© मानसिंगराव कुमठेकर, मिरज
सांगली जिल्ह्यात जैन संस्कृतीच्या प्राचीन पाऊलखुणा विविध गावांत विखुरल्या आहेत. शेकडो वर्षापासून येथे जैनधर्मीय नांदत आहेत. एक हजार वर्षांपूर्वीचे शिलालेख ताम्रपट आणि शिलालेखांमधून जिल्ह्यातील समृध्द जैन संस्कृतीचा मागोवा घेता येतो. त्या काळात भव्य अशी जैन मंदिर जिल्ह्यात उभारली. चालुक्य, शिलाहार आणि कलचुरी राजांनी या जैन मंदिरांना दान दिल्याचे दिसते.
एकेकाळी जिल्ह्यात जैन धर्म भरभराटीस आला होता. मिरज इतिहास संशोधन मंडळाने जिल्ह्यातील जैनधर्मीयांच्या प्राचीन पाऊलखुणा शोधून काढल्या आहेत.
सांगली जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे. या परिसरात हजारो वर्षांपासून विविध धर्मीयांचे वास्तव्य आहे. यामध्ये जैन धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत जैन धर्मीयांचे प्राबल्य जाणवते. सुमारे एक हजार वर्षांपासून जिल्ह्यात जैन धर्मीयांचे वास्तव्य असल्याच्या नोंदी मिळतात. या भागावर राज्य करणाऱ्या तत्कालीन चालुक्य, शिलाहार आणि यादव या राजवटींनी जैन धर्मीयांना आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी भगवान तीर्थंकरांची सुंदर मंदिरे बांधून दिली होती.
आजही अनेक गावांत या जैन मंदिरांचे अवशेष पाहावयास मिळतात. मिरजेतील आदिनाथ जैन मंदिरातील भगवान महावीरांची मूर्ती आणि कासार गल्लीतील महावीरांची मूर्ती या चालुक्यकालीन आहेत. मिरजेच्या किल्ल्यामध्ये खंदकात काही वर्षांपूर्वीपर्यंत भगवान पार्श्वनाथांची प्राचीन भग्न मूर्ती होती. पण, सध्या ती या ठिकाणाहून नाहीशी झाली आहे. तालुक्यातील आरग येथेही सुरेख असे प्राचीन जैन मंदिर आहे.
सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे
सांगलीत जिल्ह्यात शेकडो वर्षांपूर्वी जैन मंदिरे बांधली गेली. काही ठिकाणी जैन लेणीही आहेत. कुंडल येथील डोंगरावर असणारी झरी पार्श्वनाथाची लेणी प्रसिद्ध आहेत. चालुक्य आणि शिलाहारांच्या काळातील जैन मंदिरे, घाटनांद्रे, बोरगांव (देशिंग), अंकलखोप, कोगनोळी, भाळवणी, मिरज, तिसंगी, मालगाव, बेळंकी येथे होती. या गावात या मंदिराचे अवशेष, भगवान तीर्थंकरांच्या मूर्ती, शिलालेख आजही आढळून येतात. त्यावरून तत्कालीन जैन मंदिरांच्या भव्यतेची कल्पना करता येते.
यापैकी काही गावात आज जैन समाजाचा एकही व्यक्ती आढळत नाही. मात्र, या गावात हजार वर्षांपूर्वीच्या जैन संस्कृतीचे अवशेष आजही पहावयास मिळतात. आरग येथे चालुक्यकालीन जैन मंदिर आजही चांगल्या अवस्थेत आहे. अनेक जैन मंदिरातून प्राचीन तीर्थंकरांच्या प्राचीन मूर्ती आहेत. कुकटोळीजवळ गिरीलिंगाच्या डोंगरावरही भगवान महावीरांच्या मूर्तीचे अवशेष पहावयास मिळतात.
शिलालेखांतून जैन संस्कृतीचे दर्शन
सांगली जिल्ह्यात विविध गावांत शिलालेख आढळून आले आहेत. त्यातून सुमारे एक हजार वर्षांच्या जैन संस्कृतीचे दर्शन घडते. शिलाहार राजांच्या काळात जिल्ह्यात जैन धर्म भरभराटीस आलेला दिसतो. शिलाहार गंडरादित्याच्या सन १११० मधील ताम्रपटात मिरींज देशातील (म्हणजे सध्याच्या मिरजेतील) इरकुडी येथे गंडसमुद्राच्या किनारी जैन मंदिर बांधून त्याच्या पूजेअर्चेकरिता जमीन दान दिल्याचे म्हटले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगांव येथील सन ११५० मध्ये चालुक्यनृपती जगदेकमल्ल याच्या कारकिर्दीत कोरलेल्या शिलालेखात बोरगाव येथे केत गावंड याने बांधलेल्या पार्श्वनाथ मंदिराला आणि जैन मुनींच्या अन्नदानासाठी बिज्जल कलचुरीचा अधिकारी लख्खणदेव याने दान दिल्याची नोंद आहे.
बोरगांव येथे मोठे जैन मंदिर असल्याचे या नोंदीवरून दिसते. सध्या मात्र, येथे एकही जैन धर्मीय येथे नाही. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील सन ११७३ च्या शिलालेखात गावातील जैन मंदिराला व्यापाऱ्यांनी दान दिल्याचे दिसते.कलचुरी राजा रायमुरारी सोयीदेव याच्या काळातील हा लेख आहे. आज या गावात जैन समाज नाही. मात्र, जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, शिलालेख येथे आढळून येतो. याच गावातील सन १०७० च्या चालुक्य राजा भुवनेकमल्ल काळातील लेखात जैन मंदिरांना गावातील नागरिकांनी दान दिल्याची नोंद आहे.
खानापूर तालुक्यातील कोळदूर्ग (पळशी) येथील लेखात एका जैन मुनीला दान दिल्याचे म्हटले आहे. चालुक्य राजा जगदेकमल्ल याच्या काळातील हा लेख आहे. अंकलखोप येथील सन १०७७ मधील लेखात गावात मौठी जैन बस्ती असल्याचा उल्लेख आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी आणि मिरज तालुक्यातील मालगाव येथे पाया खणताना जैन मूर्ती मिळाल्या आहेत. कोगनोळी येथील जैन मूर्तीवर चालुक्यकालीन लेख आहे. घाटनांद्रे येथील जैन मूर्ती आणि शिलालेख मिळाला आहे.
जैन समाजाकडे देशमुखी आणि पाटील वतन
शिवकाळापासून जिल्ह्यातील अनेक गावात पाटील वतन हे जैन समाजाकडे असल्याचे दिसते. सांगलीच्या पाटील वतनाची अदिलशाही कालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत. याचकाळात मिरज प्रांताच्या देशमुखी आणि सरदेशमुखीचे अधिकारही जैन धर्मीयांकडेच होते.
जिल्ह्यात आढळून आलेल्या प्राचीन शिलालेख, ताम्रपट आणि ऐतिहासिक कागदपत्रांवरून शेकडो वर्षांपासून या परिसरात जैन धर्मियांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. विविध गावातून विखुरलेल्या शिल्पावशेष आणि लेखांमधून एकेकाळी जिल्ह्यात समृध्द असलेल्या जैन संस्कृतीच्या पाऊलखुणा पहावयास मिळतात.
मिरज इतिहास मंडळाकडून जैन संस्कृतीचा शोध
जिल्ह्याला लाभलेल्या वैभवशाली जैन संस्कृतीचा शोध मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर हे गेली काही वर्षे घेत आहेत. त्यांनी भाळवणी, घाटनांदे, अंकलखोप, कोगनोळी, बेळंकी येथील अप्रकाशीत जैन शिलालेख शोधून येथील जैन संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे.
चालुक्य, कलचुरी काळातील हे लेख महाराष्ट्रातील जैन धर्माच्या इतिहासाचे महत्त्वाची साधने आहेत. जिल्ह्यात अनेक गावात आज जैन अवशेष आढळतात. पण, यापैकी काही गावातून जैन समाजाचे स्थलांतर झाल्याचे दिसते. तर काही जैन मंदिराचे शैव मंदिरांत रूपांतर झाल्याचे दिसते. या स्थलांतरा मागच्या कारणांचा शोध मिरज इतिहास मंडळामार्फत घेतला जात आहे. सांगली जिल्ह्यातील जैन संस्कृतीवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा मंडळाचा संकल्प आहे.
So good information
जैन धर्म हा अतिशय प्राचीन,सनातन आहे.संपूर्ण भारतामध्ये अनेक मंदिरे होती.काही मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.अनेक शिलालेख हस्त लिखिते
जैन धर्माची भरभराट व सुवर्ण भारत
सिद्ध करतात.जैन धर्म हा कालातीत
असून यावर शास्त्रीय संशोधन होणे
काळाची गरज आहे.