दिशाची गोष्ट: मी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये

महावीर सांगलीकर

दिशाची गोष्ट भाग 15

मुंबई पोलीस हेडक्वार्टरच्या गेटजवळ पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्या पाकिटात दिशाचा फोटो आहे… अचानक माझी पावलं थबकली. कदाचित पोलिसांनी आपली झडती घेतली तर? आपल्या पाकिटात तिचा फोटो असणे आपल्याला परवडणार नाही. मी गेटपासून बाजूला झालो. जरा दूर गेलो. खिशातून पाकीट बाहेर काढलं. त्यातून दिशाचा फोटो बाहेर काढला. आता याचं करायचं? कुठं लपवायचा? पॅन्टच्या चोरखिशात? तिथं लपवला तरी पकडलं जाण्याची शक्यता…..  मग फाडून फेकून द्यायचा? बारीक बारीक तुकडे करून?

फोटो फाडायचा विचार मनात आल्याबद्दल माझा मलाच राग आला. मग अचानक डोक्यात एक कल्पना आली… हा फोटो आपण खाऊन टाकूया…. म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो फाडण्याचा प्रकार आपल्याकडून होणार नाही,  आणि तो फोटो आपल्याच शरीरातच जिरून जाईल. मी लगेच एकदा फोटातल्या दिशाकडं प्रेमानं बघितलं  आणि तो फोटो तोंडात टाकला. चावून चावून खाऊन टाकला…..

मग मी गेटमधून आता शिरलो. एक पोलीस दिसला, त्याला विचारलं सायबर सेल कुठे आहे? त्यानं इमारतीच्या एका भागाकडे बोट दाखवलं.

मुंबई सायबरसेलबद्दल माझ्या भव्य-दिव्य कल्पना होत्या. त्याकाळात टी.व्ही. वरील  सी.आय.डी. ही सिरीअल मी बघत असे. सायबर सेलचं ऑफीस सी.आय.डी. सीरिअल मधल्या सीआयडीच्या ऑफिस सारखंच भव्य-दिव्य असेल अशी माझी कल्पना होती. पण सायबर सेल अशी पाटी बघून तिथं आत शिरलो तर ती साधारण 12 बाय 12 आकाराची एक खोली होती. 3-4 कॉम्प्यूटर होते आणि सात-आठ ऑफिसर्स काम करत बसले होती. मला बघून एकाने  म्हंटलं, ‘बोला काय काम आहे?’

मी म्हटलं ‘शेख साहेबांना भेटायचं आहे’
‘ते अजून यायचे आहेत,’ असे सांगून तो म्हणाला, ‘काय काम आहे त्यांच्याकडे?’
‘मला तुमचं समन्स आलंय. मी पुण्याहून आलोय. …महावीर सांगलीकर’
मी असे म्हणताच सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मग कांहींनी एकमेकांकडे बघितले.
एवढ्यात तो ऑफिसर म्हणाला, ‘तुमच जेवण झाले आहे का?’
मी ‘नाही’ अशी मान हलवली.
‘मग तुम्ही जेवून या. तुम्ही येईपर्यंत शेख साहेब येतील’ तो म्हणाला.

मी पुन्हा गेटच्या बाहेर जावून एक हॉटेल शोधले आणि जेवून घेतले. मग पुन्हा सायबर सेलमध्ये गेलो. त्यावेळी तिथे मला आणखी एक नवीन व्यक्ती दिसली. मघाच्या ऑफीसरने मला बघताच त्या नवीन व्यक्तीला हळू आवाजात सांगितले, ‘ती त्या कोठारी मॅडमची केस आहे ना…. हेच ते महावीर सांगलीकर….’ आणि माझ्याकडे इशारा केलं. त्या सिनिअर व्यक्तीने माझ्याकडे बघितले आणि ‘काय रे, कशाला असले उद्योग करतोस? उगीच आमच्या डोक्याला ताप करून ठेवलाय’ असे उदगार काढले. मग ते त्या ऑफिसरला म्हणाले, ‘राणेंना सांगा यांची चौकशी करायला’.

ते सिनिअर ऑफिसर गडबडीत दिसत होते. ते निघून गेले.
मग तो ऑफिसर मला म्हणाला, ‘ते शेख साहेब होते. दुसऱ्या कामासाठी बाहेर चाललेत. तुमची चौकशी राणे साहेब करणार आहेत’ 

दिशाची गोष्ट भाग 15

थोड्या वेळात राणे साहेब आले. एका कॉम्प्यूटरसमोर बसले. मघाच्या ऑफिसरने राणे साहेबांना ‘हेच ते महावीर सांगलीकर’ असे सांगितले. राणे साहेबांनी माझ्याकडे बघितले आणि त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसायची खूण केली. मी लगेच त्या खुर्चीवर जावून बसलो.

राणे साहेबांनी त्यांचा कॉम्प्यूटर चालू केला. मग थोड्या वेळाने इंटरनेट कनेक्शन सुरू केले. मग मला म्हणाले, ‘इकडे या… माझ्या शेजारी येवून उभा रहा’

मी लगेच खूर्चीवरून उठलो, राणे साहेबांच्या शेजारी जावून उभा राहिलो. कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर याहूमेलचे लॉग इन पेज दिसत होते. राणे साहेबांनी त्यात माझा यूजर आय.डी. देखील टाकला होता.
‘पासवर्ड टाका तुमचा’ त्यांनी मला हुकूम केला. मी लगेच पासवर्ड टाकला. मला आलेल्या इमेल्सची लिस्ट स्क्रीनवर दिसू लागली. मग ते म्हणाले, ‘बसा त्या खुर्चीवर थोडावेळ’

मी परत खुर्चीवर जावून बसलो.

मी लगेच ओळखले, राणे साहेब आता दिशाकडून आलेल्या मेल्स चेक करणार, त्या डिलीट करणार.
थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘या इकडे..’
मी परत त्यांच्या शेजारी जावून उभा राहिलो. स्क्रीनवर मेल्सची लिस्ट दिसत होती.  त्यात बऱ्याच मेल्स दिशाकडून आलेल्या होत्या, त्या त्यांनी टिक केल्या होत्या.
‘या मेल्स डिलीट करा…’ राणे साहेब म्हणाले
‘धिस इज नॉट फेअर सर.. तुम्ही मलाच सांगताय या मेल्स डिलीट करायला? सॉरी, आय कान्ट डू इट. बट यू आर फ्री टू डिलीट देम, इफ यू वान्ट’ मी म्हणालो.

त्यांनी लगेच स्क्रीनवरचे डिलीट बटन क्लिक केले. दिशाच्या त्या मेल्स डिलीट झाल्या. मग ते म्हणाले, ‘बसा तिकडे, मी आणखीन मेल्स आहेत का ते बघतो’
‘सर, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात… मेल सर्च बॉक्समध्ये दिशा टाईप करा, आणि सर्च बटनवर क्लिक करा. तिच्या उरलेल्या सगळ्या मेल्स एकत्र दिसतील तुम्हाला’
त्यांनी तसे करताच दिशाच्या उरलेल्या मेल्स स्क्रीनवर आल्या.
‘बरेच हुशार दिसताय’ असे म्हणत त्यांनी डिलीट ऑल बटन दाबले. मग मला म्हणाले, ‘दिशाचा फोटो कुठाय?’
‘तुम्ही सगळ्या मेल्स डिलीट केल्या, त्यांच्याबरोबर तिचा फोटोही डिलीट झाला’
‘दुसरीकडे कोठे सेव्ह करून ठेवला नाहीत ना?’
‘होय, माझ्या मेंदूत आणि हृदयात सेव्ह केलेला आहे. तो तुम्हाला डिलीट करता येणार नाही, अगदी माझा मी पण डिलीट करू शकत नाही’
‘छान….. पाकिटात नाही ना एखादा फोटो?’
‘नाही’
‘पाकीट दाखवा’
मी खिशातून पाकीट काढून त्यांना दाखवले. त्यात फोटो नव्हताच.
राणे साहेबांनी विचारले, ‘आणखी कोणती इमेल अकाउंटस आहेत?’
‘हॉटमेलचे होते, पण ते हॅक झाले आहे’
‘कोणी हॅक केले, कांही कल्पना?’
‘नाही माहीत’
‘बसा आता त्या खुर्चीवर आरामशीर… मला तुमचे स्टेटमेंट घ्यायचे आहे’

मी खुर्चीवर जाऊन बसलो. राणे साहेबांच्या शेजारच्या कॉम्प्यूटरवर आणखी एक ऑफिसर बसला होता. त्याला राणे साहेब म्हणाले, ‘तुम्ही टाईप करा हे काय म्हणतात ते’
मग माझ्याकडे वळून म्हणाले, ‘नाव?
‘महावीर सांगलीकर’
‘जन्मगाव कुठले?’
‘सांगली’
‘खुद्द सांगली?’
‘नाही, सांगली जिल्ह्यातले अंकलखोप हे गाव’
‘सध्या रहाणार?’
‘चिंचवड, पुणे’
‘जन्मतारीख?’
‘22 मार्च 1958’
‘धर्म?’
या प्रश्नामुळे माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या. मी म्हणालो, ‘सर, धर्म कशाला पाहिजे? इथे धर्माचा काय संबंध?’
‘विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या… माझ्या प्रत्येक प्रश्नाचा या केसशी संबध आहे. धर्म कोणता तुमचा?’ त्यांनी जरा नाराजीतच विचारले.
‘म्हणजे मी जन्मताना जो धर्म होता तो सांगायचा की आताचा सांगायचा?’ मी विचारले.

माझ्या या प्रश्नामुळे राणे साहेब गडबडले. एक स्मार्ट दिसणारा ऑफिसर फिदीफिदी हसत म्हणाला, ‘राणे साहेब, हे पुणेकर लोक बोलायला तुम्हाला ऐकणार नाहीत.’ बहुधा तो ऑफिसर पुणेकर असावा. त्याचे वाक्य  ऐकून मला पुणेकर असल्याचा जरा जास्तच अभिमान वाटला.

दिशाची गोष्ट भाग 15

मग मी म्हणालो, ‘सर माझा धर्म जैन आहे. जन्मल्यापासून’
‘पंथ?’
‘दिगंबर’
‘मातृभाषा?’
‘मराठी’
‘शिक्षण?’
‘बी.ए.’
‘त्या पोरीचं नाव सांगा’
‘दिशा’
‘पूर्ण नाव?’
‘दिशा कोठारी’
‘धर्म?’
‘जैन’
‘पंथ?’
‘श्वेतांबर’
‘मातृभाषा?’
‘गुजराती असावी, पण सांगता येत नाही. ती मराठी, गुजराती, हिंदी सारख्याच सहजतेने बोलते’
‘तुम्ही काम काय करता?’
‘फोटोग्राफी…. आणि लिखाण’
‘महिना उत्पन्न किती?’
‘पोटापुरते..’
‘नक्की आकडा सांगा…’
‘सर, मी पगारी नोकर नाही..’
‘तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे?’
या प्रश्नाने मी नाराज झालो… म्हणालो,
‘सर हे काय चालले आहे? हे स्टेटमेंट आहे की लग्नाचा बायोडाटा? मला कोणते प्रश्न विचारायचे हे तुम्हाला दिशाने सांगितलेले दिसतेय?’
माझ्या या बोलण्याने राणे साहेब गडबडले. मघाचा तो स्मार्ट ऑफिसर पुन्हा फिदीफिदी हसला.
‘सर, लग्नासाठी चौकशी करायची असेल तर माझ्या वडिलांना भेटा. मी गैरलागू प्रश्नांची उत्तरे अजिबात देणार नाही’
‘ठीक आहे, मला आता हे सगळे सुरू कसे झाले ते सांगा’

दिशाची सगळी स्टोरी मला आत्तापर्यंत पाठ झालेलीच होती. मी ती सांगयाला सुरवात केली. मी नेहमीच्या गतीने सांगत होतो आणि तो टायपिस्ट ऑफिसर ती वेगाने आपल्या कॉम्प्यूटरवर टाईप करून घेत होता. सगळे ऑफिसर काम करता करता ती गोष्ट मन लावून ऐकत होते. शेवटी एकदाची सगळी स्टोरी सांगून झाली.

मग त्या ऑफिसरने त्याची प्रिंट काढली. जवळ-जवळ 40 पाने. त्यांना स्टेपल मारून राणे  साहेबांच्याकडे दिली. राणे  साहेबांनी त्याच्यावर एक नजर टाकून ती पाने मला दिली आणि मला म्हणाले, ‘वाचून बघा आणि सही करा’

ते स्टेटमेंट मी भरभर वाचून काढले आणि म्हणालो, ‘आहे सगळे बरोबर… मला याची एक कॉपी पाहिजे’ 
‘ती आणि कशाला?’
‘मी स्टेटमेंट दिलेय म्हणजे त्याची माझ्याकडे एक कॉपी नको का? पुढे मागे मला कथा-कादंबरी लिहायची असेल तर संदर्भ म्हणून उपयोगी पडेल’
मग मला लगेच एक कॉपी देण्यात आली.
मग राणे साहेब म्हणाले, ‘परत तिला इमेल पाठवू नका, फोनही करू नका’
‘आणि तिने इमेल वगैरे पाठवली तर?’
‘तर मला कळवायचं… मग मी बघतो तिचं काय करायचं ते. तुम्ही आता जाऊ शकता..’

मी राणे साहेबांना विचारले, ‘पण सर, तक्रारदार कुठाय?’
‘ती आली नाही’ ते म्हणाले
‘का? तुम्ही माझी ओळख परेड का घेतली नाही? मीच महावीर सांगलीकर आहे याला पुरावा काय? कदाचित मी दुसरा कोणी तरी असू शकतो…’
‘तुम्हीच महावीर सांगलीकर आहात…. दिशानं तुमचा फोटो देऊन ठेवला होता आमच्याकडे.. बर आता जा तुम्ही … नंतर तुम्हाला ट्रेन नाही लवकर पुण्याला जायला’
‘ठीक आहे जातो.. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. स्टेटमेंट देताना सांगायची राहिली होती’
‘कोणती गोष्ट?’
‘माझ्या पाकिटात दिशाचा फोटो होता. पण येथे आत यायच्या आधी मी तो खाऊन टाकला’
‘खाऊन टाकला? का?’ राणे साहेब आश्चर्याने म्हणाले.
‘कारण तो तुम्हाला सापडू नये म्हणून. तो मी फाडू शकत नव्हतो, म्हणून खाऊन टाकला … सांगाल ना दिशाला?’
सगळेजण स्तब्ध झाले. मी तेथून बाहेर पडलो.

गेटपर्यंत पोहोचलो तेवढ्यात माझ्या मागोमाग सायबर सेलमधलाच एक पोलीस मोटरसायकलवर आला. म्हणाला, ‘थांबा. मी तुम्हाला व्ही.टी. पर्यंत सोडतो’
‘नको नको, मी जातो चालत…’ मी म्हणालो.
‘नाही, साहेबांची ऑर्डर आहे तुम्हाला व्ही.टी.पर्यंत सोडायची..’
‘कुणाची? राणे साहेबांची?’
‘नाही, शेख साहेबांची’

दिशाची गोष्ट भाग 15

त्या पोलीसाची मोटर सायकल व्ही.टी.च्या दिशेने पळू लागली.
वाटेत मी त्याला विचारले, ‘काय हो, काय भानगड आहे? माझी एवढी सहजासहजी सुटका कशी झाली या केसमधनं? ब्लॅक मेलिंग वगैरे कसले भयानक आरोप होते माझ्यावर…’
‘मी जास्त कांही सांगू शकत नाही, पण त्या पोरीनंच तुम्हाला वाचवलं…. राणे साहेबांनी तुम्हाला अडकवायचे ठरवले होते. तुम्हाला अटक करण्याचा विचार होता त्यांचा.  पण काल तिनं तक्रार मागं घेतली आणि NC नोंदवली. वर म्हणाली, सांगलीकरांची नुसती चौकशी करून सोडून द्या… त्यांना त्रास नका देऊ..’
‘कमाल आहे… आज आली होती का ती तिथे?’ मी विचारले.
‘नाही…’

त्या पोलिसाने मला व्ही.टी. स्टेशनच्या बाहेर सोडले. मी त्याचे आभार मानले. 

एके ठिकाणी टेलेफोन बूथ दिसला. तिथं जाऊन मी दिशाच्या घरच्या नंबरवर फोन लावला..

‘मे आय स्पीक टू दिशा कोठारी…? मी माझा आवाज मलाही ओळखणार नाही एवढा बदलून विचारले.
‘यस, मिस्टर सांगलीकर, दिशा हिअर’ तिकडून आवाज आला.
‘थॅंक यू दिशा! थॅंक यू फॉर युवर टोटल को-ऑपरेशन…  टेक केअर, गुड बाय’
‘वेट… लिसन’ तिकडून आवाज आला, ‘यावेळी तुम्ही सुटलात माझ्या तावडीतून, पण पुढच्या वेळी…. शक्य नाही ते’
‘फरगेट इट…. देअर इज नो नेक्स्ट बर्थ…  पण तो असलाच तर पुढच्यावेळी माझी कांही हरकत नाही तुझ्या तावडीत सापडायला… गुड बाय’ असे म्हणत मी फोन कट केला.

(समाप्त)

दिशाची गोष्ट या दीर्घकथेचे आधीचे भाग ….

1 पत्रमैत्रिण2 पत्रमैत्रिण (भाग 2)3 दिशाची पुन्हा एन्ट्री
4 दिशा विविध भारतीवर5 दिशाच्या वागण्यामागील रहस्य6 राजकुमारी निर्भया
7 राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन8 दिशाचं वेगळं रूप9 अनबिलिव्हेबल दिशा
10 1857 ची बंडखोर दिशा11 इन्सल्ट12 पनिशमेंट
13 माझं कन्फेशन14 मुंबईवारीची पूर्वतयारी

इतर काही कथा ….

गूढकथा: सलोनी राठोड

गूढकथा: व्हर्च्युअल डॉटर

अँजेलिना बॅण्डची गोष्ट

रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी

TheyWon Online Magazine (English)

TheyWon Online Magazine (Hindi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *