खूप हुशार, मल्टी-टॅलेंटेड मुलगी आहेस. जिनिअस वन. पण तू तुझ्या हुशारीचा फारसा उपयोग करून घेत नाहीस. कारण तू डिप्रेसड आहेस. या डिप्रेशनमुळं तुझं वजन बरंच वाढलंय. तू रात्री बराच वेळ जागतेस आणि दिवसा झोपा काढतेस. आणखी बरंच कांही सांगू शकतो मी तुझ्याबद्दल, पण नंतर कधीतरी’
‘ओह… म्हणजे तुम्ही माझ्यावर चांगलाच वॉच ठेवला आहे… माझी माहिती काढली आहे. ’
‘हो… यू आर राईट’
‘पण काका, माझ्यावर वॉच ठेवण्याचं कारण?’
‘तुझ्यावर कांही संकट येऊ नये म्हणून’
‘आय सी… पण मीच का?’
‘ते तुला नंतर सांगेन’
‘आताच सांगा ना!’
‘नाही…. नंतर म्हणजे नंतर’
‘ओके… काका, रात्री पाडलेल्या स्वप्नाबद्दल धन्यवाद. मी आज-उद्याच त्या पतसंस्थेतले पैसे काढून घेते आणि दोन तीन चांगल्या बॅंकांमध्ये विखरून ठेवते’
नंतर तिनं म्युच्युअल फंड्सचा अभ्यास करून एफ.डी. मधले पैसे तीन वेगवेगळ्या इंडेक्स फंड्समध्ये गुंतवले.
एकदा ती नेहमीप्रमाणे दिवसा झोप काढत होती तेंव्हा तिला एक विचित्र स्वप्न पडलं. त्या स्वप्नात ती चक्क म्हातारी झाली होती पण स्वप्नातला तिचा तो दिवस नेहमीप्रमाणेच गेला. म्हणजे त्या स्वप्नात तिचं अजून लग्न झालं नव्हतं, ती एकटीच रहात होती, तिच्यापुढे कांही गोल्स नव्हते, ती दुपारी झोपली आणि संध्याकाळी उठली, इकडं तिकडं फिरून आली, टी.व्ही. बघितला, मग whats app वर चॅट करत बसली. चॅटिंगचा कंटाळा आल्यावर एक भितीदायक पुस्तक वाचत बसली.
रात्री तीन वाजता तिनं पुन्हा एकदा whats app चेक केलं. मग झोपली. त्या झोपेतल्या झोपेत तिला एक स्वप्न पडलं… काका स्वप्नात आले आणि म्हणाले, आता तरी सुधर की बये…. सांगून सांगून थकलो मी. तिला स्वप्नातल्या स्वप्नातनं जाग आली, मग स्वप्नातनं जाग आली. मग ती खाडकन उठली आणि बघते तर काय ती अजून तरुणच होती. तरी पण खात्री करून घेण्यासाठी तिनं आरशात बघितलं. ती तरुणच होती, पण डोळे सुजलेले, आळसावलेला चेहरा. काय तरीच दिसत होती.
तिनं पुन्हा एकदा ठरवलं, आता आपण दुपारी झोपायचं नाही आणि रात्री जागायचं नाही.
मग रात्री नऊ वाजता ती जेवायला म्हणून बाहेर पडली. ती तिच्या मोपेडवरनं एकटीच चालली होती. मध्येच अंधार असलेला एक सुनसान भाग आला. तिला मोपेडच्या आरशात दिसलं, पाठीमागं कुणीतरी बसलं आहे. ती दचकली. थांबावं तर तो भाग सुनसान. आजूबाजूला फारशी वर्दळ नाही. तिनं गाडीचा वेग वाढवला. थोडं पुढं जाऊन मेन रोडवर आली. मग तिनं मागं वळून बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं.
हा काय प्रकार होता? भास? की आणखी कांही?
मराठी लघुकथा वॉचब्लॉक
जेवून घरी परत आल्यावर तिनं whats app चालू केलं. काकांचा मेसेज होता, ‘रात्री असं कुठं भटकत जाऊ नकोस पोरी… उगीच तुला कांहीतरी भास व्हायचे आणि तू घाबरायचीस. आणि रात्री एवढ्या उशीरा का जेवतेस? चांगलं नसतं ते आरोग्याला’
आता मात्र तिला काकांची भिती वाटू लागली. त्यांच्यापासनं आपली कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. त्यांचा नेमका काय हेतू आहे आपल्यावर पाळत ठेवण्याचा हेही कळत नाही. हाय देवा! आता काय करायचं?
रात्रीचे बारा वाजले. काकांचा whats app वर मेसेज आला, ‘तू ठरवलं होतास ना रात्री जागायचं नाही म्हणून? झोप आता’
तिला त्यांचा राग आला. तिच्या मनात आलं, आता यांना ब्लॉकच करावं. म्हणजे आपल्याला त्यांचे मेसेजेसच येणार नाहीत.
एवढ्यात काकांचा आणखी एक मेसेज आला, ‘मला ब्लॉक वगैरे करू नकोस. त्यात तुझाच तोटा आहे’
माय गॉड! मी काकांना ब्लॉक करायचा विचार केला आणि त्यांना ते लगेच कळलं. आपल्या मनात काय चाललंय हे पण त्यांना कळतं. हे अतीच चाललंय. बास झालं आता.
मग तिनं काकांना व्हाट्स अपवर पटकन ब्लॉक करून टाकलं. त्यांचा फोन नंबरही ब्लॉक केला. आता त्यांचे मेसेजेस येणार नाहीत आणि फोनही येणार नाहीत. तिनं प्रिकॉशन म्हणून काकांना फेसबुकवरसुद्धा ब्लॉक केलं.
मग ती झोपली. गाढ झोपेत काका परत स्वप्नात आले. म्हणाले, ‘तू मला ब्लॉक केलंस म्हणून काय झालं? त्यानं मला कांही फरक पडत नाही. तू जिथं कुठं असशील तिथं तुझ्या जवळपासच मी असतो हे ध्यानात ठेव…. तुझ्या सावलीसारखा. तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझी पाळत आहे. तुझ्या मनात काय चाललेलं असतं हे पण मला लगेच कळतं….. तुझी गाडी रुळावर येईपर्यंत तुझी माझ्यापासून तुझ्यापासून सुटका नाही, समजलं?
ती दचकून जागी झाली. मग हुंदके देऊ लागली. जोरजोरानं रडू लागली.
या माणसापासून सुटका कशी करून घ्यायची? कांही तरी केलंच पाहिजे आता…..
तिच्या सुपीक डोक्यात वेगवेगळे प्लॅन शिजू लागले.
(मराठी लघुकथा वॉचब्लॉक: पुढे चालू….)
इतर काही लघुकथा
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स